१) अस्थी आणण्यास कोणी जावे ?
मृताच्या पत्नीसहित घरच्या ५ महिलांनी अस्थिसंकलनास जावे असे सांगितले आहे. घरी पाच जणी नसल्यास शेजारच्या महिला बरोबर घ्याव्यात. अलीकडील काळात सोईनुसार असे निर्णय करावेत.
२) श्राद्ध म्हणजे काय ?
देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् |
पितृन् उद्दिश्य विप्रेभ्यः दत्तं श्राद्धं उदाहृतम्॥ (ब्रह्मपुराण)
योग्य स्थळी, सुयोग्य काळी, श्रद्धेने आणि विधिपूर्वक आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जे काही गरजू अशा विद्यासंपन्नांना देण्यात येते त्यास श्राद्ध म्हणतात.
दिवंगताच्या स्मृत्यर्थ श्रद्धापूर्वक जो त्याग करण्यात येतो त्यास श्राद्ध म्हणतात.
(मिताक्षरा गौतम धर्मसूत्रावरील टीका १/२१७)
अमावास्येस वायुरूपातील पितर गृहद्वारी येऊन श्राद्ध व्हावे यासाठी सूर्यास्तापर्यंत वाट पाहून (ते न केले गेल्यास) दुःखाने परत जाताना शाप देतात. (कूर्मपुराण)
हे वचन शब्दशः घ्यावयाचे नसते. अशा प्रकारची वचने अनेक प्रकारच्या स्तोत्रांच्या अखेरीस फलश्रुतीच्या रूपात आपण पाहतो. थोड्या अतिशयोक्त स्वरूपात विशिष्ट गोष्ट केल्यास होणारे लाभ व न केल्यास होणारे वाईट परिणाम सांगणाऱ्या अशा वचनांना अर्थवाद म्हणतात. अर्थवादात वचनांचा अर्थ तारतम्याने घ्यावयाचा असतो. आपल्या दिवंगत आप्तांचे स्मरण आपण अवश्य करावे व दिवंगताच्या स्मरणार्थ काही दानधर्म म्हणजेच निरपेक्षपणे काही समाजोपयोगी कार्य करावे एवढीच अपेक्षा येथे असते.
देवलस्मृतीने अश्रद्ध माणसाने श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही असे म्हटलेले आहे.
‘नास्ति हि अश्रद्दधानस्य धर्मकृत्ये प्रयोजनम् ॥’
३) श्राद्ध कोणी करावे ?
पुत्राभावे तु पत्नी स्यात पत्न्याभावे तु सोदरः | (शंखस्मृती)
मुलगा नसेल तर बायकोने उत्तरक्रिया करावी. बायकोच्या अभावी भावाने करावी.
पुत्रः पौत्रः प्रपौत्रो वा तद्वद्वा भ्रातृसंततिः |
मुलगा, नातू, पणतू किंवा भावाची संतती यासाठी चालते.
बौद्धायन *, वृद्धशातातप * म्हणतात की ज्यांच्याविषयी आपल्या मनात स्नेह आहे त्यांचे श्राद्ध आपण अवश्य करावे. श्राद्ध करणाराने शक्यतो तो होईपर्यंत काही खाऊ नये.
४) श्राद्ध कधी करावे ?
सामान्यपणे दुपारी श्राद्ध करावे. कितीही उशीर झाला तरी चालेल. पण रात्री श्राद्ध करू नये. सकाळीही मुख्यतः संध्या म्हणजे उपासना, देवपूजा यांसाठी वेळ द्यावयाचा असल्याने या नित्यकर्मानंतरच श्राद्ध करावे. आधुनिक काळात सर्वांच्या सोयीचा विचार करता सकाळच्यावेळी नित्यकर्मे आटोपल्यावरही श्राद्ध करण्यास हरकत नाही.
५) श्राद्धे किती करावीत ?
वर्षात एकूण 96 श्राद्धे सांगितली आहेत. पण हे व्यवहार्य नाही. म्हणून देवलऋषींनी वर्षात एकच श्राद्ध मृत्युतिथीस करावयास सांगितले आहे.
६) श्राद्धप्रसंगी कोणास जेवू घालावे ?
वेदवेदांग जाणणाऱ्यांना, तत्त्वज्ञ व्यक्तींना श्राद्ध प्रसंगी भोजन द्यावे असे सांगितले आहे. प्रत्यक्षात अशा व्यक्ती सापडतील पण त्या भोजनास येतील हे अवघडच आहे. जाणकार व गुणी अशा अधिकारी व्यक्तींच्या अभावी विद्यार्थ्यांना (कष्ट करून शिकणाऱ्या), आपल्या आप्तेष्टांना श्राद्धप्रसंगी भोजनास बोलवावे असे आपस्तंब *धर्मसूत्रात म्हटले आहे. (२/७/१७/५-६) वडिलांच्या श्राद्धास तरुणांना भोजनास बोलवावे असे त्यात सांगितले आहे. (२/७/१७)
एकाग्रपणे शिवपूजा करणाऱ्यास भोजन द्यावे असे सौरपुराण सांगते. (१९/२-३)
* बौधायन – हा इ.स. पूर्व काळात होऊन गेलेला स्मृतिकार असून त्याने श्रौतसूत्र, गृह्यसूत्र आणि धर्मसूत्रे लिहिलेली आहेत.
*वृद्धशातातप – एक स्मृतिकार आपस्तंब हा ऋषी भृगुकुळातील असून त्याने श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, स्मृती, उपनिषद आणि धर्मसूत्रे लिहिलेली आहेत.