७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते.
‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा –’ भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊन ‘– विद्यया अमृतम् अश्नुते’, अध्यात्मज्ञानाने अमृतत्वाचा अनुभव येतो, हे प्रबोधिनीचे बोधवाक्य आहे. भौतिक ज्ञान मिळवून कर्मवीर भौतिक जगात यशस्वी होतो. कर्मयोग्याला शेवटी अध्यात्मज्ञान मिळते व तो अमृतत्वाचा अनुभव घेतो. अर्जुन कर्मवीर होताच. त्यामुळे कर्मवीर होण्यासाठी काय करायचे असते ते गीतेत फारसे सांगितलेले नाही. कर्मवीराने कर्मयोगी होण्यासाठी इंद्रियांवर नियंत्रण आणावे लागते. या संबंधीचे तीन श्लोक आत्तापर्यंत आपण पाहिले. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की इंद्रियांवर नियंत्रण आणणे सोपे जाते. इंद्रियांवर नियंत्रण आले की मन एकाग्र करणे सोपे जाते.
न्यूटनने झाडावरून खाली पडलेले सफरचंद खालीच का पडले? या प्रश्नावर आपले मन एकाग्र केले आणि त्याला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लागला. खाली पडलेले सफरचंद एकदा पाहिल्यावर, पुढचा सगळा विचार त्याच्या मनातच झाला. त्याच्या मनातच जणू काही त्याला तो नियम सापडला. चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी समुद्र प्रवासाच्या वेळी समुद्राचा आणि आकाशाचा रंग निळा का? या प्रश्नावर मन एकाग्र केले, आणि त्यांना प्रकाशाच्या विकिरणाचा, प्रकाशकिरण आकाशातील बारीक धूलिकणांमुळे विखुरण्याचा, शोध लागला. सफरचंद खाली पडणे किंवा समुद्र आणि आकाशाचा निळा रंग, हे दोन्ही अनेकांनी पाहिले होते. पण त्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा प्रकाशाचे विकिरण सापडले नाही. कारण तसे का होते हे शोधण्याचा ध्यास त्यांनी घेतला नव्हता. या दोन शास्त्रज्ञांनी मन एकाग्र करताच त्यांच्या मनातल्या ज्ञानावरचे झाकण मात्र दूर झाले व त्यांना या दोन नियमांचे ज्ञान झाले. त्यांनी नव्याने शोध लावला असे इतरांना वाटले.
शास्त्रज्ञांना होणारे भौतिक ज्ञान असो किंवा संतांना होणारे आध्यात्मिक ज्ञान असो, ते त्यांच्या मनातच असते. त्यावर दुर्लक्षाने जणू काही अज्ञानाचा मळ साठलेला असतो. अज्ञानाचा मळ एकाग्रतेने धुऊन काढल्यावर निर्मळ ज्ञान प्रकट होते. निर्मळ म्हणजेच पवित्र. हे जग काय आहे? कसे निर्माण झाले? त्याचे पुढे काय होणार आहे? मी कोण? कोठून आलो? माझा या सगळ्या जगाशी संबंध काय? असे अनेक प्रश्न माणसांना पडत असतात. जे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपडतात, मन एकाग्र करतात, त्यांना प्रश्नांच्या कमी-अधिक अवघडपणानुसार कमी-अधिक वेळात त्यांची उत्तरे मिळतात. म्हणजेच ज्ञान मिळते. जगाविषयीच्या प्रश्नांच्या उत्तरांना आपण भौतिक ज्ञान म्हणतो. स्वतःसंबंधीच्या प्रश्नांच्या उत्तरांना आपण आध्यात्मिक ज्ञान म्हणतो. कर्मयोगी होण्याचा परिणाम म्हणून आध्यात्मिक ज्ञान प्रकट होते. त्यासंबंधी गीतेत म्हटले आहे –
गीता ४.३८ : न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते |
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेन आत्मनि विन्दति ॥
गीताई ४.३८ : ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगीं
योग-युक्त यथाकाळीं ते पावे अंतरीं स्वयें
‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’, असे शिवाजी महाराज म्हणत. ‘कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत’, असे मंगलकार्याच्या निमंत्रण-पत्रिकेवर छापलेले असते. म्हणजे संकल्प श्रींचा किंवा परमेश्वराचा. तो सिद्धीस जाणार श्रींच्या किंवा परमेश्वराच्या सामर्थ्याने. संकल्प त्याचा. सामर्थ्य त्याचे. आपण फक्त जीव ओतून प्रयत्न करायचे व तरी आपण निमित्तमात्र, परमेश्वराच्या हातचे साधन आहोत, असे समजायचे. त्यामुळे जे काही यश त्या प्रयत्नानंतर मिळेल ते ही परमेश्वराचेच. यापैकी एक-एक सुटा विचार करणारे कर्मवीर अनेक असतात. पण संकल्प, प्रयत्न, साधन, सामर्थ्य, सिद्धी व यश, हे सर्व परमेश्वराचे असे मानणारा कर्मवीर, कर्मयोगी म्हणजेच योगसंसिद्ध किंवा योगयुक्त होतो. तो त्या स्थितीत दीर्घ काळ राहू शकला की आपोआपच ‘मी करतो‘, ‘माझे कार्य’, ‘माझे कर्तव्य’, ‘माझे यश’, हे त्याचे सर्व अज्ञान दूर होऊन ‘परमेश्वरच कर्ता’, ‘परमेश्वरच सर्व काही’, ‘परमेश्वराच्या इच्छेने सर्व काही होते’ हे त्याच्या आतले ज्ञान त्याला सापडते. असे श्रेष्ठ ज्ञान मिळवणे हे विद्याव्रताचे ध्येय असावे, म्हणून हा श्लोक विद्याव्रताच्या पोथीत घेतलेला आहे. (विद्याव्रत उपासना, चतुर्थ आवृत्ती, २०१७ , पान १६ ). विद्याथ भौतिक ज्ञान मिळवण्यापासून प्रारंभ करतील. पण त्यांचेही अंतिम ध्येय, आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार या सारखे असले पाहिजे. जो नियमपूर्वक दिनक्रम चालवतो व एकाग्रचित्त होऊन विद्यार्जन करतो त्याला आधी भौतिक ज्ञान आणि योगयुक्त झाल्यावर आत्म्याचे ही ज्ञान होते. म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव येतो.