कार्यकर्ते बनू या

प्रस्तावना
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांना 1975 मध्ये उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‌‘एक्सलन्स्‌‍‌’ पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांनी प्रबोधिनीच्या उद्दिष्टांची तात्कालिक, मध्यंतर व दीर्घकालीन उद्दिष्टे अशी विभागणी करून प्रथमच प्रबोधिनीबाहेरील लोकांसमोर प्रकटपणे मांडली होती. क्रमिक अध्ययनातील उत्तम यशाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एक तरी देशप्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वतःहून घेण्यासाठी प्रेरणाजागरण, वृत्तिघडण आणि नेतृत्वविकसन अशी चार तात्कालिक उद्दिष्टे मांडली होती. त्या भाषणातल्या आशयानुसार त्यांना विद्याथ म्हणजे शालेय, महाविद्यालयीन व पदवीधर युवक-युवती अपेक्षित होते. प्रबोधिनीची मध्यंतर व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तर वयाच्या पंचविशीनंतर प्रौढ वयातही या युवक-युवतींनी प्रबोधिनीच्या कार्याचा भाग व्हावे अशी कै. आप्पांची अपेक्षा होती.
वरील चार तात्कालिक उद्दिष्टांपैकी ‌‘वृत्तिघडण‌’ म्हणजे काय याचा विस्तार ‌‘सर्वसाधारण प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेत नंतर बऱ्याच वर्षांनी केला आहे. ‌‘प्रेरणाजागरणा‌’साठी ध्येयप्रेरित व्यक्तींचा सहवास व प्रेरक वातावरण जसे लागते तसे व्यक्तीचे स्वतःचे प्रयत्नही लागतात. हे प्रयत्न कोणते करावेत याचा विस्तार ‌‘विशेष प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेत नंतर केला आहे.
‌‘एक्सलन्स्‌‍‌’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर 1978 साली कै. आप्पांनी ‌‘प्रबोधिनीच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा व्यवहार‌’ या विषयावर मुंबईला एका शिक्षणसंस्थेत इंग्रजीतून व्याख्यान दिले. त्या व्याख्यानात त्यांनी प्रथमच प्रकटपणे विद्यार्थ्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी responsive, responsible, co-operative, creative, आणि regenerative हे गुण विकसित करण्याची आवश्यकता आहे असे मांडले. या व्याख्यानापूव काही काळ आणि नंतरही प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकींमध्ये या गुणांचा उल्लेख ते करायचे. त्या वेळी उत्तम नेतृत्व करण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत असे ते म्हणायचे.
विद्यार्थ्यांनी देशप्रश्न सोडवणारे कार्यकर्ते व्हावे व कार्यकर्त्यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेप्रमाणे नेतृत्वाची धुरा स्वीकारावी ही तर प्रबोधिनीची नेहमीसाठीची अपेक्षा. ‌‘प्रेरणाजागरण‌’ व ‌‘वृत्तिघडण‌’ या दोन तात्कालिक उद्दिष्टांप्रमाणेच ‌‘नेतृत्वविकसन‌’ या तिसऱ्या तात्कालिक उद्दिष्टाचा विस्तार responsive, responsible इत्यादी वरील पाच गुणांवरती काही लेखन संकलित करून करता येईल असे वाटले.
अनेक तज्ज्ञांनी नेतृत्वाचे विविध पैलू मांडले आहेत. नेतृत्वविकसनाचे अनेक अभ्यासक्रम जगभर बहुतेक ठिकाणी चालू असतात. त्यामध्ये प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. संघटनेच्या कार्यकर्त्याला एखाद्या क्षेत्रात नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला लागली तरी ‌‘संघटनेचा कार्यकर्ता‌’ ही भूमिका न सुटता नेतृत्व करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत हे कै. आप्पांनी मांडले आहे. त्यामुळे प्रबोधिनीतील नेतृत्वविकसनाच्या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणून या गुणांवर सविस्तर लेखन झाले पाहिजे असे वाटत होते.
मी स्वतः काही भाषणांमध्ये या गुणांची विस्ताराने मांडणी केली होती. प्रबोधिनीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या वाच. लताताई भिशीकर यांनी ‌‘संघटना‌’ या विषयावरील प्रबोधिनीच्या संकल्पित खंडासाठी लिहिलेल्या लेखात या गुणांचा काही विस्तार केला आहे. हे सर्व लेखन एकत्रित करून तयार झालेल्या टिपणांवरती मा. कार्यवाह श्री. सुभाषराव देशपांडे यांनी काही संस्करण केले. प्रबोधिनीच्या पुणे केंद्राच्या केंद्रीय विस्तारित सहविचार समितीच्या पाच बैठकींमध्ये या पाच गुणांवरील टिपणांवर चर्चा झाली. त्या चर्चेनुसार टिपणांमध्ये काही बदल करून मग पुन्हा तृतीय प्रतिज्ञितांच्या मासिक बैठकींमध्ये सुधारित टिपणांवर चर्चा झाली. त्यातील सूचनांनुसार आवश्यक बदल करून सर्व टिपणे प्रबोधिनीतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य मा. यशवंतराव लेले यांना वाचायला दिली. त्यांच्या सूचनांनुसार बदल करून या प्रस्तावनेच्या प्रारूपासह सर्व टिपणांचे संकलन प्रबोधिनीच्या मध्यवत सहविचार समितीच्या सदस्यांना वाचायला दिले. त्यांच्या प्रतिसादानंतर आवश्यक सुधारणा करून ही पुस्तिका प्रकाशित करत आहोत. कै. आप्पांनी स्वतः या पाच गुणावर पाच बैठकींमध्ये सविस्तर मांडणी केली होती. त्या बैठकींना उपस्थित असलेले श्री. शरदराव सुंकर व श्री. मोहनराव गुजराथी यांनी त्यांच्या स्मरणाप्रमाणे कै. आप्पांच्या मांडणीतील सर्व मुद्दे या पुस्तिकेत आले असल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर शीतलताई भालेराव यांनी या पुस्तिकेसाठी आशयाला समर्पक अशी चित्रे काढून दिली.
या पुस्तिकेचा कोणी एक लेखक नाही. ‌‘कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण‌’ आज कार्यरत असलेल्या सदस्यांना जसे अनुभवायला आले व लक्षात आले, तशी त्यांची मांडणी या पुस्तिकेत झाली आहे. या पुढेही अनेक कार्यकर्त्यांना प्रसंगा-प्रसंगाने लहान-मोठ्या गटांचे अल्प किंवा दीर्घकाळ नेतृत्व करायला लागेल. त्यानंतर या पुस्तिकेतील पाच गुणांवर पुढील काळात कोणीतरी नव्याने लिहू शकेल. ‌‘नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यां‌’चा आणखी एखादा नवीन गुणही लक्षात येईल. त्याची भर या पुस्तिकेच्या नवीन आवृत्तीत पडू शकेल. तोपर्यंत स्वतःचे किंवा इतरांचे नेतृत्वगुणविकसन करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना ही पुस्तिका मार्गदर्शक व्हावी हीच अपेक्षा.

गिरीश श्री. बापट
संचालक