शांती व पूजा

शांती

       शांती हा शब्द ‌‘शम्‌‍‌’ धातूपासून बनलेला असून त्या धातूचा अर्थ  वाईट प्रभाव हटवणे, शमन करणे, प्रसन्न किंवा संतुष्ट करणे असा होतो. शम्‌‍ धातूच्या या विविध अर्थांच्या प्रकाशात शांती शब्दाचा अर्थ शोधू लागल्यास मनात उत्पन्न होणाऱ्या चांगल्या विचारांच्या योगे अशुभाचे सावट, संकटांची भीती व वाईट विचारांचा  प्रभाव हटवणे, चित्तामधील क्षोभ शांत करून ते प्रसन्न करणे असा अर्थ आढळून येतो. जीवनाची क्षोभरहित अवस्था म्हणजे शांती होय. शांती ही एक मनोवृत्ती असून ते जीवनाचे अंतिम मूल्य आहे. जडत्व, निष्क्रियता, आळस म्हणजे शांती नसून चैतन्यपूर्ण, क्रियाशील व उत्साही अवस्था शांती शब्दाने व्यक्त होते.

       यत्किञ्चित् वस्तु सम्प्राप्य स्वल्पं वा यदि वा बहु |

       या तुष्टिर्जायते चित्ते सा शान्तिरिति कथ्यते ॥

(वयोवस्थाभिदशान्तिसमुच्चयः | लेखक – श्री. नारायणशास्त्री आंजर्लेकर  -केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, पान क्र. १०)

       अशी शांतीची एक व्याख्या उपलब्ध आहे. एखादी खूप हवीशी वाटणारी गोष्ट मिळाली की मनाची जी एक तृप्त, समाधानी अवस्था येते तिला शांती असे म्हणतात. यावरून दिसून येईल की शांती ही मनाची एक विशिष्ट अवस्था असून ती प्राप्त होण्यासाठीच वास्तुशांती, उदकशांती, साठीशांती, सहस्रचंद्रदर्शन शांती यांसारखे धार्मिक विधी सांगितले आहेत. काही विशिष्ट कृती आणि त्याबरोबर म्हणावयाचे मंत्र हे या धार्मिक विधींमधे येतात व त्यांचा परिणाम म्हणून मनाला शांती मिळावी अशी अपेक्षा असते.

       पूर्वीच्या काळी कित्येक प्रकारच्या शांती सांगितल्या गेल्या आहेत. जुळे जन्मल्यास, घराला आग लागल्यास, घरात भांडणं झाल्यास, वाईट स्वप्न पडल्यास, एखाद्या प्राण्याचा विशिष्ट आवाज ऐकल्यास, शरीराचा एखादा भाग कंप पावल्यास अशा विविध प्रसंगी शांती करण्यास सांगितले आहे. पूर्वीच्या काळी माणसांना ग्रहण, धूमकेतू, उल्कापात, समुद्री तुफान, कुत्र्याचे रडणे अशा घटना अनाकलनीय व भयकारी वाटत असत. त्या स्वाभाविक घटनाक्रमाच्या विरुद्ध वाटत असत. शरीरावयवांची स्पंदने ही पुढे घडणाऱ्या वाईट घटनांची निदर्शक वाटत असत. मनाच्या या साऱ्या खेळातून शुभाशुभ शकुनांची कल्पना आली.जे यापूर्वी घडलेले नाही व पुढे घडणार आहे त्याबद्दल कतूहल व भय माणसाला पूर्वीपासूनच वाटत आले आहे. न जाणो काही अनिष्ट घडेल की काय? ही शंका माणसाच्या मनाला छळत असते आणि कमकुवत करीत असते. त्यामुळे अनिष्टाच्या परिहारासाठी व इष्टाच्या स्थापनेसाठी शांतीची कल्पना पुढे आली असावी.

              यथा शस्त्रप्रहाराणां कवचं भवति वारणम्‌‍ |

            तथा दैवोपघातानां शान्तिर्भवति वारणम्‌‍

(वयोवस्थाभिदशान्तिसमुच्चयः | लेखक – श्री. नारायणशास्त्री आंजर्लेकर –  केशवभिकाजी ढवळे प्रकाशन, पान क्र. ९)

       कवचाने म्हणजे  चिलखताने ज्याप्रमाणे शस्त्रप्रहारांपासून बचाव होतो त्याप्रमाणे शांती केल्याने  दैवी आघातांपासून बचाव होतो. ही या शांतिकर्मांमागची कल्पना आहे. आजच्या काळात शांती केल्यामुळे अशुभाचे निवारण आणि शुभाचे अवतरण खरेच होते की नाही हा मुद्दा विवादास्पदच ठरेल. त्यामुळे अनिष्ट घटना घडू नयेत यासाठी नव्हे तर त्या जर घडल्याच तर त्यांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी मानसिक धैर्य लाभावे असा हेतू समोर ठेवून शांतिकर्मांची रचना केली पाहिजे.

या शांतिकर्मांच्या निमित्ताने चार चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवता येतील. लोकांच्या कातर मनाला दिलासा मिळेल असे  मंत्र त्यात आवर्जून घेता येतील. पूर्वी प्रचलित असलेल्या सर्वच्या सर्व शांती केल्याच पाहिजेत असे नाही पण वर सांगितलेल्या कर्मांमागील भाव लक्षात घेऊन काही मोजकी शांतिकर्मे करण्यास हरकत नाही. त्यांच्याकडे ‌‘काही मानसोपचार‌’ अशा दृष्टीने पहावे लागेल.

. वास्तुशांती

       हिंदू संस्कृतीतील अनेक उत्तमोत्तम कल्पना घराच्या आधाराने फुलल्या आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांत गृहस्थाश्रम धन्य होय असे मानले आहे. अपत्यसंगोपन, अतिथिपूजन इ. गृहस्थाश्रमातील कर्तव्यांना घराचा आधार असतो. कुटुंबव्यवस्थेचे उबदार कोंदण म्हणून घराकडे पाहिले जाते. केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नाही. तर वास्तू, त्यात राहाणारी माणसं, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांचे विचार या सर्वांनी मिळून घर बनत असते.

अशा या घराची वास्तू जेव्हा नव्याने बांधली जाते तेव्हा त्यात प्रवेश करणाऱ्यांच्या मनात एक मंगल, पवित्र भावना असते. चराचरामधे भरून राहिलेली ईश्वरी शक्ती वास्तूपुरुषाच्या रूपाने आपल्या घरातही असावी म्हणून वास्तुपुरुष आणि वरुणदेवतेची पूजा करून वास्तुशांती करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. वीज, वादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी अशा वरुणप्रकोपांची बाधा आपल्या घराला होऊ नये असे आपल्या पूर्वजांना वाटत असे आणि आपल्यालाही  वाटत असते. 

काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी  |

देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः |

            सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |

            सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्‌‍ दुःखमाप्नुयात्

       अशी आपली एक प्रार्थना आहे. वरुणदेवतेच्या कृपेने अन्नधान्य विपुल होऊन आपले घर  भरलेले असावे अशी आपली इच्छा असते. वरुण व वास्तुपुरुष यांचे कृपाछत्र घरावर असावे, त्याखाली घरातील मुलामाणसांनी सुखाने राहावे, यशस्वी जीवन जगावे व दीर्घायुषी व्हावे अशी प्रार्थना या प्रसंगी केली जाते.

प्रत्येक स्थानावर काही सुष्ट – दुष्ट शक्तींचे वास्तव्य असते अशी आपल्याकडे समजूत आहे. ज्या अशुभ, अहितकारी शक्ती आहेत त्यांनी वास्तु सोडून निघून जावे व शुभ, हितकारी शक्तींनी त्यात वास्तव्य  करावे अशा आशयाच्या प्रार्थनाही यामधे  केल्या जातात.

       हिंदू संस्कृतीत घर या संकल्पनेला सामाजिक संदर्भही आहे. घर हे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर समाजाचेही आधारकेंद्र व्हावे लागते. कुटुंबव्यवस्था हा समाजव्यवस्थेचा कणा आहे असे मानले तर तिचे अधिष्ठान जे घर तिथे पवित्र शुभसंकल्पांचे सिंचन झालेले असणे यात विशेष औचित्य आहे.

. उदकशांती

       उदकशांतीचा विधी बौधायन गृह्यसूत्रामधे सांगितला आहे. संकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी, अपमृत्यू टाळण्यासाठी, वास्तूच्या शुद्धीसाठी हा विधी करावा असे त्यात म्हटले आहे. उदकशांतीचा विधी आजही काही ठिकाणी केला जातो. उदक म्हणजे पाणी. पाणी हे स्वभावतःच शांती व तृप्ती देते. त्यामुळे या पाण्याचा उपयोग शांतिकर्मासाठी करणे यात औचित्यच आहे. वेदांचे आवाहन करून जल पूजन केले जाते. नंतर त्या पाण्याने यजमानांना अभिषेक केला जातो.

       आजच्या काळामधे वेदपूजन या स्वरूपामधे हा विधी टिकवणे योग्य होईल. अज्ञान म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे अशांती होय. ही अशांती दूर करायची तर ज्ञानाची उपासना केली पाहिजे; तरच खरी शांती लाभेल. वेद  म्हणजे ज्ञान.  वेद हे भारतीयांचे सर्वात प्राचीन ग्रंथ होत. या ग्रंथाची पूजा ज्ञानोपासकांनी केली पाहिजे व त्यानिमित्ताने ज्ञानोपासनेची परंपरा सुरू करणाऱ्या आपल्या पूर्वजांचेही स्मरण केले पाहिजे.

       या विधीमधे वेदग्रंथांची मांडणी केलेली असेल. प्रतीकरूपातील वेदांची विविध उपचारांनी पूजा केली जाईल. खरे वेदपूजन, वाचन, श्रवण, स्मरण, पठण व मनन या  उपचारांनी केले पाहिजे. त्याचे बाह्यप्रतीक म्हणून गंध, फूले, धूप, दीप, नैवेद्य हे उपचार करता येतील. वेदांमधील उत्तमोत्तम अर्थांच्या मंत्रांचे अर्थांसह पठण केले जाईल. वेदवाङ्मयातील विचारांची समाजाला ओळख करून देण्याची ही एक संधी असेल.

. साठी शांती

       वय वर्षे पन्नासनंतर मनुष्याच्या वयाचा उतरणीचा काळ सुरू होतो. उतार वयामधे मृत्यूच्या चाहुलीने मन कातर होऊन जाणे हे स्वाभाविकच ! अशा मनाला दिलासा मिळावा म्हणून वय वर्षे पन्नास व त्यापुढे प्रत्येक पाच वर्षांच्या टप्प्याने शांती करण्यास सांगितले आहे.

नखाधिकशतं आयुः मनुष्याणां प्रकीर्तितम्‌‍ |  (लिंगपुराण)

       असे एक वचन आहे. पूर्वी माणसाचे आयुष्य शंभर वर्षे मानले जाई. वय वर्षे पन्नास ते शंभर अशा कालावधीत केल्या जाणाऱ्या शांतींना वयोवस्थाभिदशांती म्हटले आहे. या शांती पुढीलप्रमाणे –

              वैष्णवी वारुणी चैव ततश्चोग्ररथी तथा

            महारथी भीमरथी ऐन्द्री  चैव विशेषतः |

            चांद्री दार्शनिकी रौद्री सौरी मृत्युंजयी तथा

            महामृत्युंजयी शान्तिः क्रमशश्च प्रकीर्तिताः॥

(वयोवस्थाभिदशान्तिसमुच्चयः – लेखक – श्री. नारायणशास्त्री आंजर्लेकर – केशव  भिकाजी ढवळे प्रकाशन, पान क्र. ७)

       आता निवृत्तीचे वय ५८ असल्याने व सरासरी आयुर्मान वाढत असल्याने वैष्णवी वा वारुणी शांतींची तितकीशी आवश्यकता दिसत नाही. आजच्या काळात या शांतींपैकी उग्ररथी शांती म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी करावयाची शांती विशेष प्रचलित आहे. साठी शांतीचे अन्य धार्मिक विधी तर होत असतातच. पण या धार्मिक विधींना जोड द्यायला पाहिजे ती वानप्रस्थाश्रम प्रवेशाची.

       वय वर्षे साठ हा गृहस्थाश्रमाच्या परिपूर्तीचा काळ आहे. साठ वर्षे पूर्ण करून एकसष्टाव्या वर्षात  म्हणजेच संवत्सरात जी व्यक्ती प्रवेश करते त्या नावाच्या संवत्सरातच  त्या व्यक्तीचा जन्म झालेला असतो. म्हणूनच साठीशांतीलाच एकसष्टी (जन्मसंवत्सरात प्रवेश) असेही म्हणतात. या वयात साधारणतः पुत्र, कन्या जाणत्या झालेल्या असतात. बहुधा त्यांची जबाबदारी आपल्यावर राहिलेली नसते. व्यावसायिक निवृत्तीचाही हाच काळ असतो. अशा वेळी स्वाभाविकच मनाची वृत्ती ईश्वरसम्मुख होऊन अधिक धार्मिक, अधिक देवशरण बनते. साठाव्या वर्षानंतर जीवनशक्ती – कार्यशक्तीची दिशा कुटुंबाकडून समाजाकडे वळवावी अशी वानप्रस्थाश्रम प्रवेशाची कल्पना आहे. आता वृक्षारोपण, वनसंवर्धन करणे हा  वानप्रस्थाश्रमाचा कालोचित अर्थ करावा.

       हल्लीच्या काळात वानप्रस्थाश्रम प्रवेश म्हणजे घरदार सोडून वनात जाऊन राहाणे असे कोणी सांगणार नाही. मात्र घरातच अलिप्तपणे, समाधानाने, इतरांच्या उपयोगी पडत राहाणे, इतरांना उपदेश न करता राहणे  अभिप्रेत आहे. घरातील मुख्य जबाबदारी पुढील पिढीवर सोपवावी आणि स्वतःचे उर्वरित आयुष्य  ईश्वरचिंतनात आणि लोककल्याणात व्यतीत करावे.

पूजा

        भारतीय संस्कृतीमधे पूजेला एक महत्त्वाचे स्थान आहे. घरोघरी चालणारी कुलदेवता, इष्टदेवता यांची नित्यपूजा, गणपती, देवी, सत्यनारायण  यांसारख्या दैवतांची नैमित्तिक पूजा, यांच्यापासून ते वृक्ष, नाग, बैल, पुस्तक, केरसुणी, यंत्र, इ.च्या वार्षिक पूजेमधून ते महत्त्वाचे स्थान व्यक्त होते.

       चराचरामधे, प्रत्येक अणुरेणूत भरून राहिलेली परमेश्वरी शक्तीच मातीच्या, लाकडाच्या अथवा धातूच्या मूर्तीतदेखील वसत आहे अशी कल्पना करून तिच्यासाठी जे विधियुक्त उपचारसमर्पण केले जाते तीच पूजा म्हणून प्रचलित आहे.

विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्यशक्तीला विविध नावांनी ओळखले जाते. निर्गुण, निराकार चैतन्यशक्तीची अनेक सगुण, साकार रूपे आहेत. अद्वैत सिद्धांतानुसार अंतिम तत्त्व एकमेवाद्वितीय असले तरी व्यवहारात द्वैताशिवाय भागत नाही. द्वैत हे भक्तीला सोपे आहे. म्हणून  निर्गुण, निराकाराची जाण ठेवूनसुद्धा सगुण, साकाराची उपासना  सर्वप्रिय आहे. पूजा हा सगुण, साकाराच्या उपासनेचाच एक प्रकार होय. आजचे सर्व पूजाविधी हे तंत्रात सांगितले आहेत असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. मुळात ‌पूजा‌’ हा शब्द वेदात नाही. पण वैदिक तत्त्वज्ञानाशी विसंगत नसणारी भूमिका घेऊन पुढे अमूर्ताचे समूर्त इंद्रियगोचर प्रतीक म्हणून मूर्ती सर्वजनास भक्ती करण्यास सोयीची ठरली तरीही

              देहो देवालय: प्रोक्त: जीवो देव: सनातन😐

            त्यजेत् अज्ञाननिर्माल्यं सोऽहं भावेन पूजयेत्

       अशा श्लोकातून काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल‌’ हे तत्त्वज्ञान वेदाला धरून मांडणे चालूच होते म्हणून ‌’

              देवो विद्यते मंत्रे तंत्रे व्रतोऽपिच |

            न तीर्थे प्रतिमायां वा भावगम्यो हि केशव:

       अशा वचनांमधून ‌ ‘भाव तेथे देव‌’ ही भूमिका संतांनी मांडली. स्वामी रामतीर्थांनी प्रयोगशाळेत, रसायनशास्त्राच्या दालनात यज्ञवेदीचे पावित्र्य यावे असे म्हटले आहे. काय असते या पूजाविधीमधे ?

       पूजाविधीसाठी मूर्तीसारखे एखादे स्थूल प्रतीक आवश्यक असते. ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष  चैतन्यशक्तीचेच रूप आहे अशी भावना मात्र हवी. नंतर त्या शक्तीला आवाहन करून  तिला विविध उपचार अर्पण करायचे असतात. नंतर पूजेची समाप्ती करायची असते.

       आवाहन म्हणजे बोलावणे. आपल्या घरी कोणाला बोलावले आणि ती व्यक्ती आली की आपण “या! या!” म्हणून त्याचे आवाहन करतो,  स्वागत करतो. त्याला हातपाय धुवायला पाणी देतो. त्याला चांगल्या आसनावर बसवतो. उत्तमोत्तम पदार्थ त्याला खाण्यासाठी देतो. पाहुणचार गोड मानून घ्यायला सांगतो आणि त्याला निरोप देतो. अशाच सर्व गोष्टी पूजेमधे देवासाठी केल्या जातात. त्यांना उपचार असे म्हणतात.

       एकूण सोळा उपचार प्रमुख मानलेले आहेत. सर्वप्रथम पूजेचा संकल्प उपास्य दैवतास  निवेदन करून पुढील सोळा उपचार करण्याची प्रथा आहे.  त्यामधे आवाहन (बोलावणे), आसन,(बसण्याचे स्थान), पाद्य (पाय धुण्यासाठी पाणी), अर्घ्य (हात धुण्यासाठी पाणी), आचमनीय (पिण्यासाठी पाणी), स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत (जानवे), अनुलेपन (अंगाला लावण्यासाठी चंदन), पुष्प, धूप (सुगंधी उदबत्ती), दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार व मंत्रपुष्प (मंत्र म्हणून वाहिलेली फुले) या उपचारांचा मुख्यतः समावेश होतो. यामधे स्त्रीदेवतेसाठी  हळद-कुंकू इ. सौभाग्यद्रव्ये, अलंकार व सर्वच देवतांना प्रसंगी विडा-दक्षिणा इ.  उपचारदेखील करतात. षोडश उपचारातील शेवटचा उपचार प्रार्थनेचा असतो. त्यावेळेला पुढील प्रार्थना अवश्यमेव करावी.

              जीवने यावद्‌‍ आदानं स्यात्‌‍ प्रदानं  ततोऽधिकम्‌‍ |

            इत्येषा प्रार्थनाऽस्माकं, भगवन्‌‍ परिपूर्यताम्‌‍

       हे भगवंता, आयुष्यामधे आम्ही इतरांच्याकडून जेवढं ग्रहण करतो त्यापेक्षा आमच्याकडून काही ना काही अधिक दिले जावे अशी आमची प्रार्थना आहे. ही आमची इच्छा तू पूर्ण कर. अशा प्रकारे  सर्व उपचार केल्यानंतर खरोखरी जे, जसे, जितके देवासाठी करायला हवे त्यामानाने आपल्याला काहीच करणे जमले नाही ही भावना व्यक्त करणाऱ्या पुढील पंक्ती म्हणण्यात येतात.

              आवाहनं जानामि जानामि तवार्चनम्‌‍ |

            पूजां चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर

            मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर |

            यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे

       हे देवा, तुला कोणत्या प्रकारे बोलवावं, तुझी पूजा कशी करावी, कोणत्या शब्दांत निरोप द्यावा ते मला नीटसं कळत नाही. या पूजेत काही उणं-अधिक राहिलं असेल तर क्षमा कर. मला पूजेचे मंत्र येत नाहीत, उपचार कळत नाहीत, पुरेशी भक्तीही नाही, तरीही मी ही जी पूजा केली आहे ती तू पूर्ण मानून घे. असा आशय येथे व्यक्त होतो.

       हे सर्व उपचार करणे, त्यासाठी लागणारी पूजाद्रव्ये असणे हे चांगले. पण ते शक्य नसल्यास गंध लावणे पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पाचच उपचारांनी पूजा केली तरी चालते. एखाद्या पूजाद्रव्याच्या अभावी अक्षता वाहाता येतात.

शेवटी पूजेमधे सर्वात महत्त्वाचा मानला आहे तो भाव ! एखादा उपचार करायचा राहिला किंवा एखादे पूजाद्रव्य मिळू शकले नाही तर देवाचा कोप होईल, काहीतरी अनिष्ट घडेल असे मानायचे कारण नाही. भगवद्गीतेत म्हटले आहे  – 

              पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति |

            तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः॥ (गीता ९ – २६)

       पान, फूल, फळ किंवा नुसते पाणीदेखील मला कोणी भक्तिपूर्वक अर्पण केले तर मी ते आनंदाने स्वीकारतो.

त्यामुळे अशा भक्तिभावनेची वृद्धी जर पूजेमुळे होत असेल तरच ती सफल होय.‌‘पूजा कोणाची करावी आणि कोणत्या प्रकारे करावी असा काही नियम नाही.‌’

              उपास्यानाम्‌‍ अनियमःसाधनानाम्‌‍ अनेकता |

       म्हणजे कोणा देवाची उपासना करावी याचा काही नियम नाही. कोणत्या साधनांनी करावी यासाठी अनेक पर्याय आहेत.

       हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा हे अशा अनेक साधनांपैकीच एक होय. या पूजेमधे आपल्या इष्ट दैवताच्या माध्यमातून एकमेवाद्वितीय चैतन्यशक्तीचे, अंतिम तत्त्वाचे, सत्याचेच पूजन आपण करत असतो.

माणसाची आध्यात्मिक उंची जसजशी वाढत जाते तसतशी त्याला बाह्य उपचारांनी केलेल्या पूजेपेक्षा मानसपूजा (मनाने केलेले उपचारसमर्पण) प्रिय होऊ लागते आणि अंती संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे त्याप्रमाणे

              तया सर्वात्मका ईश्वरा | स्वकर्मकुसुमांची वीरा |

            पूजा केली होय अपारा | तोषालागी  (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९१७)

       प्राप्त कर्तव्य निष्कामबुद्धीने करत राहाणे हीच त्याला खरी पूजा वाटू लागते. आज समाजामधे गणेशोत्सवात गणपतीची, नवरात्रात देवीची, दीपावलीत लक्ष्मीची, श्रावणामधे सत्यनारायणाची अशा विविध पूजा प्रचलित आहेत. श्राद्धामधे केले जाणारे विधी म्हणजेदेखील आपल्या पूर्वजांचे केलेले पूजनच आहे. भक्तिभावनेची वाढ होणे हे तर पूजांमधून साधता येईलच. पण त्याचबरोबर काही मूल्ये समाजामधे रुजण्याच्या दृष्टीनेही या पूजांचा उपयोग व्हावा. उदा. गणपती हा गणांचा अधिपती म्हणजे संघटनेची देवता आहे. गणपतीपूजनाच्या निमित्ताने एकजुटीने काम करण्याचे महत्त्व समाजात अधिक रुजायला हवे. नवरात्रातील देवीपूजनाच्या निमित्ताने सर्वसामान्य समाजात व विशेषतः स्त्रियांमधे स्वतःच्या शक्तीची जाणीव जागी व्हायला हवी. दीपावलीतील लक्ष्मीपूजनामधून आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता ही मूल्ये रुजली पाहिजेत. सत्यनारायणाच्या निमित्ताने लोकांना सत्याचरणाचे महत्त्व जाणवावे. त्यामुळे समाजप्रबोधनासाठी  या पूजांचा उपयोग होऊ शकेल.