हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या असंख्यात ज्योतिर्दळे लावली
जरी दाट अंधार आहे सभोती तरी आमुची वाट तेजाळली ॥ ध्रु. ॥
दिली ध्येयनिष्ठा दिली कार्यनिष्ठा, मनी रेखलेली श्रमाची प्रतिष्ठा
समाजार्थ निःस्वार्थ सेवा कराया तुम्ही त्यागदीक्षा आम्हाला दिली
हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या कृतीने नवी प्रेरणा कोरली ॥ १ ॥
जेथे घोर अन्याय थैमान घाली तिथे धावुनी जा तुम्ही निर्भय
पटे सत्य तेथे तुम्ही ठाण मांडा युवाशक्ति आहे जगी दुर्जय
उद्याच्या जगाचे नवे स्वप्न देखा, दिसू दे तुम्हाला उषःकालरेखा
अरे आज जे गांजले-पोळलेले मिळू दे सुखाची तयां सावली
हे कर्मयोगिन, तुम्ही मानसी या अशी ध्येयसृष्टीच साकारली ॥ २॥
तपस्वी मनस्वी जरी आकृती ती नसे आज साक्षात् समोरी उभी
स्मृतींच्या कृतींच्या हजारो शलाका तरी चेतलेल्या मनाच्या नभी
वसा टाकुनी दूर जाणार नाही, रणातून माघार घेणार नाही
अम्हि अंतरात्म्यास साक्षी करोनी मनाने प्रतिज्ञा अशी घेतली
हे कर्मयोगिन, तुम्ही मानसी या नवी वज्रबीजेच ही पेरली ॥ ३ ॥