परिवर्तन का व कसे ?

       मागील तीन प्रकरणांमधे आपण धर्म म्हणजे काय, धर्मामधे स्थल-कालातीत  तत्त्वांप्रमाणेच, स्थलकालसापेक्ष सत्यासारखे तत्त्व एका ठिकाणी लागू असून अन्य कोठे ते लागू पडत नाही असे नाही. याला म्हणतात ‘‌‍‍‌‌स्थलनिरपेक्ष‌’ अमक्या वेळी हे तत्त्व योग्य आणि अन्य वेळी अयोग्य याचा अर्थ ‌‘कालनिरपेक्ष‌’ आचारधर्म मात्र जागोजागी, वेळोवेळी बदलताना दिसतात व तसे ते पुढेही दिसणार याचा अर्थ ‌‘स्थलकालसापेक्ष‌’.    

आता  या व पुढील प्रकरणात आपण या धर्मविधींमधे  स्थलकालानुसार परिवर्तन करण्याची काय आवश्यकता आहे, हे परिवर्तन करण्याला आधार कोणता व ते कसे केले पाहिजे हे समजावून घेऊ.

       धार्मिक क्षेत्रामधे परिवर्तनीयतेची परंपरा महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या काळापासून चालत आलेली आहे. गीतेसारख्या ग्रंथाचा मायमराठीत सर्वजनसुलभ असा आविष्कार करून ज्ञानदेवांनी या परंपरेचा पाया घातला आहे. त्यांच्या अवती-भवती अठरापगड जातींच्या संतांची मांदियाळी उभी राहिली व त्यात स्पृश्यास्पृश्यतेची रूढी अर्धमेली होऊन गेली. मग संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, इत्यादींनी मराठी भूमीवर औदार्याचे, माणुसकीचे गंगाजल शिंपून तिची मशागत केली. समर्थ रामदासांनी

              भेटो कोणी एक नर | धेड महार चांभार |

            राखावे तयाचे अंतर | या नाव भजन (समर्थ रामदासांच्या सवाया)

       अशा शब्दांत भक्तिमार्गातील समतेचा डांगोरा पिटला, तर छळाबळाने बाटवलेल्यांना पुनश्च स्वधर्मात स्वीकारून छत्रपती शिवरायांनी आणखी पुढचे पाऊल टाकले.

       पेशवाईत राजकीय प्रगती झाली पण काहीसे सामाजिक विषमतेचे दृश्यही दिसले. इंग्रज  राजवटीच्या आरंभीच श्री. बाळशास्त्री जांभेकरांनी धर्मभ्रष्टांना पुन्हा स्वधर्मात  घेण्यास प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापून नवीन दृष्टीने, नवीन पद्धतीने धर्मसंस्कार करण्यास सुरुवात केली. धर्मसंस्कारांमधे त्यांनी लोकभाषेचा वापर करून सुलभता आणली. पुरोहित वर्गाचे महत्त्व कमी करून समतेची चळवळ उभी केली. न्यायमूर्ती रानडे यांनी संतपरंपरेचा धागा पकडून पारमार्थिक लोकशाहीची परंपरा धर्मक्षेत्रात आणण्यासाठी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि दयानंद सरस्वतींच्या परिवर्तनवादी आर्य समाजासही पाठिंबा दिला. श्री शाहू छत्रपतींनीही  दयानंद सरस्वतींना मोठा पाठिंबा दिला. कोल्हापुरात सत्यार्थप्रकाश या दयानंद सरस्वतींच्या ग्रंथाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले.

       धार्मिक बाबतीतील सुधारणांचे प्रयत्न अशाप्रकारे चालू असतानाच पाश्चात्य पद्धतीने शिक्षण घेतलेल्या काही नवशिक्षितांनी भारतीय संस्कृती, धर्म, आचार-विचार यांना कनिष्ठ  किंवा अगदी टाकाऊ समजण्यास सुरुवात केली होती. तरीही काळानुसार आवश्यक ते फेरबदल करून योग्य तो आचारधर्म चालू ठेवण्याचे औचित्य दाखवणारा वर्गही समाजात होता.

       धर्मातील दोन प्रमुख भाग म्हणजे तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, इ. तत्त्वे स्थलकालातीत असली तरी ती तत्त्वे व्यवहारात उतरवण्याची साधने म्हणजे आचारधर्म हा स्थलकालसापेक्षच असतो हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील परिवर्तनवादी पंडितांनी १९३४ मधे ‌‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदे‌’ची स्थापना केली. या परिषदेचे बहुतेक संस्थापक हे हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केलेले व काहीजण इंग्रजीचाही अभ्यास  केलेले असे होता. त्यांचा मुख्य विचार असा –

       ‌‘हिंदू धर्मात अनेक स्मृती रचल्या गेल्या याचे कारण त्या त्या परिस्थितीला आवश्यक असे बदल मूळच्या आचारधर्मात करावे लागतात. (उदा. इस्लाम भारतात आल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी देवल स्मृतीचा जन्म झाला.)  आचारधर्मातील परिवर्तनाची ही आवश्यकता लक्षात घेऊन आजच्या काळातही ते करण्यात आले पाहिजे.‌’

       समाजामधे अशा परिवर्तनवादी लोकांप्रमाणेच स्थितिवादी म्हणजे ‌‘जुने मोडू नये आणि नवे करू नये‌’ असे म्हणणारेही काही लोक असतात. त्यांना सनातनी म्हणतात. त्यांची धर्मनिष्ठा खोटी नसते. आपल्या धर्ममतांशी ते प्रामाणिकच असतात. तसे लोक त्या काळीही होते. या सनातनी मंडळींनी आपल्या धोरणांत काही लवचिकता ठेवली असती तर महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा अधिक परिवर्तन होणे शक्य होते. या काळी सनातनी मतांचे समर्थन करणारे लेखन सुरू झाले. हे लेखन परिवर्तनास प्रतिकूल होत आहे हे पाहून पं. नारायणशास्त्री मराठे यांनी धर्मकोशाची रचना करण्याचे ठरवले. पं. नारायणशास्त्री मराठे हे परिवर्तनवादी पक्षाचे होते व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यांचे उजवे हात!  इ.स. १९२७  मधे  प्रयाग येथील कुंभमेळ्याच्या प्रसंगी पं. मदनमोहन मालवीय यांनी बोलावलेल्या पंडित परिषदेस पं. नारायणशास्त्री मराठे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे उपस्थित राहिले व त्यांनी शास्त्रचर्चेत परिवर्तनवादी पक्षाची भूमिका समर्थपणे मांडली.

       श्री. रा. स. भागवतांच्या पुढाकाराने ठाणे येथे ७, ८ एप्रिल १९३४ या दोन दिवशी तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचे प्रथम अधिवेशन भरले. म. म. पाठकशास्त्री हे अध्यक्षस्थानी होते. या पहिल्याच परिषदेने ‌‘वेद‌’ हे अपौरुषेय नव्हेत तर मनुष्यकृतच असल्याचा स्पष्ट निर्णय केला.

       पुणे येथे गीताधर्म मंडळात परिषदेचे दुसरे अधिवेशन भरले ते २७ डिसेंबर १९३५ या दिवशी ! याच्या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे अस्पृश्यता निवारणावर या अधिवेशनात विशेष भर देण्यात आला. डॉ. कुर्तकोटी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 

       ४ ते ६ जून १९३६ रोजी नगर येथे स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन झाले. या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. नानासाहेब सप्तर्षी यांनी आपल्या भाषणात, ‌‘जुनी परंपरा न सोडता आजच्या आचारांत फरक कसा घडवून आणावा याचा विचार करण्यासाठी हे अधिवेशन भरवण्यात आले आहे‌’ असे सांगितले. समाजधारणा होऊन उत्कर्ष साधावा  यासाठी श्रुती, स्मृती आणि सदाचाराचे अनुषंगाने आचार  परिवर्तनाचे धोरण नगरला निश्चित केले गेले.

१६ ऑक्टोबर १९३८ या दिवशी लोणावळ्यात चौथे अधिवेशन पार पडले. त्याचेही अध्यक्ष स्वामी केवलानंदच होते. या अधिवेशनात जे स्वागतगीत म्हणण्यात आले ते मोठे अर्थपूर्ण होते –

              श्रुतीस्मृतींचे मंथन करुनी, तत्त्वामृत जे देति अम्हाते 

            समाजधारण, समाजोन्नती, ध्येय हेच धर्माचे मानिति |

            धर्मां साधन मानुनि करिती, परिवर्तन जे आचारांचे

            तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी, नाम असे हे सार्थ  तयांचे

       या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात स्वामी केवलानंद सरस्वतींनी परिवर्तनवाद्यांच्या एकत्र काम करण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देता सनातन्यांनी  ‌‘वर्णाश्रम – स्वराज्य – संघा‌’ची स्थापना करून सवता सुभा स्थापल्याबद्दल व त्यात परिवर्तनवाद्यांना प्रवेश देऊ नये असे ठरवल्याबद्दल खेद व्यक्त केला. यानंतर ‌‘उपनयनादि-संस्कार‌’ यावर चर्चा झाली. याच अधिवेशनात तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेने ‌‘धर्मनिर्णय मंडळ‌’ हे नाव धारण केले व संस्थेची संक्षिप्त घटना निर्माण करून तिलाही मान्यता देण्यात आली. आता वर्षातून एक अधिवेशन घेण्याची जुनी कार्यपद्धती बदलून वर्षभर कार्यरत राहाण्याच्या हेतूने कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली.

       १९३९ पासूनच मंडळाचे कार्यवाह तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे  यांनी काम पाहिले. यांचे पूर्ण नाव रघुनाथ गोपाळ कोकजे. ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिकले. वेदशास्त्रसंपन्न नारायणशास्त्री मराठे यांचे ते विद्यार्थी. पुढे ते लोणावळ्यातील कैवल्यधाम या योगशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्थेत तत्त्वज्ञान हा विषय शिकवत. अध्यापन, ग्रंथसंशोधन याबरोबर आयुष्यभर त्यांनी धर्म निर्णय मंडळाच्या प्रचाराचे, संस्कार कार्याचे काम केले. यांनी ठिकठिकाणच्या आपल्या भाषणांमधून सामूहिक प्रार्थनेच्या प्रचारास प्रारंभ केला. उपनयन, विवाह व संध्येची छोटी पुस्तिका प्रकाशित झाली. अशा प्रकारे विचारमंथनास  कृतीचीही जोड मिळू लागली.

यानंतरच्या अधिवेशनांमधे शास्त्रचर्चेसाठी एक सत्र राखून ठेवून खुल्या सत्रात सर्वसामान्य जनतेस मंडळाची भूमिका समजावून सांगणे असा कार्यक्रम असे. स्वामी केवलानंदांकडे शास्त्रचर्चेचे स्थायी अध्यक्षपद दिले गेले होते.

       ४ व ५ नोव्हेंबर १९३९ रोजी बदलापूर येथे मंडळाचे पाचवे अधिवेशन झाले. त्याचे अध्यक्ष महामहोपाध्याय पां. वा. काणे होते. त्यांनी मंडळावरील आक्षेपांचे खंडन करून अत्यावश्यक विधींनुसार धर्मसंस्कार करण्याचे समाजास आवाहन केले. पुढे १९४० मधे अन्त्येष्टी व श्राद्ध आणि १९४१ मधे पुनर्विवाह व हिंदूकरणाच्या पोथ्या मंडळाने प्रसिद्ध केल्या.

महत्त्वाचे धर्मनिर्णय

धर्मनिर्णयमंडळाच्या विविध अधिवेशनांमधील काही निर्णय पुढे दिले आहेत-

१) मानव्य, राष्ट्रहित व हिंदू समाजसंघटना अशा तिन्ही दृष्टींनी विचार करता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांची जन्मनिमित्तक अस्पृश्यता अतिशीघ्र नष्ट झाली पाहिजे असे या सभेचे मत आहे. 

       विविध स्मृतींचा ऐतिहासिकदृष्ट्या कालानुक्रम पाहाता परिस्थित्यनुरूप काही स्मृतीकार अस्पृश्यता निवारणास आनुकूल्य दर्शवीत गेले असे दिसते. तेव्हा त्याच धोरणास अनुसरून आज विद्यमान असलेल्या अस्पृश्य वर्गाची अस्पृश्यता सर्वथैव नष्ट व्हावी असे या परिषदेचे मत आहे. कोणतीही जात जन्मतः श्रेष्ठ अथवा कनिष्ठ समजू नये. असेही या सभेत ठरविले गेले.

२) समाजाची धारणा व उत्कर्ष व्हावा यासाठी श्रुती, स्मृती व शिष्टाचार यांच्या साहाय्याने आपल्या आचारात परिवर्तन करणे हे या परिषदेचे धोरण राहील.

३) अनुभव व तर्क मिळून मनुष्याची बुद्धी बनते. ही बुद्धीच धर्माचे प्रमाण होय. धर्म हा श्रुती, स्मृती, शिष्टांचा आचार व विचार यांच्या साह्याने शिष्ट परिषदेने करावा.

४) धर्मनिर्णयात सध्या रूढ  असलेली समन्वय पद्धती मान्य करू नये. ऐतिहासिक पद्धतीनेच धर्मनिर्णय केला पाहिजे. ऐतिहासिक पद्धती म्हणजे मागील अनुभव लक्षात घेऊन कालानुरूप परिवर्तन करण्याचा मार्ग. या ऐतिहासिक पद्धतीची मूलतत्त्वे  पुढीलप्रमाणे आहेत –

अ) ऐहिक कल्याणाच्या साधनांमधे पारलौकिक कल्याणाच्या साधनांचा अंतर्भाव होतो.

आ) आचारधर्मात वेळोवेळी परिवर्तन होत असते.

इ) हे परिवर्तन पूर्वीच्या शिष्टांनी वेळोवेळी केले आहे.

ई) आजच्या  शिष्टांना आजच्या परिस्थितीला अनुसरून परिवर्तनाचा अधिकार आहे.

       ही तत्त्वे विशेषतः आचारधर्मास लागू करून आचारधर्मासंबंधीचा विचार प्रस्तुत परिषद करेल.

५) अ) प्रत्येक हिंदूला द्विजत्वाचा अधिकार आहे. चारही वर्णांच्या व्यक्तींना संस्कार करून घेऊन द्विज बनण्याचा अधिकार आहे.

आ) द्विजत्वसिद्ध्यर्थ वैदिक पद्धतीने उपनयन संस्कार प्रत्येक हिंदूने तज्ज्ञांच्या साहाय्याने करावा.

इ) तज्ज्ञाने सर्व हिंदूंकडे हा संस्कार करण्यासाठी बोलावल्यास अवश्य जावे अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे.

६) सकेशा विधवांना विवाहादि मंगल कार्यात आणि धार्मिक कृत्यात कोणत्याही प्रकारे अनधिकारी, अशुभ, अपवित्र किंवा हीन समजण्यात येऊ नये असे या परिषदेचे मत आहे.

७) स्त्रियांचे धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील अधिकार पुरुषांच्या बरोबरीचे आहेत. स्त्रियांची आर्थिक उन्नती देखील करणे आवश्यक आहे. या दृष्टीने हल्ली स्त्रियांना वारसा, वाटप इ. विषयात जे अधिकार आहेत त्यात योग्य परिवर्तन आणि वाढ करावी.

८) दहनक्रिया झाल्यावर पहिल्या तीन दिवसात अस्थिसंचयन (अस्थि गोळा करणे.) आणि अकराव्या दिवशी एकोद्दिष्ट व सपिंडीकरण ही श्राद्धे करावीत. एवढे केले म्हणजे मृतात्म्यासाठी आवश्यक तेवढा क्रियाकलाप झाला असे समजण्यास प्रत्यवाय नाही.

       धर्मनिर्णय मंडळाच्या काही अधिवेशनातील निर्णय नमुन्यादाखल वर दिले आहेत. हे निर्णय घेणारे कोणी सर्वसामान्य लोक नव्हते. भारतरत्न म्हणून गौरविले गेलेले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून गाजलेले, प्रख्यात अधिवक्ता म्हणून मुंबई उच्च न्यायालयात नाव कमावलेले व आपल्या ‌‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र‌’ या असामान्य ग्रंथनिर्मितीसाठी चिरस्मरणीय ठरलेले भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे हे धर्मनिर्णयमंडळाचे प्रवक्ते होते. याशिवाय विद्वद्रत्न कृ. ल. दप्तरी (नागपूर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), हिंदुत्वदीपक महादेवशास्त्री दिवेकर (मिरज), महामहोपाध्याय पाठकशास्त्री, (धुळे), तर्कसांख्यतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे (लोणावळा), या व अशा अनेक विद्वान व विचारी मंडळींच्या विचारमंथनाचे फलित म्हणून हे निर्णय आपल्यासमोर आले. धर्मनिर्णय मंडळाच्या मतांचा प्रसार करणारे ग्रंथलेखन या मंडळींनी विपुल केले. विवाह, उपनयन,अन्त्येष्टी यांसारख्या पोथ्या छापून प्रसिद्ध केल्या. धर्मनिर्णय मंडळाच्या अधिवेशनांमधून विद्वान लोकांची शास्त्रचर्चा व त्या चर्चेचा निर्णय सामान्य माणसांसमोर ठेवणे अशा दोन्ही प्रकारचे काम करण्यात आले.

       अशा प्रकारे धर्मनिर्णय मंडळाचे काम चालू असताना १९६२ मधे पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना झाली. त्यावेळी धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री  कोकजे यांचे पुण्यात येणे जाणे होत असे. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वाच. वि. वि. पेंडसे यांच्याशी त्यांची अनेक विषयांवर चर्चा होत असे. त्यामधे ‌‘अर्थ न समजता, औचित्य-अनौचित्य याचा विचार न करता, स्थलकालसापेक्षता दुलर्क्षून जे धर्मविधी होतात ते बदलणे आवश्यक आहे ‌’ हाही विचार असे.यातूनच  १९६४ मध्ये सामूहिक समता श्रावणीची योजना प्रबोधिनीच्या वास्तूमध्येच केली गेली. श्रावणी म्हणजे जानवे बदलण्याचा विधी म्हणजेच नवीन अध्ययन वर्षाचा शुभारंभ. प्राचीन काळी गुरूकुल शिक्षण पद्धतीत श्रावण महिन्यात हा विधी करून नंतर पुढील नव्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवायला प्रारंभ होत असे. या प्राचीन विधीला आधुनिक विचारांची जोड देऊन ‌’श्रावणी‌’ संस्कार प्रबोधिनीत प्रतिवर्षी केला जातो. त्याला ‌’वर्षारंभ‌’ असे म्हटले जाते.

       पुढे १९७५ मधे ज्ञान प्रबोधिनीचा ‌‘संस्कृत संस्कृति संशोधिका‌’  हा विभाग अस्तित्वात आल्यानंतर धर्मनिर्णय मंडळाने घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे धर्मविधींच्या पोथ्या तयार करणे, त्यांचे  प्रशिक्षण देणे व ते प्रत्यक्ष करणे हे काम सुरू झाले व ते अजूनही चालू आहे.

       येथपर्यंत आपण धर्मविधींमधे परिवर्तन आणले पाहिजे या विचाराला आधार काय ते पाहिले. शांती व पूजा या प्रकरणात सध्या समाजात रूढ असलेल्या शांती व पूजा यांच्यामधे परिवर्तन कसे आणता येईल ते त्या त्या ठिकाणी बघितले.

       संस्कारांच्या बाबतीत म्हणायचे तर हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले सर्वच्या सर्व संस्कार आजही केलेच पाहिजेत असे नाही. एकतर ते शक्यही नाही व त्यातील बरेचसे संस्कार स्थलकालसापेक्षतेच्या तत्त्वानुसार संस्कार या स्वरूपात समाजात शिल्लक राहिलेलेच नाहीत. ते पुन्हा रूढ करण्याची आवश्यकता नाही.  मात्र नामकरण, उपनयन, विवाह, अन्त्येष्टी हे संस्कार परिवर्तनीयतेच्या कसोटीवर तपासून ‌‘संस्कार‌’ या स्वरूपात समाजातील सर्व जातींसाठी टिकवले पाहिजेत.  याशिवाय कालसंगत अशा संस्कारांची भरही घातली पाहिजे.

कालसंगत नवीन संस्कार

देहदान

       हिंदू धर्मात मानवी जीवनाचा विचार जन्माआधीपासून म्हणजे गर्भधारणेपासून सुरू होतो. मरणानंतरही तो केला आहे. त्यामुळेच अन्त्येष्टी, श्राद्धसंस्कार हे मरणोत्तर संस्कार हिंदू धर्मात रूढ आहेत. पण हल्ली अनेक जणांची मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा असते. देहदान, नेत्रदान, रक्तदान ही आजच्या काळातील पुण्यकारक दाने होत. एकूणच दानाचे महत्त्व आजच्या काळात मोठे आहे –

       तपः परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते |

       द्वापरे यज्ञमेवाहुः दानमेकं कलौ युगे ॥ (पद्मपुराण)

कृतयुगात तपश्चर्या सर्वश्रेष्ठ होती. त्रेतायुगात ज्ञान हेच सर्वोपरि ठरले होते. द्वापरयुगात यज्ञाहून श्रेष्ठ काहीच नव्हते. कलियुगात मात्र दान हेच सर्वश्रेष्ठ कर्म मानले आहे.

आयुर्विज्ञानाच्या प्रगतीसाठी मानवी देहाचा अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी देहदान आवश्यक ठरते. मरणोत्तर शरीर अग्नीस अर्पण करण्याऐवजी, ते मातीत गाडून टाकण्याऐवजी किंवा पशुपक्ष्यांनी आपली भूक भागवावी म्हणून टांगून ठेवण्याऐवजी वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शरीररचनेचा अभ्यास करून ज्ञान मिळवावे यासाठी दान करणे श्रेयस्कर होय असे अनेकांना वाटते. पण हे दान समंत्रक, विधिपूर्वक, संस्कारपूर्वक व्हावे अशीही त्यांची इच्छा असते. अशी इच्छा असणाऱ्यांच्या आग्रहाखातर हा नवीन संस्कार प्रचलित केला आहे. हा विधी घरातच करून नंतर देह ज्या वैद्यकीय महाविद्यालयास द्यावयाचे योजले असेल त्यांच्या ताब्यात तो आदरपूर्वक दिला जावा.

हिंदूकरण

हिंदू धर्मातील उच्च तत्त्वविचार, उपासनास्वातंत्र्य, प्रत्येकाला स्वतःच्या स्वभावानुरूप विकास घडवून आणण्याची संधी देणारी समाजरचना या व अशा अनेक गोष्टींमुळे अनेक अहिंदू लोकांनाही या धर्माचे आकर्षण वाटत असते व हिंदू धर्माचा स्वीकार  करावसा वाटतो. अहिंदू  व्यक्तीला हिंदू धर्मात घेताना हिंदूकरण संस्कार केला जातो.

       काही वेळा छळाबळाने बाटवलेला किंवा अन्य काही कारणाने परधर्मात गेलेला मनुष्य हिंदू धर्मात परत येऊ इच्छितो तेव्हा परावर्तन संस्कार केला जातो. परावर्तन म्हणजे (स्वधर्मात) परत येणे.

       हिंदूकरण व परावर्तन संस्काराची आवश्यकता वाढते आहे असा अनुभव आहे.

३.  विद्याव्रत

       मागील प्रकरणात आपण उपनयन संस्काराची माहिती घेतली. उपनयन म्हणजे शब्दशः ‌‘विद्येसाठी शिष्याला गुरूंच्या जवळ नेणे‌’. हल्ली गुरुकुलांची पद्धत राहिलेली नसल्याने या संस्काराचे उपनयन हे रूप दिसत नाही. उपनयन संस्कारामागची भूमिका ‌‘व्यक्तिमत्त्व विकसन‌’ ही मात्र अतिशय ग्राह्य वाटते. त्यामुळे हीच भूमिका कायम ठेऊन त्यावर विद्याव्रत संस्कार या नवीन संस्काराची रचना केली आहे.

       सर्व जाति-जमातींतील वय वर्षे १२ व पुढील मुलामुलींसाठी  हा संस्कार आहे. सर्वप्रथम व्यक्तिमत्त्वविकास म्हणजे काय हे समजून घ्यायचे, त्यासाठी विविध संकल्प करायचे, ते सर्वांसमक्ष मांडायचे व ते पाळण्याचा निश्चय करायचा, दैनंदिन उपासनेसाठी गायत्रीमंत्राचा उपदेश आचार्यांकडून घ्यायचा व व्रताचे स्मरण राहावे म्हणून ॐकार, यज्ञोपवीत, जानवे, कडे यांसारखे बाह्यचिह्न स्वीकारायचे अशी या संस्काराची मांडणी केली आहे.

       मागे उल्लेख आला आहे त्याप्रमाणे ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करताना विद्याव्रत संस्कार, गृहस्थाश्रमात प्रवेश करताना विवाह संस्कार व वानप्रस्थात प्रवेश  करताना  साठी शांती अशी मांडणी शक्य दिसते.

  • वाढदिवस

       वाढदिवस हा जरी परंपरागत संस्कार नसला तरी तो आज या ना त्या स्वरूपात समाजात रूढ झाला आहे. मात्र केक कापून, मेणबत्त्या फुंकून वाढदिवस साजरा करणे ही आपली संस्कृती नाही. दिवा विझवणे हे आपल्याकडे  अशुभ समजले जाते. प्रत्येक संस्कृतीचे काही संकेत असतात. ते शक्यतो पाळले गेले पाहिजेत. आजच्या काळात वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो संस्कार या स्वरूपात केला पाहिजे. त्यामधे आई, आजी व घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी ज्याचा वाढदिवस असेल त्या मुलाला/मुलीला ओवाळणे,

              सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनम्‌‍ |

            विजयी भव  सर्वत्र सर्वदा  जगति भवतु तव सुयशोगानम्‌‍

       यासारखे शुभेच्छापर  पद्य म्हणणे अशा गोष्टींचा समावेश करता येईल. टाळ्या वाजवत एका व्यक्तीने  सांगून उपस्थित  सर्वांनी तालासुरात म्हणाव्यात अशाच या काव्यपंक्ती आहेत.

विवाह वाढदिवस

आपल्याकडे श्रावणी नावाचा जो संस्कार केला जातो त्यामधे उपनयन संस्कारात घेतलेल्या व्रताचे पुनःस्मरण हा एक हेतू असतो. विवाह हेदेखील एक व्रतच आहे आणि विवाहामधे अग्नीसमोर घेतलेल्या व्रताचे स्मरणदेखील पतीपत्नी दोघांनी पुनःपुन्हा केले पाहिजे. आजच्या काळात विवाहाचा वाढदिवस काही ना काही स्वरूपात करण्याची पद्धत पडतेच आहे. तिलाच योग्य वळण देऊन हा नवीन संस्कार रूढ करता येईल. या निमित्ताने पती-पत्नी उभयतांनी मिळून गतवर्षाचा आढावा घेऊन नवीन वर्षाची आखणी करता येईल.

. सहस्रचंद्रदर्शन

सहस्रचंद्रदर्शन याचा अर्थ १ सहस्र पौर्णिमा किंवा प्रतिपदा  एखाद्याने आपल्या आयुष्यात पाहाणे म्हणजेच ८० वर्षे जगणे. ८० वर्षे अखंडपणे कार्यरत राहण्याची  पुण्याई ज्यांच्यापाशी आहे, अशांसाठी त्यांच्या आप्तस्वकीयांनी हा सहस्रचंद्रदर्शनाचा विधी करावयाचा असतो. उर्वरित आयुष्य समाधानात, कृतकृत्यतेत व्यतीत करण्याच्या दृष्टीने ही पोथी तयार केली आहे.