गीतेतील चार सूत्रे

मला सर्वप्रथम गीतेतील कर्मयोगच भावला. त्यामुळे पहिल्या वीस वर्षांच्या अभ्यासानंतर गीतेचे सार मी चार छोट्या वाक्यांमध्ये काढले. पहिले – संकल्पेषु यज्ञत्वम्‌‍. जेवढे इतरांकडून घेतले किंवा मिळाले, त्यापेक्षा जास्त इतरांना देण्याचा विचार आपल्या संकल्पातच असावा. दुसरे सूत्र गीतेतलेच कर्मसु कौशलं हे ठरले. कोणतेही काम करताना त्या कामात जास्तीत जास्त कुशलता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरे सूत्र – फलेषु समत्वम्‌‍. कामाचा जो काही परिणाम होईल तो संतुलित प्रतिक्रिया देऊन स्वीकारला पाहिजे. आणि चौथे सूत्र – कर्तृत्वे अनहंकारः. जे काही काम करत आहोत किंवा केले, ते मी करतो किंवा केले असे न म्हणता माझ्याकडून करवले गेले असा भाव ठेवायला हवा.

  • निरूपणमालेतील पहिला आणि शेवटचा श्लोक

गीतेचा स्वाध्याय जसा वाढत गेला, तसे कर्मयोगापलीकडचे भक्तियोग आणि ज्ञानयोग दिसायला लागले. या निरूपणमालेतील पहिल्या श्लोकाच्या निरूपणात विवेकानंद गीतेवर बोलायला लागले आणि ‌‘एक तरी ओवी अनुभवावी‌’ या पद्धतीने हा एकच श्लोक अनुभवावा, म्हणजे गीता समजली, असे त्यांनी सांगितले, हे मी मांडले आहेच. अरविंदांनी मात्र ‌‘गीतेवरील निबंध‌’ असा स्वतंत्र ग्रंथच निर्माण केला. त्यात एकेका श्लोकाचा अर्थ देण्याची पद्धत त्यांनी वापरलेली नाही. परंतु त्यांच्या आश्रमातील एका साधकांनी कोणत्या श्लोकाचा अर्थ कोठे आला आहे, हे शोधत चिकाटीने त्या ग्रंथाची श्लोकांनुसार पुनर्मांडणी केलेली सापडली. या पुनर्रचित ग्रंथामध्ये (Bhagwad Gita in the Light of Sri Aurobindo, संपादक  Maheshwar, पान २४५ ते २४७)  गीतेच्या अठराव्या अध्यायामधील उपदेशाच्या शेवटच्या श्लोकावर त्यांचे सर्वात मोठे भाष्य आहे, असे लक्षात आले. त्या श्लोकात, भगवान श्रीकृष्णांनी “मला शरण जा” असे सांगितले आहे. हृदयातील ईश्वराला शरण जा, असे सांगणाऱ्या त्याच अर्थाच्या श्लोकावर, शेवटचे सत्ताविसावे निरूपण मी लिहिले आहे.

विवेकानंद आणि अरविंद हे दोघेही प्रबोधिनीचे आदर्श राष्ट्रपुरुष. एक म्हणतो आहे – पहिला श्लोक जगून दाखवा, म्हणजे तुम्हाला गीता समजली. दुसरा म्हणतो आहे, सगळी गीता जगून दाखवा, म्हणजे त्या जीवनाचा कलशाध्याय – देवमानवत्व तुम्हाला लाभेल. हे दोन्ही श्लोक प्रबोधिनीच्या वाङ्मयात आलेल्या सत्तावीस श्लोकांमध्ये होतेच. म्हणून या निरूपणमालेची सुरुवात आणि शेवट निश्चित झाला. मधल्या सगळ्या श्लोकांचा क्रम ठरवताना, प्रबोधिनीचे काम ‌‘ज्ञान-कर्म-युत भक्ति-व्रत‌’ आहे ही प्रबोधिनीच्या प्रार्थनेतील ओळ मी लक्षात ठेवली. त्या दृष्टीने या सत्तावीस श्लोकांचे कर्मासंबंधी आठ, भक्तीसंबंधी अकरा आणि ज्ञानासंबंधी आठ श्लोक असे वगकरण करण्याचा मी प्रयत्न केला. कर्मातच ज्ञानाचे सार्थक हा प्रबोधिनीतील सांगावा आहे. प्रत्यक्ष कर्माला इतके महत्त्व आहे आणि कर्माचा साक्षात अनुभव क्षणोक्षणी आणि पदोपदी येत असतो. म्हणून कर्मयोगासंबंधीचे आठ श्लोक सर्वात आधी घेतले. समर्थ रामदासांच्या एका ओवीमध्ये

‌ ‘आधी ते करावे कर्म| कर्ममार्गे उपासना|

                                                    उपासका सापडे ज्ञान| ज्ञान मोक्षचि पाविजे॥‌’

असा क्रम दिला आहे. त्यातील पहिल्या ओळीचा तर मला अनुभव आलेला आहे. त्यामुळे कर्मासंबंधीच्या आठ लोकांनंतर भक्तीसंबंधीचे अकरा श्लोक घेतले आहेत. उरलेले ज्ञानासंबंधीचे आठ श्लोक सगळ्यात शेवटी घेतले आहेत. हे निरूपणमालेचे मुख्य सूत्र झाले.

  • कर्माविषयी श्लोकांचा क्रम

कर्मासंबंधीच्या आठ श्लोकांचा क्रम लावताना स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, हे सांगणारा श्लोक प्रस्तावनेच्या श्लोकानंतर (श्लोक दुसरा) घेतला. प्रबोधिनीतील विद्याव्रत संस्कार हा स्वप्रेरणेने स्वविकास करण्याचा संस्कार आहे. त्या विद्याव्रत संस्काराच्या पोथीत ज्या क्रमाने श्लोक येतात, त्या क्रमाने पुढचे चार श्लोक घेतले (श्लोक तिसरा ते सहावा). विद्याव्रत संस्काराचा हेतू सांगताना, ज्ञानाचे महत्त्व सांगितलेले आहे. विद्याव्रताच्या पोथीमध्ये तो श्लोक वरील श्लोकांच्या आधी येतो. परंतु तिथे तो श्लोक ज्ञानाच्या प्रशस्तीसाठी किंवा स्तुतीसाठी घातल्यासारखा वाटतो. व्रताचे काही काळ प्रत्यक्ष आचरण केल्यानंतर हळूहळू ज्ञानाचे महत्त्व परीक्षेच्या अभ्यासाच्या निरपेक्ष आहे हे कळायला लागते. म्हणून तो श्लोक (श्लोक सातवा) युक्ताहारविहार आणि इंद्रिय संयमन या व्रतांच्या श्लोकांसंबंधीच्या श्लोकांनंतर  घेतला. छांदोग्य उपनिषदामध्ये (प्रपाठक ३, खंड १६, मंत्र १) ब्रह्मचर्याश्रमाचा काळ म्हणजे आयुष्याच्या यज्ञातील पहिली आहुती आहे, असे वर्णन केले आहे. मला सापडलेल्या गीतेच्या सूत्रांमध्ये ‌‘संकल्पेषु यज्ञत्वं‌’ हे आधी येते. म्हणून विद्याव्रतासंबंधीचे श्लोक आधी घेतले आणि ‌‘कर्मसु कौशलं‌’ हा चरण असलेला श्लोक आठव्या क्रमांकावर घेतला.

  • माझ्या दृष्टीने भक्तीसंबंधी कळीचा श्लोक

महाराष्ट्रात इतर अनेक देवी आणि देवांना नवस केले तरी पंढरपूरच्या विठ्ठलाला कोणताही वारकरी नवस करत नाही. कोणी नवस केलाच तर ‌‘तुझ्या बद्दलचे प्रेम वाढते राहो‌’, एवढेच त्याचे मागणे असते. अशा देवाला जे काही वाहू, ते वाहिल्यावर परतफेडीची अपेक्षाच नसते. त्यामुळे त्याला आपली सर्व कर्मे वाहिली तर परतफेडीची अपेक्षा नसल्यामुळे ‌‘फलेषु समत्वं‌’ हे आपोआपच साधले जाते. भक्तीसंबंधी श्लोकांचा क्रम ठरवताना, त्या गटातला साधारण मधला आणि एकूणातला तेरावा श्लोक याची जागा मी आधी निश्चित केली. तो भक्तीच्या श्लोकांमधला माझ्या दृष्टीने कळीचा श्लोक किंवा मेरूमणी आहे. या श्लोकामध्ये परमेश्वराला वायू, यम, अग्नी, चंद्र इत्यादी नावांनी संबोधित केले आहे. अथर्वशीर्षात गणपतीला तू ब्रह्मा, तू विष्णू, तू रुद्र असे म्हटले आहे. रामदासांना पंढरपूरच्या विठ्ठलातच राम दिसला. विवेकानंदांना सगळ्या देवांच्या पाठीमागे मातृभूमीची मूत दिसली. तात्पर्य सर्व रूपे एकाच देवाची आहेत. मातृभूमी या दैवताची पूजा इथल्या गोरगरिबांच्या सेवेतून होईल, असे विवेकानंद आणि गांधीजींनी म्हटले आहे. त्यावरून एका सामूहिक उपासनेच्या वेळी गीतेतल्या या श्लोकासारख्या पुढील दोन ओळी मला उपासनेच्या पोथीत घालाव्याशा वाटल्या –

                          आर्तरूप तू, रुग्णरूप तू, जनी जनार्दन तू |

                           अज्ञरूप तू, दीनरूप तू, राष्ट्ररूप ही तू ॥

आर्त, रुग्ण, अज्ञ आणि दीन व्यक्ती, सर्व जनता आणि आपले राष्ट्र ही देखील परमेश्वराचीच रूपे आहेत. मग भक्तीसंबंधीच्या इतर श्लोकांचा क्रम ठरवणे सोपे गेले.

  • भक्तीविषयी इतर श्लोकांचा क्रम

कोणी कितीही अल्प शिक्षित माणूस या राष्ट्ररूपी देवाची सेवा करत असेल, तर त्याचा बुद्धिभेद करायचा नाही, हा या गटातील पहिला श्लोक (श्लोक नववा). सगळ्यांना सेवा करायचे सुचतेच असे नाही. ज्यांना हे सुचलेले नाही, त्यांच्याही जीवनविषयक श्रद्धेचा आदर करायचा, हा त्या पुढचा श्लोक (श्लोक दहावा). जे ज्याची ज्या पद्धतीने पूजा करतात, त्याला तिथून हळूहळू राष्ट्रदेवाच्या पूजेपर्यंत त्याचे मान्य करत करत शिकवावे, हे पुढच्या दोन श्लोकांमध्ये सांगितले आहे (श्लोक अकरावा व बारावा). त्याच्यानंतर हा कळीचा श्लोक (श्लोक तेरावा) येतो. आपण स्वतःही आपल्या कर्माने या रूपातील राष्ट्रदेवाची पूजा करतच पूर्णत्व मिळवायचे आहे, हे पुढच्या श्लोकात सांगितले आहे (श्लोक चौदावा). असे केले तरी आपल्या आयुष्यात पूर्णत्वाची सिद्धी कधी मिळेल, याची सतत चिंता न करता काम करत राहणे, हे पुढच्या श्लोकात सांगितले आहे (श्लोक पंधरावा). सिद्धीची आशा न ठेवता असे काम करत राहिल्याने स्वतःमध्ये हळूहळू कोणते गुण प्रगट होतात, हे पुढच्या दोन श्लोकांत (श्लोक सोळावा व सतरावा) सांगितले आहे. असे काम करत राहिले, तर त्याला यश देण्याची जबाबदारी परमेश्वराने घेतली आहे या बाबतीत निर्धास्त राहावे, हे त्या पुढच्या श्लोकात (श्लोक अठरावा) सांगितले आहे. भक्तीसंबंधीच्या गटातील शेवटचा श्लोक देशातील अज्ञ, दीन, आर्त, रुग्ण या सगळ्यांना समर्थ, संपन्न, संतुष्ट बनवणे हेच समाजसंस्थापनेचे काम आहे व ते आपल्यासारख्या अनेकांच्या द्वारे परमेश्वरच करत असतो, आपण सारेच परमेश्वराचे अवतार आहोत, हा सिद्धांत सांगणारा श्लोक (श्लोक एकोणिसावा) आहे.

  • ज्ञानासंबंधी श्लोकांचा क्रम

कर्म आणि भक्तीसंबंधीच्या श्लोकांनंतर ज्ञानासंबंधीचे श्लोक येतात. समाजसंस्थापनेचे काम करता करता आपले लक्ष आपल्यामधील परमेश्वरावर एकाग्र झाले, तर सायफनच्या तत्त्वाप्रमाणे आपल्या बाहेरील ईश्वरी शक्ती ही आपल्याला उपलब्ध होते. ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचे कर्मातच सार्थक करण्यासाठी अशी एकाग्रता आवश्यक असते. म्हणून हे श्लोक (श्लोक विसावा व एकविसावा) सर्वात आधी घेतले. आपल्यामधील ईश्वरी शक्तीचे ज्ञान झाल्याचे मुख्य लक्षण अभय किंवा निर्भयता आहे, असे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितले आहे. निरोगी मन असलेल्या सर्व माणसांना मृत्यूची भीती असतेच. तो टाळावा, अशी त्यांची इच्छा असते. मृत्यूला निर्भयतेने सामोरे जाता येणे हे ज्ञान झाल्याचे लक्षण आहे. यामुळे एकाग्रतेची साधना करता करता मृत्यू म्हणजे नेमके काय, हे कळणेही आवश्यक असते. यासाठी पुढचे चार श्लोक (श्लोक बाविसावा ते पंचविसावा) मृत्यूचे स्वरूप स्पष्ट करणारे आहेत. हे कळत गेल्यानंतर परमेश्वर आपल्या हृदयातच आहे, याचे अनुभवजन्य ज्ञान मिळते, हे सांगणारा श्लोक (श्लोक सव्विसावा) घेतला आहे. जो परमेश्वर राष्ट्ररूपाने आहे, अज्ञ- दीन श्लोकांच्या रूपाने आहे, तोच आपल्यामध्येही आहे, याचा स्पष्ट अनुभव आल्यानंतर आपण त्याचे साधन आहोत व त्याची इच्छा आपल्याद्वारे पूर्ण होणे यातच आपल्या आयुष्याचे सार्थक आहे, हे कळते. ‌‘कर्तृत्वे अनहंकारः‌’ हे सूत्र या श्लोकातून व्यक्त होते. उत्तमोत्तम साधन बनत राहणे यासाठीच आपले प्रयत्न होत राहतात व ते अतिशय समाधान देणारे असते, हे सांगणाऱ्या श्लोकाने (श्लोक सत्ताविसावा) या निरूपणमालेचा शेवट केला आहे.

याच श्लोकांची संगती आणखी कोणाला वेगळ्या पद्धतीने लावावीशी वाटू शकेल. पण या क्रमाने या श्लोकांचा अर्थ प्रत्यक्ष आपल्या जगण्यातून अनुभवत गेलो तर, आपले राष्ट्रयोगातील एक साधक म्हणून स्थान अधिक पक्के होत जाईल, असे मला माझ्या आजवरच्या अनुभवातून वाटते. समाजसंस्थापनेसाठी देशकारण करणारा कार्यकर्ता बनणे आणि इतरांना बनवण्याचा प्रयत्न करणे, हे आध्यात्मिक राष्ट्रयोगाचे आचरण आहे. त्या मार्गावरचे टप्पे या सत्तावीस श्लोकांमध्ये मला दिसतात.