६.व्यक्तिगत उपासनेतून स्वतःमध्ये होणारे बदल

उपासनेबद्दलचे प्रश्न

            ज्यांना  ज्ञान प्रबोधिनीचा नव्यानेच परिचय होतो, त्यांतले अनेक जण ‌‘उपासना केलीच पाहिजे का ?‌’‌‘उपासना कशासाठी ?‌’ ‌‘उपासना केल्याने काय मिळते?‌’, ‌‘उपासनेचा व्यक्तिमत्त्वावर काय काय परिणाम होतो ?‌’ असे प्रश्न विचारतात. अशा काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुढे प्रयत्न करणार आहे.

उपासनेमुळे मनाला स्थिरता येते, प्रसन्नता येते, सामर्थ्य प्राप्त होते असे कै. आप्पांनी उपासनेच्या पोथीच्या प्रस्तावनेत लिहिले आहे. या पैकी सामर्थ्य प्राप्त होण्याचे अनुभव मला अजून आलेले नाहीत. पण उपासनेमुळे आपल्यात काय काय बदल झाले आहेत हे बघता येते. कोणीही बघू शकेल. आपल्याकडे काही क्षमता उपजत असतात तर काही क्षमता आपल्या सरावाने वाढलेल्या असतात. आपण विचार करून हे असे असे करायचे असे ठरवलेले असते. याबाबतीत काही जणांच्या क्षमता कमी असतील तर काही जणांच्या जास्त असतील. आपल्या क्षमता जेवढ्या आहेत तिथून त्या वाढतात की नाही हे पाहायला हवे. उपजत काय काय आहे ते बाजूला काढा; सरावाने वाढलेल्या क्षमता बाजूला काढा; विचाराने ठरवून काही केले व मग जमायला लागले त्या क्षमता बाजूला काढा; त्याशिवाय कधी परिस्थितीशी जाणीवपूर्वक किंवा अजाणता जुळवून घ्यावे लागले म्हणून काही बदल झाले असे लक्षात येते. परंतु ही चारही कारणे नसताना काही बदल झालेत असे लक्षात येते. ते बदल मग उपासनेने झाले आहेत असे म्हणावे लागते. असे माझे काही अनुभव मी सांगतो.

उपासनेमुळे स्वतःमध्ये घडणारे बदल  : 1) द्वन्द्वसहिष्णुता

अशा काही शारीरिक क्षमता असतात की  तुम्हाला ऊनही सहन करता येते, पाऊसही सहन करता येतो. वाराही सहन करता येतो. आणि अजिबात वारा नाही तरी कासावीस न होता राहता येते. काही रग असते तुमच्यात. त्यामुळेही सहन करता येते. पण काही वेळा असे लक्षात येते हे जे बदल आहेत ते आपल्याला जाणवतही नाहीत इतक्या आपण सहज करायला लागलेलो आहोत. ज्यांच्यात आधी ही क्षमता नसते त्यांना हे बदल जास्त जाणवतात. मला क्वचित एक दोन बाबतीत जाणवले. कारण तशी ही रग माझ्यामध्ये आधीपासून होती असे मला वाटते. पण मानसिक अशा टोकाच्या गोष्टीही पचवता येणे हे उपासनेमुळे होते. म्हणजे यश मिळाले की हुरळून जाणे आणि अपयश मिळाले की एकदम खच्ची होणे हे माझ्या बाबतीत पूर्वी बऱ्याच वेळा घडायचे. अपयश आले की काहीही करू नये असे वाटायचे. प्रबोधिनीतही दोन-चार महिने जाऊ नये असे वाटायचे असेही एक-दोन वेळा झाले. पण अपयश पचवण्याची शक्ती उपासनेमुळे वाढत गेली.

            त्याचप्रमाणे उपासनेमुळे नदा-स्तुती पचवण्याची शक्ती वाढते. तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल की आपल्या दोन मित्रांनी प्रबोधिनीवर भरपूर टीका करणारे लेख लिहिले होते. माझ्याकडे कुणीतरी ते घेऊन आले. मी पाहिले व बाजूला ठेवून दिले. त्याचा रागही मला आला नाही कवा दुःखही झाले नाही. असे कसे यांनी केले असेही वाटले नाही.  त्यांच्याशी बोलणेही मी टाळले नाही. ते दोघेही नंतर जेव्हा प्रत्यक्ष भेटले तेव्हा त्यांना सांगितले की, ‌‘तुमचं लिखाण मी वाचलं आहे, काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. पण काही बाबतीत तुम्ही अद्ययावत माहिती घेतलेली नाही‌’. असं मी त्यांना थंडपणे सांगू शकलो. आधीचा जर मी असतो तर ? महाविद्यालयात शिकत असताना आम्ही काही मित्र कोणीतरी प्रबोधिनीविरुद्ध लिहिले म्हणून दोन वेळा त्यांच्या घरी जाऊन मारहाण करायची भाषा बोलून आलेलो आहोत. पण आता असे करावेसे वाटत नाही.  कोणाची वेगळी मते असू शकतात. त्यासाठी आपण अस्वस्थ होण्याची काही गरज नाही. लोक आपली उपेक्षा करताहेत आणि आपण करतोय त्याला वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते – अशी ही टोकं असतात कवा आपण काही करतोय त्या प्रत्येकाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे असेही वाटू शकते. काही वेळेस पसिद्धी मिळते. काही वेळेस मिळत नाही. कारण प्रसिद्धी मिळणे हे काही आपल्या हातात नसते. पण प्रसिद्धी मिळाली तरी हुरळून जायचे नाही आणि आपण एवढे करतोय तरी कुणी दखल घेत नाही याचे काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. ही टोके पचवण्याची शक्ती वाढली ती उपासनेमुळे वाढली. 

उपासनेमुळे स्वतःमध्ये घडणारे बदल  :  2) संवेदनक्षमता

आणखी काय होते? ‌‘नित्य नवा दिस जागृतीचा‌’. काल काम केले तेच आज करायचे, पुन्हा उद्याही तेच करायचे, परवाही तेच करायचे – वर्षानुवर्षे मी तेच करतोय. असा आपल्याला कंटाळा येऊ शकतो. आणि तेच काम करताना आज काहीतरी वेगळे झाले बरं का ! बारीकसा बदल असेल पण त्यातले नावीन्य लक्षात येते. तोचतोचपणा लक्षात येण्याऐवजी त्यातले नावीन्य लक्षात आले. साध्या साध्या गोष्टीतले सौंदर्य आपल्याला जाणवायला लागते. साध्या साध्या गोष्टी करण्यातला आनंद आपल्याला पुन्हा पुन्हा घेता येतो. एखादे कलाकौशल्य शिकत असताना त्यातले बारकावे सरावाने आपण शिकतो. मला हे काल नव्हते कळले, आज कळले. यातही सरावाचा भाग आहे. कुणीतरी मार्गदर्शन केल्यामुळे ती दृष्टी आली हासुद्धा भाग आहे. पण हे काहीही झाले नाही तरी तुम्हाला जाणवते. उदा. आज त्याने भाषण केले. त्यात वक्तृत्व म्हणून असं फार नव्हतं हे लक्षात येण्याऐवजी त्याचा भाषण करण्याच्या तयारीतला उत्साह फार वेगळाच होता बरं का ! हे जाणवते. नाहीतर हे नाही झाले, ते नाही झाले असे, एरवी तुम्ही सतत परीक्षकाच्या भूमिकेत असता.  बरं त्याचे कौतुक करायचे, त्याला प्रसन्न करायचे कवा पुढे त्याच्याकडून काही काम करवून घ्यायचे असेही काही नाही. पण त्याच्या भाषणातले चांगले काय झाले हे मला जाणवते. भाषणाच्या तयारीतला त्याचा उत्साह खूप चांगला होता, वेगळा होता. अशा साध्या साध्या गोष्टीतला वेगळेपणा, नावीन्य, सौंदर्य तुम्हाला जाणवते. तुमची संवेदनक्षमता वाढत चाललेली आहे हे जाणवते. उपासनेमुळे संवदेनक्षमता वाढते.

उपासनेमुळे स्वतःमध्ये घडणारे बदल  :  3) आत्मविश्वास

उपासनेमुळे आणखी काय होते ?  आधी एखादे काम सगळ्यांनी मिळून करायचे ठरले होते. पण आज आता ते एकट्याने करावे लागणार आहे. पण आता कसे होणार म्हणून हात-पाय गाळून बसत नाही. करायचंय ना, काय करायचे माहिती आहे मग लागू या करायला. कवा काम करायला घेतले पण काम कधी संपणार माहीत नाही, किती वेळ मीच करायचे हे कळत नाही, पण अशा वेळी कुणी सांगायला नसतानासुद्धा काम करत राहायचे; काम कधी संपणार हे माहीत नसतानासुद्धा ते करत राहायचे. कधीतरी संपणारच आहे. हातात घेतलंय म्हणजे संपणारच आहे ह्या भावनेने करत रहायचे. काम करत असताना वेगवेगळ्या लोकांना भेटावे लागते. मग आपल्यापेक्षा शारीरिक बळाने जो मोठा आहे अशाशी जाऊन बोलायचंय, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे अशाशी जाऊन बोलायचे, आपल्यापेक्षा कितीतरी जास्त शिकलेला आहे अशाशी जाऊन बोलायचे, मी तर एवढा अनुभवी नाही पण एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी जाऊन बोलायचे आहे. मला तर कुठलेही पद नाही आणि एका उच्चपदस्थाशी जाऊन बोलायचे – सरावाने हे जमायला लागते, प्रशिक्षणाने जमायला लागते, उपजतही असते काही जणांकडे. पण ह्या सगळ्यापलीकडे बलवंतांना, श्रीमंतांना, उच्चपदस्थांना आणि विद्वानांना तुमच्याकडे काही नसतानाही तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. हा आत्मविश्वास उपासनेने वाढलेला आहे हे लक्षात येते.

उपासनेमुळे स्वतःमध्ये घडणारे बदल  : 4) भावनिक स्वावलंबन

आणखी काय परिणाम उपासनेमुळे होतो ? आजकालच्या भाषेत ज्याला भावनिक स्वावलंबन म्हणतात ते वाढते. म्हणजे काय ? माझ्यावर कुणीतरी उपकार केले आहेत ते मान्य करण्यात मला काही वाटत नाही. छोटेसेच ऋण आहे. 99% गोष्टी मी केल्या पण 1% त्याची मदत झाली. 99% मी केल्यात हे सांगण्यापेक्षा 1% त्याची मदत झाली हे सांगायला मला काहीच अडचण वाटत नाही; याला मी भावनिक स्वावलंबन म्हणतो. कुणीतरी काम करायला घेतले व त्याला आपण मदत केली. 70% काम त्याचेच होते पण 30% माझी मदत असली तर खरे म्हणजे माझ्या 30% मदतीमुळे झाले असे सांगावेसे वाटणे याला मी भावनिक परावलंबन म्हणेन. याहूनही आपली 99% मदत असली तरी त्याने 1% काम केले ना? मग आपली 99% मदत लपवावीशी वाटणे व त्याने केलेले 1% काम लोकांना सांगावेसे वाटणे हे भावनिक स्वावलंबन.

माझी छोटीशीच चूक झाली तरी क्षमा मागायला संकोच वाटत नाही. आणि दुसऱ्याकडून कितीही मोठी चूक झालेली असली तरी त्याने क्षमा मागितल्याशिवाय मी बोलणार नाही असे म्हणण्याची गरज वाटत नाही. याला भावनिक स्वावलंबन म्हणतात.

            व्यक्तिगत लाभहानीचा हिशोबीपणा कमी होत जातो. मी एवढं केलंय, मला इतके मिळाले पाहिजे, मी हे केलंय याची नोंद घेतली गेली पाहिजे. सगळ्यांचे फोटो काढले; माझे मात्र नाही काढले, मी होतो ना कार्यक्रमाला  हा हिशोबीपणा झाला आणि हा हिशोबीपणा कमी होत जाणे; याची काही गरज नाही असे वाटणे म्हणजे भावनिक स्वावलंबन होय. उपासनेमुळे भावनिक स्वावलंबन वाढते.

उपासनेमुळे स्वतःमध्ये घडणारे बदल  : 5) सर्वांविषयी कृतज्ञता

आणखी एक उल्लेख करावासा वाटतो. आपण हिरा आहोत म्हणजे सर्वश्रेष्ठ आहोत असे समजू नये. कारण हिऱ्याला शोभा कोंदणामुळे येते. मी अगदी कोहिनूर हिरा असलो तरी मी कोणत्या कोंदणामध्ये आहे, त्या कोंदणाची जाणीव असणे महत्त्वाचे. मी सगळे केलेले आहे. पण अनेकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत असते. आपल्या कामाआड यायचे नाही अशीही मदत त्यांनी कदाचित केलेली असते. आपल्या कामात अडथळा आणायचा नाही अशीही मदत काहींची असते. असे सगळे समाजाचे कोंदण आहे. त्या कोंदणातला मी एक हिरा आहे. ‌‘मी सुटा हिरा आहे‌’ याची जाणीव कमी होऊन ‌‘मी या कोंदणात बसलेला हिरा आहे‌’ अशी जाणीव वाढणे महत्त्वाचे. यालाच दुसरा शब्द आहे कृतज्ञता. इतर सगळ्यांच्या अस्तित्वामुळे माझे अस्तित्व आहे. म्हणून त्यांच्या अस्तित्वासाठी मी कृतज्ञ आहे. अशी जाणीव उपासनेमुळे वाढत जाते.

उपासनेमुळे व्यक्तीमध्ये होणारे बदल  :  इतर काही अनुभव

उपासनेमुळे स्वतःमध्ये घडणारे पाच प्रकारचे बदल माझ्या स्वतःच्या अनुभवाला आले.  ते वरती दिले आहेत.  दिवसभराच्या कामामधे चित्तविस्तारासाठी प्रयत्न होत असतात. उपासनेतही  शक्ति-मंत्रांच्या उच्चारणामुळे हळुहळू चित्तविस्तार होत असतो. चित्तविस्तारामुळे चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीमुळे स्वतःमध्ये झालेले वरील पाच प्रकारचे बदल अनुभवाला येऊ शकतात.

कै. आप्पांनी समाजबांधवांविषयी अनास्था, स्वार्थीपणा, पराकोटीचा उपयुक्ततावाद, आत्मकेंद्रितता आणि राष्ट्रप्रीती व मानवप्रीती यांचा स्पर्श नसणे, हे चित्ताचे मुख्य दोष सांगितले आहेत. हे दोष कमी होत त्यांच्याऐवजी अनुक्रमे समाजबांधवांविषयी आस्था, निःस्वार्थीपणा, ध्येयप्रवणता,  समाजकेंद्रितता आणि राष्ट्रप्रीती व मानवप्रीती यांचा चित्तामध्ये जसा उदय  होत जाईल त्याप्रमाणेही स्वतःची चित्तशुद्धी झाल्याचे स्वतःला तपासता येईल.

प्रबोधिनीच्या उपासनापद्धतीत हिंदू समाजापासून सुरुवात करून स्वतःपर्यंत म्हणजे व्यापक आस्तित्वापासून मर्यादित अस्तित्वापर्यंत परब्रह्मशक्तीचे स्फुरण व्हावे असे आवाहन आहे. त्यानंतर स्वगत-चतन करून पुन्हा पृथ्वीपासून परब्रह्मापर्यंत म्हणजे मर्यादितपासून व्यापक अस्तित्वापर्यंत क्रमशः मनाचा आवाका वाढवत जाऊन मग गायत्रीमंत्राचे उच्चारण करायचे आहे. व्यापकाकडून मर्यादितापर्यंत आणि मग पुन्हा व्यापकापर्यंत अशा चिंतनाचा समावेश असलेली आणखी एक व्यक्तिगत उपासनापद्धती मला योगायोगाने माहीत झाली. मग त्या संबंधीचा अभ्यासही एका पुस्तकात मिळाला.

मुंबईच्या  गोदरेज  उद्योग  समूहामध्ये तेथील व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेच्या  वाढीसाठी  कलकत्त्याच्या  इंडियन  इन्स्टिट्यूट  ऑफ  मॅनेजमेंटमधील सन्माननीय  प्रा. डॉ.एस्‌‍. के. चक्रवर्ती  यांनी  काही  महिन्यांच्या अंतराने दोन-दोन दिवसांचे तीन प्रशिक्षण वर्ग घेतले होते. वर्गाच्या प्रारंभीच त्यांनी सर्वांना कामाच्या ठिकाणी कवा घरी ‌‘काही मिनिटे स्वतःसाठी द्या‌’,असे सुचवले आणि त्यांनी विकसित केलेली एक उपासनापद्धती सर्वांना शिकवली. ती व्यापक-मर्यादित-व्यापक अशा क्रमानेच चिंतन करायला लावणारी होती.  पाठपुरावा घेतला तेव्हा साडेपाचशेपैकी सुमारे 430 जणांनी जी प्रश्नावली भरून दिली,  त्यापैकी 98% लोक पावणे दोन वर्षांनंतरही दैनंदिन कवा साप्ताहिक उपासना करत होते.  

            प्रशिक्षणानंतर वर्षभरानंतर गोदरेजमधील व्यवस्थापक, कार्यालयीन सदस्य आणि कर्मचारी युनियनचे पदाधिकारी अशा 90 जणांनी स्वतःमधले एकूण 24 प्रकारचे बदल त्रयस्थ तज्ञाने घेतलेल्या मुलाखतींमध्ये उत्स्फूर्तपणे सांगितले. प्रा. चक्रवर्ती यांनी त्या 24 बदलांचे सार पुढीलप्रमाणे सांगितले आहे,   1) संकल्पशक्ती वाढणे, 2) मर्मदृष्टी (reading between the lines) वाढणे, 3) नैतिक बाबतीतली निर्णयक्षमता वाढणे, 4) बाह्य परिस्थितीने विचलित न होणे, 5) प्रत्येक क्षण स्वतंत्रपणे अनुभवता येणे, 6) एखाद्या विषयाचे सर्व बाजूंनी एकदम आकलन होणे, (हातावर ठेवलेल्या आवळ्याचे आकलन होते तसे) आणि 7) मनातील विकारांची सुरुवात ओळखून त्यावर नियंत्रण ठेवता येणे. (S.K. Chakraborty Managerial Transformation by Values : A Corporate Perspective, Sage publications, 1993, पान  43)

माझे व्यक्तिगत अनुभव, कै. आप्पांनी सुचविलेले चित्तातील दोष दूर होणे आणि प्रा. चक्रवर्ती यांनी केलेले गुणात्मक विलेषण याप्रमाणे अनेक जण जेव्हा आपले अनुभव नोंदवतील तेव्हा उपासनेमुळे होणाऱ्या मानसिक व बौद्धिक बदलांचे शास्त्र तयार करता येईल.

स्थूल आणि सूक्ष्म उपासना

उपासनेमध्ये ध्यानाच्यावेळी ‌‘मी कसा आहे ? माझ्यामध्ये काय-काय बदल होत आहेत?‌’ याची नोंद घेत राहिले पाहिजे. पण फक्त याच्यासाठी नाही उपासना करायची. या उपासनेला  मी स्थूल उपासना म्हणतो. अगदी स्थूल उपासना म्हणजे परीक्षेच्या आधी मारुतीला प्रदक्षिणा घालणे, नवस बोलणे, इत्यादी. मी निधि-संकलनासाठी निघालो आहे तर आधी देवाला नमस्कार करून जाऊ ही स्थूल उपासना झाली. ती बंद करावी असे माझे म्हणणे नाही. पण प्रबोधिनीत स्थूल उपासना अपेक्षित नाही. प्रबोधिनीमध्ये ‌‘परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये‌’ यासाठी उपासना आहे. ‌‘अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो‌’ यासाठी उपासना आहे. ही सूक्ष्म उपासना आहे. पण अशी उपासना करत राहिल्यानंतर आपल्यात जे बदल होतात याची नोंद आपण घेत राहिलो तर आपल्याला दिलासा मिळतो की आपण योग्य दिशेने चाललो आहोत. असे बदल जर जाणवत गेले तर आपला उपासनेवरचा विश्वास वाढत जातो.