२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती

लढाया, अपघात किंवा शस्त्रक्रिया या दरम्यान पूर्वीच्या काळी अनेकदा असे घडले आहे की शरीराचा एखादा अवयव जखमी/निकामी झाला तरी त्याच्या वेदना त्या माणसाला जाणवल्या नाहीत. आजही असे प्रसंग घडल्याच्या बातम्या येत असतात. बऱ्याच वेळेला पूर्वकल्पना नसताना हे प्रसंग घडतात. तसेच पूर्वकल्पना नसताना बारीकशा गोष्टींनीही असह्य वेदना होऊ शकतात. पेशवाईच्या काळातली उदाहरणे अशी आहेत, की शूर सरदार न्हाव्यासमोर बसला आणि वस्तरा लागल्यावर त्याच्या तोंडून दुःखाचे उद्गार बाहेर पडले. एवढेसे लागल्यावर तोंडातून दुःखाचे उद्गार येण्यावरून न्हाव्याने सरदाराची थट्टा केल्यावर त्याने आपल्या पायात भाल्याचा फाळ घुसवला आणि चेहऱ्यावरचे स्मित हास्य कायम ठेवले. शरीराला इजा झाल्यावर त्याचे संदेश मेंदूपर्यंत जातात. परंतु त्या संदेशांकडे लक्ष द्यावे वा नाही, हे आपले मन ठरवू शकते. चुकून वस्तरा लागला तेव्हा मन आणि शरीर जोडलेले होते. आणि भाल्याचा फाळ पायात मुद्दाम घुसवला तेव्हा ठरवून मन शरीरापासून किंवा निदान पायाच्या संवेदनांपासून वेगळे केले होते. अपघाताच्या वेळीही मन दुसऱ्या कोणत्या तरी विचारात असल्याने इजा झाल्याचे लगेच लक्षात येत नाही. 

पायाच्या दुःखाकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले की तिकडे लक्ष जात नाही. तसेच मन आणखी वेगळ्या कामात पूर्ण एकाग्र असले, तरी इतर कोणत्या संवदेनांकडे लक्ष जात नाही. उपनिषदांमध्ये असे एक निरीक्षण सांगितले आहे की आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांची तोंडे बाहेरच्या जगाचे ज्ञान व्हावे म्हणून शरीराच्या बाहेरच्या दिशांनी ठेवलेली आहेत. मन इंद्रियांशी जोडले गेले की तेही आपोआप बाहेरच्या दिशांनी धावते. पण इंद्रियांची तोंडे कायम बाहेरच असतात तसे मनाचे नाही. मन पाहिजे तेव्हा आतही वळवता येते. आपण ‌‘कानात प्राण आणून ऐकले‌’ असे म्हणतो. तेव्हा मन फक्त कानांशी जोडलेले असते. इतर इंद्रियांशी असलेला संबंध तात्पुरता बंद असतो. त्यावेळी फक्त ऐकू येते. पावनखिंडीत बाजीप्रभूंना तोफांचे आवाज ऐकायचे होते. ऐकण्याशिवाय बाकी काहीही करायचे नव्हते. त्यामुळे शरीर स्वतंत्रपणे जखमांची पर्वा न करता लढत होते व कान फक्त तोफांच्या आवाजांची वाट पाहत होते. डोळ्यात प्राण आणून कोणाची वाट बघत असताना मन फक्त डोळ्यांशी जोडलेले असते.

अशी कल्पना करा की मन कुठल्याच इंद्रियाशी जोडले गेलेले नाही. आणि इंद्रियांच्या वाटेबाहेर लक्ष देण्याऐवजी ते आतमध्ये वळलेले आहे. तर मनाला काय कळते? आपल्या आतमध्ये एक जाणीवेचे केंद्र आहे. तेच सर्व शरीराला प्रेरणा देत असते. आणि त्यालाच स्वतःची जाणीव असते, हे त्यावेळी मनाला कळते. मन तासन्‌‍ तास गाणी ऐकू शकते, चित्रे बघू शकते, तसेच तासन्‌‍ तास आपल्या आतल्या जाणीवेच्या केंद्राशीही जोडलेले राहू शकते. असे दिवसातून अनेक वेळा आणि रोजच आतल्या केंद्राशी जोडले राहण्याचा मनाला सराव झाला, तर काय होईल? गीतेच्या पुढच्या श्लोकात हेच सांगितले आहे.

गीता २.२०  :         न जायते म्रियते वा कदाचित्‌‍ नायं भूत्वा भविता वा न भूयः |

                           अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥

गीताई २.२० :         न जन्म पावे न कदापि मृत्यु होऊनि मागे न पुढे न होय

                            आला न गेला स्थिर हा पुराण मारोत देहास परी मरे ना

डोंबाऱ्याचे मूल जेव्हा दोरीवर चालायला शिकते तेव्हा सुरुवातीला त्याचे लक्ष आजूबाजूला सगळीकडेच असते. तेव्हा त्याला खालून त्याचे पालक हात धरून आधार देतात. हळूहळू फक्त दोरीवर तो लक्ष केंद्रित करू लागला, की आजूबाजूचे काही त्याला जाणवत नाही. मग पडण्याची भीतीही जाते. मग हात सोडून दिलेला चालतो. तशी आपल्या मनाला आतल्या केंद्रावर लक्ष केंद्रित करायची सवय लागली, की त्याला शरीराशी जोडले राहण्याची आवश्यकता कमी होते. मग ‌‘देह जावो अथवा राहो‌’ अशी मनाची स्थिती होते. शरीराचा जन्म झाला अथवा मृत्यू झाला, किंवा एक आयुष्य संपल्यावर पुन्हा जन्म घेतला, तरी मनाला त्याची फिकीर नसते. आतले जाणीवेचे केंद्र स्थिर आहे, ते नाहीसे होणार नाही याचा त्याला अनुभव येतो. त्यामुळे शरीर कोणी कापले तरी ‌‘मी‌’ मरणार नाही, मरते ते फक्त शरीर, असा मनाचा ठाम विश्वास असतो. हेच या श्लोकात सांगितले आहे. म्हणून प्रबोधिनीने केलेल्या अंत्येष्टीच्या पोथीत हा श्लोक देखील समाविष्ट केला आहे. (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार पोथी, पाचवी आवृत्ती, शके १९३९, पान १२) स्मशानामध्ये हा श्लोक म्हणताना गेलेल्या व्यक्तीचे आप्त आणि मित्रपरिवार यांना ही अगदी नैसर्गिक घटना घडली आहे हे समजून घ्यायला या ज्ञानाचा उपयोग होतो. आतल्या जाणीवेच्या केंद्राशी म्हणजेच आत्म्याशी जोडले जाण्याचा मनाला प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत यावर श्रद्धाच ठेवावी लागते.