स्वतःला घडविण्यासाठी उपासना – प्रस्तावना

आजच्या आधुनिक काळात कोणी दुसऱ्या कोणाला घडवण्याची भाषा केली तर ते व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का देणारे ठरू शकते. पण बदलत्या स्थळ-काळानुसार आणि प्रसंगानुसार स्वतःची प्राधान्ये बदलावी लागतात, नवी कौशल्ये शिकावी लागतात, नवे ज्ञान संपादून वापरावे लागते. म्हणजेच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत राहावे लागते. पाण्याचा आकार ते ज्या भांड्यात ठेवले असेल तसा बनतो. पाण्याचा रंग आणि चव त्याच्यात जे मिसळले असेल त्याच्या रंग व चवीप्रमाणे बनते. माणसाचे व्यक्तिमत्त्व मात्र स्वतःचा आकार, रंग व चव नसलेल्या पाण्याप्रमाणे असून चालत नाही. स्वतःचे स्पष्ट मत, निश्चित मार्ग आणि विचाराने तावून-सुलाखून निघालेले ध्येय असलेली व्यक्तीच जगात काही काळापुरता आपला ठसा निर्माण करू शकते. स्वतःचे मत आणि मार्ग स्थळ-काळ-प्रसंगानुसार बदलण्याइतकी लवचिकता पाहिजे. पण इतरांशी सहमत होण्याइतकेच इतरांना आपल्याशी सहमत करून घेण्यालाही महत्त्व आहे. ध्येयाच्या बाबतीत न वाकण्याइतका ठामपणा पण मार्गाच्या बाबतीत न मोडण्याइतकी लवचिकता आपल्या व्यक्तिमत्त्वात येणे म्हणजे स्वतःला घडवणे.

            स्वतःला याप्रमाणे घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये उपासनेचे स्थान मला हळूहळू अनुभवातून कळत गेले. नियमित उपासनेचा निश्चय व्हायला मला काही वर्षे लागली. आधी सुरू झाली  ती सामूहिक उपासना. तीही विशिष्ट स्थळी आणि वेळीच व्हायची. कोणत्याही स्थळी पण दिवसाच्या नियमित वेळी आणि एकट्यानेही नियमित उपासना सुरू व्हायला वीस-पंचवीस वर्षे लागली. नियमित व्यक्तिगत उपासनाही आता पंधरा-वीस वर्षे होते आहे. कोणत्यातरी एका उपासना-पद्धतीवर म्हणजेच प्रबोधिनीतील उपासना-पद्धतीवर अनुभवातून दृढ विश्वास बसल्याशिवाय इतर ध्यान-उपासना-साधना-प्रार्थना-पद्धतींची चौकशीही करायची नाही असे ठरवून आता पंचवीसहून अधिक वर्षे होऊन गेली. असे ठरवण्याला माझे वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण कारणीभूत झाले. त्यामुळे प्रबोधिनीमध्ये कै. आप्पांनी (म्हणजे कै. डॉ. वि. वि. पेंडसे यांनी) प्रचलित केलेल्या उपासना-पद्धतीवर माझा विश्वास पक्का होत गेला आहे. कै. आप्पांनी चित्तशुद्धी  चित्तउल्हास  चित्तप्रेरणा अशी उपासनेमुळे घडणाऱ्या आंतरिक बदलांची सैद्धान्तिक चौकट मांडली होती. या सैद्धान्तिक चौकटीमुळे माझ्या अनुभवांना वैचारिक आधारही मिळाला आहे. मी स्वतःपुरत्या ठरवून घेतलेल्या वैज्ञानिक पद्धतीच्या चौकटीचा परिणाम म्हणून इतर उपासना-पद्धतींमुळे होणाऱ्या व्यक्तीच्या घडणीचा मात्र मला काही अनुभव नाही.

उपासनेमुळे होणारी स्वतःची घडण व्यक्तिनिष्ठ किंवा आत्मनिष्ठच असणार. रामकृष्ण परमहंस यांनी विविध संप्रदायांच्या उपासना-पद्धतींनुसार साधना करून सर्व पद्धती व्यक्तीला एकाच अंतिम स्थानापर्यंत नेऊन पोचवतात याचा स्वतः अनुभव घेतला. गुरुदेव रानडे यांनी गीता, उपनिषदे, हिंदी , मराठी व कन्नड संत आणि मध्ययुगीन ख्रिस्ती साधक यांच्या साधनामार्गातील अनुभवांचे विश्लेषण केले. आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही पद्धतीची उपासना केली तरी सर्वांना निश्चित क्रमाने काही किमान समान टप्पे आपापल्या साधनामार्गावर अनुभवाला येतात असा सिद्धान्त त्यांनी मांडला. देशात व विदेशात अनेक संशोधन संस्थांमध्ये विविध ध्यान-पद्धतींच्या, जप-पद्धतींच्या, प्राणायाम-पद्धतींच्या आणि उपासना-पद्धतींच्या शरीरांतर्गत क्रियांवर होणाऱ्या परिणामांचे मापन करण्याचा प्रयत्न चालू आहे. विविध पद्धतींची तुलना करण्यासाठी अशा मापनाचा उपयोग होऊ शकेल. प्रबोधिनीच्या उपासना-पद्धतीनुसार साधनेचे अंतिम स्थान कवा आत्मसाक्षात्कारापर्यंतचे टप्पे कवा शरीरांतर्गत क्रियांमधील बदल याबाबत अद्याप काही अभ्यास किंवा नोंदी झालेल्या नाहीत. प्रबोधिनीतील उपासनेमुळे मन आणि बुद्धीवर होणाऱ्या परिणामांबाबत अनेकजण बोललेले आहेत. परंतु ते लेखबद्ध करण्याचा हा पहिलाच पयत्न आहे. 

कै. आप्पांनी सुचवलेल्या सैद्धान्तिक चौकटीत माझ्याप्रमाणे अनेक जण जेव्हा आपले व्यक्तिनिष्ठ अनुभव नोंदवतील तेव्हाच त्या चौकटीची यथार्थता आणि प्रबोधिनीच्या उपासना-पद्धतीची विश्वासार्हता अधिक वाढेल. स्वतःला घडवण्याचे एक साधन म्हणून उपासनेकडे आणि प्रबोधिनीच्या उपासना-पद्धतीकडे वैज्ञानिक पद्धतीनेच  पाहू या. पण त्यात वैज्ञानिकाची चिकाटी आणि धीरही असायला हवा. स्वतःवरती उपासनेचे असे वैज्ञानिक दृष्टीने प्रयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी या पुस्तिकेचा काही उपयोग होऊ शकेल अशी आशा आहे.                               

                                                                                                                      गिरीश श्री. बापट