निरूपण –
साने गुरुजींच्या १६३ कवितांचा संग्रह १९३५ साली ‘पत्री’ या नावाने प्रकाशित झाला होता. पत्री म्हणजे देवपूजेत वाहतो ती विविध वनस्पतींची पाने. जगन्मातेला, भारतमातेला, जन्मदात्री आईला वाहिलेल्या कविता म्हणजेच पत्री. त्यातले एक पान म्हणजे ‘बलसागर भारत होवो’ ही कविता. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात लिहिलेली असल्याने त्यात परदास्यातून मुक्तीचा, स्वातंत्र्याचा संदर्भ असलेले काही शब्द होते. असे दोन-तीन शब्द बदलून स्वातंत्र्यानंतरही हे पद्य ध्येयगीत म्हणून सर्व मराठी भाषिकांमध्ये प्रचलित झाले आहे. प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त महापुरुष व सर्वधर्मग्रंथ पूजा केली होती. त्या पूजेच्या शेवटी हे पद्य म्हटले गेले. आधी बऱ्याच वेळा म्हटले होते. पण त्या पूजेच्या शेवटी ऐकलेले कायमचे लक्षात राहिले. प्रबोधिनीच्या स्थापनेच्या सुमारे अठ्ठावीस-तीस वर्षे आधी लिहिलेल्या या पद्यामुळे ‘ध्येय एक जरि भिन्न साधने’ याचीच प्रचीती येते. या पद्यात मांडलेल्या ध्येयासाठीच वेगळ्या काळात, वेगळ्या साधनांनी प्रबोधिनी काम करत आहे.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ॥धृ.॥
बलवान म्हणजे ज्याच्याकडे बल आहे असा. बलवानाकडे खूप बल असते. पण त्या बलालाही मर्यादा आहे. सागराला मर्यादा नाही. बलसागर म्हणजे अमर्याद बल असलेला. देशाला बलसागर म्हटले म्हणजे सर्वात आधी अमर्याद सैनिकी बळ किंवा अमर्याद संपत्तीचे बळ डोळ्यांसमोर येते. ही दोन्ही बळे देशाकडे हवीतच. पण त्यांनाही मर्यादा असते. शास्त्र-संशोधनाचे, ज्ञान-विज्ञानाचे, यंत्र-तंत्राचे बळही देशाकडे हवे. पण त्यांनाही मर्यादा आहे. देश विश्वात शोभून राहायचा असेल, म्हणजे विश्वाला खरी शोभा भारतामुळे येते असे इतर सर्व देशांना वाटायचे असेल, तर नैतिक बळाच्या बाबतीत आणि आत्मबळाच्या बाबतीत भारत बलसागर व्हायला हवा.
पाकिस्तान, इराण, उत्तर कोरिया, इस्राएल या देशांनी आम्ही फक्त स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे बनवली आहेत असे म्हटले, तर जग त्याकडे संशयाने पाहील. भारताने स्वतःहून आम्ही कोणाविरुद्ध अण्वस्त्रांचा पहिला वापर करणार नाही असे जाहीर केले. त्यावर मात्र जगाने विश्वास ठेवला. आपल्या हेतूतील सद्भावावर आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल इतरांना विश्वास वाटणे, हेच भारताचे नैतिक बळ. आत्मबळ म्हणजे निर्भयता आणि निर्वैरता. आम्ही कोणाला भीत नाही आणि आम्हाला ही कोणी निष्कारण भीत नाही, म्हणजे निर्भयता. आमचे कोणाशी भांडण नाही आणि मतभेद असले तरी आम्हाला कोणी खोडसाळपणे विरोध करत नाही. ‘सर्वेषाम् अविरोधेन’ आमची प्रगती चालू असते, ही निर्वैरता. नैतिक बळ आणि आत्मबळाच्या बाबतीत भारत बलसागर होवो, ही मुख्य प्रार्थना आहे. इतर सर्व बळांचे त्याला पूरक महत्त्व आहे.
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ॥१॥
देशातील सर्व लोकांचे शरीर सुंदर, सतेज करणे; मन पवित्र, सुदृढ करणे; बुद्धी कुशाग्र, विशाल करणे; आत्मा निर्भय, निर्वैर करणे, हीच त्या लोकांची सेवा. या जनसेवेसाठी शेतीपासून अंतराळ विज्ञानापर्यंत, आणि समानतेपासून सामाजिक न्यायापर्यंत देशाच्या प्रगतीकरिता, आणि सर्वांच्या मधील विषमता, दारिद्र्य, फुटीरता दूर करण्याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजेच राष्ट्रार्थ प्रयत्न करायला हवेत. ‘कंकण करि बांधियले’ म्हणजे असे प्रयत्न करण्याची मी शपथ घेतली आहे. माझ्यात प्राण असेपर्यंत मी जनसेवेसाठी आणि राष्ट्रार्थच काम करणार आहे. ते काम करत करतच मी मृत्यूला सामोरे जायला तयार आहे. म्हणजेच आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रार्थ काम करणार आहे.
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो ॥२॥
राष्ट्रार्थ प्राण वेचायचे, म्हणजे देशाला सर्व प्रकारे वैभवसंपन्न करायचे काम, मी आजीवन करायचे ठरवले आहे. त्या कामासाठी माझी शक्ती-युक्ती-बुद्धी, माझा वेळ, धन आणि मन, म्हणजेच माझे सर्वस्व अर्पण करायचे मी ठरवले आहे. पूर्वी देश पारतंत्र्यात होता. आज आर्थिक उत्पन्नामध्ये भारत जगात पाचवा देश आहे. इतर अनेक क्षेत्रांत मात्र, वेगवेगळ्या निर्देशांकांवर भारत जगात विसावा, पन्नासावा, शंभरावा, दीडशेवा आहे. म्हणजेच देशाचा समतोल विकास झालेला नाही. पारतंत्र्य हा घोर तिमिर, म्हणजेच भीषण अंधार होता. तसा हा वेगवेगळ्या क्षेत्रातील विकासाचा असमतोलही अजून सारा अंधार फिटलेला नसल्याचे सांगतो. तो असमतोल दूर करण्यालाही मी बांधील आहे. पण हे काम माझे एकट्याचे नाही. सर्व देशवासीयांना या कामात सहभागी होण्याचे मी आवाहन करतो.
हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायला हो ॥३॥
भारत बलसागर बनवण्याचा राष्ट्रयोग साधायचा असेल, तर सर्व देशवासीयांची श्रमशक्ती एकवटली पाहिजे. त्यासाठी परस्परांशी हातमिळवणी करून काम करता आले पाहिजे. सर्वांची मने जोडली गेली पाहिजेत. संशय, दुरावा, अविश्वास, द्वेष, सूड किंवा बदला, उच्च-नीचतेच्या कल्पना, या भावना मनातून काढून टाकल्या तरच परस्परांची मनमिळणी होईल. त्यालाच ‘हृदयास हृदय जोडून’ असे म्हटले आहे. परस्परांपासून वेगळेपणा राखण्याची निमित्ते किंवा सबबी आपली बुद्धी शोधू शकते. तसेच एकत्र येण्यासाठी समान मुद्देही शोधू शकते. समानता शोधण्यासाठीच बुद्धी वापरणे म्हणजे ऐक्याचा मंत्र जपणे. कामासाठी हातमिळवणी करण्याचे, जोडले राहण्यासाठी मनमिळणी करण्याचे आणि जुळेल तेवढ्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्यासाठी बुद्धी वापरण्याचे, सर्व देशवासीयांना मी आवाहन करत आहे.
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ
विश्वात पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ॥४॥
एकत्र काम करण्यासाठी सर्वांची शारीरिक श्रमशक्ती, हृदये आणि बुद्धी एकवटली तरी ती एकजूट तशीच टिकून राहण्यासाठी सर्वांच्या समोर मोठे, लांब पल्ल्याचे समान ध्येय लागते. ‘माय निजपदा लाहो‘ म्हणजेच भारतमाता, विश्वात सतत शोभून राहील, असे स्थान प्राप्त करो, हेच ते ध्येय आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रात अग्रगण्य होऊनही भारत साऱ्या जगामध्ये विश्वासार्ह, निर्भय, निर्वैर राहील असा पराक्रम जगाला दाखवायचा आहे, याची आठवण आपल्याला सतत राहिली पाहिजे. अशी आठवण जागी ठेवणारीच गीते आपण गाऊया. भारताची कीर्ती वाढवणारा झेंडा आपल्या हातात ठेवूया. म्हणजेच कीर्ती वाढेल असे वागूया.
या उठा, करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ॥५॥
पुरुषार्थाचा रूढ अर्थ पराक्रम असा आहे. पण मनुष्याने आयुष्यात मिळवाव्यात अशा गोष्टी म्हणजे पुरुषार्थ हा पुरुषार्थाचा मूळ अर्थ आहे. एकेका व्यक्तीसाठी पुरुषार्थ मिळवायचा. राष्ट्रासाठी दिव्य पुरुषार्थ मिळवायचा. राष्ट्राचा दिव्य पुरुषार्थ म्हणजे विश्वात ध्रुव ताऱ्यासारखे अढळपणे शोभून राहणे. ते स्थान देशाला मिळावे या साठी आपण शर्थ म्हणजे सर्व शक्तीनिशी प्रयत्न करूया. असे आपण केले नाही तर आपले आयुष्य फुकट गेले असे होईल. रात्रीच्या वेळी ध्रुवतारा अढळ असतो. दिवसभर सूर्य तळपत असतो. ‘भाग्यसूर्य तळपत राहो’ म्हणजे देशाचे स्थान मात्र अहोरात्र, चोवीस तास, सर्व जगाला शोभा आणत राहील, असे आपण आपल्या प्रयत्नांनी करूया.
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ॥६॥
भारत थोर म्हणजेच बलसागर व्हावा. त्याच्या वैभवाची कीर्ती जगभर पसरावी. पण भारताच्या बळामध्ये आत्मबळ मुख्य आहे. पूर्वी ऋषी-मुनींच्या आश्रमांच्या परिसरात जंगलातील प्राणी त्या ऋषींच्या आत्मबळाच्या प्रभावाने, आपला भित्रेपणा किंवा हिंस्रपणा विसरून जाऊन गुण्या-गोविंदाने एकत्र राहत, अशी वर्णने आहेत. भारताच्या आत्मबळाच्या प्रभावाने जगातील राष्ट्रे सुद्धा परस्पर वैर विसरून शांततेने नांदू लागली असे जेव्हा होईल, तो खरा सोन्याचा दिवस असेल. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ याचा सगळ्या जगाला अनुभव येणे हाच भारत बलसागर होण्याचा हेतू आहे.
पद्य –
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ॥धृ.॥
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ॥१॥
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो ॥२॥
हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायला हो ॥३॥
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ
विश्वात पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ॥४॥
या उठा, करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ॥५॥
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ॥६॥
खूप छान वाटले. धन्यवाद
हे गीत सर्व मुलांना येते. जोशात म्हणतात. पण अर्थ पूर्ण कळतो असं नाही. तो या निरूपणामुळे नक्की कळेल
हे पद्य शाळेत असल्या पासून माहित होते. म्हंटले होते. पण अर्थ समजून पद्य म्हणताना एक वेगळीच शक्ती संचारत आहे असे वाटले. आणि मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ह्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. त्यांना हेच तर सगळे अपेक्षित आहे असे वाटले.
नमस्कार संपूर्ण गीतामध्ये एका माणसाने अथवा अनेकांनी मिळून पराकोटीचे प्रयत्न करण्याचे महत्त्व अथवा तसे आवाहन वर्णिले आहे परंतु
यात ” भाग्यसूर्य ‘ हा शब्द मात्र थोडासा खटकतो.
त्यावर अधिक मार्गदर्शन मिळू शकेल काय?