परिशिष्ट  :  चिदानंद रूपी  शिव मी शिव मी

ज्ञान प्रबोधिनीमध्ये इयत्ता आठवीत विद्या-व्रत संस्कार झाल्यावर उपासनेत गायत्री-मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. विद्या-व्रत संस्कार होईपर्यंत सातवीपर्यंतचे विद्यार्थी उपासनेमध्ये ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो ….‌’ या शक्ति-मंत्रांबरोबर ‌‘चिदानंदरूपः शिवोऽहम्‌‍ शिवोऽहम्‌‍‌’ हा संस्कृत मंत्र आणि ‌‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी‌’ असा मराठी मंत्र म्हणतात.  शंकराचार्यांच्या आत्मषट्क या स्तोत्रातील प्रत्येक कडव्याचा शेवट ‌‘चिदानंदरूपः ….‌’ या ओळीने होतो.  आपले खरे स्वरूप लक्षात येण्यासाठी आपण काय नाही हेही कळले पाहिजे हे या स्तोत्राचे सूत्र आहे. यासाठी चिंतनाची एक दिशा पुढील स्पष्टीकरणावरून लक्षात येऊ शकेल.    

शिव म्हणजे चांगले. मी शिव आहे हे वागण्यातून दिसावे लागते.  चांगले काय असते ते पुस्तकात लिहून ठेवल्याने किंवा चित्रामधून दाखवल्याने प्रत्यक्षात येत नाही. एकेका माणसाच्या वागण्यानेच जे चांगले ते प्रत्यक्षात येते. आपले शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी ही सर्व जे शिवतत्त्व आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याची साधने आहेत. शिवतत्त्व हे सोन्यासारखे आहे. शुद्ध सोन्याचा उपयोग करता येत नाही. शुद्ध सोने कसे असते हे कळण्यापुरतेच सोने शुद्ध केल्याचा उपयोग असतो. सोने वापरायचे असेल तर त्याच्यात इतर धातू थोड्या प्रमाणात मिसळायला लागतात. त्या धातूंचा उपयोग आधारापुरता असतो, किंमत सोन्याचीच असते. परंतु दोन्ही एकत्र केल्याशिवाय सोन्याचा उपयोग करता येत नाही. त्याचप्रमाणे शिवतत्त्व अनुभवता येण्यासाठी त्याला शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी या शिव नसलेल्या गोष्टींचा आधार लागतो.

औरंगजेबाने संभाजी महाराजांचे डोळे फोडले आणि जीभ कापून टाकली. डोळे आणि जीभ ही अनुक्रमे बघण्याची आणि बोलण्याची साधने आहेत. ती अत्यंत उपयोगी आहेत. पण संभाजी महाराजांनी डोळे आणि जीभ गेले तरी चालेल पण आपला धर्म सोडायचा नाही असे ठरवले. म्हणजेच धर्म हा चांगला किंवा शिव आहे. डोळे आणि जीभ ही काही शिवही नाहीत किंवा अशिवही नाहीत, ती केवळ शिवतत्त्वाच्या प्रकटीकरणाची साधने आहेत.

गौतम बुद्धांनी त्यावेळी लोकांना जो धर्म वाटत होता त्याचा त्याग केला आणि करुणेवर आधारित नवीन मार्ग सांगितला. यज्ञ, यज्ञातील मंत्र, यज्ञासाठी केलेल्या पशूंचे बलिदान यांनी करुणा वाढत नसेल तर ते काही शिव नाहीत. इतर जीवांचे दुःख पाहून मनात निर्माण होणारी करुणा ही शिव आहे. धर्मातील यज्ञाशी संबंधित आचाराचा भाग हा शिवही नाही आणि अशिवही नाही. तो केवळ साधन आहे. त्यामुळे तो बदलता येण्यासारखा आहे.

शिबी राजाची गोष्ट प्रसिद्ध आहे. एका कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी त्या कबुतराचा पाठलाग करणाऱ्या ससाण्याला शिबी राजा कबुतराच्या वजनाएवढे आपले मांस द्यायला तयार झाला. आपले शरीर राखण्यापेक्षा दिलेला शब्द पाळणे हे त्याने महत्त्वाचे मानले. शब्द पाळणे हे शिव आहे. शरीर हे शिवही नाही आणि अशिवही नाही, ते शब्द पाळण्याचे साधन आहे.

अनेक वेळा असा प्रश्न विचारतात की आपल्या समोरून गेलेल्या निःशस्त्र माणसाचा पाठलाग करत मागून सशस्त्र मारेकरी आले आणि ‌‘आमच्या आधी आलेला माणूस कोणत्या दिशेने गेला ?‌’ असे विचारू लागले तर काय सांगायचे ? खरे बोलणे हे पुण्यकारक असले तरी स्वतःच्या पाप-पुण्यापेक्षा निःशस्त्र माणसाचा जीव वाचवणे हे निश्चितच चांगले आहे. इतरांचा जीव वाचविणे हे शिव आहे. स्वतःचे पाप-पुण्य हे शिवही नाही आणि अशिवही नाही. पुण्य करणे आणि पाप न करणे ही आपण शिव आहोत हे ओळखण्याची केवळ साधने आहेत.

वरील उदाहरणांमधले धर्म, करुणा, शब्द पाळणे व इतरांचा जीव वाचवणे हे सर्व चांगले म्हणजे शिव आहे. उपासनेमध्ये आपण म्हणतो ‌‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी‌’. मी शिव आहे आणि माझे रूप चिदानंद असे आहे. चिदानंद म्हणजे चित्‌‍ आणि आनंद. चित्‌‍ म्हणजे जाणीव, आणि आनंद म्हणजे ज्या सुखामध्ये दुःखाचा एक कणही नाही असे सुख. दुःखाचा स्पर्शही होऊ न शकणाऱ्या सुखाची अखंड जागती जाणीव म्हणजे चिदानंद.

जाणिवेचा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो. आपल्याला आलेला जाणिवेचा अनुभव इतरांना देता येत नाही. पण त्या अनुभवाच्या वाटेवरती सत्य, शिव व सुंदर लागते, त्यांचा अनुभव सर्वांनाच देता घेता येऊ शकतो. सत्य म्हणजे जसे आहे तसे, शिव म्हणजे चांगले, आणि सुंदर म्हणजे प्रमाणबद्ध आणि सुव्यवस्थित. सत्य, शिव आणि सुंदर या तीन पेडांच्या दोराच्या साहाय्याने चिदानंदापर्यंत पोचता येते. ‌‘मी‌’ या तीन पेडांनी बनलेला असतो आणि त्यातील शिव हा एक पेड सर्व लोकांच्या हाताला सतत लागावा यासाठी मला सत्य आणि सुंदर या दोन पेडांची कास धरली पाहिजे. मी सत्याने म्हणजे प्रामाणिकपणे, आणि सुंदरतेने म्हणजे प्रमाणबद्ध व सुव्यवस्थित जगलो तर ‌‘मी‌’ ‌‘चिदानंदरूपी आहे‌’ याचा मला अनुभव येईल आणि ‌‘मी‌’ चांगला, म्हणजे ‌‘शिव‌’ आहे असा इतरांना अनुभव येईल. ‌‘चिदानंदरूपा‌’चा अनुभव स्वतः घ्यायचा आहे आणि इतरांना ‌‘शिवाचा‌’ अनुभव देणारा व्हायचे आहे. याचे भान निर्माण होण्यासाठी ‌‘चिदानंदरूपः शिवोऽहम्‌‍ शिवोऽहम्‌‍‌’या शिवमंत्राची उपासना केल्याचा उपयोग आहे. त्याने विद्याव्रत संस्कारापूर्वी चित्तप्रकाशनाला सुरुवात होऊ शकेल.