सारे विचार-प्रवाह आमचेच
व्याख्यान
ज्ञान प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष मा. डॉ. प्र. ल. गावडे, ज्ञान प्रबोधिनीचे सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक सदस्य आणि इथे जमलेल्या सर्व नागरिक बंधु-भगिनींनो,
गेले दोन तास आपण जे प्रात्यक्षिक सतत पाहात होतो, ते युवकांच्या उत्साहाचे प्रात्यक्षिक पाहात होतो. त्याच्यामध्ये अनेक कौशल्यांचा समावेश होता, धाडसाचा समावेश होता, निर्भयतेचा समावेश होता. परंतु सतत जाणवत होता, तो म्हणजे या सर्व युवकांचा उत्साह. या सगळ्यांच्या मनामध्ये फार पूर्वीपासून काहीतरी मोठं प्रात्यक्षिक आपण करून दाखवावं असं होतं आणि सगळ्यांच्या आकांक्षा एकत्र आल्यामुळे आजची ही प्रात्यक्षिकं संपन्न झालेली आहेत. याच्यासाठी या सगळ्यांना संघटित प्रयत्न करायला लागलेले आहेत. सगळ्यांची इच्छाशक्ती एकत्र यायला लागली आहे. कामाची विभागणी करायला ते शिकले आहेत आणि ‘मला काम केलं पाहिजे म्हणजे आमची प्रात्यक्षिकं उत्तम होतील. असा ध्यास घेऊन सगळ्यांनी सतत काम केलेलं आहे.
प्रात्यक्षिकं सादर करणारे सर्व प्रबोधक आणि प्रात्यक्षिकं पाहणारे सर्वजण, आपण सर्वांनी मिळून मातृभूमीचं पूजन केलेलं आहे. आपल्याकडे पद्धत अशी असते की पूजा सांगायला कोणीतरी पुरोहित येतात, ते मंत्र म्हणत असतात आणि आपण बाकी सर्वजण आपल्याला जमतील तशी बाकीची कामं करत करत, पूजा कधी संपते आहे याकडे लक्ष ठेवून असतो. पण ज्ञान प्रबोधिनीमध्ये अशा या सर्व पूजा पद्धतीमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. अशा काही संस्कार पोथ्या केलेल्या आहेत की त्यांच्यामध्ये कोणीतरी पूजा सांगणारा पुरोहित, कोणीतरी पूजा करणारा यजमान आणि प्रेक्षक, असे गट राहात नाहीत; एक पूजेचा चालक असतो आणि बाकी सगळे पूजक असतात. तसंच प्रात्याक्षिकं सादर करणारे आणि प्रात्यक्षिकं पाहणारे, यांच्यामधलं हे द्वैत संपावं म्हणून आज हा छोटासा प्रयोग केलेला आहे की, ज्यांनी याच्या पूर्वी प्रात्यक्षिकं सादर केलेली आहेत, अशा सगळ्यांनी आत्ता आपण जे ऋषीस्मरण केलेलं आहे, स्वामी विवेकानंद्रांचं स्मरण केलेलं आहे, निदान त्या स्मरणामध्ये सहभागी व्हावं.
माझी अशी आशा आहे की जेव्हा पुढची प्रात्यक्षिकं होतील तेव्हा जे कुठलं गीत सगळेजण म्हणणार असतील, ते उपस्थित असणारे सर्वच जण प्रात्यक्षिकं पाहणारे आणि प्रात्यक्षिकं करणारे असे सगळेच म्हणू शकतील. कारण ज्ञान प्रबोधिनीची जी पूजा पद्धती आहे, तिच्यामध्ये ती सुरचित असली पाहिजे, सार्थ असली पाहिजे, सामूहिक असली पाहिजे असं आपण म्हणतो.
आज हे मातृभूमी पूजन आपण केलेलं आहे आणि पूजेतला विधींचा भाग झालेला आहे. आता कथेचा भाग चालू झालेला आहे आणि कथेकडेही आपल्या सगळ्यांचं तसंच लक्ष असावं आणि सहभाग असावा, अशी मी आपल्याला विनंती करतो.
स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की ‘केवळ मनामध्ये कल्पना आणून पुरत नाही, उठावं लागतं, कामाला लागावं लागतं आणि आपण सगळे कामाला लागलो तरच स्वप्न प्रत्यक्षात येतात.’
सगळेच जण ज्याची प्रभावी कल्पना करू शकतात आणि सगळ्यांनाच करायला त्या मानानं सोपं असं काम म्हणजे शारीरिक कौशल्यं शिकणं, शारीरिक कौशल्यं वापरणं, शारीरिक कौशल्यांचं प्रात्यक्षिक करणं आणि या शारीरिक कौशल्यांचं महत्त्व का? तर सगळ्याची सुरूवात तिथून असते. शारीरिक बल जर का नसेल, शारीरिक शक्ती जर का नसेल तर अनेक कल्पना सुचूनही त्या प्रत्यक्षात आणता येत नाहीत. आपल्या सगळ्या अडचर्णीचं कारण शारीरिक दुर्बलता हे असतं आणि मग ज्यांना मातृभूमी पूजन करायचं आहे, अशांनी हे शारीरिक बल मिळवण्यापासून सुरूवात करायची असते. आज ही प्रात्यक्षिकं सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी किती वेगवेगळ्या प्रकाराचं शारीरिक बल मिळवलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे.
सराव करून वेगवेगळी कौशल्य मिळविली, ती सादर केली त्याच्यातून जी मुख्य गोष्ट घडते, ती म्हणजे स्वतःच्या शक्तीवरती श्रद्धा निर्माण होते. माणसामाणसांमध्ये फरक असतो, राष्ट्राराष्ट्रांमध्ये फरक असतो. तो त्यांची कशावर श्रद्धा आहे याच्यामुळे असतो. मीही कोणीतरी आहे, मीही काहीतरी करू शकतो, असं वाटलं की ही श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण होते.
कालच मला एक आई भेटल्या आणि त्या म्हणत होत्या की, “मुलगा सायकलवरनं रायगडावर चालला होता, मला का जाता येणार नाही? असं माझ्या मनात आलं” आणि त्या मुलानं हे सांगितलं की, “मी आईला सायकल शिकवली आणि मग आमच्या बरोबर आईसुद्धा सायकल चालवत रायगडापर्यंत आली.” असं काही केलं की ती श्रद्धा मनामध्ये निर्माण होते. ‘असे श्रद्धासंपत्र युवक हे मातृभूमीची चांगली पूजा करु शकतील’ असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं.
आजच्या भाषेमध्ये याला आत्मसन्मान म्हणतात. “मीही कोणीतरी आहे, मलाही काही करता येतं” असं प्रत्येकाला म्हणता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर “मला आणखी करण्यासारख, शिकण्यासारख, घेण्यासारख बरच आहे. मी देऊही शकतो इतरांना आणि मला घ्यायचंही आहे” असं ज्यांच्या मनात सतत असतं, त्यांच्या मनामध्ये ही श्रद्धा असते.
श्रद्धा असली तरी त्याच्या जोडीला इच्छाशक्ती लागते. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो करायचं, करायचं, करायचं आणि शेवटी कधीतरी लक्षात येतं की आता खरंच केलं पाहिजे आणि आपण कंबर कसून कामाला लागतो. कंबर कसून कामाला लागणं याचा अर्थ इच्छाशक्ती आपल्यामध्ये काम करायला लागली. सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या दादांमध्ये, त्यांच्या संयोजकांच्या गटामध्ये ही इच्छाशक्ती काम करायला लागलेली होती आणि मग “जमतंय की नाही? होतंय की नाही? जमणार का?” अशा शंका मनामध्ये येत, तरी प्रयत्न चालू ठेवून ही प्रात्यक्षिकं त्यांनी केली. एकदा प्रात्यक्षिकं केली, दुसऱ्यांदा प्रात्यक्षिकं केली, तिसऱ्यांदा प्रात्यक्षिकं केली, की मग आपण एवढंच काय आणखीही मोठं काही करू शकतो, असा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण होतो. प्रबोधिनीमध्ये आपण त्याला म्हणतो की प्रबोधिनीच्या सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व सदस्यांनी ‘नाही चं हो’ करायला शिकलं पाहिजे. “एखादी गोष्ट जमत नाही? मग जमलीच पाहिजे. कळत नाही? मग कळलीच पाहिजे. होणार नाही असं म्हणतात ? मग करूनच दाखवू.” असा आत्मविश्वास निर्माण व्हावा याच्यासाठी हा प्रात्यक्षिकांचा धडा सगळ्यांनाच गिरविण्याची आवश्यकता असते.
श्रद्धा आहे, इच्छाशक्ती आहे, आत्मविश्वास आहे. त्याच्याबरोबर आपण पाहिलं की अतिशय निर्भयतेनं, लीलया सर्व प्रकार विद्यार्थी करत होते. भीती कशाची असते? अपयशाची भीती असते. पालकांच्या मनात भीती कशाची असते? अपघाताची भीती असते आणि फसलं तर लोक आपल्याला हसतील, अशी अपमानाची भीती असते. पण कशाचीही चिंता न करता, समजा असं काही घडलंच, तर “आपलं काय चुकलं हे कळलं, शिकायची संधी निर्माण झाली, ते शिकू आणि पुन्हा करू, पण घाबरण्याचं काही कारण नाही. बरोबर पाऊल टाकलं ते पुढेच जायचं आहे आणि चुकीचं पाऊल पडलं तर दुरूस्त काय करायचं ते कळलं, घाबरण्याचं काहीच कारण नाही.” अशी निर्भयता हे विद्यार्थी सगळीकडे शिकत जातात.
मला सहज आठवत होतं की आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर अशीच प्रात्यक्षिकं झाली होती आणि ती प्रात्यक्षिक करताना ज्या ज्या चुका करायला नकोत त्या सर्व चुका आम्ही केलेल्या होत्या. प्रात्यक्षिकं दोन तास झाली आणि कोण, कुठे चुकलं, किती चुकलं? याचा शोध द्यायला आम्हाला सहा तास बसायला लागलं होतं. पण “चुकलं, समजलं काय करायचं ते, पुढची प्रात्यक्षिकं आणखी मोठी करून दाखवू, आणखी मोठी करून दाखवू,” अशी सलग पाच वर्षे मग प्रात्यक्षिकांची चढती कमान चालू होती आणि त्याच्यानंतर दर दोन वर्षांआड ही प्रात्यक्षिकं चालूच आहेत. गेल्या तीस वर्षांमधलं हे पंधरावं प्रात्यक्षिक झालं, असं आपले युवक सचिव संतोष गायकवाड यांनी सांगितलेलंच आहे.
असे सगळे अनुभव घेत काय होतं आपलं? तर शिक्षण होतं. शिक्षणानं स्वतःचंही रूप पालटतं आणि आपल्या समाजाचंही रूप पालटतं. देशाचं रूप पालटण्याचा अनुभव आम्ही घेतला असं जे म्हणतात, त्यांचं खरं शिक्षण झालं. आणि हे शिक्षण घेण्यासाठी काय काय करायला लागतं? क्रीडा प्रात्यक्षिकांपासून शारीरिक कौशल्यांपासून सुरूवात झाली. स्वामी विवेकानंदांनी असं हे ‘देशाचं रूप पालटण्यासाठी काय काय केलं पाहिजे?’ असं जे अनेक ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. त्यातल्याच काही काही गोष्टी गेली शंभर वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहेत.
स्वामी विवेकानंदांचा सगळ्यात आग्रहाचा जो मुद्दा होता, त्याचं मोठं प्रात्यक्षिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखविलं आहे.
स्वामी विवेकानंदांनी ज्याला भारत म्हणलेलं आहे, त्या खऱ्या भारताचे प्रतिनिधी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करत होते, ज्या समाजाच्या दुःखांमध्ये ते सहभागी झाले होते, स्वतः दाहक अनुभव जे त्यांनी घेतले होते, त्या सगळ्या आपल्या बांधवांना त्यांनी सांगितलं की, “शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!”
स्वामी विवेकानंदांना ही संघर्षाची भाषा फार आवडायची. नुसतं स्वस्थ बसण्यापेक्षा, तुम्ही कशाला तरी भिडलेला आहात, त्याच्याशी चार हात करता आहात, याच्यामध्ये तुमचं माणूसपण दिसून येतं,’ असं स्वामी विवेकानंद म्हणत. समाजातल्या अन्याय्य बंधनांविरूद्ध लढणं चागले आहे, पण स्वामी विवेकानंद त्याच्याही पुढे म्हणत की, “अन्याय्य बंधन आणि न्याय्य बंधन असा काही फरक असतो का हो? बंधनं ती बंधनंच! आणि तुम्ही माणूस असाल तर सगळ्याच बंधनांमधून मुक्त व्हायला पाहिजे.’ निसर्गाच्या नियमानुसार चालावं लागतं असं म्हणतात, पण “माणसानं जी काही आजपर्यंत प्रगती केली आहे, ती निसर्गाचे नियम मोडायचा प्रयत्न करत करतच” असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे.
“याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. स्वतः समोरची सामाजिक बंधनं असतात. स्वतःची शारीरिक बंधनं असतात, मानसिक बंधनं असतात. पण सगळ्या बंधनांच्या पलीकडे जाणं, कुठलंही बंधन असेल, तर तो नियम मोडून दाखवतो, कारण मी माणूस आहे आणि मी हे सगळे नियम बदलायला व तयार करायला आलो आहे, नियमांनुसार बागायला आलेलो नाही.” असं स्वामी विवेकानंद म्हणत.
शेवटी नियम करणारा मी आहे हा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि तो अनुभव घेईपर्यंत मोठे नियम शोधून काढून छोटे नियम मोडायचे आणि आणखी शोधत राहायचे, हा प्रवास चालू राहायला पाहिजे. आपल्या देशातल्या एका मोठ्या गटाचा असा प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे सुरू झालेला आहे.
मग दुसरं काय शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे? स्वामी विवेकानंदांचा आवडता विषय, ज्याच्यामध्ये ते पुन्हा पुन्हा न कंटाळता सांगायचे, ते म्हणजे ‘सामर्थ्यांची उपासना केली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या समाजाचं असंच रूप पाहात होते. स्वतःच्या स्वत्वाची जाणीव असलेला आणि सामर्थ्यामध्ये कोणच्याही तुलनेत कुठेही कमी पडणार नाही, इतकं सामर्थ्य मिळवलेला असा आपला देश असावा,’ अशी त्यांची कल्पना होती.
स्वाभिमान हा तर अनेक गोष्टींमधून व्यक्त होत असतो. स्वदेशीचं, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पराक्रमाचं शिल्प इथे जवळच उभं आहे आणि स्वभाषेचा त्यांचा आग्रहही आपल्याला माहीत आहे. पण स्वाभिमान जो व्यक्त होतो तो, “जिथे जिथे आमचा अपमान झाला आहे तो आम्ही धुऊन काढू शकतो. तेवढी शक्ती आमच्याकडे आहे” अशा बागण्यातून स्वाभिमान व्यक्त होत असतो.
गेल्या आठवड्यातच बातमी आणि छायाचित्र आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की २००१ साली न्यूयॉर्कमधल्या त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. दोन मोठ्या गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. त्याच जागेवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उंच मनोरे उभं करण्याचं काम चालू झालेलं आहे; ते काम करणारे कामगार त्या छायाचित्रामध्ये दाखवले होते. अमेरिकेचा मानबिंदू व्यापारामध्ये, त्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटर नाहीसं झालेलं त्यांना सहन झालं नाही आणि त्या जागेवर ते पुन्हा मोठी इमारत उभी करत आहेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, “आपल्या देशाचा प्राण, आपल्या देशाचा मानबिंदू आपला धर्म आहे.”
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे “तुम्ही देवाकडे प्रार्थना करत, देव कधीतरी आपलं रूप बदलेल, असं किती म्हणत राहणार? तो देव आहे की नाही हे ही माहीत नाही. देव कधी कुणी पाहिला आहे की नाही हे माहीत नाही. पाहिलेलं आहे ते हे की तुम्ही प्रयत्न केला तर परिस्थिती बदलते. असं तुम्ही सतत करत राहिलं पाहिजे.”
‘परमेश्वर आहे की नाही माहीत नाही पण प्रयत्नांनी परिस्थिती बदलता येते.’ याला स्वामी विवेकानंद जडवाद म्हणतात. ते फार छान वर्णन करतात त्याचं;
ते म्हणतात, “आपल्या देशामध्ये परमेश्वर आहे असे म्हणणारे अनेक लोक होते, पण ‘परमेश्वर आहे’ याचा अनुभव ज्यांना आलेला नाही, त्यांना फक्त ‘मी आहे आणि बाजूची परिस्थिती आहे’ एवढेच दिसत असते आणि त्यांच्यासाठी थोडासा जडवाद आवश्यक आहे. विष आहे ते जडवाद म्हणजे, पाहिलं आहे मी अमेरिकेमध्ये जाऊन काय असतं ते, पण विषाचासुद्धा औषधासारखा उपयोग करता येतो. आपल्या देशानं या औषधाकडे हजार वर्ष दुर्लक्ष केलं आहे. आता आपल्या देशातल्या अनेक लोकांना भौतिक शक्तीने भौतिक परिस्थिती बदलू याचेच धडे बराच काळ निरवावे लागणार आहेत.” हेही आपण केले पाहिजे.
सावरकर म्हणायचे की, ‘यांच्यासाठी शस्त्रसज्ज झालं पाहिजे.’ स्वामी विवेकानंदांनी परदेश प्रवासात जपानमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या जे पहिलं पत्र पाठवलं आहे, त्या पत्रामध्ये मोठ्या आनंदाने लिहिलं आहे की, ‘या देशातले लोक स्वतःच्या तोफा स्वतः बनवतात; आपल्या देशात हे बनायला कधी सुरूवात होईल?’ पण अशी शस्त्रसज्जता पाहिजे असली तरी ती कशासाठी? ती पाहिजे आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेनी पाहू नये याच्यासाठी.
आजच आपल्या राष्ट्रपतींचं भाषण आपण वाचलं असेल की, ‘भारतानं कधी कोणावर आक्रमण का केलं नाही?’ असा प्रश्न ते विचारतात. आता ते राष्ट्रपती आहेत म्हणून छापून आलं, पण मला माहीत आहे की दहा वर्षांपूर्वीसुद्धा सैन्याधिकाऱ्यांसमोर ते बोलायला गेले तेव्हा हेच बोलत होते. अनेक मित्रांनी मला असं सांगितलं की, डॉ. अब्दुल कलामांनी असं म्हटलेलं आहे ‘विचार करायला हवा की आपण आक्रमण का केलं नाही? म्हणजे आक्रमण करता येईल इतकी आपली शस्त्रसज्जता असली पाहिजे आणि तरीही आक्रमण करणं हे आपलं काम नाही. आपलं काम धर्मनिष्ठा वाढवणं, निःस्वार्थतता वाढवणं आपल्या देशातलीच नाही तर जगातली वाढवणं. आणि त्यामुळे ‘भारतानं आपल्या विचारांच्या साहाय्यानं प्रेमाच्या साहाय्यानं सगळ्यांमधली मैत्री भावना वाढवत जग जिंकलं पाहिजे, पण आपल्याला कोणी जिंकणार नाही इतकं ते जडवादाच औषध आपल्याकडे असलंच पाहिजे’ असं स्वामी विवेकानंद म्हणत.
आणि मग तिसरं काय शिक्षणात दिलं पाहिजे? विवेकानंदांचा अतिशय आग्रहाचा तिसरा विषय म्हणजे’ आपण कोणत्या युगात जगतो आहोत याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात की नाही? की जुनंच काहीतरी सांगत बसणार आहात? आजच्या युगामध्ये जे आवश्यक आहे ते आपण केले पाहिजे.’
आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच कारणासाठी विवेकानंदांना मानायचे की आधुनिकतेचं महत्त्व त्यांनी जाणलं. विज्ञान पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे, आधुनिक विचारही पाहिजेत, लोकशाही पाहिजे, समाजबाद पाहिजे आणि ज्यांचा हजार वर्षांपूर्वी आपल्या देशानं कधी विचारच केला नव्हता, ते आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण पाहिजे.
पं. जवाहरलाल नेहरूंनी अलिप्त राष्ट्र परिषद निर्माण करून या देशाला परराष्ट्र धोरण दिलं. विवेकानंद म्हणाले असते की, “छान आहे, आधुनिकेतेच्या मागे तुम्ही लागलेले आहात, उत्तम आहे, त्याच्यामुळेच देशाची प्रगती होणार आहे. काहीतरी परराष्ट्र धोरण ठरवलं, चांगलं आहे. पण आपल्याला कुणाची नक्कल करायची नाही, शिकण्यासाठी अनुकरण करायचं आहे. आपल्याकडे काहीच नाही, आपल्याला काही जमतच नाही म्हणून इतरांचं उसनं घ्यायचं नाही आहे, उधार घ्यायचं नाही आहे, तर आमचं सुरू होईपर्यंत तात्पुरतं तुमचं घेत आहोत म्हणून अनुकरण करायचं आहे. असं विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये वाढावं.” आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण कसं असावं याबाबत विवेकानंद म्हणाले असते की “तटस्थता, अलिप्तता असं कशासाठी? आपण जागतिक राजकारणाचे दोन्ही ध्रुव आपल्या कवेत घेऊ शकतो. दोघांनाही शिकवण्यासारखं आपल्याकडे आहे आणि आम्ही तटस्थ राहणार नाही, तर आम्ही सगळ्यांनाच आपलं मानणारे होणार असं परराष्ट्र धोरणही असेल.’
विवेकानंद समजण्यासाठी आपल्याला आंबेडकर समजावे लागतात. सांवरकर समजावे लागतात. नेहरू समजावे लागतात. त्यांचं काम समजावं लागतं. त्यांच्या कामाचे परिणाम समजावे लागतात आणि हे सगळे एकत्रितपणे अनुभवावे लागतात. या तिघांनी सुरू केलेली कामं संपली नाहीयेत. चालूच आहेत. त्यांचा वारसा सांगणारे अनेकजण ती कामं करत आहेत. त्यांचा वारसा सांगत ती कामं करता करता, देशामध्ये इतरही काही प्रवाह आहेत. याचं काही वेळा इतरांना विस्मरण होत असेल. पण जे विवेकानंदांना आदर्श मानतात त्यांना “सगळेच प्रवाह आपले आहेत” असं म्हणता आलं पाहिजे.
माझा अभ्यास आंबेडकराचा आहे. पण आंबेडकराचं नाव घ्यायच्या ऐवजी कुणाला फुल्यांचं नाव घ्यायचं असेल, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं असेल, गाडगे महाराजांचं नाव घ्यायचं असेल, भाऊराव पाटलांचं नाव घ्यायचं असेल, आणखी अनेक नावं आहेत. कुठलही घेतलं चालेल, सर्व घेतली तरी चालतील. तो एक प्रवाह आहे की आपलं राष्ट्र खेडेगावांमधल्या, झोपड्यांमधल्या दरिद्री लोकांमध्ये आहे, त्यांची बहुसंख्या आहे. त्यांचा उद्धार होणं, त्यांची उन्नती होणं, स्वतःची उन्नती करण्यांइतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येणं, हा एक आपल्या देशाच्या उन्नतीचा मोठा प्रवाह आहे. तो प्रवाह प्रबोधिनीच्या सर्व सदस्यांना समजला पाहिजे आणि आपण त्या प्रवाहाचाच भाग झालं पाहिजे, असंही त्यांना वाटलं पाहिजे.
सावरकरांचं नाव मी घेतलं. काही जणांना नेताजींचं घ्यावसं वाटेल, भगतसिंगांचं घ्यावं असं वाटेल, ४२ च्या चळवळीतल्या क्रांतिकारकांचं घ्यावं असं वाटेल. कुणाचंही घ्या, सगळ्यांची घेतली तरी चालतील. पण सामर्थ्याची उपासना, शस्त्राची उपासना, शस्त्राची गरज ओळखणं आणि ते शख म्यानात कधी ठेवायचं असतं व बाहेर काढायचं हे ही कळणं आवश्यक आहे.
आणि नेहरूंचं नाव मी घेतलं. पण आपल्याला अनेक उद्योगपतींची घ्यावीशी वाटतील, शास्त्रज्ञांची घ्यावीशी वाटतील. नेहरूंनी काहीतरी धोरणं रचली म्हणून आपल्याला डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई काम करायला लागले आणि म्हणून आपल्या डॉ. अब्दुल कलमांसारखे राष्ट्रपती मिळाले. कुणाचंही नाव आपण घ्या, पण सर्व प्रकारच्या नियमापासून मुक्ती मिळविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं याच्यात माणूसपण आहे. औषध म्हणून का होईना पण आपल्या देशाला जडवाद, भौतिक शाखांची आवश्यकता आहे आणि सुरूवातीला अनुकरण करावं असं वाटलं तरी आपल्या स्वतःच्या प्रतिभेतून आपण आधुनिक झालं पाहिजे. आधुनिक होणं म्हणजे फक्त कोणाची तरी नक्कल करणं नाही. तर आम्हीही नवीन निर्माण करू शकतो हे अनुभवतो आणि म्हणजेच आम्ही आधुनिक आहोत.
तर या गोष्टी शिकायच्या. विचार स्वामी विवेकानंदांनी मांडलेत. त्याची प्रात्यक्षिकं गेली शंभर वर्ष देशात चालूच आहेत. ते प्रवाह कोणते आहेत हे ओळखलं पाहिजे आणि हे सगळे प्रवाह आमचे आहेत असं म्हणून आपल्याला ते आत्मसात करता आले पाहिजेत.
मानवंदनेमध्ये, संचलनामध्ये पहिलं पथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलाचं होतं. तो आपल्या देशातला महत्त्वाचा विचारप्रवाह आहे, कार्यप्रवाह आहे. प्रबोधिनीचे युवक जेव्हा ही शारीरिक कौशल्यांची प्रात्यक्षिकं सुरू करतात तेव्हा त्यांची तयारी सुरू करताना त्यांच्या दादांना माहीत असतं की खेळता खेळता, आपण त्या प्रवाहामध्ये मिसळून गेलं पाहिजे. तो रंग आपल्यालाही लागला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर दल होतं. आपण त्याही प्रवाहात मिसळून गेलं पाहिजे, तोही रंग आपल्याला लागला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाचं दल अजून सुरू व्हायचं आहे, पण इथं बसलेल्या अनेक युवकांनी ‘भारताचा शोध’ हे नेहरूंचं आत्मचरित्र वाचलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि त्याचा अभ्यास ते करत असतात. तोही प्रवाह आत्मसात करायला पाहिजे.
विचार मांडणं सोपं असतं, ते कृतीत आणायला सुरूवात झाली की मग काहीतरी छोटसं काम करून सुरूवात करायला लागते. स्वामी विवेकानंदही सुरूवातीला म्हणत होते. की ‘आता मी काय करणार आहे? तर देशभर शिक्षणाचा प्रसार करतील असे १०,००० तरी युवक शोधणार आहे आणि त्यांना कामाला लावणार आहे.’ मग नंतर त्यांनी एका पत्रामध्ये असं म्हटलं आहे की, ‘आता माझ्या लक्षात आलंय की त्याच्या आधी असे प्रचारक तयार करणारं केंद्र मला सुरू केलं पाहिजे.’ त्यांच्या मनात अर्थात् संन्यासी प्रचारक होते. भगव्या कपड्यातल्या संन्याशांनी लोकांना ‘अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी कसं व्हायचं ? आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी कसं व्हायचं? आणि शिक्षण मिळवून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग स्वतःच कसा आखायचा?’ हे शिकवलं पाहिजे आणि असे भगव्या कपड्यातले संन्यासी तयार करण्याचं केंद्र त्यांनी सुरू केलं. आजही ते काम चालू आहे.
एकदा विचार प्रत्यक्षात आणायला सुरूवात केली की सगळं instant झालं पाहिजे असं आपल्याला बाटतं. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात असं होत नाही. देशामध्ये एखादा विचार प्रत्यक्षात येण्यासाठी काही वेळा ५० वर्ष, १०० वर्षं लागू शकतात. पण ती प्रक्रिया देशामध्ये चालू झालेली आहे. “ही प्रक्रिया जिथे जिथे चालू झालेली आहे, ते काम आमचंच आहे आणि तो वारसा आम्हाला चालवायचा आहे,” असं ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी म्हटलं पाहिजे.
आणि असं शिक्षण सगळीकडे पोचवून काय करायचं? स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की “हजार वर्षाच्या परातंत्र्यामध्ये आमचा धर्म अगतिक झालेला होता, त्याची वाढ खुंटली होती आणि मला तो धर्म गतिशील करायचा आहे. गतिशील धर्मजीवन म्हणजे ‘निस्वार्थपणे कसं जागायचं?’ हे देशातल्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन शिकवलं पाहिजे. आणि ज्याला निःस्वार्थपणे जगायला शिकवायचं त्याला ती निःस्वार्थता साधण्यासाठी, त्याग करण्यासाठी आधी काहीतरी मिळवायला शिकवलं पाहिजे. ज्यानं कधी काही मिळवलेलंच नाही त्याला त्याग करायला सांगण्यात अर्थ नाही. ज्यानं श्रीमंती काय कधी पाहिलीच नाही त्याला गरिबीचं महत्त्व काय, हे सांगण्यात काही अर्थ नाही.” हे सगळं आपल्या देशामध्ये करायला लागणार आहे. यालाच ‘औषधाकरता आपल्याला जडवाद आवश्यक आहे, ‘स्वामी विवेकानंद म्हणतात.
आणि मग तो हजार वर्ष खुंटलेला प्रवाह पुन्हा चालू करायचा म्हणजे काय करायचं? की ‘देशातल्या सर्व माणसांपर्यंत, जगातल्या सर्व गोष्टी या कुठे ना कुठेतरी उपयोगाच्या असतात, या सर्वांचा संग्रह कसा करायचा? सगळ्याला आपलं कसं म्हणायचं?’ हे शिकवायचं. सगळ्याला आपलं म्हणण्यासाठी “माझ्याकडे जे आहे ते माझं नाही,” हे म्हणायला शिकावं लागतं. ती फक्त त्यागाची एकच बाजू आपल्या देशात फारच आग्रहानं मांडली गेली. पण ती शिकायची याच्यासाठी, “माझं स्वतःच व्यक्तिगत काही नाही” असं यासाठी म्हणायचं की “जगातलं जे काही सगळं आहे, ते माझंच आहे” असं कुणा फक्त ऋषी मुनींनाच नाही तर सामान्य माणसालासुद्धा म्हणता आलं पाहिजे.”
देशाचं काही हजार वर्ष चालणार काम आहे. पण त्या कामाचा भाग प्रत्येकानं केला पाहिजे. प्रत्येक पिढीमध्ये हे काम झालं पाहिजे.
हेच ज्ञान प्रबोधिनीला करायचंय आणि त्याच्यासाठी कृतीचा भाग म्हणून अशा प्रात्यक्षिकांपासून सुरूवात केली असली तरी या सगळ्या प्रबोधकांना, पुढच्या काही वर्षांमध्ये, “आंबेडकरांचं काम कसं वाढलं? सावरकरांचं काम कसं वाढलं ? नेहरूंचं काम कसं वाढलं ? आज ते कसं चालू आहे? आणि ही सगळी कामं एकत्रच कशी जातात?” हे समजून घेत घेत स्वामी विवेकानंदांनी ज्या पद्धतीनी मातृभूमीची पूजा करायला सांगितली म्हणजेच ‘आपल्या मातृभूमीचं रूप पालटायचं, स्वतःच रूप पालटायचं आणि ते अशासाठी की आपल्याला सगळ्या जगाचं रूप पालटायचंय. हे मनात बिंबवण्यासाठीच ज्ञान प्रबोधिनीमध्ये आपण सारे कार्यक्रम करत असतो.
पुन्हा एकदा, आज जसे प्रात्यक्षिकं करणाऱ्या काही विद्यार्थ्यांबरोबर काही मोठे युवकही पद्य म्हणायला सहभागी झाले तसे पुढे, सगळ्या युवक कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, आणखीन मोठ्या मैदानावर, आणखीन मोठ्या संख्येनं प्रात्यक्षिके करणारेही असू देत आणि त्या वेळी पद्य म्हणताना आणखीन मोठ्या संख्येनं तिथे असणारे सगळेच जण सहभागी होऊ देत. म्हणजे आपलं काम वाढेल ! वाढेल !! वाढेल !!! वाढता वाढता देशभर पोचेल ! देशभर जेव्हा पोचेल, तेव्हाच स्वामी विवेकानंदांनी मातृभूमीची पूजा करायचा जो मार्ग सांगितलेला आहे, त्यामागनि आपल्याला जाता येईल आणि त्याच्यासाठीच आपण सगळेजण आहोत असं आपण लक्षात ठेवूया !
***************************************************************************************************************