स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीणचे काम सुरु होऊन तीस वर्षे झाली. बचतगटा मार्फत कामाची सुरुवात झाली. ते खूप गरजेचे होते. तिने स्वतःच्या हिमतीवर चार पैसे बचत केले आणि चार पैसे मिळवले तर तिचा आत्मविश्वास वाढतो असे आमच्या लक्षात आले. अनौपचारिक शिक्षणातून आणि काळानुरुप अशा व्यावहारिक साक्षरतेतून ( Functional Literacy ) तर हा आत्मविश्वास काही पटीने वाढू शकतो हे देखील लक्षात आले. तिने बँकेत खाते काढले, कर्ज घेऊन ते फेडले, घरातील दुरुस्तीची, घरावर कौले चढविण्याची, मुलीला शिकवण्याची, सावकाराचे कर्ज फेडण्याची, आधार कार्ड काढण्याची, pancard आणि आधारकार्ड लिंक करण्याची कामे केलीआणि तिलाही वाटू लागले कि ती देखील घराकरता महत्वाची आहे. तिला फक्त आत्मविश्वासच मिळाला असं नाही तर हळूहळू आत्मसन्मान वाटू लागला. आता तीस वर्षानंतर आत्मसन्मान वाटू लागून ती अनेक कामांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन काम सुरु करणारी आणि स्वतःच्या पदरचे वेळ आणि पैसे खर्च करून विशिष्ट कामासाठी वेळ काढणारी झाली.
![](https://www.jnanaprabodhini.org/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-03-at-4.43.15-PM-2-462x1024.jpeg)
आता घराघरातून त्या घरातली लक्ष्मी किंवा मुलगी ही जशी आपल्या कामात आली तशी नंतरच्या काळात घरात माघारपणाला आलेली किंवा सासरी राहत आहे पण एकल आहे. माघारी आलेली नाही पण आपल्या मुलाला घेऊन सासरच्याच घरात राहते आहे. तिथे दिवसभर काम करून संपूर्ण घराचा आधार तर ती झाली आहे पण तिला म्हणावा तसा आत्मविश्वास नाहीये. म्हणावी तशी तिची दखल घेतली जात नाहीये. माहेरी राहत असली तरी भावाच्या मुलांचे मनापासून करत राहिली आहे त्याच्या मुलाबरोबर स्वतःच्या मुलाला सांभाळते आहे पण मोकळेपणी तिच्या तोंडून कधी चार शब्द ऐकायला आले नाहीयेत. तिचे खळाळते हसू ऐकू आले नाहीये. आपल्या कामाचा परिणाम असा की तिचा आवाज आपल्या भरल्या घरातल्या लक्ष्मीलाही ऐकू येऊ लागला आणि सर्व कार्यकर्त्यांनी ठरवले की अशा एकल महिले साठी प्राधान्याने काम करायचे.
![](https://www.jnanaprabodhini.org/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-03-at-4.19.31-PM-1024x462.jpeg)
आपल्या कामात आज जबाबदारी घेऊन काम करण्याच्या ठिकाणी अनेक एकल महिलाच महत्वाचे योगदान करत आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे स्त्री शक्ती प्रबोधनाचे काम स्त्रियांनी स्त्रियांसाठी करायचे असल्यामुळे ग्रामीण भागातील एकल महिलेला या ठिकाणी खूप सहज आणि सुरक्षित वाटते. आजूबाजूला सगळ्याच महिला काम करीत असल्यामुळे सासर माहेरचे सगळे वडील मंडळीही निश्चिंत असतात. वेल्हे तालुक्यांमधील दुर्गम भागातील मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून मुलींसाठी सहनिवास गेल्या १० वर्षांपासून एकल महिलाद्वारेच चालवले जाते. सरकार दरबारी एकल महिलेसाठी आयोजित केलेल्या योजना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजना योग्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वाचे आणि कागदपत्रांच्या पूर्ततेच्या अटीमुळे खूप कठीण असे हे काम सुद्धा स्वतः एकल असलेल्या ताई गेली १० वर्षे करीत आहेत. ३०० बचत गटांच्या संघाचा ४ कोटी रुपयांचा हिशोब पाहणे, आरोग्याच्या कामासाठी २० वर्षांपासून भागातील अनेक गावांमध्ये जाऊन जाणीव जागृती करणे ही आणि अशी अनेक कामे त्या वर्षानुवर्षे करत आहेत. ही सर्व कामे करताना संपूर्ण वेल्हे तालुक्यातील गावागावांमधून स्वतःच्या आयुष्याशी झगडत राहणाऱ्या एकल महिलेच्या अवघड परिस्थितीविषयी स्वतः एकल असलेल्या आणि गावोगावच्या महिलांना प्रेरणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव .
![](https://www.jnanaprabodhini.org/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-03-at-4.33.10-PM-1024x458.jpeg)