निरूपण –
काही पद्ये सोप्या शब्दांची व सोप्या चालीची असतात. म्हणायला सोपी, सांगायला सोपी आणि त्यांचा सरळ शब्दार्थही समजायला सोपा. आजचे पद्य तसे आहे. पण जसा काळ गेला, जसे या पद्यावर चिंतन होत गेले, तसे या पद्यात एक मोठे सूत्र दडलेले आहे असे लक्षात आले, मागे ‘विकसता, विकसता ….’ या पद्याच्या निरूपणात आप्पांनी मांडलेले दर्शन (exposure) आणि आव्हान (challenge) हे शिक्षणातील दोन कळीचे शब्द सांगितले होते. शालेय वयासाठी ते पुरेसे आहेत. पण आयुष्यभरासाठी आणखी काही पायऱ्या हव्यात. औपचारिक शिक्षण संपल्यावर पुढील आयुष्यात आपण अनुभवातूनच शिकत असतो. साध्या साध्या कौशल्यांपासून सवयी, वृत्ती आणि पूर्ण स्वभाव अनुभवातून शिकण्याने घडू शकतो. एका राष्ट्रसमर्पित कार्यकर्त्याच्या घडणीचे टप्पे या पद्यात मांडले आहेत असे मला जाणवले.
बनें हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का
उठाकर धर्म का झंडा, करेंगे मान भारत का ॥धृ॥
हिंद के योगी, म्हणजे देशभक्त बनूया, अशी इच्छा सुरुवातीलाच व्यक्त केली आहे. योगी म्हटल्यामुळे देशभक्ताचा वेष, वागणे, बोलणे, काम करणे या सर्वांचे वर्णन योग्याच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीने केले आहे. योगी ध्यान करतो. मग आपणही आपल्या देशाचे, भारताचे, ध्यान करूया. एकाग्रतेने सतत भारताचाच विचार करूया. भारताचा मान वाढेल अशा प्रकारचे काम करूया. विवेकानंदांनी भारतातील धर्माचा संदेश जगाला दिला, धर्माचा झेंडा जगभर फिरवला. कारण त्यांच्या दृष्टीने धर्म हाच भारताचा प्राण आहे. तसे आपणही भारतातील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा झेंडा जगभर फिरवूया. त्यागी, योगी, राष्ट्रभक्त संत पाहिल्यावर, त्यांच्यासारखे व्हावे असे मनात येणे इथूनच स्वत:मधील बदलांना सुरुवात होते. नवीन किंवा वेगळ्या गोष्टींचे दर्शन झाले की तसे करून पाहावेसे, व्हावेसे वाटते. इथे इतर देशभक्तांची चरित्रे वाचून किंवा ऐकून आपण देशभक्त व्हावे, हिंद के योगी व्हावे, असा संकल्प करावासा वाटले आहे. हाच दर्शनाचा परिणाम आहे.
गले में शील की माला, पहनकर ज्ञान की कफनी
पकडकर त्याग का डंडा, करेंगे मान भारतका ॥१॥
योगी म्हटले की त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आली. अंगावर भगवी कफनी आली. हातात दंड आला. योगी व्हायचे ठरवले तर सगळ्यात आधी करण्यासारखे म्हणजे त्याच्या बाहेरून किंवा वरून दिसणाऱ्या रूपाचे अनुकरण करणे. लहान मुलांच्या आकर्षक पोशाखाच्या स्पर्धा होतात. तेव्हा कोणी झाशीची राणी, कोणी भगतसिंह, कोणी सुभाषबाबू, कोणी सैनिक, कोणी वकील बनतात. तेव्हा फक्त त्यांच्या सारखा पोशाख ती मुले करतात. वरवरचे अनुकरण करतात. देशभक्ताला शील किंवा उत्तम चारित्र्य, अद्ययावत ज्ञान आणि स्वार्थत्यागाची आवश्यकता आहे. त्या गुणांनाच अनुक्रमे माळ, कफनी आणि दंडाची उपमा दिली आहे, हे गुण देशभक्तामध्ये आले तरच तो देशाचा मान जगात वाढवू शकेल. अनुकरण म्हणजे फक्त बाहेरून वागणे बदलणे नाही. ते बदलल्यावर आतून पण बदल होऊ लागेल अशी अपेक्षा आहे. आण्णा पूर्वी धोतर नेसायचे. प्रबोधिनीचे प्रतिनिधी म्हणून लष्करी संशोधन प्रयोगशाळेत जाताना आप्पांनी त्यांना सुरवार घालायला सांगितली. मी पूर्वी पायजमा वापरायचो. मलाही परदेशात प्रबोधिनीचा प्रतिनिधी म्हणून वावरायचे आहे, यासाठी सुरवार वापरायला सांगितली. पूर्वी व्यापार उद्योग विभागाच्या प्रतिनिधींनी विक्रीसाठी भारतभर हिंडताना सुटाबुटात न जाता सुरवार-झब्ब्यात गेले पाहिजे अशी त्यांना सूचना होती. बहिरंगाचे अनुकरण करण्यासाठी, त्या भूमिकेत शिरण्यासाठी काही वेळा दर्शनानंतर मार्गदर्शन किंवा प्रशिक्षणाची गरज असते. आवश्यक तर कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन अनुकरण करणे ही अनुभव शिक्षणाची दुसरी पायरी आहे.
जलाकर कष्ट की होली, उठाकर इष्ट की झोली
जमाकर संत की टोली, करेंगे मान भारतका ॥२॥
संत म्हणजे ही योगी किंवा देशभक्तच. त्यांची टोळी म्हणजे संघटना करून भारताचा मान आम्ही वाढवू. देशाचा मान वाढवणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही, समानशील लोकांची संघटना करणे हे देशभक्तीचेच काम आहे. योगी यज्ञ करताना मंत्र म्हणतात. सर्वसामान्य लोकांसाठी बिनमंत्रांची होळी म्हणजे यज्ञच. होळीत कष्टाच्या गोवऱ्या आणि लाकडे अर्पण करायची. देशासाठी कष्ट केल्यावर त्याचा परिणाम प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. प्रसाद चवीसाठी घ्यायचा नसतो. तसे इष्ट म्हणजे यश-अपयश दोन्ही. यश मिळाले तर कष्ट कारणी लागले. अपयश आले तर कष्टात काय सुधारणा केली पाहिजे हे शिकण्याची संधी मिळाली. योग्याच्या वेषाच्या बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाताना योग्याच्या मानसिक भूमिकेतून वागणे ही आले पाहिजे. यश मिळवण्यासाठी कष्ट करायचे आणि अपयशावर मात करण्यासाठीही कष्ट करायचे, हे आव्हान स्वीकारायचे असते. नंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करून योग्याच्या भूमिकेशी आतून बाहेरून एकरूप व्हायचे आहे. आव्हान स्वीकारून काही काळ उद्दिष्टाशी एकरूप होणे ही अनुभव शिक्षणाची तिसरी पायरी आहे.
स्वरों में तान भारत की, है मुख में आन भारत की
नसों में रक्त भारत का, नयन में मूर्ति भारत की ॥३॥
नटाची भूमिकेशी एकरूपता नाटकापुरती असते. नाटक संपले की तो मूळ स्वभावावर येतो. आव्हान पूर्ण झाले की शिथिलता येते. गणेशोत्सव, प्रात्यक्षिके, एखादे अभियान संपल्यावर युवक-युवती कार्यकर्ते काही काळ निद्रितावस्थेत जातात. कारण ती भूमिका, त्यासाठी आलेली एकरूपता हे उसने अवसान असते. आव्हान संपल्यावर ते अवसान गळून पडते. रामायण मालिकेतील राम आणि सीतेची भूमिका उत्तम वठवलेले नट-नटी, मालिकेनंतरच्या आयुष्यात आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे जगले. ‘संत तुकाराम’ या चित्रपटात तुकारामांची भूमिका करणारे नट विष्णुपंत पागनीस हे मात्र चित्रीकरण संपले तरी तुकारामांच्या मनोभूमिकेतून बाहेर आले नाहीत. त्यांनी चित्रपटातील कामाचे मानधन तर स्वीकारले नाहीच. पण पुढे ही तुकारामांची भूमिका करत असल्यासारखेच ते लौकिक आयुष्यात विरक्त वृत्तीने जगले. ‘हिंद के योगी’ होऊ इच्छिणारे देशभक्त देशाशी एकरूप झाल्यावर ती देशभक्ती अंगात भिनवू इच्छितात. देशभक्ती अंगात भिनली की ती डोळे, बोलणे, गाणे या सगळ्यातून कायम व्यक्त होत राहते. मग बोलायला वेगळा विषय राहत नाही. ही एकरूपतेच्या पुढची पायरी. तिला तन्मयता किंवा कायाकल्प म्हणता येईल. असा देशभक्त ‘मी काही काळ देशभक्ती केली’ असे म्हणूच शकत नाही. तो देशभक्तीचाच सजीव पुतळा बनतो. एखाद्या विषयाने आपला कायाकल्प होणे, व्यक्तिमत्त्व ध्येयमय होऊन पूर्णपणे ध्येयरूप होणे, ही अनुभवशिक्षणाची चौथी पायरी आहे.
हमारे जन्म का सार्थक, हमारे स्वर्ग का कारण
हमारे मोक्ष का साधन, यही उत्थान भारत का ॥४॥
काही जणांच्या बाबतीत देशभक्ती अंगात भिनते आणि त्यांचे आयुष्य त्यांच्यापुरते बदलून जाते. पण काही जणांच्या बाबतीत ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ या न्यायाने आपला अनुभव इतरांना सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नाही. माझ्या जन्माचे सार्थक देशाच्या पुनर्उभारणीसाठी – उत्थानासाठी – काम करण्यातून झाले, तसे तूही तुझ्या जन्माचे सार्थक कर, असे सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मी देश उभारणीसाठी काम करत आहे, त्यामुळे स्वर्गातील माझी जागा आरक्षित झाली आहे, यावर काही जण समाधानी असतात. काही जण मात्र माझ्या मार्गाने तुम्ही तुमची स्वर्गातली जागा आरक्षित करा, असे इतरांना सांगितल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी – मोक्ष मिळवण्यासाठी – देशाच्या उत्थानाकरता काम करणे, हे साधन मला सापडले आहे, ते सर्वांनी वापरले पाहिजे, असा आग्रह करणारेही काही जण असतात. देशभक्तीचे सक्रिय प्रचारक, विस्तारक, उपदेशक बनणारे किंवा इतरांना आपल्यासारखे बनण्याचे आवाहन करणारे अनुभव शिक्षणाच्या पाचव्या पायरीवर जातात.
दर्शन – सहभाग किंवा अनुकरण – आव्हान आणि एकरूपता – कायाकल्प – इतरांना आवाहन, या अनुभव शिक्षणाच्या पाच पायऱ्या मला या पद्यात दिसल्या.
पद्य –
बनें हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का
उठाकर धर्म का झंडा, करेंगे मान भारत का
॥धृ॥
गले में शील की माला, पहनकर ज्ञान की कफनी
पकडकर त्याग का डंडा, करेंगे मान भारतका
॥१॥
जलाकर कष्ट की होली, उठाकर इष्ट की झोली
जमाकर संत की टोली, करेंगे मान भारतका
॥२॥
स्वरों में तान भारत की, है मुख में आन भारत की
नसों में रक्त भारत का, नयन में मूर्ति भारत की
॥३॥
हमारे जन्म का सार्थक, हमारे स्वर्ग का कारण
हमारे मोक्ष का साधन, यही उत्थान भारत का
॥४॥
Hamaare जन्म का सार्थक !
पद्याचे निरूपण खूप प्रेरणादायी…
मागील एक महिन्यापासून वेगवेगळ्या चार पद्यांचे अर्थ समजून या निमित्ताने घेता आला .
माननीय गिरीश राव आपण आजार काळातील विश्रांती घेत असताना सुद्धा आपला चालू असलेला विचार खूप भावला.