“स्वतः प्रामणिकपणे, कष्टपूर्वक व निष्ठेने आयुष्यभर समाजासाठी काम करणे हे महत्त्वाचे आहेच. परंतु, ते पुरेसे नाही. आपले विचार व त्यामागील प्रेरणा दुसऱ्यापर्यंत पोहोचविता येणे व त्या व्यक्तीलाही समाजकार्य करावेसे वाटू लागणे, ही महत्त्वाची आवश्यकता आहे. त्यासाठी, स्वतःच्या बोलण्याने, वावरण्याने आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये आपल्यासारखे वागावे, बोलावे अशी प्रेरणा निर्माण झाल्यास संघटना अधिक काळ टिकू शकते. तसे प्रेरक आणि प्रेरणावाहक होणे म्हणजे कार्यकर्ता होणे…”
संघटना आणि समाजजीवनाचे सातत्य
एखाद्या शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असतात तेव्हा ते आपल्या विषयातील माहितीचे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण करत असतात. अनेक शिक्षक केवळ माहितीच देतात, आणि अनेक विद्याथ केवळ ती माहितीच ग्रहण करतात. पण काही शिक्षक माहिती बरोबर अधिक ज्ञान मिळवण्याची प्रेरणा देखील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात. अध्यापकांना स्वतःला सतत अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची प्रेरणा असेल, तरच ते विद्यार्थ्यांमध्ये तशी प्रेरणा निर्माण करू शकतात. एका प्रेरित व्यक्तीने दुसऱ्यामध्ये प्रेरणा जागृत करणे म्हणजे प्रेरणेचे संक्रमण करणे. एखादा चांगला कलाकार जेव्हा आपल्या शिष्याला त्या कलेतले धडे देत असतो, तेव्हा तो केवळ कलेचे तंत्र आणि कलेचे मर्म ग्रहण करण्याची दृष्टी देत नाही, तो त्या कलेमध्ये उत्तमता गाठण्याची, नवे नवे प्रयोग करण्याची प्रेरणासुद्धा स्वतःच्या उदाहरणाने शिष्यामध्ये संक्रमित करत असतो. एखादा कुशल तंत्रज्ञ त्याच्याकडे उमेदवारी करणाऱ्या शिकाऊ उमेदवाराला अवजारे हाताळण्याचे व तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य शिकवत असतो. तेव्हा नकळत आपले काम चोख आणि दोषरहित झाले पाहिजे हा आग्रह म्हणजे उत्तमतेची प्रेरणाच संक्रमित करता असतो. पी.एच्. डी.चे संशोधन करणारा विद्याथ आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शकाकडून केवळ प्रश्न शोधण्याची शोधक दृष्टी आणि त्यावर उपाय शोधण्याची संशोधन पद्धतीच शिकत नाही. त्याचा मार्गदर्शक त्याच्यामध्ये त्याच्या संशोधन विषयाची सीमारेषा पुढे पुढे सरकवण्याची प्रेरणाही संक्रमित करत असतो. संघटनेमध्ये संघटनेतील ज्येष्ठ सदस्यांनी नवीन सदस्यांमध्ये ध्येयदृष्टीचे संक्रमण तर करावे लागतेच, त्याबरोबर ते ध्येय गाठण्यासाठी सतत सुबुद्ध कष्ट करण्याची ध्येयप्रेरणाही संक्रमित करावी लागते. माहिती, ज्ञान, कौशल्य, कार्यपद्धती, मूल्ये, विचारपद्धती आणि ध्येयदृष्टी या सगळ्याचे संक्रमण अनेक लोक आपापल्या शक्तीप्रमाणे आपल्या बरोबर काम करणाऱ्या नवीन लोकांमध्ये करत असतात. हे संक्रमण करता करता जे प्रेरणेचेही संक्रमण करतात, ते आपल्या कामाची परंपरा पुढे चालू ठेवतात. प्रेरणा संक्रमित करता येणे म्हणजेच प्रेरणा-संक्रामक होता येणे, हे संघटनेतील कार्यकर्त्याला संघटनेचे काम अनेक पिढ्या चालू राहण्यासाठी आवश्यक असते.
आपणासारिखे करावे इतरांसी
कार्यकर्त्याचा पाचवा गुण म्हणजे आपल्यासारख्याच आणखी प्रेरणासंपन्न व्यक्ती घडवण्याची क्षमता. समाजात जुन्या पिढ्या मागे पडतात, नवीन येतात. सामाजिक जीवनाचा एकत्र येण्याचा हेतू आणि प्रक्रिया आपले स्वरूप बदलतात पण त्या शाश्वत असतात. समाजातल्या प्रक्रिया, सामाजिक जीवनाचे हेतू हे पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आधीच्या पिढीला करावं लागतं. तो त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा असतो. पुढच्या पिढीत जैविक, आनुवांशिक वारसा संक्रांत होतच असतो. पण सामाजिक, सांस्कृतिक वारसा पुढे संक्रांत होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तो पोचवण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती स्थिर समाजरचनेसाठी आवश्यक असतात. स्थायी संघटनांसाठी, कार्यांसाठीही अशा व्यक्तींची आवश्यकता असते. कार्यपद्धती, विचारपद्धती आणि अभिव्यक्ती यांतून तो वारसा प्रकट होतो. कार्यनिष्ठा, ध्येयवाद, मूल्ये आणि प्रेरणा संक्रांत करण्याची शक्ती सर्वांत महत्त्वाची असते. बदलता परिवेष, संघटना व कार्य यांतील बदलतं वातावरण ध्यानी घेऊन हे संक्रमण करण्यासाठी मोठ्या प्रतिभेची आवश्यकता असते.
पेरते व्हा, प्रवर्तक व्हा
वाद्यघोषासाठी भारतीय संगीतावर आधारित अनेक रचना बसवणारे, संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार बसवणारे मा. बापुराव तथा श्री. ह. वि. दात्ये यांच्या अमृतमहोत्सवाच्या समारंभात श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी सांगितले की, ‘जाणता राजा’चे प्रयोग बसवताना त्या नाट्यसंचात जी शिस्त, नेटकेपणा, नियोजन, वक्तशीरपणा असे गुण आलेले आहेत, त्याचे मूळ कारण बाबासाहेबांनी श्री. दात्ये यांच्या देखरेखीखाली केलेला घोषाचा सराव हे होते. श्री. दात्ये यांनी काही गुण बाबासाहेबांमध्ये पेरले आणि ते ‘जाणता राजा’च्या संचातील सर्वांमध्ये बाबासाहेबांनी पेरले.
प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष कै. डॉ. वसंतराव गोवारीकर यांची ‘इस्त्रोची कथा’ ही लेखमाला ‘सकाळ’च्या सुट्टीच्या पानात क्रमशः येत होती. भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रातील प्रगतीचे एक मोठे स्वप्न डॉ. विक्रम साराभाई यांच्या मनात होते. ते स्वप्न त्यांनी डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात कसे उतरवले याचे वर्णन डॉ. गोवारीकर यांनी एका लेखांकात केले होते. डॉ. गोवारीकरांनी स्वत: तेच स्वप्न विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रातील हजारो शास्त्रज्ञांच्या मनात कसे उतरवले याचेही वर्णन एका लेखांकात होते. आपल्या आजूबाजूला असलेल्यांच्या मनात स्वप्ने पेरण्याविषयी बोलताना भरपूर नारळांनी लगडलेल्या झाडाचे उदाहरण कै. आप्पा सर्वांना देत. संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांभोवती नवे उमेदीचे तरुण कार्यकर्ते नेहमी असले पाहिजेत. कल्याणमित्र (Mentor) या भूमिकेतून त्यांनी संघटनेचा वैचारिक आणि कार्याचा वारसा हळूहळू या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला पाहिजे. इतकेच काय दलावरच्या दलप्रमुखाभोवती मुलांचा लडिवाळ मेळा नेहमी असला पाहिजे आणि त्या दलप्रमुखाकडे, प्रतोद किंवा साहाय्यक प्रतोदाकडे पाहात मुलांनी देशाशी, समाजाशी नाते जोडले पाहिजे. प्रत्यक्षात दिसायला खेळ चालले आहेत, सहली चालल्या आहेत, प्रात्यक्षिके, फराळ वा राखी विक्री चालली आहे पण प्रत्यक्ष न दिसले तरी त्यातून संघटन चाललेले आहे असे व्हायला हवे.
सर्व वयाच्या व्यक्तींना यावेसे वाटेल असे वातावरण आणि करावेसे वाटतील असे उपक्रम प्रबोधिनीत आहेत. त्यामुळे बालसंघटन, युवक संघटन, स्त्री संघटन, लोकसंघटनाचे अनेकानेक मार्ग आहेत. या विविध वाटांनी जे या कार्याच्या गाभ्यात येतील, दीर्घ कामासाठी सिद्ध होतील असे कार्यकर्ते घडण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व्यक्तिमत्त्वे प्रसन्न, स्नेहशील, स्वतः ध्येयधुंद आणि इतरांनाही ध्येयाची, कार्याची आस लावणारी असायला हवीत. याला म्हणायचे Regenerative असणे. नवे कार्यकर्ते सिद्ध करण्यासाठी प्रबोधिनीचा भाव, प्रबोधिनीची कार्यसंस्कृती आणि प्रबोधिनीचा ध्येयविचार इतरांमध्ये संक्रमित करण्याची प्रखर कृतिशीलता, सखोल चिंतनशीलता आणि निरपेक्ष प्रगाढ स्नेहशीलता लागते.
भाव, कार्यसंस्कृती आणि ध्येयविचाराचे संक्रमण
प्रबोधिनीचा भाव संक्रमित करणे म्हणजे सामाजिक किंवा राष्ट्रीय समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हे स्वतःचे कर्तव्य आहे असे समजून स्वयंस्फूतने आपल्याला सुचेल व जमेल ते काम, कोणाची वाट न पाहता सुरू करायला शिकवणे.
पुण्याच्या नागरी वस्त्यांमध्ये कालव्याच्या पाण्याचे लोट शिरले, किंवा तिथे आगीने झोपड्या जळाल्या तर कुटुंबांच्या पुनर्वसनाला धावून जाणे हा प्रबोधिनीचा भाव आहे. जम्मू आणि काश्मिर मधल्या अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरजालावरून शिक्षण-व्यवसायाच्या त्यांना माहिती नसलेल्या वाटांचे मार्गदर्शन करणे हा प्रबोधिनीचा भाव आहे. या भावाचे म्हणजे प्रतिसादीपणाचे संक्रमण करायचे आहे. प्रबोधिनीची कार्यसंस्कृती संक्रमित करणे म्हणजे गटाने मिळून काम करणे, सहविचाराने काम करणे, कामे योजनापूर्वक वाटून घेणे, प्रत्येक टप्प्याला कामाचा शोधबोध घेणे, आपले मनोगत गटामध्ये मोकळेपणाने सांगणे, नियमित सामूहिक उपासना करणे. हे सर्व अभ्यासपूर्वक, प्रतिभेचा वापर करून, आधुनिक तंत्रे वापरून व अडचणींवर मात करून काम करायला शिकवणे. आपल्या कामाची समग्रता अनुभवण्यासाठी प्रबोधिनीतील इतर गटांना आपल्या कामाचे निवेदन करत राहणे व इतर गटांचे काम समजून घेत राहणे, ही देखील प्रबोधिनीची कार्यसंस्कृती. आपल्या गटामध्ये, प्रबोधिनीच्या इतर गटांबरोबर व समाजामध्ये आधी स्वावलंबन अनुसरायला शिकवणे आणि नंतर स्वावलंबनाकडून परस्परावलंबनाकडे जायला शिकवणे म्हणजे ही कार्यसंस्कृती संक्रमित करणे.
खातेवाटप, नियोजन, आढावा, शोधबोध, भविष्यचिंतन, देशस्थितीचा अभ्यास या सर्वांसाठी सहविचाराच्या बैठकी, सेतूबंधन मेळावे, निवासी बैठकी, विभाग व केंद्रांचे संयुक्त कार्यक्रम यातून उत्तरदायित्व, सहयोगित्व व नवनिर्मितीक्षमता यांचे संक्रमण करायचे आहे. म्हणजेच प्रबोधिनीच्या कार्यसंस्कृतीचे संक्रमण करायचे आहे.
प्रबोधिनीचा ध्येयविचार संक्रमित करणे म्हणजे देशाचे भौतिक रूप पालटणे, समाज उद्योगप्रिय, संघटित, विजिगीषू वृत्तीचा व आपले गुण इतरांमध्ये संक्रमित करू इच्छिणारा बनवणे, आध्यात्मिक पायावरील सुसंस्कृत हिंदुत्व-विचार समाजजीवनातून व व्यक्ती-जीवनातून प्रकट करणे, हे विचार रुजवणे.
प्रबोधिनीच्या वार्षिक उपासना, पुनर्रचित संस्कारविधी, सामूहिक पद्यगायन व भजन, अभ्यासदौरे व अभ्यास शिबिरे, भवितव्य लेखाच्या निमित्ताने होणाऱ्या चर्चा, प्रतिज्ञाग्रहण, कार्यवाढीची स्वप्ने एकमेकांना सांगणे व एकत्र रंगवणे यातून प्रबोधिनीच्या ध्येयविचाराचे व ध्येयप्रेरणेचे संक्रमण करायचे आहे.
संघटना हा एक वाहता प्रवाह असतो. विशेषतः दीर्घकालीन उद्दिष्टे असलेल्या संघटना. दोन हजार वर्षे काम करण्याची आकांक्षा असणाऱ्या संघटना. त्यातील केंद्रस्थानीच्या व्यक्ती बदलतात, कार्यकर्त्यांचे संच बदलतात, समोर असणारी आव्हाने बदलतात, देशकाल व समाजाची परिस्थिती बदलते, पण व्यापक ध्येय मात्र तेच असते. ते ध्येय प्रथम विकसित मानवत्वाकडे आणि नंतर देवमानवत्वाकडे जाण्याचे आहे. सध्या दिसणाऱ्या वाटेवर ते राष्ट्रसेवेचे, मनुष्याचा आत्मसन्मान जागा करण्याचे, समाजसंस्थापनेचे आहे.
प्रेरणासंक्रमणाचे मार्ग आणि पद्धती
हे ध्येय कोणा एका व्यक्तीचे नाही, तर एका जयिष्णु, पुरुषाथ संघटनेचे आहे. आज हे ध्येयदर्शन ज्या व्यक्तींना झाले त्यांनी तो वारसा अन्य ध्येयप्रवण व्यक्तींना दिला पाहिजे. ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व कार्याला प्रारंभ करणाऱ्याचे असते, तसेच त्यांचा वारसा चालवणाऱ्या पुढील व्यक्तींचे असले पाहिजे अशी अपेक्षा करणे योग्य होणार नाही. प्रत्येक व्यक्तीची शक्तिस्थाने वेगळी असतात. कोणी भावनेला आवाहन करील, कोणी बुद्धीला आवाहन करील. मुख्य गोष्ट घडते ती प्रेरणाजागरण.
**************************************************************************************************************
एक मास्टर गिअर अनेक गिअर्सची चक्रे फिरवतो.
स्वत:ची प्रेरणा जिवंत ठेवून इतरांमध्ये प्रेरणेचे संक्रमण करणारा संक्रामक (रिजनरेटिव्ह) बनणे हे प्रबोधिनीच्या कार्यकर्त्याचे पाचवे लक्षण आहे. प्रतिसादी, उत्तरदायी, सहयोगी, नवनिर्माता आणि प्रेरणा-संक्रामक असा जो आहे तोच प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा आदर्श आहे. प्रतिसादी असणं, उत्तरदायित्वाची जाणीव, सहकार्यशीलता, प्रतिभा आणि इतरांना स्वतःप्रमाणे प्रेरणासंपन्न करण्याची शक्ती हे गुण समाजात राहूनच विकसित होतात.
हे सर्व गुण मनुष्यत्व अधिक विकसित करतात आणि त्याच्या ठायी मुळातच असलेली दिव्यता किंवा पूर्णता अधिकाधिक अंशानं प्रकट करतात.
*****************************************************************************************************************