५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‘काम’
खेळांच्या किंवा कसरतींच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार आहे, गोल कड्यामधून उडी मारण्याचा. शरीर मधल्या जागेतून आरपार जाऊ शकेल एवढे मोठे गोल कडे असते. ते जमिनीपासून थोडे वर उचलून उभे धरलेले असते. पुरेशा वेगाने येऊन नेम धरून उडी मारली तर पलीकडे जाणे थोड्या सरावाने जमू शकते. पळत येऊन कड्यामधून सूर मारणे हे शारीरिक कौशल्य आहे आणि मानसिक ही. पण कड्याला आपण धडकू या भीतीनेच उडीचा नेम चुकतो व शरीराचा काहीतरी भाग कड्याला घासतो. कड्याभोवती दोरी किंवा चिंध्या गुंडाळून त्या पेटवल्या तर जळत्या कड्यातून उडी मारणे हे आणखी मानसिक कौशल्याचे बनते. शारीरिक कौशल्य तेवढेच लागते. पण कड्याला धडकण्याच्या भीतीबरोबर जळत्या कड्याच्या ज्वाळांचे चटके बसण्याची भीती वाढते. या ही भीतीवर विजय मिळवणे हे अधिकचे मानसिक कौशल्य. कोणीतरी त्या कड्यावर तेल ओतले तर ज्वाळा आणखी भडकतात. मग कड्याच्या पलीकडचा भाग दिसणेसुद्धा अवघड होऊन जाते. याच अर्थाचा गीतेतला पुढचा श्लोक विद्याव्रताच्या पोथीत घेतला होता. त्यात काहीतरी हवेसे वाटण्याला कामरूप अग्नी म्हटले आहे. इथे या अग्नीच्या भीतीऐवजी अग्नीचे आकर्षण न वाटण्यात मनाचे कौशल्य आहे. (विद्याव्रत संस्कार, आवृत्ती तिसरी, २००२, पान २२)
गीता ३.३९ : आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा |
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥
गीताई ३.३९ : काम-रूप महा-अग्नि नव्हे तृप्त कधी चि जो
जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले
विद्यार्थ्यांसाठी लौकिक म्हणजे पुस्तकी विद्या मिळवणे हे प्रारंभीचे उद्दिष्ट असते. त्या विद्येला ज्ञान ही म्हणतात. काही प्रमाणात विद्या मिळवल्यावर आणखी विद्या मिळवता मिळवता शेवटी आपल्या खऱ्या रूपाची ओळख करून घ्यायची असते. त्या ओळखण्याला ही ज्ञान म्हणतात. ज्ञान प्रबोधिनीचे काम सर्व प्रकारचे ज्ञान जागृत करण्याचे आहे. प्रबोधिनीच्या सदस्यांनी ‘रूप पालटू देशाचे’ हाच ध्यास घ्यावा असे प्रबोधिनीचे ध्येय आहे. सुरुवातीला लौकिक विद्या आणि शेवटी स्वतःचे खरे रूप या दोन्हीच्यामध्ये देशाचे रूप आज कसे आहे? ते तसे का आहे? नवे रूप कसे असले पाहिजे? नवे रूप प्रत्यक्षात कसे आणायचे? त्यात अडचणी कोणत्या? त्या दूर कशा करायच्या? हे सर्व कळले पाहिजे. असे कळणे म्हणजे ही ज्ञान होणे. देशाचे रूप बदलण्याचे व त्यातील अडचणी दूर करण्याचे काम आपण स्वतःच करायचे आहे याचे ही ज्ञान झाले पाहिजे. या सर्व प्रकारचे ज्ञान मिळवणे हे प्रत्येकाचे उद्दिष्ट असावे. त्याच्याआड ‘काम’ हा जळत्या कड्यासारखा असतो. तो मुख्यतः स्वार्थाच्या रूपात असतो. माझे करीअर, माझी सिक्युरिटी, माझा व्यक्तिमत्त्व विकास, हे त्या कामाचे गोंडस रूप (म्हणजे इतरांच्या व स्वतःच्या इच्छा वाजवी वाटणे) असते. मला पदवी, पद, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हवी, हे कामाचे त्याहून थोडे बेंगरूळ रूप. (म्हणजे इतरांच्या इच्छा अवाजवी व स्वतःच्या इच्छा वाजवी वाटणे) या गोंडस किंवा बेंगरूळ इच्छा संपणे किंवा त्यांना पुरे म्हणता येणे फार अवघड. म्हणूनच कामाला महाअग्नी, कधी तृप्त न होणारा, खादाड, असे म्हटले आहे. हाव आणि क्रोध हे जणू त्या कामाच्या भडकलेल्या ज्वाळा आहेत. त्यांच्यामुळे पलीकडची ज्ञानाची क्षितिजे दिसेनाशी होतात.
आपल्या इंद्रियांनी जे जे आकर्षक आहे ते आपल्याला कळते. ते मिळवण्याची इच्छा होते. मिळण्यात अडचणी आल्या की राग येतो. इंद्रियांमुळे होणाऱ्या नव्या आकर्षणांच्या जाणिवा म्हणजे जणू जळत्या कड्यावर कोणीतरी तेल ओतते आहे. एकदा का काम भडकला, हाव किंवा राग निर्माण झाला, की ज्ञानप्राप्तीचे उद्दिष्ट नजरेआड होते, दिसेनासे होते, त्याचा विसर पडतो. म्हणून काम-रूप अग्नी भडकतो आणि ज्ञान हे उद्दिष्ट झाकून टाकतो असे म्हटले आहे. मला हे हवे, मला ते हवे, मला आणखी हवे, मला मिळालेच पाहिजे, असेच मनात सतत येत राहते. त्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्जन करणे बाजूला पडते. विद्यार्थि-दशा संपलेल्या प्रौढांच्या बाबतीत देशस्थिती बदलण्यासाठीच्या ज्ञानापासून स्वरूपापर्यंतचे ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न मागे पडतात. म्हणून कामाला नित्यवैरी, नेहमीसाठीचा शत्रू, असे म्हटले आहे. कोणतेही ज्ञान मिळवत असताना या शत्रूपासून नेहमी सावध राहिले पाहिजे आणि त्याला कमजोर केले पाहिजे.