उपासनेतील तिसरी पायरी : चित्तउल्हास
चित्तविस्तार प्रयत्नपूर्वक करत गेलो तर तो आपल्या नियंत्रणात राहतो. असा चित्तविस्तार स्व-कष्टार्जित किंवा अभ्यासयुक्त असल्याने तो जास्त टिकाऊ असतो. पण असे प्रयत्न चालू केल्यावर माझ्या बाबतीत काही वेळा अकल्पितपणे, यदृच्छया, म्हणजे ज्याचे कारण सांगता येत नाही अशा स्थळी, अशा काळी, अशा रितीने काही काळापुरता चित्तविस्तार होऊन गेला. हा अनुभव तात्पुरत्या तद्रूपतेचा होता. त्या काळात मी म्हणजे हा देह ही जाणीव काही क्षण अगदी कमजोर होऊन गेली. मी आजूबाजूच्या मोठ्या अस्तित्वाएवढा आहे, असा अनुभव आला. हा अनुभव चित्ताला एकाच वेळी शांती, प्रसन्नता आणि उत्साह देणारा होता. नित्य उपासनेने चित्तविस्तार स्थिर झाला व तद्रूपतेचा ही अभ्यास झाला की शांती, प्रसन्नता आणि उत्साह म्हणजेच चित्तउल्हास ही आपली नेहमीची स्थिती व्हायला लागते.
१९७८ साली मी एकटाच सोमनाथला गेलो होतो. दिवाळीच्या सुट्टीचे दिवस होते. वेधशाळेने वादळाचा इशारा दिला होता. त्यामुळे गर्दी फारशी नव्हती. वारा, पाऊस आणि समुद्राला भरती चालू होती. दर्शन घेऊन बाहेर पडलो. संध्याकाळची वेळ होती. अंधुकच प्रकाश होता. समुद्रकिनाऱ्यापाशी एका चौथऱ्यावरती एक खांब होता. त्यावर दक्षिण दिशेकडे टोक असलेली एक बाणाची आकृती काढलेली होती. वारा तोंडावर घेत आणि पावसात भिजत त्या बाणाच्या खाली लिहिलेली माहिती वाचत होतो. त्या बाणाच्या दिशेने पुढे दक्षिण धुवापर्यंत कुठेही जमीन नाही, केवळ समुद्रच आहे असे लिहिलेले होते. त्या दिशेने पाहात उभा राहिलो. समुद्राच्या भरतीच्या लाटा वादळी वाऱ्यामुळे वेगाने पायापर्यंत येऊन कोसळत होत्या. पाणी अंगावर उडत होते. वरून पाऊस पडत होता. दोन लाटांच्या मध्ये वाऱ्यामुळे पावसाचे आडवे येणारे थेंबही चेहऱ्यावर आपटत होते. दक्षिण ध्रुवापर्यंत समुद्र केवढा असेल या विचारात तसाच उभा होतो. आप आणि वायू या महाभूतांच्या खेळात त्यांच्यामध्ये मी स्वतःला विसरून गेलो. काही काळ त्या खेळाचाच भाग होऊन गेलो. यदृच्छया चित्तविस्तार आणि त्यातून मिळणारी प्रसन्नता याचा माझ्या आठवणीतला हा पहिला अनुभव. चित्तउल्हास हा शब्द त्यानंतर पाच-सहा वर्षांनी माहीत झाला. पण तो वाचताच त्याचा अर्थ आधीच अनुभवला असल्याने लगेच समजला.
पुढे जून 1986 मध्ये युवकांच्या एका गटाबरोबर कोकणातून कोकणकडा चढून भीमाशंकरला निघालो होतो. चढता चढता पुढचा गट पुढे निघून गेला. मागचा गट बराच मागे राहिला होता. मध्ये मी एकटाच होतो. दुपारी चार-साडे चारची वेळ होती. पाऊल-वाटेने चालता चालता मध्येच गर्द जंगलाचा पट्टा लागला. पाऊल वाटेवर वाळक्या पानांचा मऊ चुरा झालेला होता. झाडीमधून सूर्यप्रकाश थोडा थोडा पाझरत होता. पुढची चाळीस-पन्नास फूट वाट दिसण्याएवढा प्रकाश होता. जंगलात शिरल्यावर काही मिनिटात जाणवले की जंगलात नीरव शांतता आहे. आपल्या पावलांचाही आवाज येत नाही आहे. जवळ जवळ दहा मिनिटे मी एकटाच पाऊल वाटेने चाललो होतो. आजूबाजूला कसलीही चाहूल नाही, कोणताही आवाज नाही, चिटपाखरूही कुठे दिसत नाही. पावले नकळत पडत होती. मी त्या जंगलाचाच भाग होऊन गेलो होतो. जंगलाचा भाग विरळ होत गेला. वाटेवर एकदम सूर्यप्रकाश पडला. दूरवर झोपडी दिसली. तिथे माणसांच्या आकृती दिसल्या. आणि जंगलमय झालेलो मी पुन्हा माझ्या शरीराएवढा झालो. हा नीरव शांततेचा अनुभवही चित्ताला प्रसन्न आणि उत्साहित करणारा होता. नव्या जोमाने घाटमाथ्याकडे जाणारी वाट मी चढू लागलो.
यानंतर काही महिन्यांनी तिसरा अनुभव आला. पहिला अनुभव महाभूतांमध्ये मिसळून जाण्याचा. दुसरा अनुभव वनस्पतीसृष्टीशी तद्रूप होऊन जाण्याचा. तिसऱ्या वेळचा अनुभव पक्षीगणाशी मनाने एकरूप होऊन जाण्याचा होता. आसाममध्ये हाफलाँग या शहराच्या जवळ रोंगमाई नावाच्या एका नागा जमातीच्या वस्तीवर त्यांचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच परतीच्या प्रवासाला निघायचे होते. आम्ही चौघेजण उजाडण्यापूर्वीच निघालो. वस्ती डोंगरमाथ्यावर होती. गाडीरस्ता गाठण्यासाठी पायवाटेने खाली उतरू लागलो. डोंगर उतरून सपाटीवर आलो. वाटेच्या दोन्ही बाजूला मोठे डेरेदार वृक्ष होते. सूर्योदय अजून व्हायचा होता. पण उषःकाल झाला होता. वृक्षांच्या दाटीमधून जात असताना सर्व झाडांना जणू कंठ फुटला. रात्रीच्या निवाऱ्यासाठी त्यांच्या फांद्या-फांद्यांवर बसलेल्या हजारो पक्ष्यांचा किलबिलाट एकदम सुरू झाला. वाटेने जाणारे आम्ही चौघे एकदम थबकलो. आम्हाला परस्परांशी बोलणे त्या आवाजात अशक्यच होते. आवाज होता पण गोंगाट नव्हता. आधीचा महिनाभर नागा प्रदेशात राहिलो होतो. तिथे पक्षी फार कमी दिसायचे व त्यांचे आवाजही फार ऐकले नव्हते. त्यामुळे हा किलबिलाट ऐकत राहावासा वाटत होता. त्या आवाजाच्या साथीत आम्ही न बोलता चालायला सुरुवात केली. मी तरी त्या आवाजाने हरखून गेलो. नवा दिवस सुरू झाल्याचा एवढा आनंदकल्लोळ सर्व पक्षीगणाने सुरू केल्यावर मला त्या आनंदाचा भाग होऊन जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. माझ्या नकळत मी तो किलबिलाट ऐकत आतल्या आत आनंदाचा अनुभव घेत होतो. मला हा देखील यदृच्छया झालेला चित्तविस्तार आणि त्यामुळे झालेला चित्तउल्हास वाटतो.
महाभूते, वनस्पतीसृष्टी, पक्षीजगत यांच्याशी तात्पुरती तद्रूपता अनुभवता येते तर मानवी समूहाशी तद्रूपता का नाही अनुभवता येणार ? सुमारे वीस वर्षे तरी पुण्यात ज्ञानेश्वर कवा तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागताला जात होतो. १९९० साली पालख्यांना निरोप द्यायला पुण्याबाहेर दिवे घाटाच्या पायथ्यापर्यंत गेलो. दड्या पुढे गेल्या. आम्ही दोघे-तिघे घाट चढणारी दड्यांची रांग पाहात खालीच थांबलो. टाळ-मृदुंगांचा गजर करत, अभंग म्हणत आणि विठोबा-रखुमाईचा नामघोष करत घाट चढणाऱ्या दड्यांमागून दड्या पाहिल्या. एका दडीबरोबर मी वर कधी चढायला लागलो ते कळलेच नाही. सगळ्या बाजूंनी वारकऱ्यांच्या प्रवाहात मी बुडून गेलो. थोडे चालल्यावर एका वळणापाशी मी पुन्हा उभा राहिलो. शेवटची दडी जाईपर्यंत दड्यांच्या लाटा माझ्यावरून जात होत्या. मनात उमटलेले वारीचे दृक-श्राव्य चित्र आजही चित्ताला उत्साह देते. या पूर्वी पालख्यांचे पुण्यात स्वागत करताना प्रबोधिनीच्या दडीबरोबर पूर्ण वेळ असायचो. पुढच्या मागच्या एक दोन दड्या दिसायच्या. घाटात संपूर्ण पालखी सोहळा एकदम पाहण्यामुळेच माणसांच्या लोटात त्याचा भाग बनून जाण्याचा अनुभव घेता आला.
त्यानंतर तीन वर्षांनी १९९३ च्या दिवाळीच्या सुट्टीत भाटघर धरणाच्या जलाशयाच्या काठावर जोगवडी गावाच्या शिवारात विद्यार्थ्यांचे चार दिवस शिबिर झाले. मी समारोपाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. समारोप झाल्यावर तंबूंची व सामानाची आवराआवर चालू झाली. सगळ्यांनी एकत्रच परत जायचे असल्याने मधल्या वेळात मी जलाशयाच्या काठाशी गेलो. हिरवळीवर उताणा पडलो. सूर्य डोक्याच्या मागे होता. वर निरभ्र निळेशार आकाश होते. ढगांचा एकही पुंजका आकाशात दिसत नव्हता. बरेच वर घारींचे दोन-तीन ठिपके दिसत होते. थोड्या वेळाने तेही नजरेच्या टप्प्याबाहेर गेले. सूर्यकिरण थेट डोळ्यावर येत नव्हते. उघड्या डोळ्यांनी फक्त आकाशच दिसत होते. जवळ जवळ अर्धा तास आकाशाच्या पोकळीत मी त्याचा भाग होऊन गेलो. आकाशाचाही आपण भाग होऊ शकतो, नव्हे आपण आकाशच आहोत असा अनुभव घेता येतो हे तेव्हा कळले. आतापर्यंतच्या पाच वेगवेगळ्या अनुभवांमध्ये हा अनुभव सर्वांत जास्त शांती आणि प्रसन्नता देणारा होता. ती प्रसन्नता जवळ जवळ महिनाभर टिकली.
1978 पासून असे अनुभव येत गेले. शेवटचा अनुभव 1993 साली आला. त्यानंतर बहुधा आपण मोठ्या शक्तीचे अंश आहोत याबाबत बौद्धिकदृष्ट्या माझा पूर्ण विश्वास बसल्याने असे यदृच्छया अनुभव पुन्हा आले नसावेत. मला चित्तविस्ताराच्या पुढची चित्तउल्हासाची वाट दाखवण्याचे काम या अनुभवांनी केले. असे अनुभव अनेकांना आले असतील. पण मी पाहिले तसे त्यांनी त्या अनुभवांकडे पाहिले नसेल. असे अनुभव सगळ्यांना येतीलच असा काही नियम नाही. पण ज्यांना येतील त्यांच्यासाठी अशा अनुभवांकडे बघायची एक दिशा तेवढी मी सुचवली आहे.
शुद्धि–मंत्रांचे उच्चारण
स्वतःच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या या अनुभवांनी चित्तउल्हास म्हणजे काय ते कळले. नित्य उपासनेतून हा उल्हास कसा मिळवायचा ? चित्तप्रकाशन आणि चित्तविस्तार हे आधीचे टप्पे पूर्ण झाले नसताना चित्तउल्हासासाठी प्रयत्न करता येतात का ? प्रबोधिनीच्या उपासनेत जे शुद्धि-मंत्र (विरजा-मंत्र) आहेत त्यांचा अर्थ समजून घेऊन केलेल्या त्यांच्या उच्चारणाने चित्तउल्हास मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो.
अशुद्धी काढून टाकण्याने जसे शुद्धीकरण होते तसेच शुद्ध पदार्थाची भर घालूनही शुद्धतेचे प्रमाण वाढत जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व घटक शुद्ध होवोत अशी शुद्धि-मंत्रांमध्ये (विरजा मंत्रांमध्ये) प्रार्थना आहे. ही प्रार्थना करताना आपण स्वतः ज्योतिरूप आत्मा आहोत असेही चतन करायचे असते. शुद्ध ज्योतिःस्वरूपाची शक्ती आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व घटकांना देत आहोत, थेट उगमाशी जोडले गेल्याने त्या घटकांची शुद्धता वाढते आहे असे चिंतन करत गेलो की हळूहळू या सर्वांची शुद्धता वाढल्याचा अनुभव येतो. शुद्धता वाढल्याने आवाका वाढतो, कार्यक्षमता वाढते, कामगिरीचे सातत्य वाढते, संवेदनक्षमता वाढते, सर्वांचे शुभचतन करण्याची वृत्ती वाढते.
उपासनेमुळे एकंदर जो काही चित्तउल्हास होत असेल त्यापैकी यदृच्छया अनुभवांनी पाच-दहा टक्केच चित्तउल्हासाचा अनुभव मी घेतला असेल. पुरेसा चित्तविस्तार झालेला नसताना शुद्धि-मंत्र म्हणून यदृच्छया अनुभवांच्या शतांशच चित्तउल्हास होत असेल; पण तेवढा सूक्ष्म बदलही आपल्याला जाणवतो. त्यामुळे उपासनेवरचा आपला विश्वास दृढ होतो. सूक्ष्म चित्तउल्हासाच्या भांडवलावर आपण अधिकाधिक शांती, प्रसन्नता आणि उत्साह गाठीला बांधत जातो. हे सूक्ष्म बदल कसे होत असावेत याचा काहीसा साधार (व्यक्तिगत अनुभवाचा आधारे) अंदाज (पण एकट्याच्याच अनुभवावर आधारित) पुढे मांडला आहे.
चित्तउल्हास कसा होत असेल ?
आपल्या घरातील दूरदर्शन संचाच्या काचेच्या पडद्याला आतल्या बाजूने रसायनांच्या मिश्रणाचा एक मुलामा दिलेला असतो. संचाच्या आतून संपूर्ण पडद्यावरील या रसायनांच्या मुलाम्यावर विद्युत्-कणांचा मारा होतो. ते विद्युत्-कण या मुलाम्यावर आदळल्यावर त्यांच्या ऊर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. त्यामुळे संपूर्ण पडदा आतून प्रकाशित होतो व बाहेरून पडदाभर चित्र बघायला मिळते. या पडद्यावरचे चित्र किती स्पष्ट आणि किती उजळ दिसायचे ते आतल्या रसायनाच्या मिश्रणात, विद्युत्-कणांनी उत्तेजित होऊन प्रकाशमान होणारे, किती कण आहेत यावर अवलंबून असते. एका चौरस सेंटिमीटरमध्ये काही हजार, काही लक्ष किंवा आता ‘डिजिटल’ उपकरणांच्या युगात असे काही दशलक्ष कण असतात. या कणांना ‘पिक्सेल’ असे म्हणतात. पडद्यावरचे चित्र जास्त चांगले दिसायचे असेल तर पडद्यामागील रसायनांच्या मुलाम्यातील विद्युत्-कणांनी उत्तेजित होणाऱ्या कणांची संख्या वाढवायला लागते. तसेच पडद्यावर जेवढी ‘पिक्सेल’ची संख्या असते, त्या प्रमाणात दूरदर्शन संचाच्या प्रकाश नळीतून विद्युत्-कण बाहेर पडले पाहिजेत. त्यांची संख्या मुळात दूरदर्शन-प्रक्षेपणासाठी चित्रे टिपणाऱ्या कॅमेऱ्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे कॅमेऱ्यातील भगाची व त्यातील चित्रफितीची क्षमता देखील ‘पिक्सेल’ च्या भाषेत चांगली पाहिजे. आताच्या चांगल्या कॅमेऱ्यात किंवा दूरदर्शन संचात ती क्षमता ‘दशलक्ष पिक्सेल’ किंवा ‘मेगापिक्सेल’ मध्ये मोजतात.
दूरदर्शन संचातील पडद्याची कार्यक्षमता चांगली चित्रे दिसण्यावर ठरते. आपली कार्यक्षमता आपल्या शरीर, मन, बुद्धीवर अवलंबून असते. शरीर, मन, बुद्धीची कार्यक्षमता आपल्या शरीरातील विविध पेशींच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. या सर्व पेशींना दोन प्रकारची ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेचे रूपांतर कार्यशक्तीत होते. पहिल्या प्रकारची ऊर्जा म्हणजे अन्न-पाणी-प्राणवायू-सूर्यप्रकाश यांच्यावरील रासायनिक-जैविक प्रक्रियांतून मिळणारी प्राणशक्ती. दुसऱ्या प्रकारची ऊर्जा म्हणजे आपले संकल्प पूर्ण करण्याच्या ध्यासातून आणि उद्दिष्ट गाठण्याच्या कवा ध्येय साकार करण्याच्या ध्यासातून सक्रिय होणारी इच्छाशक्ती. प्राणशक्ती शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते. त्यातून सर्व जीवनावश्यक क्रिया होतात. आपल्यातील इच्छाशक्ती दूरदर्शनच्या पडद्यावर आदळणाऱ्या विद्युत्-कणांसारखी काम करत असते. पडद्यामागील जेवढे ‘पिक्सेल’ हे विद्युत्-कण ग्रहण करतील तेवढेच प्रकाशमान होतात. त्याप्रमाणे आपल्या शरीरातील जितक्या पेशी आपल्या इच्छा-शक्तीने प्रभावित होतात तेवढ्या पेशी जीवनावश्यक क्रियांपलीकडे संकल्पपूर्तीसाठी, उद्दिष्ट गाठण्यासाठी, ध्येय साकार करण्यासाठी जास्तीच्या क्षमतेने काम करतात. अशा पेशींनाच येथे कार्यक्षमतेच्या ‘पिक्सेल’ म्हटले आहे.
पडद्यावरची ‘पिक्सेल’ची संख्या त्या त्या दूरदर्शन संचापुरती ठरलेली असते. जास्त ‘पिक्सेल’ हवे असतील तर संचच बदलावा लागतो. मानवी शरीरात अब्जावधी पेशी असतात. त्या पैकी इच्छाशक्तीने पभावित होणाऱ्या पेशी सुरुवातीला तरी मुख्यत: आपल्या मेंदूतच असतात. दूरदर्शन संच बदलण्याप्रमाणे आपल्याला मेंदू कवा त्यातील पेशी बदलता येणार नाहीत. परंतु मेंदूतील पेशींप्रमाणे शरीरातील सर्वच पेशी इच्छाशक्तीला प्रतिसाद देणाऱ्या करता आल्या तर कार्यक्षमतेच्या ‘पिक्सेल’ची संख्या मात्र कैक पटीने वाढवता येईल.
दूरदर्शन पडद्यावरील ‘पिक्सेल’च्या संख्येच्या प्रमाणात दूरदर्शन कॅमेऱ्यातील ‘पिक्सेल’ असल्या तरच पडद्यावरील चित्राचा दर्जा सुधारतो. त्याचप्रमाणे कार्यक्षमता वाढण्यासाठी आपल्यातली इच्छाशक्ती तीव्र व्हायला हवी व तिला प्रतिसाद देणाऱ्या पेशींची संख्याही वाढायला हवी. हे दोन्ही घडविण्याचे साधन म्हणजे कोणत्या तरी प्रकारची दैनंदिन उपासना.
दैनंदिन उपासनेमुळे प्रतिभा-स्फुरण होऊ लागले, बुद्धीच्या सर्व पैलूंना उजाळा मिळू लागला की मेंदूतील ‘पिक्सेल’ वाढू लागले हे कळते. दु:ख, अपयश, निराशा यांचा निचरा करण्याची शक्ती वाढू लागली म्हणजे भावनांचे नियंत्रण करणाऱ्या ग्रंथींमधील पेशी ‘पिक्सेल’ बनू लागल्या हे कळते. उत्साह वाढू लागला, सकारात्मकता वाढू लागली की रक्तातील व रक्ताबाहेरील रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी ‘पिक्सेल’बनू लागल्या. कौशल्यांमध्ये प्रावीण्य व प्रभुत्वाच्या पलीकडे अनायास सहजता आली की ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांतील ‘पिक्सेल’ची संख्या वाढू लागली. हळूहळू शरीरातील सर्वच अवयवांमधील अधिकाधिक पेशी ‘पिक्सेल’म्हणून काम करू लागतात. चित्ताची प्रसन्नता वाढते, उद्दिष्टावरील एकाग्रता वाढते व इच्छाशक्ती शरीराच्या सर्व पेशींद्वारे काम करू लागते.