१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम
परमेश्वराला पूजेसाठी काहीही श्रद्धापूर्वक वाहिले तरी चालते. श्रद्धापूर्वक हात जोडून नमस्कार केला तरी चालते. परमेश्वराच्या दृष्टीने श्रद्धा महत्त्वाची. काहीही दिले तरी चालते या सवलतीचा भक्त मानवाने गैरफायदा घ्यावा का? की त्याने श्रद्धेने आपल्या जवळचे सगळ्यात उत्तम आहे ते द्यावे? देताना श्रद्धेने द्यावे (श्रद्धया देयम्) आणि अश्रद्धेने देऊ नये (अश्रद्धया अदेयम्), याच्याबरोबर भरभरून द्यावे (श्रिया देयम्), आपण कमी तर देत नाही ना या भीतीने द्यावे (भिया देयम्), आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन तर आपण करत नाही ना, या संकोचाने द्यावे (ऱ्हिया देयम्) आणि जे ज्याचे आहे त्यालाच आपण ते देत आहोत या जाणिवेने द्यावे (संविदा देयम्) असे प्राचीन गुरूंनी सांगितले आहे.
गीतेमध्ये अर्जुनाने हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ असा प्रश्न विचारला की उत्तर देताना श्रीकृष्णाने कायम जे जास्त लोकांच्या आवाक्यात आहे, जे जास्त लोकांना करणे शक्य आहे, ते जास्त श्रेष्ठ, असे उत्तर दिले आहे. जास्तीत जास्त जणांना जमण्यासारखे आहे, आणि श्रद्धेने व भरभरून देता येईल असे काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात –
गीता १८.४६ : यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम् इदं ततम् |
स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥
गीताई १८.४६ : जो प्रेरी भूतमात्रास ज्याचा विस्तार विश्व हे
स्व-कर्म-कुसुमीं त्यास पूजिता मोक्ष लाभतो
परमेश्वराला कोणत्या ही रूपात पाहिलेले चालते. परमेश्वराला कोणत्याही नावाने पुकारलेले चालते. मग नाव न घेतलेले ही चालते. तो आपल्याला कसा जाणवतो त्याचे वर्णन फक्त करायचे. जो सर्व भूतांना म्हणजे सजीव-निजवांना त्यांची त्यांची गती देतो तो, असे परमेश्वराचे वर्णन झाले. कोणते ही रूप चालत असेल, तर रूप नसलेले ही चालेल. सारे विश्वच ज्याच्यापासून निर्माण झाले आहे, म्हणजे जो विश्वच बनला आहे, असे त्याचे रूप झाले. गीतेमध्ये श्रीकृष्ण बोलतो आहे म्हणून जो-तो असे शब्द आले. पण जी-ती शक्ती असे स्त्रीलिंगी उल्लेखही चालतील किंवा जे-ते तत्त्व असे नपुंसकलिंगी उल्लेख ही चालतील. कारण सर्व विश्वच ज्यापासून बनले आहे त्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि लिंगविरहित असे सर्वच आले.
असा तो परमेश्वर, ती शक्ती, ते तत्त्व, त्याच्यावर आपलेही अस्तित्व अवलंबून आहे, असे साधारण जाणवू लागले की तो आहे म्हणून आपण आहोत, याबद्दल कृतज्ञता वाटायला लागते. माझ्याकडे जे काही आहे, ते तुझ्यामुळे आहे, तुझेच आहे, हे देवाकडे व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे त्याची पूजा करणे. प्रत्येकाची कार्यशक्ती त्याच्या आवाक्यातली असते. जवळ काही नसले तरी त्या कार्यशक्तीने जे काही काम करतो, ते कामच परमेश्वराला वाहणे हे प्रत्येकाला शक्य आहे. असे स्वतःचे काम परमेश्वराला वाहण्याने, रोज वाहण्याने, सतत वाहण्याने, सिद्धी मिळते. म्हणजे मोक्ष मिळतो. म्हणजेच मी त्याचा अंश आहे, तो माझा प्रेरक आहे, अशी जाणीव सतत मनात जागी राहते. काम अर्पण करता करता एक दिवस काम करणारा ही समर्पित होऊन जातो. म्हणजे परमेश्वराचे साधन बनून जातो. मी कर्ता हा त्याचा भाव संपून जातो.
कोणत्याही कामाचा संकल्प आणि निश्चय अनुक्रमे आपले मन व बुद्धी करतात. आपली ज्ञानेंद्रिये बाह्य परिस्थितीचे भान आणून देतात. आपल्या कर्मेन्द्रियांनी आपण बाह्य परिस्थितीत आपल्या संकल्प आणि निश्चयाप्रमाणे बदल घडवायचा प्रयत्न करतो. इंद्रियांच्या शक्तीला मर्यादा असल्याने आपण त्यांना अवजारे, यंत्रे, उपकरणे व साधनांची जोड देतो. बुद्धी, मन, इंद्रिये, अवजारे व साधने या सर्वांमुळे एखादे काम करणे सोपे होते. आणि काम अधिक उत्तम करता येते. आपले काम ईश्वराला अर्पण करताना बुद्धीपासूनची सर्व साधने, ती वापरून केलेली कृती, आणि त्या कृतीचा परिणाम, हे सर्वच ईश्वराला अर्पण करावे असा या लोकाचा मतितार्थ आहे. त्यामुळे सर्व साधने, आणि वापर वस्तू यांची निगा राखणे, काळजी घेणे, त्यांचा योग्य उपयोग करणे, त्या वाया न घालवणे, आदळ-आपट न करता वापरणे, योग्य रितीने स्वच्छ ठेवणे, हे त्यांचा वापर चालू नसताना देखील, स्वकर्माने करायच्या पूजेची तयारी म्हणूनच, करता आले पाहिजे. कामाच्या साधनांमध्ये आणि कामात, असे तन्मय होऊन ते काम ईश्वरार्पण करण्याने, व्यवहारही उत्तम साधतो आणि भक्तीही होते.
यंत्रपूजनाच्या पोथीच्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच (यंत्रपूजन उपसना पोथी, शके १९३४ आवृत्ती, पान ३) हा श्लोक सांगून पुढे म्हटले आहे की आपण प्रत्येक काम ज्या साधनाने करतो ते कुठलेही शस्त्र, अवजार, नांगर, लेखणी हे ईश्वरापर्यंत पोचवणारे जणू वाहन आहे. अशा साधनांबद्दल पण कृतज्ञता ही हिंदूंची संस्कृती आहे.