समूहशक्तीची जाणीव व तिची अभिव्यक्ती
समूहशक्तीचे जागरण सामूहिक उपासनेने होते की संघटनाने होते ? व्यक्तीप्रमाणे समूहाचेही चित्त असते. नुसत्या गदला या सामूहिक चित्ताची जाणीवच नसते. एखाद्या भयंकर घटनेची अफवा पसरली की सामूहिक चित्तामध्ये भीतीची भावना पसरते. एखादा जमाव बिथरला आणि झुंड म्हणून प्रक्षोभक कृती करायला लागला की समूहचित्तामध्ये क्रोधाची भावना पसरते. एखादा लोकसमूह रागावलेला नसेल किंवा घाबरलेलाही नसेल तर त्या लोकसमूहाला तो संघटित झाल्यावर आपल्या सामूहिक चित्ताची जाणीव होते. एका सुरात एकच आशय असलेली प्रार्थना एकत्र म्हणण्याने सामूहिक चित्ताची जाणीव होते. एखादा समूह संघटित झाला म्हणजे त्याच्या सामूहिक मनाला जाग आली. संघटित लोकसमूह सामूहिक उपासना करू लागला म्हणजे त्याला आपल्या सामूहिक चित्ताच्या क्षमतांची जाणीव झाली. या समूहचित्ताची शुद्धी, उल्हास आणि प्रेरणा या पुढच्या पायऱ्या अजून कल्पनेतीलच आहेत. चित्तशुद्धी, चित्तउल्हास व चित्तप्रेरणा या पायऱ्या अनुभवलेल्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या आहेत. परंतु चित्तशुद्धी झालेला लोकसमूह कोणता ? हे सांगणे आज तरी शक्य नाही. त्यामुळे सामूहिक उपासनेतून समूहशक्ती जागरण एवढे मर्यादित उद्दिष्टच सामूहिक उपासनेच्या बाबतीत कै. आप्पांनी मांडले आहे. समूहचित्ताची जाणीव व समूहचित्ताचे प्रकाशन असे समूहशक्ती जागरणाचे दोन टप्पे करता येतील.
‘या गटासाठी मी माझी चार कामे बाजूला ठेवून आलेलो आहे. या गटासाठी मी सगळ्या जबाबदाऱ्यांशी जुळवून घेऊन, त्याच्यातून वेळ काढून मी आलेलो आहे. यालाही माझ्या आयुष्यात महत्त्व आहे’, असे म्हणून जेव्हा सामूहिक उपासनेसाठी सगळे एकत्र जमतात, तेव्हा त्यांना समूहचित्ताची जाणीव होते.
प्रबोधिनीत कधी-कधी आपण ऋग्वेदातील एक सूक्त म्हणतो त्यातला शेवटचा श्लोक आहे, “समानी व आकूतिः समाना हृदयानि वः |…” आपल्या वर्षारंभ उपासनेच्या गद्य प्रार्थनेत याचा समावेश केलेला आहे. मध्यंतरी मी एकदा वेगवेगळ्या लोकांनी लावलेले याचे अर्थ पाहात होतो. माझ्या असे लक्षात आले की सगळ्यांनी सर्वसाधारणपणे एकाच पद्धतीने भाषांतर केलेले आहे. सगळ्यांचा अर्थ साधारण सारखाच आहे. ‘विकसता विकसता विकसावे’ या पद्याच्या शेवटच्या कडव्यात या मंत्राचा अर्थ आलेला आहे. आपल्या सर्वांचा आशय एक असो आणि आपली हृदये अभिन्न असोत.
‘समकृती समकृती समकार्य’ म्हणजेच ‘समानी व आकूतिः’
‘हृदय स्पंदन घडो मन एक’ म्हणजेच ‘समाना हृदयानि वः’
कै. आप्पांनी हा श्लोक समोर ठेवून हे पद्य रचलेले नाही. पण कोणीही माणूस जेव्हा विचार करतो आणि तो विचार योग्य विचार असतो तेव्हा इतरांनी केलेल्या योग्य विचारांशी तो जुळतोच. तसं हे झालंय. ‘समकृती समकृती समकार्य’ म्हणजे एकत्र कृती करत असतानाच याच्यापुढे आपण एकत्र कोणते कार्य करायचे आहे हे कळायला लागते. हे कळायला लागणे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आशय एक होणे. आशय एक होणे म्हणजे समूहाच्या चित्ताचे प्रकाशन होणे. ‘रूप पालटू देशाचे’ किंवा इतर अनेक प्रबोधन गीते आहेत ती एकत्र म्हणत म्हणत व एकत्र काम करता करता तो आशय स्पष्ट होत जातो. हा आशय स्पष्ट होत जाणे म्हणजे समूहाचे चित्त प्रकाशात येणे. चित्त आहे म्हटले म्हणजे त्याच्या पुढच्या प्रक्रिया व्हायलाच हव्यात. समूहाच्या चित्तासाठी समूहानेच प्रयत्न करायला लागतात. यासाठी समूहाने शक्ति-मंत्र म्हणणे, समूहाने विरजा मंत्र म्हणणे, समूहाने गायत्री मंत्र म्हणणे, यांचे प्रयोगही करून पाहिले पाहिजेत.
प्रबोधिनीत अनेक ठिकाणी सामूहिक उपासना होते. पण बऱ्याच वेळा ती कर्मकांड म्हणूनच होते. ‘प्रबोधिनीचं ठरलंय सामूहिक उपासना करायची’ म्हणून आपण करतो. पण सामूहिक उपासना का करायची हे समजून घेऊन सामूहिक उपासना केली तर व्यक्तीला जसे उपासनेचे काय काय परिणाम होतात ते अनुभवता येते तसे समूहालासुद्धा उपासनेचे काय काय परिणाम होतात ते अनुभवता येतील. जे गट प्रबोधिनीत सातत्याने दीर्घकाळ अशी सामूहिक उपासना करतात त्यांनाही सुरुवातीचे असे अनुभव आलेले आहेत. पण प्रत्येक वेळी तो गट टिकून राहतो असे नाही. तो गट पांगल्यानंतर ते प्रयत्न नुसते बीजावस्थेत राहतात. पुन्हा कुठे एकत्र जमले तर कदाचित उपयोग होईल. परंतु सामूहिक उपासनेची गरज आहे. तीही सातत्याने करण्याची गरज आहे. कारण राष्ट्र घडवण्यासाठी पूर्ण राष्ट्राला आपल्या सामूहिक चित्ताची जाणीव व्हायला पाहिजे. त्यातला आपला वाटा म्हणून जेवढा केवढा समूह आपल्याला एकत्र आणता येईल त्या समूहाची रोज शक्य नसते म्हणून आठवड्यातून एकदा सामूहिक उपासना झाली पाहिजे. त्याचेही असे परिणाम आपल्याला अनुभवता येतील. असे काय काय परिणाम होतात हे लक्षात घेऊन, त्याच्यावर लक्ष ठेवून पण त्याच्यासाठी म्हणून नाही अशी आपली व्यक्तिगत आणि सामूहिक उपासना चालू राहावी. त्याचा प्रबोधिनीच्या इतर कामावर आणि व्यक्तिगतरित्या त्याच्याशिवाय आपली आणखी काही ध्येये असतील त्यावर नक्की अनुकूल असा परिणाम झालेला दिसेल.
सामूहिक चित्ताच्या जागरणासाठी आवश्यक गुण
प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेच्या पोथीत उपासनेची फलश्रुती अशा शीर्षकाच्या परिच्छेदात पुढील वाक्य आहे. ‘सर्व हिंदुस्थानभर तळमळ आणि निष्ठापूर्वक – ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र कोटी कोटी कंठांतून निघत आहे आणि खरोखरीच सामुदायिक निष्ठा-नीती, धैर्य, उद्योगशीलता, मित्रभाव, सर्वांभूती प्रेम आदी समाजधारणेला आवश्यक गुणांचा समाजात विकास होत आहे असे दृश्य लवकरात लवकर पाहावयास मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना’. समाजधारणेला आवश्यक गुण अर्थातच प्रत्येक व्यक्तीमध्ये विकसित झाले पाहिजेत. हे मनाचे गुण म्हणजेच आंतरिक गुण आहेत.
कै.आप्पांनी एका वैचारिकात असे म्हटले होते की, समाजात बदल घडविण्यासाठी आवश्यक संख्येइतक्या व्यक्तींनी स्वतःमध्ये आंतरिक बदल घडवून आणणे म्हणजेच संघटन त्यामुळे समूहशक्ती जागरण म्हणजेच व्यक्तींमध्ये आंतरिक बदल. आणि पुरेशा संख्येइतक्या व्यक्तींमध्ये आंतरिक बदल घडविणे म्हणजे संघटन हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही एका संघटनेमध्ये समाजातील काही थोडे लोकच असतात. त्यामुळे समूहशक्ती जागरण हे सर्व संघटनांचे साध्य आणि एकेक संघटना हे साधन हे स्पष्ट होते. समूहशक्ती जागरणाचा अंतिम परिणाम म्हणजे राष्ट्रीयत्वाच्या भावनेने प्रेरित झालेल्या समाजाने आपले अर्थकारण, राजकारण, समाजकारण, राष्ट्रकारण आणि मानव्यकारण यांना गती देणे. असे समूहशक्ती जागरण करणारी संघटना आपल्याला करायची आहे, असेही कै. आप्पांनी म्हटले आहे.
उपासनेने आंतरिक गुणांचा परिपोष
एखादा लोकसमूह एकत्र येण्यासाठी त्यातील व्यक्तींमध्ये एकत्र काम करताना उद्योगशीलता आणि मित्रभाव वाढायला हवा. त्याशिवाय एकत्र येऊन स्वयंस्फूर्त काम करणे शक्यच होणार नाही. काम चालू राहण्यासाठी त्या समूहातील व्यक्तींमध्ये धैर्य, चिकाटी आणि चिवटपणाही हवा. समूहाचे अस्तित्व टिकण्यासाठी त्या समूहाने नवीन-नवीन कामे हातात घेतली पाहिजेत. यासाठी समूहातील काही व्यक्तींमध्ये तरी चिंतनशीलता हवी. आपल्या समूहाने पुढे काय करायचे याचे चिंतन त्यांनी करायला हवे. गटातील सदस्य गळाले किंवा बदलले तरी गट टिकला पाहिजे असे म्हणणारेही काही जण हवेत. त्यासाठी गटाचे ध्येय ठरलेले हवे व त्यावर निष्ठा असलेले काही लोक तरी हवेत. निश्चित तत्त्व असलेले, निश्चित ध्येय असलेले व या तत्त्वज्ञानाच्या व ध्येयनिष्ठेच्या आधाराने एकसूत्रात असलेले काहीतरी जण एखाद्या समूहात असले म्हणजे त्यांना समूहशक्तीची जाणीव झाली असे म्हणता येईल.
एकत्र प्रत्यक्ष काम करून, एकत्र नियोजन करून, ध्येयाची चर्चा करून, ध्येयासाठी अडीअडचणींमध्ये एकमेकांना मदत करून आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून समूहांना आपल्या शक्तीची म्हणजेच सामूहिक चित्ताची जाणीव होऊ शकते. एक वा अधिक मंत्र किंवा प्रार्थना एकत्र उच्चारण्याच्या प्रत्यक्ष कृतीने सामूहिक उपासना होते आणि या उपासनेला तत्त्वज्ञानाचा आधारही आहे. त्यामुळे गटाने मिळून इतर व्यावहारिक कामे करत असताना गटाने सामूहिक उपासनाही करण्याचा उपयोग सामूहिक चित्ताची जाणीव अधिक वेगाने किंवा चांगली होण्यासाठी होऊ शकेल, असे प्रबोधिनीचे गृहीत आहे. प्रबोधिनीतल्या अनेक गटांनी सामूहिक उपासना करून हे गृहीत सिद्ध करायचे आहे. प्रबोधिनीतील गटांनी, दलांनी आणि विभागांनी सामूहिक उपासना केली नाही, त्यात सातत्य राखले नाही, तर सामूहिक उपासनेने समूहशक्ती जागरण होते हे केवळ गृहीतच राहील. दीर्घकाळ सामूहिक उपासना केल्याशिवाय हे गृहीत म्हणजे सार्वत्रिक नियम आहे किंवा नाही हे देखील सांगता येणार नाही.
संघटित कामाने, सामूहिक व्यवहाराने आणि सामूहिक उपासनेने गटातील समूहचित्ताची जाणीव झाल्यावर त्या समूहचित्ताच्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे. म्हणजेच समूहचित्ताच्या शक्तीची अभिव्यक्ती झाली पाहिजे. व्यक्तिगत हानी झाली तरी समूहाच्या कार्याची हानी होऊ देणार नाही, अशी निष्ठा म्हणजे सामुदायिक निष्ठा. एका ध्येयाने प्रेरित आहोत म्हणून समूहाच्या ध्येयाकरिता कोणतीही व्यक्तिगत हानी पत्करायला तयार असणे म्हणजे ध्येयनिष्ठा. संघटना प्रमुखांच्या आज्ञेनुसार व सूचनेनुसार वागणे ही संघटनेची प्राथमिक नीती. याच सामुदायिक नीतीचा अधिक विकास झाला म्हणजे संघटनेतील सदस्यांमध्ये आत्मसमर्पणबुद्धी, व्यक्तीपेक्षा संघटनेला मोठे मानण्याची बुद्धी, व्यक्तिगत अहंकाराचे विसर्जन हे गुण प्रकट होतात. संघटनेच्या कार्याच्या, ध्येयाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या चिंतनातूनच समूहचित्ताची अभिव्यक्ती होऊ लागते. आणि व्यक्तीचे चित्त समूहचित्ताशी जुळवून घेत हळूहळू त्याच्याशी तन्मय होऊ लागते. हे केवळ व्यावहारिक कामे करून होणार नाही. समूहातील सर्व व्यक्ती चिंतनशील स्वभावाच्या नसतात. त्यामुळे सामूहिक उपासनेच्या निमित्तानेच सर्वांचे असे नियमित चिंतन होऊ शकते.
सामूहिक उपासनेचे प्रकार
सामूहिक व्यायाम, सामूहिक संचलन, सामूहिक पद्यगायन, सामूहिक भजन, निश्चित वेळी केलेली सामुदायिक कृती (उदा. एकाच वेळी घंटानाद करणे, एकाच वेळी सूर्यनमस्कार घालणे, एकाच वेळी नेत्रदान, देहदान इत्यादीची संकल्पपत्रे भरणे, एकाच दिवशी रक्तदान करणे, एकाच ग्रंथाचे एकत्र वाचन करणे, इ.) हे सर्व समूहचित्ताची जाणीव व अभिव्यक्ती वाढविण्याचेच मार्ग आहेत. या सर्वांनाही सामूहिक उपासना म्हणता येईल.
कृती जेवढी नेमकी व सोपी तितका समूहातील व्यक्तींची संख्या वाढायला उपयोग होतो. परंतु त्या कृतीचा ध्येयाशी व तत्त्वज्ञानाशी संबंध कसा आहे हे फार काळ लक्षात राहात नाही. लोक कृतीतच रमून जातात किंवा कृतीतला त्यांचा रस संपतो. त्यामुळे जागे झालेले समूहाचे चित्त पुन्हा निद्रिस्त होऊ शकते. असे होऊ नये म्हणून थेट ध्येयाचा व तत्त्वज्ञानाचा संबंध जोडून देणारी परब्रह्मशक्तीची सामूहिक उपासना आवश्यक आहे. अशा सामूहिक उपासनेतूनच आपली संघटना सर्व समाजाला स्पर्श करणारी राष्ट्रव्यापी झाली पाहिजे याचे स्मरण होते. समाजातील सर्व व्यक्ती आज नाही तर उद्या आपल्या संघटनेत यायच्या आहेत अशी जाणीव होते. संघटनेतील सदस्यांबाबत वाटणाऱ्या मित्रभावाचे सर्वांभूती आत्मीयतेत विकसन होऊ लागते. सामूहिक उपासना करताना त्या समूहातील काही व्यक्ती तरी चित्तशुद्धीकरिता, चित्तउल्हासाकरिता आणि चित्तप्रेरणेकरिता नित्य व्यक्तिगत उपासना करणाऱ्या असायला हव्यात. नाहीतर सामूहिक उपासना केवळ कर्मकांड बनण्याचा धोका असतो.
प्रबोधिनीपण जोपासण्याची आवश्यकता
प्रबोधिनीचे सर्व गट, दले, विभाग, केंद्रे ही उद्दिष्टानुसार कृतिरूप, नियमित आचाररूप आणि प्रार्थनारूप सामूहिक उपासना करणारे समूह बनायला हवेत. १) आपल्या निष्ठापूर्ण व अभ्यासपूर्ण कृतीतून उत्तम रीतीने देशप्रश्न सोडविणे, २) आपल्या प्रतिभापूर्ण व प्रेरणायुक्त कृतीतून सातत्याने पराक्रम व नवनिर्मिती करणे व ३) नियमित सामूहिक उपासनेतून परब्रह्मशक्तीशी व ध्येयाशी अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करणे, असे त्रिविध काम प्रबोधिनीतील सदस्यांच्या सर्व समूहांनी केले पाहिजे. यामुळेच प्रबोधिनीच्या कामाची सर्व वैशिष्ट्ये आपण जोपासू शकू.