पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने

निरूपण

एक संस्कृत सुभाषित आहे.  त्याचा आशय असा की एखाद्या व्यक्तीचे मूल्य किंवा त्याची उत्तमता त्याच्या स्थानावरून निश्चित होत नाही तर त्याच्या गुणांवरून निश्चित होत असते. हे स्पष्ट करण्याकरता उदाहरण दिले आहे की राजवाड्याच्या शिखरावर बसला आहे म्हणून कावळ्याला कोणी पक्षीराज गरुड म्हणत नाहीत. आपल्या पदामुळे किंवा पदव्यांमुळे आपली श्रेष्ठता ठरत नाही. आपले कर्तृत्व, हृदयगुण आणि चारित्र्यगुणांमुळे आपले खरे मूल्य ठरत असते. आजचे पद्य पहिल्यांदा म्हटले त्याच वर्षी हे संस्कृत सुभाषित शिकलो होतो. दोन्हीची सांगड तेव्हापासून मनात पक्की बसून गेली.

असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदीर उभविणे हेच आमुचे शील ॥धृ.॥

शील म्हणजे जी गोष्ट करण्याकडे आपल्या मनाचा सहज कल आहे आणि जी करायची आपण विचारपूर्वक ठरवले आहे अशी आपली ओळख. सर्वांना क्षमा करणारा तो क्षमाशील. सर्व प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणारा तो धैर्यशील. तसे या पद्यात राष्ट्रमंदिर उभे करणे हेच ज्यांचे काम, स्वभाव, ध्येय आणि व्रत आहे ते म्हणतात की मंदिर उभे करणे, निर्माण करणे हीच आमची ओळख आहे. आम्ही निर्मितीशील आहोत. राष्ट्रमंदिर उभे राहणे हे महत्त्वाचे. आम्ही कळसाचे दगड आहोत, की भिंतीतला चिरा आहोत की पायाचा दगड आहोत हे महत्त्वाचे नाही. इतर कोणी तयार नसेल तर आम्ही आनंदाने पायाचे दगड व्हायला तयार आहोत. मंदिरासाठी त्याची भौतिक रचना आणि आतली मूर्ती दोन्ही लागते. मंदिर कोणाचेही असू शकते. आम्ही राष्ट्रमंदिर उभे करू इच्छिणारे असे राष्ट्रनिर्मितीशील आहोत हे या धृपदानंतरच्या पहिल्या कडव्यात सांगितले आहे. 

आम्हास नको मुळी मानमरातब काही
कीर्तीची आम्हा चाड मुळीही नाही
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील ॥१॥  

राष्ट्र उभविणे हे आमचे ध्येय आहे. राष्ट्र उभे करणे, त्याची नव्याने उभारणी करणे हे मंदिर उभे करण्यासारखेच काम आहे. ध्येयमंदिर म्हणजेच ज्यांचे राष्ट्रमंदिर उभे करण्याचे ध्येय आहे अशांनी उभे केलेले मंदिर. त्याच्या गाभाऱ्यामध्ये आमच्या आराध्य दैवताची म्हणजेच मातृभूमीची मूर्ती आहे. त्या मातृभूमीच्या पायावर आम्ही आमची, शक्ती, पैसा, वक्तृत्व, प्रतिभा आणि मनही, म्हणजेच सर्व काही  अर्पण केले आहे. त्यामुळेच राष्ट्रमंदिर उभारणे हेच आमचे शील झाले आहे. सर्वस्व अर्पण करण्यात जो आनंद असतो, त्यापुढे राष्ट्रासाठी काम करताना आपले सत्कार होतात की नाही, आपले कौतुक होते की नाही, आपले नाव आणि छायाचित्र छापून येते की नाही, ‌‘सेलेब्रिटीं‌’च्या यादीत आपल्याला मोजले जाते की नाही, याकडे आमचे लक्षच जात नाही.

वृक्षांच्या शाखा उंच नभांतरि जावो
विश्रांति सुखाने विहगवृंद तैं घेवो
जरि देईल टकरा नाग बळाने देवो
करू अमर पाजुनि रस पाताळातील ॥२॥

मंदिर कितीही भव्य आणि आकर्षक झाले, तरी ती स्थिर, निर्जीव रचना आहे. त्याच्या पायाचा दगड होण्याची तयारी आहेच. पण आम्ही सतत वाढणाऱ्या सजीव रचनेचाही भाग होऊ शकतो. आकाशाकडे झेपावणाऱ्या झाडांच्या शेंड्यांकडे सर्वांचे लक्ष जाते. त्या झाडाच्या अंगा-खांद्यांवर म्हणजे फांदी-फांदीवर शेकडो पक्ष्यांचे थवे म्हणजे विहगवृंद, आसरा घेतात. त्यांनी तिथे विश्रांती घ्यावीच.  राष्ट्रातील सर्व लोकही रोज रात्री भरल्या पोटी समाधानाने झोपी जाणारे असावेत. असा अनेक जीवांना आधार देणारी झाडे मजबूत पाहिजेत. त्यांच्या खोडांना-बुंध्यांना ‌‘नाग‌’ म्हणजे मदाने माजलेले, पिसाळलेले हत्ती आपल्या भव्य कपाळाने टकरा द्यायला लागले, तरी ती झाडे टिकली पाहिजेत. मोडून किंवा मुळापासून उखडली जायला नकोत. झाडाची मुळे जेवढी खोल तेवढी झाडाची धक्का सहन करण्याची ताकद वाढते. मग आम्ही त्या झाडाची खोलवर, अगदी पाताळापर्यंत जाणारी मुळे व्हायला तयार आहोत. पायाच्या दगडासारखे फक्त आधार देण्याचेच काम नाही, तर जमिनीतली सर्व पोषक द्रव्ये शोषून त्या झाडांच्या सर्वांगांचे पोषणही आम्ही दीर्घ काळ करत राहू.  पोषणाअभावी त्यांना मरू देणार नाही. जमिनीखाली मुळांचे काम करताना आमच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही तरी चालेल.

जरि असेल ठरले देवत्वाप्रत जाणे
सोसून टाकीचे घाव बदलवू जिणे
गुणसुमने आम्ही विकसित करू यत्नाने
पावित्र्ये जीवन का न होइ तेजाळ ॥३॥

या कडव्याची पहिली ओळ मुळात ‌‘जरि असेल अमुचे रूपहि ओंगळवाणे‌’ अशी होती. एकदा आप्पांनी या ओळीत बदल सुचवला.  पायाचे दगड किंवा जमिनीखालची मुळे आहोत असे म्हणण्यात नम्रता आहे. रूप ओंगळवाणे आहे म्हणण्यात नम्रता नसून, आपण काहीतरी कमी आहोत असा न्यूनगंड आहे. आमचे ते रूप आम्ही बदलू एवढी संकुचित आकांक्षा का ठेवायची ? नम्रतेच्या बरोबर ‘रूप पालटू देशाचे’ ही मोठी आकांक्षा पाहिजे. पहिल्या दोन कडव्यांत निर्जीव मंदिराचा दृष्टान्त झाला, सजीव वृक्षाचा दृष्टान्त  झाला, पद्याच्या शेवटी आणखी काहीतरी मोठा विचार हवा.

सुरुवातीला म्हटले तसे कावळ्याला गरूड व्हावेसे वाटले, तर नुसते राजवाड्याच्या शिखरावर बसून तो बदल होणार नाही. कावळ्याला स्वतःमध्ये गरुडाचे गुण आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. कावळ्याला असे प्रयत्न करता येतील की नाही हे माहीत नाही. पण माणसाला प्रयत्न करून आपले दोष घालवता येतात, गुणही वाढवता येतात. निर्दोष, गुणसंपन्न माणूस म्हणजेच देवमाणूस.

राष्ट्र उभारायचे म्हणजे खरे तर साऱ्या समाजाने, राष्ट्रातल्या सर्वांनी देवमाणूस बनायला हवे. मंदिर, वृक्ष यापेक्षा देवमाणसांचा संघटित समाज या शब्दांत राष्ट्राचे अधिक यथार्थ वर्णन होईल. पायाचे दगड किंवा झाडाची मुळेही व्हायची आमची तयारी आहे. पण राष्ट्रातल्या सर्वांनी देवत्वाचे गुण मिळवायचे असतील तर आमच्यापासूनच आम्ही सुरुवात करतो. दगडातून मूर्ती घडवताना टाकीचे, म्हणजे छिन्नीचे, घाव घालून नको असलेला भाग काढून टाकावा लागतो. तसे आमच्यातले दुर्गुण आम्ही काढून टाकू. ते काढून टाकताना दगड जसे छिन्नीचे घाव सोसतो, तसे आम्हाला जो काही त्रास होईल, तो आम्ही सहन करू. आमचे जिणे, म्हणजे जीवन निर्दोष म्हणजे शुद्ध, आणि पवित्र म्हणजे इतरांचे दुर्गुण घालवणारे करू. आमचे दोष घालवूच. पण त्या शिवाय आमच्यामध्ये प्रयत्नपूर्वक अनेक सद्गुण मिळवायचा प्रयत्न करू. दोष घालवून पवित्र होऊ. सद्गुण मिळवून तेजाळ म्हणजे तेजस्वी होऊ. पवित्र आणि तेजस्वी होणे म्हणजेच देवत्वाप्रत जाणे. आधी स्वतः देवत्वाप्रत जाण्याचा प्रयत्न करू. मग इतरांना त्यासाठी मदत करू. पायाचा दगड बनून आधार देणे, झाडाचे मूळ बनून आधार देणे व पोषण करणे, याच्या पुढची पायरी म्हणजे स्वतःमधले देवत्व वाढवून इतरांमधले वाढवायला मदत करणे. या तीन्ही गोष्टी आम्हाला समान आहेत. भौतिक आधार देणारे, पोषण करणारे आणि सर्वांना श्रेष्ठत्वाकडे  नेणारे ही तीन्ही कामे आम्ही आमच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडला नाही तरी प्रसन्नतेने करू. हेच आमचे शील, आमचे चारित्र्य, आमच्या व्यक्तिमत्त्वाचे बरोबर असे वर्णन आहे.

पद्य –

असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदीर उभविणे हेच आमुचे शील ॥धृ.॥

आम्हास नको मुळी मानमरातब काही
कीर्तीची आम्हा चाड मुळीही नाही
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील ॥१॥

वृक्षांच्या शाखा उंच नभांतरि जावो
विश्रांति सुखाने विहगवृंद तैं घेवो
जरि देईल टकरा नाग बळाने देवो
करू अमर पाजुनि रस पाताळातील ॥२॥

जरि असेल ठरले देवत्वाप्रत जाणे
सोसून टाकीचे घाव बदलवू जिणे
गुणसुमने आम्ही विकसित करू यत्नाने
पावित्र्ये जीवन का न होइ तेजाळ ॥३॥

3 thoughts on “पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने”

  1. श्री.सुभाष गदादे

    खूप छान.
    सविस्तर विवेचन वाचून आनंद झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *