पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए …

निरूपण –

प्रबोधिनीच्या दशवार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘आम्ही जाऊच जाऊ’  हे पद्य लिहिले गेले. त्यात एक कडवे नवतेज, नवक्षितिजे, नवस्वप्ने, नवीन कवने, नव्या कहाण्या, नवस्फूर्ती असा नाविन्याचा पुरस्कार करणारे आहे. प्रबोधिनीतील कवींनी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आणखी पाच पद्यांमध्ये एखाद्या कडव्यात नाविन्याचा उल्लेख आहे. मात्र अशा पद्यांमध्ये नाविन्यापेक्षा तेज, पराक्रम, राष्ट्रघडण, ध्येयाचा ध्यास, यशस्वी जीवन, विजयी जीवन, सामर्थ्य अशा कल्पना आणि भावना जास्त वेळा आल्या आहेत. प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानंतर आप्पांनी ‘नवीन पर्व के लिए’  या एका जुन्या पद्याचा शोध घेण्याचे काम दोन युवक कार्यकर्त्यांना सांगितले. तो पर्यंत प्रबोधिनीत लिहिली गेलेली, नव्या युगासाठी नवीन विचाराचा फक्त उल्लेख असणारी व तेव्हा नित्य म्हणण्यात असलेली, वरील पाच-सहा पद्ये आप्पांना पुरेशी वाटली नसावीत.  ‘नवीन पर्व के लिए’ हे पद्य स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले आहे अशा काळात लिहिलेले आहे. त्यात वारंवार नव्या युगासाठी नव्या विचाराचे आवाहन केलेले आहे.

नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए ॥धृ.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवीन पर्व म्हणजे नवा कालखंड सुरू झाला होता. या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे नसून देशाच्या पुनर्घडणीसाठी प्रयत्न करायचे होते. स्वातंत्र्य लढ्यात लोकांमध्ये वीर वृत्ती आवश्यक होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर लोकांमध्ये आधुनिक ज्ञान वृत्ती व विज्ञानाचा आधार घेणारी कर्मवृत्ती आवश्यक होती. त्यासाठी आता नवीन प्राण म्हणजे नवीन वेगळ्या प्रकारची शक्ती हवी आहे, असे म्हटले आहे.

स्वतंत्र देश हो गया, प्रभुत्वमय दिशा मही,
निशा कराल टल चली, स्वतंत्र माँ, विभामयी
मुक्त मातृभूमि को , नवीन मान चाहिये ॥१॥

देश स्वतंत्र झाला हेच नवीन पर्व आहे. मही म्हणजे भूमी. आपल्या मातृभूमीवर सर्व दिशांनी आता आपलाच पूर्ण अधिकार आहे. पारतंत्र्याची कराल निशा म्हणजे भीषण रात्र आता संपली आहे. भारतमाता स्वतंत्र झाली आहे आणि त्यामुळे तिचे रूप आता विभामयी म्हणजे उजळलेले दिसत आहे. स्वतंत्र झालेल्या मातृभूमीला आता नवीन मान म्हणजे जगात प्रतिष्ठा असलेली नवी ओळख प्राप्त झाली पाहिजे. ती नवीन ओळख निर्माण करण्यासाठीच नवीन प्राण हवे आहेत.

चढ रहा निकेत है कि, स्वर्ग छू गया सरल
दिशा दिशा पुकारती कि, साधना करो सफल।
मुक्त गीत हो रहा, नवीन राग चाहिए ॥२॥

निकेत याचा सर्वसाधारण अर्थ घर असा आहे. स्वतःचे घर नसलेला किंवा सर्व जगच ज्याचे घर आहे असा संन्यासी अनिकेत असतो. निकेतचा दुसरा विशेष अर्थ मनोरा असा आहे. इथे याच अर्थाने तो या पद्यात वापरला आहे. आधीच तयार असलेल्या उंच गगनचुंबी मनोऱ्यावर चढत जाऊन स्वर्गापर्यंत जायचे आहे असा अर्थ लावता येईल, किंवा मनोऱ्याचे मजल्यावर मजले चढवत, तो स्वर्गाला टेकेपर्यंत बांधत जायचे आहे, असाही अर्थ करता येईल. एवढा उंच मनोरा चढणे किंवा बांधणे ही मोठी तपश्चर्या किंवा साधना आहे. आपल्या देशाचे नंदनवन किंवा आनंदवनभुवन करणे म्हणजेच आपला देश, आपल्या सर्वांचे घर, स्वर्गाला शिवू पाहत आहे अशा उंच मनोऱ्याएवढे करणे. ही आपली साधना यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करत राहा असा जणू काही सर्व दिशांनी घोष चालू आहे.

‘साधना करो सफल’ असा घोष जेव्हा आपल्या अंतर्मनातच चालू असतो, तेव्हा तेवढाच एक आवाज आपल्याला ऐकू येतो आणि त्यामुळे सर्व दिशांनी तोच घोष चालू आहे असे वाटते. देशाचे ‘आनंदवनभुवन करू या’ हा अंतर्मनातील घोष जणू काही मुक्त स्वरांमध्ये मोकळ्या आवाजात चाललेल्या गाण्याच्या रूपात व्यक्त होत आहे. स्वातंत्र्ययुद्ध संपले, आता राष्ट्रनिर्माणाचे काम करण्याची दिशा दाखवणारे गाणे सुद्धा नव्या रागामध्ये म्हटले पाहिजे. हा नवीन राग सुचणे म्हणजे कामाची नवी दिशा व पद्धत लक्षात येणे. हेच नवीन पर्वासाठीचे नवीन प्राण. धृपद आणि पहिल्या कडव्याप्रमाणे या कडव्यातही नाविन्याची भूक व्यक्त होते.

*ध्यान में सदा रखो कि कंटकों की राह है,
प्राण-दान का समय, उमंग है उछाह है ।
पगों में आँधियाँ भरे, प्रयाण गान चाहिए ॥३॥

*( मूळ हिंदी पद्यामध्ये ‘युवकों कमर कसो कि’ (११ मात्रा) अशी पहिली अर्धी ओळ आहे. ती कवितेच्या वृत्तात बसत नाही म्हणून काही जणांनी ‘युवक कमर कसो कि कष्ट – (१३ मात्रा)  कंटकों की राह है’ असा त्यात बदल केला. पण तीही वृत्तात नीट बसत नाही. म्हणून प्रबोधिनीत हे पद्य म्हणायला प्रारंभ केला, तेव्हा पहिल्या ओळीत ‘ध्यान में सदा रखो कि’ (१२ मात्रा)  असा बदल करून म्हणायला सुरुवात केली. कंबर कसायची म्हणजे जोर लावून काम करायचे हा मुख्य अर्थ आणि कंबर कसलेली असेपर्यंत कामाची जाणीवही राहते हा गौण अर्थ. कामाची सतत जाणीव राहणे हा अर्थ प्रबोधिनीत केलेल्या बदलामध्ये जास्त स्पष्ट होतो.)

स्वर्गाला स्पर्श करणारा मनोरा उभा करायचा ठरवले म्हणजे त्या वाटेत अनेक कंटक, म्हणजे काटे किंवा अडचणी येणारच. हे कायम लक्षात ठेवा आणि अडचणींनी निराश होऊ नका. अडचणींवर मात करण्यासाठी लागणारी उमंग म्हणजे स्फूर्ती आणि उछाह म्हणजे उत्साह तुमच्यामध्ये आहे हे लक्षात असू द्या. हे काम दीर्घ काळाचे आहे. त्या कामाला भिडण्याचे ठरवले की संपूर्ण आयुष्यच त्या कामात पेरायला हवे.स्वातंत्र्यासाठी बलिदानाची, म्हणजे मरणाला तयार असण्याची आवश्यकता होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्राणदान किंवा जीवनदानाची*, म्हणजे सर्व आयुष्य देश उभारणीच्या कामात गुंतवण्याची आवश्यकता आहे.

*(भूदान पदयात्रेत भूदान मागता मागता विनोबांनी चढत्या वाढत्या श्रेणीने संपत्तीदान, ग्रामदान अशा कल्पना मांडत, शेवटी जीवनदानाचे म्हणजेच प्राणदानाचे आवाहन केले. त्याला त्याच दिवशी जयप्रकाश नारायण यांनी प्रतिसाद दिला. आपण जीवनदान करीत असल्याचे जाहीर सभेत सांगितले. नंतर आयुष्याच्या अंतापर्यंत, पुढची जवळ जवळ ३० वर्षे, अहिंसक संपूर्ण क्रांतीसाठी ते झटत राहिले. असेच जीवनदानाचे संकल्प पांडुरंगशास्त्री आठवले आणि आण्णा हजारेंनी केल्याचे त्यांच्या चरित्रात किंवा आत्मकथनात वाचायला मिळते. )

असे जीवनदान करताना झपाटल्यासारखे धुंद होऊन काम करावे लागते. त्यालाच ‘पगों में आँधियाँ भरे’ म्हणजे पावलांमध्ये वादळाचा संचार करणारे, असे म्हटले आहे. अडचणींना भिडण्यासाठी स्फूर्ती देणारे, ध्येयधुंद होऊन काम करायला लावणारे प्रयाणगान, म्हणजे संचलन गीत आता हवे आहे. संचलनात ‘तेज चल’ म्हणजे ‘वेगाने चाला’ अशी आज्ञा असते. पावलांमध्ये वादळ भरून म्हणजे अतिशय वेगाने चालण्याची स्फूर्ती देणारे संचलन गीत हवे, म्हणजेच आता नवीन प्राण हवेत.

नवीन मान, म्हणजे नवे आदर्श आणि नवी ओळख. नवीन राग म्हणजे आदर्शापर्यंत जाण्यासाठी नवीन मार्ग आणि नवी पद्धत. प्रयाणगान म्हणजे आदर्शाची आणि तिथे पोचण्याची सतत आठवण व त्यासाठी प्रेरणा. नवीन मान, नवीन राग आणि प्रयाणगान मिळूनच नवीन प्राण होतात. प्रत्येक नवीन पर्वासाठी नवे प्राण हवे असतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर तीस वर्षांनी आणि प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन-दिनानंतर, या पद्याचे पुनरुज्जीवन करून, ‘काळाची पावले ओळखून सतत बदलाला तयार राहा’ हेच आप्पांना सुचवायचे असावे.


पद्य –

नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए ॥धृ.॥

स्वतंत्र देश हो गया, प्रभुत्वमय दिशा मही,
निशा कराल टल चली, स्वतंत्र माँ, विभामयी
मुक्त मातृभूमि को , नवीन मान चाहिये ॥१॥

चढ रहा निकेत है कि, स्वर्ग छू गया सरल
दिशा दिशा पुकारती कि, साधना करो सफल।
मुक्त गीत हो रहा, नवीन राग चाहिए ॥२॥

ध्यान में सदा रखो कि कंटकों की राह है,
प्राण-दान का समय, उमंग है उछाह है ।
पगों में आँधियाँ भरे, प्रयाण गान चाहिए ॥३॥

3 thoughts on “पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए …”

  1. विजय रायबागकर

    कै अप्पांच्या स्मृती जागत असताना वाटतय की आदर्शवाद आणि व्यवहार यांच्यात वाढत जाणारी दरी कमी करण्यासाठी , मनोबल
    उच्च असणारे प्रबोधिनीय कवि आता पुढे सरसावण्याची वेळ झाली आहे!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *