आपले चित्त कायम मी आणि माझे याच्या चिंतनात गुंतून पडत असते. त्याला विधायक व विजिगीषू विचार करायची प्रथम सवय लावायची आणि मग या विचारांची कक्षा हिंदुराष्ट्रापर्यंत नेऊन भिडवायची. यालाच चित्तविस्तार म्हणायचे. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ या शक्ति-मंत्राच्या मननानेच हा चित्तविस्तार होतो. प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी व्हावी अशा चिंतनाने, ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ या शक्ति-मंत्राच्या मननाने, आपला चित्तविस्तार कृतीच्या भाषेत अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतो.
‘परब्रह्मशक्ती स्फुरो हदुत्वामध्ये’ या मंत्रातील ‘हिंदुत्वा’चा अर्थ समजायचा असेल तर प्रथम हिंदुस्थानची भूमी केवढी आहे याचा अंदाज यावा लागतो. मग त्या भूमीवर राहणारा समाज कसा आहे हे कळावे लागते. त्या समाजाची संस्कृती, परंपरा, मूल्ये काय आहेत हेही समजून घेत जावे लागते. शेवटी त्या समाजाचा धर्म म्हणजेच आध्यात्मिक आदर्श व ते आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या समाजाने स्वीकारलेला कृति-कार्यक्रम लक्षात यावा लागतो. अखंड भारताचा भौगोलिक विस्तार, त्या भूमीवर प्रेम करत तिथे राहणारा भारतीय समाज, त्या समाजाची संस्कृती आणि त्याचे आध्यात्मिक आदर्श व आध्यात्मिक साधनेचे मार्ग हे सर्व म्हणजे हिंदुत्व! हिंदुस्थानची भूमी सुजला, सुफला करणे, भारतीय समाज एकात्म व समृद्ध करणे, भारतीय संस्कृती जगातील इतरसंस्कृतींबरोबर आदान-प्रदान करायला सक्षम व उत्सुक होणे आणि भारतीय अध्यात्माच्या साहाय्याने सर्व मानव समाजाची देव-मानवापर्यंत उत्क्रांती होणे म्हणजे हिंदुत्वामध्ये परब्रह्मशक्तीचे स्फुरण होणे. असे होण्यासाठी भारतीय समाजामध्ये संघटनशीलता, व्यक्तिगत व सामूहिक पराक्रम, विश्वविजयाची प्रेरणा आणि स्वतःमधील व इतरांमधील ईश्वरी शक्तीची जाणीव वाढणे म्हणजे हिंदुत्वामध्ये परब्रह्मशक्तीचे स्फुरण होणे.
चित्तविस्तार : व्यक्तिगत अनुभव
याची सुरुवात देश पाहण्याने होते. देश पाहता पाहता आपला समाज व संस्कृती हळूहळू कळत जाते. मग त्या समाजाची सेवा करता करता आपल्या हातून विराटाची पूजा होऊ लागते व आपला चित्तविस्तार होऊ लागतो. मी नववी किंवा दहावीमध्ये असताना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावात एक दिवसाच्या श्रमकार्यासाठी प्रशालेतील आम्ही सर्व विद्यार्थी गेलो होतो. सकाळी श्रमकार्य झाले. दुपारी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे प्रवचन ठेवले होते. गावकरी व विद्यार्थी श्रोते म्हणून बसले होते. परंतु सर्व प्रवचन गावकऱ्यांना उद्देशूनच झाले. पाचलेगावकर महाराजांनी प्रथम लोकांना गावाच्या ‘कल्याण’ या नावाचा अर्थ विचारला. मग गावात उगम पावणाऱ्या शिवगंगा नदीच्या नावातील ‘शिव’ व ‘गंगा’ शब्दांचा अर्थ विचारला. गावकऱ्यांपैकी कोणी असा विचार कधीच केला नव्हता. पाचलेगावकर महाराजच प्रश्न विचारत होते व उत्तरेही देत होते. ‘कल्याण म्हणजे शिव. शिव म्हणजेच कल्याण. या दोन्हीचा अर्थ सर्वांचे चांगले होणे. आपण एकजुटीने प्रयत्न केल्यानेच सर्वांचे चांगले होते’ हा त्यांच्या प्रवचनाचा माझ्या लक्षात राहिलेला सारांश. ग्रामीण भारताचे माझ्या लक्षात राहिलेले हे माझे पहिले दर्शन. तिथून देश बघायला सुरुवात झाली.
नंतर तीन-चार वर्षांनी महाविद्यालयात असताना गुजराथमधील नवनिर्माण आंदोलनाचा अभ्यास करायला आठवडाभराचा दौरा केला. राजकीय पुढारी, विद्यार्थी- नेते, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक एकाच घटनाक्रमाकडे किती वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघतात हे या निमित्ताने बघायला मिळाले. समाजातील गुंतागुंत लक्षात आली. गुजराथमध्ये जे पाहिले ते वर्षभरानंतर आणीबाणीच्या काळात पुण्यातही बघायला मिळाले.
आणखी तीन वर्षांनी आंध्र प्रदेशात मदत-कार्यासाठी गेलो होतो. तिथे महिन्याभरात सर्व संप्रदाय, सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटनांचे कार्यकर्ते काम करताना बघायला मिळाले. ते एकत्रही काम करू शकतात हे अनुभवता आले. तिथेच पहिल्यांदा ‘आमच्या पडलेल्या घरांच्या दुरुस्तीआधी गावातले पडलेले देऊळ बांधा’ असे सांगणारे लोक भेटले. इथे समाजाबरोबर हदू संस्कृतीचीही ओळख होऊ लागली.
भारतातील दारिद्य प्रथम आंध्रात पाहिले. आणखी तीन वर्षांनी सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे दारिद्यावर मात करण्याचे सहकारी प्रयत्न अनुभवले. निरक्षर शेतमजुरांपासून पदवीधर युवकांपर्यंतचे गावकरी स्वतःची स्थिती सुधारून इतरांना मदत करायला कसे प्रवृत्त होतात हे तिथे पाहिले.
आणखी तीन वर्षांनी परदेशात एका आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण वर्गात पाकिस्तानी, बांगला देशी, मलाय, कोरिअन, श्रीलंकावासी, फिलिपिनो आणि चिनी शास्त्रज्ञांबरोबर दहा दिवस एकत्र राहिलो. तेव्हा भारतीय संस्कृती आपण त्यांना समजावून सांगू शकतो व त्यांची संस्कृती समजून घेऊ शकतो असा अनुभव घेतला.
कल्याण ते कॅनडा अशा बारा वर्षांमधल्या अनुभवांतून भारतीय समाज आणि संस्कृती यांची एक चौकट मनात तयार झाली. भारताचा विस्तार आणि भारतीय अध्यात्म यांची ओळख ही नंतरच्या वर्षांमध्ये चालूच आहे. समाज आणि संस्कृतीचे अनेक पदर त्यानंतरच्या काळात लक्षात येत गेले. भुकेची भावना आणि भक्ति-भावना ही भारतभर समान आहे हे लक्षात आले. त्यातून विराटाची पूजा करण्यासाठी संघटना आणि राष्ट्रार्थ पराक्रम हे दोन मार्ग आपण नित्य वापरत राहिले पाहिजे हे मनात पक्के झाले. प्रत्येकालाच जाणीवपूर्वक अनुभव घेत व अनुभवांचे सार जाणीवपूर्वक काढत स्वतःला चित्तविस्ताराच्या पायरीवर घेऊन जाता येते.
चित्तप्रकाशनाने ज्या राष्ट्राचा विचार मनाच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवायचा त्या राष्ट्राचा विस्तार प्रत्यक्ष प्रवासाने, वाचनाने, श्रवणाने आणि पाहण्याने आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्र या शब्दाला राष्ट्रातील दृश्यांची जेवढी जोड मिळेल तितका राष्ट्राचा विस्तार मनामध्ये पक्का होऊन जातो. विविध बातम्या वाचताना किंवा ऐकताना राष्ट्राच्या विस्तारात त्या नेमक्या कुठे घडल्या आहेत ती ठिकाणे नकाशात शोधून आणि आठवणीत ठेवून राष्ट्राचा विस्तार मनात पक्का होत जातो. या ऐकण्याला, पाहण्याला आणि लक्षात ठेवण्याला चिंतनाची जोड द्यावी लागते.
चित्तविस्तार : उपासनेबरोबरीने करावयाचे चिंतन
रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद या चिंतनासाठी दोन तंत्रे सुचवायचे. त्यापैकी पहिले तंत्र म्हणजे ‘कल्पक सहानुभूती’ (imaginative sympathy). बसल्या जागेवरून आपल्या मनात असलेल्या राष्ट्राच्या नकाशात कुठे कुठे , कोण कोण लोक, कुठल्या प्रकारच्या अडचणीत असतील, त्यांची दुःखे कोणती असतील याची मनानेच कल्पना करायची. अशा दूरवरच्या, न पाहिलेल्या, कल्पनेनेच जाणलेल्या देशबांधवांच्या अडचणी आपल्या कोणत्या कृतीने कमी होतील व कोणत्या कृतीने वाढतील असा विचार करायचा. आणि त्यानंतर आपण कसे वागायचे याचा निर्णय घ्यायचा. याला म्हणायचे कल्पक सहानुभूती.
स्वामी रंगनाथानंदांनी सांगितलेले चिंतनाचे दुसरे तंत्र म्हणजे ‘व्यक्तीपलीकडच्या तत्त्वावर निष्ठा’(impersonal loyalty). अनेक वेळा कोणीतरी ज्येष्ठ, आदरणीय, अधिकारावरील किंवा प्रेमाच्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आपण इतर लोकांची दखल घेतो किंवा त्यांच्याबरोबर काम करतो किंवा त्यांच्यासाठी काम करतो. ही झाली त्या व्यक्तीवरील निष्ठा. माझ्या आजूबाजूचे सर्वजण केवळ माझे देशबांधव आहेत म्हणून त्यांची दखल घेणे, त्यांच्याबरोबर काम करणे किंवा त्यांच्यासाठी काम करणे म्हणजे व्यक्तीपलीकडच्या तत्त्वावरील निष्ठा. मध्ये कोणी सांगणारा असला आणि आपण त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे वागत असलो की ती व्यक्तिनिष्ठा होते. कोणी न सांगता केवळ देशबांधव हे नाते मानून आपण वागू लागलो की ती राष्ट्रनिष्ठा (म्हणजेच व्यक्तीपलीकडच्या तत्त्वावरील निष्ठा) होते. कोणीतरी ‘भारत बंद’ पुकारला आहे. त्या बंदमध्ये सहभागी होणे किंवा इतरांनी बंद पुकारलेला असतानाही आपण काम चालू ठेवणे या पैकी काहीही एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून करणे म्हणजे व्यक्तिनिष्ठा. आपण स्वतः राष्ट्रीय हिताचा विचार करून सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा निर्णय घेणे म्हणजे व्यक्तीपलीकडच्या तत्त्वावरील निष्ठा.
मनातले राष्ट्राचे चित्र जेवढे व्यापक आणि राष्ट्रनिष्ठा जेवढी बळकट तेवढे आपले चित्त विस्तारित झाले. चित्ताचा विस्तार जेवढा होतो तेवढ्या प्रमाणात स्वतःचे मानापमान, रुसवे-फुगवे, सुख-दुःखे, लाभ-हानी आणि मानसिक आघातांनी होणारी शल्ये किरकोळ व नगण्य वाटायला लागतात आणि ती झटकून टाकता येतात. यालाच कै. आप्पांनी चित्तशुद्धी असे म्हटले आहे. विराटाच्या पूजेने हीच चित्तशुद्धी होते. म्हणजेच चित्तप्रकाशन आणि चित्तविस्ताराने चित्तशुद्धी होते. मातृभूमीचा विचार सतत डोळ्यासमोर आणणे, कल्पक सहानुभूती आणि व्यक्तीपलीकडच्या तत्त्वावर निष्ठा यांचा सराव सतत चालू असणे आणि मग उपासनेत शक्ति-मंत्र म्हणणे, याने चित्तविस्तार आणि त्यातून चित्तशुद्धी होते.
आत्तापर्यंत दैनंदिन उपासनेनंतर दिवसभर उरलेल्या वेळात आपल्या वागण्याला आणि विचार करण्याला कशी दिशा मिळाली म्हणजे चित्तप्रकाशन व चित्तविस्तार होतो हे सांगितले. यालाच उपासनाभिमुख होणे म्हणतात. उपासनाभिमुख झाल्यावर आणि तसेच राहता आल्यावर आपल्याला नित्य उपासनेतून चित्तउल्हास आणि चित्तप्रेरणा प्राप्त होतात. मग आपला सारा दिवस उपासनामय होऊ लागतो. हे पुढचे टप्पेही अनुभवावे लागतात. त्यांचा विचार आपण पुढील प्रकरणात करू.