१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण

प्रबोधिनीत स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील पुढील उतारा पूव विद्यार्थ्यांना पाठांतराला दिला जायचा. “जे सुकुमार आहे, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजवळ जाते असे श्रुतिवचन आहे. म्हणून उठा! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे. जो पर्यंत तुम्हांमध्ये तारुण्याची तडफ आहे, जोपर्यंत तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात, तोपर्यंतच निश्चय करा! उठा, काम करा! नुकतेच फुललेले, न हाताळलेले, न वास घेतलेले पुष्प देवाच्या चरणी अर्पण करायचे असते; ते स्वहस्ताने ईश्वरार्पण करा!”

आधीच्या श्लोकामध्ये विद्यार्थिदशेपासूनच कोट्यवधी व्यक्तींनी देशाचे रूप पालटण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत असे म्हटले आहे. विद्यार्थिदशेपासून सुरू करायचे कारण त्या वयात विद्याथ उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले असतात. त्यांनीच ईश्वराकडे जाण्याचा, स्वतःमधला ईश्वर ओळखण्याचा आणि ईश्वराच्या अवतरणाचा, इतरांना त्यांच्यामधल्या ईश्वराला ओळखायला मदत करण्याचा संकल्प करायला हवा. ईश्वरत्व ओळखणे म्हणजेच सामान्य मनुष्यत्वाकडून विकसित मनुष्यत्वाकडे स्वतः जाणे व इतरांना जायला मदत करणे.

विकसित मनुष्यत्वाकडे जाण्याच्या प्रक्रियेत अनेक टप्पे असतात. शरीर सुंदर सतेज, मन पवित्र सुदृढ, बुद्धी कुशाग्र विशाल, आत्मा निर्भय निर्वैर, ही विकसित मनुष्यत्वाची लक्षणे आपण विद्याव्रत संस्कारापासून चिंतनासाठी सुचवत असतो. मन सुदृढ बनण्यासाठी आधी स्वतःवरील श्रद्धेची गरज असते. मन पवित्र होण्यासाठी समावेशक किंवा समाजाभिमुख भक्तीची गरज असते. मन पवित्र होण्याच्या प्रक्रियेतला एक-एक टप्पा ओलांडत जाणे म्हणजे भक्त असण्याचे एक-एक लक्षण आपल्यामध्ये प्रकट होत जाणे. उपासनेने मन-बुद्धीचे ऐक्य वाढत जाते. बुद्धीला आपल्या संकुचित मीपणाच्या खऱ्या विशालतेची ओळख जशी होत जाते, तसे मनामध्ये पवित्रता येऊ लागते व भक्ताची लक्षणे आपल्या वागण्यातून प्रकट होऊ लागतात. गीतेमध्ये भक्ताची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत.

गीता १२.१३ :        अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |

                            निर्ममो निरहंकारः सम दुःखसुखः क्षमी ॥

गीताई १२.१३ :      कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनीं

                            मी माझे न म्हणे सोशी सुखदुःखे क्षमा-बळें 

या पूर्वी  महापुरुषपूजेचा उल्लेख आला आहे. त्या पूजेची कल्पना कशी सुचली या संदर्भात श्लोक क्र. ११ आणि १२ चे निरूपण झाले आहे. या पूजेच्या वेळी प्रथम रामदास, दयानंद, विवेकानंद व अरविंद या राष्ट्रसंतांना आवाहन करण्यात आले. यानंतर ख्रिस्ती भजन व बायबलमधल्या काही उताऱ्यांचे वाचन झाले. कुराणातल्या काही सूऱ्यांचे पठण झाले. नंतर गुरु ग्रंथसाहिबमधल्या काही शबदांचे गायन झाले. शेवटी कै. आप्पांनी गीतेतले दोन श्लोक म्हटले व त्यांचे निरूपण केले. त्यापैकी पहिला या वेळचा श्लोक  होता. (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड २, पान ३१०)

सर्वभूतानां म्हणजे फक्त सर्व मनुष्यांचा असे नाही, तर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीव आणि निर्जीवांचा.  यापैकी कोणाचाही आणि कशाचाही द्वेष करत नाही हे भक्ताचे पहिले लक्षण. त्याचे सर्व लक्ष आपल्या ध्येयाकडेच असते. त्यामुळे इतरांचे दोष पाहून त्यांच्याशी शत्रुत्व करणे किंवा त्यांचा राग करणे याची त्याला सवडच नसते. पण हे अभावात्मक लक्षण झाले. सगळ्यांमधली ईश्वरी शक्ती पाहण्याचा प्रयत्न करत तो सर्वांशी मैत्री करतो. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना सहृदयतेने मदत करतो. हे माझे, हे तुझे करत नाही. सर्व गोष्टी वाटून घ्यायला तयार होतो. म्हणजेच निर्मम होतो. हे सर्व करताना आपले मोठेपण मिरवत नाही. म्हणजेच निरहंकारी होतो. आपण काही विशेष करतो आहोत असे ही त्याला वाटत नाही. लोक ज्या कारणांसाठी परस्परांचा द्वेष करतात, ती कारणे तो इतरांना क्षमा करून विसरून जातो. मैत्री, करुणा, क्षमा हे गुण त्याच्यामध्ये इतके वरचढ असतात की स्वतःला सुख मिळवण्याच्या बाबतीत आणि स्वतःचे दुःख टाळण्याच्या बाबतीत तो सारखाच तटस्थ असतो. स्वतःच्या वाट्याला जे सुखदुःख येईल ते सहजपणे स्वीकारतो. महापुरुषपूजेतल्या सर्व धर्मग्रंथांच्या पूजनाच्या वेळी कै. आप्पांनी हिंदू धर्मातील व्यक्तींचा आदर्श म्हणून हा श्लोक निरूपणासह गायलेला होता.