१२. ध्येय एक – मार्ग अनेक
अनेक वर्षे विवेकानंद जयंतीला प्रबोधिनीच्या युवक विभागातर्फे क्रीडा प्रात्यक्षिके व्हायची. एका वष प्रात्यक्षिकांनंतर बोलताना कै. आप्पांनी विनोबांचे एक सहकारी श्री. राधाकृष्ण बजाज यांच्या ‘भारत का धर्म’ या लेखाचा संदर्भ दिला होता. (ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक, वि. वि. पेंडसे, दुसरी आवृत्ती, पान ६८ ते ७०) त्या लेखात श्री. बजाज यांनी म्हटले होते की जो म्हणतो ‘माझेच खरे, इतर सर्व खोटे’, तो अहिंदू. जो म्हणतो ‘माझे खरे आणि तुझे वेगळे असले तरी ते ही खरे’, तो हिंदू. ही व्यापक हिंदुत्वाची मांडणी कै. आप्पांना अत्यंत आनंद देणारी होती. महापुरुषपूजेमध्ये सर्व धर्मग्रंथ पूजेचा अंतर्भाव करताना त्यांची भूमिका अशीच व्यापक होती.
आकाशातून पडलेले पावसाचे पाणी अनेक वाटांनी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. त्याप्रमाणेच सर्व देवांना केलेले नमस्कार शेवटी एकाच परमेश्वराला पोचतात. या अर्थाचा श्लोक अनेकांना परिचित आहे. याच अर्थाचा शिवमहिम्न स्तोत्रातील आणखी एक श्लोक स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेमध्ये केलेल्या जगप्रसिद्ध भाषणात म्हटला होता. ज्या प्रमाणे सरळ किंवा वळणावळणाच्या वाटांनी पाणी समुद्राला जाऊन मिळते तसे वेगवेगळ्या आवडीनिवडीच्या लोकांना शेवटी एकाच परमेश्वरापर्यंत जावे लागते, असे या दुसऱ्या श्लोकात म्हटले आहे. पहिल्या श्लोकात एकाच परमेश्वराला केशव म्हटले आहे. तर दुसऱ्या श्लोकात त्याच परमेश्वराला शिव हे नाव आहे. ‘एकं सत्’, परमेश्वर एकच आहे. ‘विप्राः बहुधा वदन्ति’, जाणते लोक त्यालाच केशव, शिव अशी वेगवेगळी नावे देतात.
आपल्या उपास्य देवाची पूजा-प्रार्थना-उपासना कशी करायची याच्या पद्धतीही अनेक असू शकतात. समुद्रापर्यंत पोचायचे पाण्याचे अनेक जवळचे किंवा लांबचे, सोपे किंवा अवघड, सरळ किंवा वेडेवाकडे मार्ग असतात. तसेच परमेश्वरापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग असतात. थोडक्यात भक्ती कोणाची करायची याचे पर्याय अनेक आहेत आणि भक्ती कशी करायची याच्या पद्धतीही अनेक आहेत, ही वस्तुस्थिती मोकळ्या मनाने स्वीकारणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याला अनुसरूनच महापुरुषपूजेची योजना केली होती. त्या मागची भूमिका सांगणारा भगवद्गीतेतील पुढील श्लोक मागच्या वेळच्या श्लोकाबरोबर त्यासंबंधीच्या लेखात घेतलेला आहे. (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड २, पान ३०८)
गीता ९.२३ : ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः |
ते अपि माम् एव कौन्तेय भजन्ति अविधिपूर्वकम् ॥
गीताई ९.२३ : श्रद्धापूर्वक जे कोणी भजती अन्य दैवते
यजिती ते हि मातें चि परी मार्गास सोडुनी
आपापल्या श्रद्धेप्रमाणे जो तो आपापल्या दैवताची किंवा उपास्याची भक्ती करतो. तो माझीच भक्ती करत असतो असे श्रीकृष्ण म्हणतात. तुम्ही रायगडाला जा किंवा रायरेश्वराला जा. शिवनेरीला जा किंवा राजगडाला जा. प्रतापगडावर जा किंवा पन्हाळ्यावर जा. पुरंदरवर जा किंवा तोरण्याला जा. सर्वच गड शिवाजी महाराजांचे प्रतीक आहेत. तिथे जाताना व गेल्यावर मनात शिवाजी महाराजांचेच स्मरण होणार. तसेच हे आहे. कोणत्याही रूपातील देवाची पूजा करा. त्या रूपामागे मीच आहे व माझीच पूजा तुमच्याकडून होते हेच भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत.
महामार्गाने जाणारा दुसऱ्या पायवाटेने जाणाऱ्याला मार्ग सोडून जाणारा असेच म्हणेल. पण महामार्ग आणि पायवाट एकाच ठिकाणी पोचत असतील तर शेवटी पोचणे महत्त्वाचे. कोणी रायगडावर रोपवेने जाईल. कोणी पायऱ्यांच्या रस्त्याने जाईल. रायगडावर पोचणे महत्त्वाचे. मार्ग कोणताही, कसाही चालेल. तसेच प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असू शकेल. ते परमेश्वरापर्यंत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. एव्हरेस्टवर नेपाळच्या बाजूने जा किंवा तिबेटच्या बाजूने. एकाच शिखरावर तुम्ही शेवटी पोचता. इतरांच्या मार्गांना चुकीचे मानू व म्हणू नका असे या श्लोकात सांगितले आहे.
विचारांचा हा मोकळेपणा किंवा ही उदारता कृतीतून व्यक्त करायची तर ती कशी करायची? महापुरुषपूजेच्या वेळी मार्ग शोधला तो सर्व धर्मांच्या प्रार्थना म्हणण्याचा व सर्व धर्मग्रंथांची पूजा करण्याचा. त्याबरोबर एकाच राष्ट्रपुरुषाची प्रतिमा पूजण्याऐवजी, चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले, ते ही सर्वांच्या विचारातील काळानुसार ग्राह्य भाग आम्ही घेतो म्हणून. सर्वजण एकाच भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, त्या संस्कृतीचे आम्ही अभिमानी आहोत म्हणून. भजनाच्या शेवटी ‘सब संतन की जय’ याच भावनेने म्हणतो. एका परब्रह्मशक्तीची विविध नावे, एका संस्कृतीची विविध रूपे, एका भावनेची विविध प्रकारे अभिव्यक्ती, मुळातल्या एकात्मतेचे विविध प्रकारे दर्शन, हा प्रबोधिनीचा आध्यात्मिक पाया आहे.