२ . उपासनेची तयारी  :  चित्तप्रकाशन

चित्तप्रकाशनाचे माझे काही अनुभव प्रथम सांगतो. ते वाचल्यावर असे लक्षात येईल की यासारखे अनुभव सगळ्यांनाच येतात. फक्त  या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहिलेले नसते. आपल्यालाही चित्त आहे हे कळण्यासाठी चित्त आपल्याला पकडून ठेवावे लागते. त्यासाठी त्याला काहीतरी आधार द्यावे लागतात. मला जेव्हा उपासनेचा विचार समजला, तेव्हा मी मागे वळून बघायला लागलो. आपण उपासना कधीपासून करायला लागलो ? का करायला लागलो? त्यानंतर काही बदल झाले का ? ते कसे लक्षात येतात ? बदल कसे होतात ? याचा विचार करायला लागलो. तेव्हा लक्षात आले की ही चित्तप्रकाशनाची पायरी उपासना करत नव्हतो त्याआधीही सुरू होतीच. अनेक घटनांमुळे सुरू झाली.

 चित्तप्रकाशनाचे व्यक्तिगत अनुभव

आपल्याला चित्त आहे व त्याची काही चौकट आहे, त्याच्यावर कशाचा तरी परिणाम होतो हे कसं लक्षात आलं ? प्रबोधिनीत यायला लागल्यानंतर पहिल्या वर्षीच  “असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाऊ नका; घेई झोपा तो नर मेला संशय त्याचा धरू नका”हे पद्य मी शिकलो. त्याची चाल चांगली व अर्थही चांगला असल्यामुळे ते पद्य मी वारंवार म्हणायचो. त्यामुळे त्याचे शब्द, त्यातील विचार, त्याचा अर्थ आत ठसत गेला. तो जिथे ठसतो आहे तेच आपले ‌‘चित्त‌’ हे कळायला लागले. म्हणजेच आपल्या चित्तात एक विचार सारखा घर करून राहिला आहे हे स्पष्ट व्हायला लागले किंवा चित्त प्रकाशात आले.

            पुढे कधीतरी “हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची” हा अभंग ऐकला व आवडला. पुन्हा पुन्हा म्हणत असल्यामुळे तोही विचार चित्तामध्ये ठसला. त्यामुळे चित्त आणखी प्रकाशात आले. त्यानंतर ‌‘सत्कार‌’ नावाची एक कविता मी शिकलो. त्यात आधी उन्हाळ्याचे वर्णन आहे. सगळीकडे रखरखाट झालेला. पहिला पाऊस पडल्यानंतर कोठेतरी गवताचं पातं उगवलं आहे आणि त्यानंतर “कवच भूमिचे आणि अचानक भेदुनी आले हिरवे कौतुक, नचिकेत्याचे स्वप्नच जणू हो भूमिवर साकार” ही ओळ त्या कवितेत आली. हे नचिकेत्याचे स्वप्न नक्की काय आहे, हे समजून घेतलं पाहिजे हा विचार मनामध्ये आला. स्वप्न त्यावेळी समजले नव्हते पण समजून घ्यायला हवं हे मात्र कळले होते. पुढे कधीतरी उपनिषदातली नचिकेत्याची गोष्ट कळली. मग मृत्यूला जिंकणारा, मृत्यूचं रहस्य समजून घेणारा हा नचिकेता, त्याची श्रद्धा चित्तामध्ये ठसली. अशी श्रद्धा आपली झाली पाहिजे हा विचारही ठसत गेला. त्यामुळे माझं चित्त आणखी प्रकाशात आले. आपल्या शरीरामध्ये जे काही घडतं त्याच्याशिवाय आपल्याला एक चित्त आहे व त्या चित्तात काही विचार घर करून राहिलेले आहेत हे लक्षात आले. प्रबोधिनीत अनेक वेगवेगळे अनुभव आपण घेत असतो व त्याचेही परिणाम आपल्या चित्तावर होत असतात. चित्त आणखी स्पष्ट होत जाते.

            पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलो तेव्हाचा एक अनुभव सांगतो. कॅनडामध्ये तीन वर्षे पी.एच्‌‍.डी. साठी शिकायला होतो. विद्यापीठात शिकायचे, तिथून ४-५ कि. मी. वर घर होते. बसनेही जाता येत असे व चालतही जाता यायचे. मी बऱ्याच वेळा चालतच जात असे. रस्ते निर्मनुष्य. मग चालता-चालता मला माहीत असलेली सगळी पद्ये म्हणत जायचो. जाताना, येताना मोठ्याने, मोकळ्या आवाजात म्हणत असे. असे ४-५ महिने चालले. तरी चालीच्या पलिकडे कधी गेलो नव्हतो. नंतर मात्र अर्थाकडे, त्यातील विचारांकडे लक्ष गेले आणि तो अर्थही चित्तामध्ये ठसत गेला. एका पद्यामुळे चित्त  आहे हे समजले तर अनेक पद्ये दीर्घ काळ म्हणत राहिल्यामुळे त्यातून राष्ट्रभक्तीचा विचार चित्तात ठसत गेला. नेमका होत गेला. आता जी राष्ट्रभक्ती चित्तामध्ये आहे ती या पद्यगायनातून मिळवलेली आहे. ही पद्ये म्हणजे स्तवने आहेत.

  देवदेवतांची अनेक स्तवने किंवा स्तोत्रे असतात. स्तोत्रे म्हणणे ही उपासनेची अगदी प्राथमिक अवस्था आहे.  मनापासून स्तोत्रे म्हटली तर चित्तप्रकाशन नक्की होते. स्तोत्रे अवघड वाटली तर आरत्या आहेत. आरत्या म्हणजे स्तवनेच आहेत. आपल्याला जे परमेश्वराचे रूप आवडते त्या रूपाचे वर्णन त्यामध्ये केलेले असते. रूपाचे वर्णन असते तसे गुणांचेही वर्णन केलेले असते. ते अशासाठी असते की तसे गुण आपल्यामध्येही यावेत. पद्यांवर विचार करता करता असे गुण आपल्यात यावे असे वाटायला लागणे ही पायरी माझी नकळत झाली. एकट्याने रस्त्याने चालायचे तर काय करायचे म्हणून काहीतरी म्हणायला लागलो. पण त्यातून हा बदल झाल्याचे लक्षात आले. देवभक्तीच्या आधी मनात देशभक्ती रुजत गेली. देशभक्ती आणि देवभक्ती काही वेगळे नाही हे नंतर कधीतरी विचाराने कळत गेले.

उपासनेने चित्तप्रकाशन होते. पण उपासनेची सवय लागण्यापूर्वी उत्कट अनुभवांमुळेही आपल्या नकळत चित्तप्रकाशनाला सुरुवात होते. चित्तप्रकाशनाला गती देण्यासाठी उपासनेची वेळ सोडून इतर वेळीही आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करणे, अंतर्मुख होऊन आपल्या कामाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो आहे हे बघणे म्हणजे जाणीवपूर्वक चित्तप्रकाशन. कोणतेही काम चालू नसताना आपल्या मनात कोणते विचार येतात हे बघणे म्हणजे जाणीवपूर्वक चित्तप्रकाशन. विधायक व विजिगीषू विचार मुद्दाम आपल्या मनावर ठसविणे व काम करत असताना व नसताना देखील त्यांचे स्मरण होईल असा प्रयत्न करणे म्हणजे जाणीवपूर्वक चित्तप्रकाशन. या विचारांचे सहज स्मरण सतत राहायला लागले म्हणजे चित्तप्रकाशनाची पायरी आपण गाठली.

चित्तप्रकाशनाच्या लौकिक पद्धती

चित्तप्रकाशनाची ही पायरी गाठायला अनेक जण वेगवेगळे मार्ग वापरतात. काहीजणांच्या टेबलाच्या काचेखाली, काही जणांच्या दैनंदिनीतील पहिल्या किंवा शेवटच्या पानावर, काही जणांच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवलेल्या एखाद्या कागदावर, काही जणांच्या घरात आरशावर किंवा झोपेतून उठल्यावर सहज समोर दिसेल असा भिंतीवर,  एखादा सुविचार किंवा श्लोक किंवा पद्याची ओळ लिहून ठेवलेली असते. ती सतत आणि केव्हाही डोळ्यासमोर राहावी अशी इच्छा त्यामागे असते. बऱ्याच जणांच्या चित्तप्रकाशनाची इथून सुरुवात होते. काही जणांकडे पद्य, अभंग किंवा सुविचारांच्या संग्रहाची धारिणी किंवा वही असते. अनेकांच्या नित्य वाचनामध्ये एखादा वैचारिक किंवा धार्मिक ग्रंथ असतो. अनेक जण एखादे स्तोत्र, कविता, आरती रोज म्हणतात. अनेक जण ठराविक विषयावरची पुस्तके जाणीवपूर्वक वाचतात. अनेक जण एखाद्या व्यक्तीची भाषणे किंवा प्रवचने जाणीवपूर्वक ऐकतात. हे देखील चित्तप्रकाशनाचे प्रयत्न आहेत. यातून इतर सर्व विषयांपेक्षा कोणतातरी एक विचार आपण सर्वांत महत्त्वाचा मानायला लागतो.

प्रबोधकांचे चित्तप्रकाशन प्रार्थनेने

प्रबोधिनीतील युवकांच्या अभ्यासशिबिरासाठी १९८७ मध्ये कन्याकुमारीला गेलो होतो. त्यावेळी विवेकानंद केंद्राची प्रार्थना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना, स्वरूपवर्धिनीची प्रार्थना, भारतीय शिक्षण संस्थेने प्रौढ शिक्षण वर्गांसाठी तयार केलेली प्रार्थना, पुण्याच्या महाराष्ट्र मंडळातील प्रार्थना  आणि प्रबोधिनीची प्रार्थना या प्रत्येक प्रार्थनेत कोणता मध्यवर्ती विचार आहे यावरती प्रबोधिनीचे द्वितीय संचालक डॉ. व. सी. ताम्हनकर यांच्याबरोबर चर्चा केल्याचे आठवते. प्रबोधिनीत प्रार्थनेचे शेवटचे कडवे जास्ती वेळा म्हटले जात असले तरी मध्यवर्ती विचार ‌‘राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची‌’ हा आहे अशी चर्चा तेव्हा झाली होती. प्रबोधिनीच्या सदस्यांसाठी ‌‘चित्तप्रकाशन‌’ म्हणजे प्रार्थनेतील हा मध्यवर्ती विचार मनात केंद्रस्थानावरती नेऊन ठेवणे.

इतर सर्व विचार या मध्यवर्ती विचाराच्या भोवती अनेक समकेंद्री वर्तुळांमध्ये मांडता आले म्हणजे आपल्या चित्ताचा तपशिलातला नकाशा आपल्याला तयार करता आला. म्हणजेच आपल्या चित्तात काय-काय आहे आणि ते कुठे आहे याची आपल्याला ओळख झाली. हेच आपले चित्तप्रकाशन ! वर सुरुवातीला लिहिलेल्यापैकी चित्तप्रकाशनाचा कोणताही एक मार्ग किंवा सर्व मार्ग वापरले तरी प्रबोधकांसाठी प्रबोधिनीची प्रार्थना रोज म्हणणे आणि दैनंदिन उपासनेचा प्रारंभ ‌‘राष्ट्रार्थ भव्य कृति काहि ….‌’ असा संकल्प करून करणे हा चित्तप्रकाशनाचा प्रमुख मार्ग आहे.