१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन
कै. आप्पा अनेक वेळा म्हणायचे की झाले आहे ते काम थेंबाएवढे आहे. आणि आणखी समुद्राएवढे काम व्हायचे आहे. एकेक व्यक्ती बदलणे म्हणजे थेंबाएवढे काम झाले. राष्ट्र घडवणे, पृथ्वीवर – साऱ्या मानवतेमध्ये – परब्रह्मशक्तीचे अवतरण होणे, हे समुद्राएवढे काम करायचे आहे. झालेल्या कामाबद्दल आणि होत असलेल्या कामाबद्दल संतोष असावा असेही ते म्हणायचे. झालेल्या कामांबद्दल संतोष म्हणजे त्यात काय राहिले, काय चुकले, याबद्दल हळहळत बसायचे नाही, कुढायचे नाही.
एका वैचारिकामध्ये त्यांनी म्हटले आहे की ‘असमाधान, चीड, तडफड हे काहीच आमच्या मनामध्ये नसते. जे झाले त्याबद्दल थोडे समाधान, जे झाले नाही त्याबद्दल तीव्र असमाधान पाहिजे.’ असे म्हणून ते भगवद्गीतेतला श्लोक सांगतात (राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान १२७) –
गीता ९.२२ : अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते |
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम् ॥
गीताई ९.२२ : अनन्यभावे चिंतूनि भजती भक्त जे मज
सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी
परमेश्वरच आहे अन्य काही नाही असा विश्वास म्हणजे अनन्य भाव. जे अनन्य होऊन म्हणजे अनन्य भावाने सतत परमेश्वराचे चिंतन करतात, त्याची भक्ती करतात, ते नेहमीच परमेश्वराशी एकरूप होऊन गेलेले असतात. लाट जशी समुद्राच्या पाण्यापेक्षा वेगळी नसते, तशा केवळ शरीराने वेगळे दिसणाऱ्या, परंतु मन-बुद्धी परमेश्वराच्या वैश्विक मन-बुद्धीमध्ये मिसळून गेलेल्या योग्यांचा योगक्षेम मी चालवतो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
योग म्हणजे जोडले जाणे. भक्त भगवंताशी जोडला जाणे म्हणजे योग. पण योगक्षेम या जोडशब्दात योग म्हणजे जवळ नसलेली गोष्ट मिळणे. आणि क्षेम म्हणजे जवळ असलेली गोष्ट सांभाळणे किंवा तिचे रक्षण करणे. व्यावहारिक अर्थाने भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतो म्हणजे त्याची उपासमार होऊ देत नाही. त्याला व त्याच्या कुटुंबाला जगण्यापुरते आवश्यक ते अन्न आच्छादन मिळत जाते. आध्यात्मिक अर्थाने योगक्षेम म्हणजे भक्त अधिकाधिक काळ परमेश्वराशी जोडलेला राहील व परमेश्वराचा विसर त्याला कधीही पडणार नाही.
कै. आप्पांनी मात्र या श्लोकाकडे आणि त्यातल्या योगक्षेम शब्दाकडे वेगळ्याच अर्थाने पाहिले. परमेश्वरी शक्ती अधिकाधिक अंशांनी प्रकट होणे, मानवाचा देवमानव होणे ही खरी या पुढील उत्क्रांती आहे. ती अजून चालू आहे. आजवर झालेली उत्क्रांती स्थिर करणे म्हणजे क्षेम. यापुढचे उत्क्रांतीचे टप्पे गाठणे म्हणजे योग. परमेश्वर योगक्षेम पाहतो म्हणजे काय? तर अनेक व्यक्तींद्वारे तो अधिक अंशांनी प्रकट होण्याचा प्रयत्न करत राहतो. झालेल्या उत्क्रांतीबद्दल परमेश्वर समाधानी आहे. अजून न झालेल्या उत्क्रांतीसाठी त्याचे प्रयत्न सतत चालू असतात. म्हणजे तो असमाधानी पण आहे. अधिकाधिक उत्क्रांती होणे जर श्रेयस्कर आहे, तर श्रेयस तेच घडवता येण्याचे मूळ असंतोषात आहे. असंतोष असेल तरच प्रयत्न होतात.
आपण प्रत्येक जण जर परमेश्वराचेच अंश आहोत तर योगक्षेमाच्या जबाबदारीचा वाटा आपण ही उचलला पाहिजे. व्यावहारिक अर्थाने सृष्टीचा, निदान मानवतेचा, किमान आपल्या राष्ट्राचा, योगक्षेम पाहिला पाहिजे आणि आध्यात्मिक अर्थानेही पाहिला पाहिजे. व्यावहारिक अर्थाने राष्ट्राचा योगक्षेम पाहणे म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये देशाचा विकास होईल, सर्व क्षेत्रांतले देशप्रश्न सुटत राहतील, यासाठी प्रयत्न करणे. आध्यात्मिक अर्थाने राष्ट्राचा योगक्षेम पाहणे म्हणजे श्लोक क्र. ९ च्या निरूपणात म्हटल्याप्रमाणे सर्व समाजच उत्तम पुरुष लक्षणांनी युक्त किंवा दैवी संपत्तीच्या गुणांनी युक्त बनावा यासाठी प्रयत्न करणे. याच वैचारिकात कै. आप्पा पुढे म्हणतात, व्यावहारिक योगक्षेमाची जबाबदारी घेणे म्हणजे वीर होणे. आध्यात्मिक योगक्षेमाची जबाबदारी घेणे म्हणजे तत्त्वज्ञ होणे. राष्ट्राच्या, मानवतेच्या ‘भाग्यासी काय उणे| वीर तत्त्वज्ञ कार्यकर्त्यावाचून राहिले॥’ देशाच्या दोन्ही प्रकारच्या योगक्षेमाची आपली जबाबदारी मानणारे ‘वीर आणि तत्त्वज्ञ स्त्री-पुरुष कार्यकर्ते घडवणे हेच सर्व ज्ञान प्रबोधिनीचे साध्य आहे’.