उपासना सूक्ते

प्रस्तावना

            ‌‘उपासना सूक्ते‌’ या पुस्तिकेत ज्ञान प्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पांचे उपासनेविषयीचे विचार चोवीस सूक्तांच्या रूपात संकलित केले आहेत. यातील एका सूक्तामध्ये कौटुंबिक उपासनेचा उल्लेख येतो. चार सूक्तांमध्ये सामूहिक उपासनेचा उल्लेख आहे. तर इतर सर्व सूक्ते व्यक्तिगत उपासना का व कशी करावी यासंबंधी आहेत. तर, या संकलनातील शेवटचे सूक्त म्हणजे कै. आप्पांनी सामूहिक उपासनेसंबंधी पाहिलेले स्वप्न..

            या सूक्तांच्या संकलनासोबत दिलेल्या सुरुवातीच्या तीन व शेवटच्या तीन अशा २०२० च्या करोना संचारबंदीच्या काळात लिहिलेल्या एकूण सहा पत्रांमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान संचालक आ. गिरीशराव बापट यांनी त्यांचे सामूहिक उपासनेविषयीचे चिंतन मांडलेले आहे. उपासनेविषयीच्या चोवीस सूक्तांपैकी पंधरा सूक्ते करोना संचारबंदीच्या काळात अनेक प्रबोधकांना पाठवली होती. उरलेली नऊ निवडून ठेवली होती. सूक्ते व पत्रे ज्या क्रमाने पाठवली होती, त्यापेक्षा पुस्तिकेत छापताना क्रम थोडा बदललेला आहे.

            प्रबोधिनी साहित्यात अन्यही अनेक ठिकाणी उपासनेसंबंधी विचार मांडलेले आहेत. या चोवीस सूक्तांचे, सहा पत्रांचे आणि आपल्या वाचनात येणाऱ्या अन्य साहित्याचे चिंतन करत, त्याचा अर्थ समजून घेत, आपल्या सर्वांची वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामूहिक उपासना अधिक अर्थपूर्ण होत जाईल, अशी अपेक्षा आहे.

                     

   सौर चैत्र २२ शके १९४२

  ११/४/२०

स. न. वि. वि.

            महाराष्ट्रामध्ये कोरोना साथीमुळे संचारबंदी सुरू होऊन दि. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूपासून काल २० दिवस पूर्ण झाले. आजच मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की ही संचारबंदी अजून २० दिवस चालणार आहे. पुणे व निगडीतील शाळा तर दि.१४ मार्च पासूनच बंद आहेत.

            गेल्या वीस ते अठ्ठावीस दिवसांमध्ये प्रबोधिनीच्या शैक्षणिक विभागांतर्फे इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अध्यापन, कार्यपत्रके, वैज्ञानिक खेळ, स्पर्धा, कथाकथन, काव्यवाचन, गणितयज्ञ, अध्यापक बैठकी, परीक्षा असे अनेक कार्यक्रम घेतले गेले.

            युवक-युवती विभागांतर्फे अनेक कार्यशाळा, रक्तदान, दल, बैठकी, मार्गदर्शक प्रशिक्षण, व्याख्याने, व्यायाम असे उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून केले गेले.

            काही पुरोहित इंटरनेटच्या माध्यमातून संस्कार कार्यक्रम करत आहेत. संशोधिकांचे सदस्य घरूनच संशोधन कार्य करत आहेत. कार्यालयीन सदस्यांनी घरून किंवा एक-दोन दिवस पास मिळवून कार्यालयात येऊन वेतनवाटपाची कामे केली.

स्त्री-शक्ती ग्रामीण विभागातर्फे रोजच दूरभाषवरून बैठकी घेऊन कामाचा व परिस्थितीचा आढावा घेणे चालू असते. जागेवर पोहोचलेले बांधकाम साहित्य संपेपर्यंत ग्रामीण भागातली विहिरींची कामेही चालू होती. जागेवर पोहोचलेले बांधकाम साहित्य संपेपर्यंत ग्रामीण भागातली विहिरींची कामेही चालू होती.

घरून करता येण्यासारखी कामे वेगवेगळ्या पद्धतीने समस्यापरिहार करून करण्याचा प्रयत्न अनेक विभागांतील सदस्यांनी केला. पुणे, निगडी, साळुंब्रे केंद्रांमध्ये संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्यांना मदत करण्याचे काम करण्याची संधी अजून यायची आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर १९ मध्ये सांगली-कोल्हापूर-पुणे शहरातील पूरग्रस्तांसाठी विविध केंद्रांनी आपणहून पुढाकार घेऊन मदतकार्य केले,  त्याप्रमाणे हराळी व अंबाजोगाई केंद्रातून व कालपासून वेल्हे व सोलापूर केंद्रांमधूनही तयार जेवण किंवा शिधावाटपाचे काम तेथील केंद्रांनी पुढाकार घेऊन सुरू केले. वरील चार-पाच परिच्छेदांमधील कामाचे काही ना काही निवेदन १ चैत्रपासूनच्या तीन साप्ताहिक वृत्तांमधून दिलेले आहे.

पुढील २० दिवसांमध्ये आणखी काय करण्यासारखे आहे याबाबत काही विचार पुढे मांडत आहे. सर्व राजकीय पक्षांचे मुख्यमंत्री आज पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या बैठकीत एकमुखी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे कोरोना साथीमध्ये राजकारणाला स्थान नाही व आपल्याला त्यात करण्यासारखे लगेच नाही.

प्रशासनापुढे खूपच आव्हाने आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रातले अनेक माजी विद्याथ-अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यासंबंधी मासिक वृत्तात आपल्याला अधिक वाचायला मिळेल. आर्थिक आणि प्रशासन क्षेत्रातील विविध प्रश्नांवरती उपाय सुचवणारे अनेक माजी विद्याथ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मानसशास्त्रज्ञ व काही अध्यापक कौटुंबिक व मानसिक समुपदेशन करत आहेत. आपत्तीकाळात ही सर्व कामे करणारे समाजपुरुषांची किंवा जनताजनार्दनाची उपासनाच करत आहेत. त्याशिवाय आपापली व्यक्तिगत उपासनाही चालू असेल.

सुखात किंवा विपदाकाली आपली व्यक्तिगत उपासना चालू असलीच पाहिजे. परंतु प्रबोधिनीपण व्यक्तिगत आणि सामूहिक उपासनेत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मदतकार्याला गेलेले गट जिथे कुठे मुक्कामाला असतील तिथे एकत्र उपासना करतात. अभ्यासदौरे, तंबूतील शिबिरे, सहलींमध्ये ही एकत्र उपासना होते. सध्या  दैनंदिन काम बंद असले तरी पुणे, निगडी, हराळी  केंद्रांमध्ये रोज सामूहिक उपासना, मग तीन-चार जणांची का असेना, होते. जिथे प्रबोधिनीचे केंद्र किंवा काम तिथे उपासना होते कारण तिथे प्रबोधक असतात.

सध्या प्रबोधक आपल्या घरात स्थानबद्ध आहेत. आपल्या घरच्यांसह सामूहिक उपासना करता येईल का? प्रबोधक सदस्यांना आपल्या घरातच एकत्र साप्ताहिक सामूहिक उपासना करणारे प्रबोधक कुटुंब करता येईल का? Work from home, Study from home, मदत वाटप, त्यासाठी निधी संकलन ही कामे तर आपल्याला हिकमतीपणा वापरून करायची आहेतच. अखंड कर्मशीलता हे जसे प्रबोधिनीपणाचे  लक्षण आहे, ‌‘राष्ट्रार्थ भव्य  कृती‌’ हे जसे प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे, तसेच किमान सामूहिक साप्ताहिक उपासना हे देखील प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे. आपल्या घरच्यांशी आजपर्यंत उपासनेबद्दल  बोलला नसलात तर सध्याची स्थानबद्धता ही असे बोलायची व त्याप्रमाणे करण्याची संधी आहे. ही संधी जरूर घ्यावी व घेतल्यावर मला अवश्य कळवावे. आधीपासूनच आपले प्रबोधक कुटुंब असेल तर तसेही कळवावे.

        सौर चैत्र २५ शके १९४२

१४/०४/२०२०

स. न. वि. वि.

शनिवार, दि.२२ चैत्र (११/४/२०२०) या दिवशी प्रबोधिनीच्या सदस्यांनी आपापल्या घरी कुटुंबियांसमवेत दर आठवड्यात एकदा तरी सामूहिक उपासना करावी असे मी सुचवले होते. आजच्या पंतप्रधानांच्या घोषणेनुसार अशी उपासना करायला आणखी किमान तीन आठवडे तरी नक्की मिळतील. त्या आवाहनाला गेल्या तीन दिवसांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिसाद १२० जणांनी दिला.

आमच्या कुटुंबात आम्ही या आधीच रोजची सामूहिक उपासना सुरू केली आहे, असे काही जणांनी कळवले. आवाहन वाचल्यावर दिवसभरात घरच्यांशी बोलून त्यांच्यासह उपासना केली. आता व्यक्तिगत उपासना नक्की सुरू करतो, घरच्यांशी उपासनेसंबंधी बोलण्याचा प्रयत्न करून पाहतो. असे आणखी काही जणांचे वेगवेगळे प्रतिसाद होते, काहींनी नमस्काराचे हात जोडून आवाहन-पत्राची पोच दिली.

प्रतिसाद देणारे निम्मे सदस्य पुण्यातले होते. भाईंदर, डोंबिवली, चिपळूण, साळुंबे केंद्र, निगडी, सांगली, भालवणी, डोमरी, अंमळनेर, अंबाजोगाई, शिरूर, सोलापूर, बडोदा, आणि रांची येथूनही प्रतिसाद आले.

ज्या कुटुंबांमध्ये आधीपासूनच सामूहिक उपासना सुरू आहे, तिथे उपासना विविध प्रकारांनी होते. ध्यान, योगासने व ध्यान, पूजा व आरती, रामरक्षा म्हणणे, भीमरूपी म्हणणे, जप करणे, पसायदान म्हणणे, घरी दासबोध बैठक करणे, पोथीवाचन व श्रवण, काही लोक म्हणणे, गीतेचा अध्याय म्हणणे, विरजा मंत्रासह प्रबोधिनीची पूर्ण उपासना म्हणणे, असे उपासनेचे अनेक प्रकार प्रतिसादांमध्ये होते. माझ्या आवाहनात मला कोणती उपासना अपेक्षित होती?

‘साधनानाम्‌‍ अनेकता‌’ हे हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आपल्या कुटुंबाला जी उपासना प्रिय, प्रेरक आणि आश्वासक वाटते, ती इतर कोणाला चालण्याचा किंवा न चालण्याचा प्रश्नच नाही. कुटुंबातल्या काही जणांनी किंवा सगळ्यांनी एकेकट्याने उपासना करण्याबरोबर सगळ्यांनी एकत्र बसूनही एकत्र उपासना करावी असे माझे आवाहन आहे.

घरात पती-पत्नी दोघेच असतील तर त्यांनी एकत्र उपासना करणे सामूहिक उपासनाच आहे, असे गेल्या दोन दिवसांत मी पाच जणांना तरी सांगितले. आई-वडील आणि काही वेळ तरी बडबड न करता शांत बसू शकणारी मुले, असे तीन किंवा चार जणांचेच कुटुंब असेल, तरी त्यांनी एकत्र बसून केलेली उपासना म्हणजे सामूहिक उपासनाच आहे. अशी कौटुंबिक उपासना रोज करता आली तर चांगलेच, सध्याच्या संचारबंदीच्या काळात अनेकांना तसे शक्यही होईल. व्यवहारतः नेहमीसाठी ती साप्ताहिक करणे सोयीचे जाते. सुरुवातीला रोज केली तर सवय लागायला सोयीचे जाते. फक्त आताच्या अडचणीच्या काळापुरते हे आवाहन नाही.

  उपासना म्हणजे स्वतःला किंवा आपल्या समूहाला रोजच्या मंत्र म्हणण्याने, एखाद्या विचाराने भरून व भारून टाकणे. सामूहिक उपासनेने भारून जाण्याचा अनुभव एकदा उपासना करण्यानेही येऊ शकतो. कै. आप्पांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुण्यात २६०० जणांनी भारून जाण्याचा हा अनुभव घेतला. जेवढी संख्या जास्त व उपासना म्हणणारे एका सुरात, एका तालात, एका लयीत मंत्र व लोक अर्थ समजून म्हणतात, तेवढा भारून जाण्याचा अनुभव लवकर येतो. पण अशा उपासनेतून मिळणारा उत्साह, प्रेरणा किंवा मनःशांती तात्पुरती असते. वर्षारंभ, वर्षान्त, विद्याव्रत, गणेश प्रतिष्ठापना, मातृभूमिपूजन अशा उपासनांच्या वेळी तात्पुरते भारून जाण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

एखाद्या विचाराने किवा संकल्पाने मन भरून जाण्यासाठी मात्र नियमित उपासना लागते. व्यक्तिगत उपासनेने व्यक्तीचे मन संकल्पमय होऊन जाते. सामूहिक उपासनेने समूहाचे मन संकल्पमय होऊन जाते. आपल्या कुटुंबाचे सामूहिक मनही संकल्पाने भरून जाण्यासाठी कुटुंबातील सामूहिक उपासनेचा अनुभव सर्वांनी घेऊन पाहण्यासारखा आहे. एखाद्या संघटनेला काही हेतू व उद्दिष्ट असते. तसे प्रत्येक कुटुंबाला का असू नये? कुटुंबातील प्रत्येकाला व्यक्तिगत इच्छा, महत्त्वाकांक्षा असतात. पण कुटुंबाच्या एकत्रित जगण्याच्या हेतूचा व उद्दिष्टाचा विचार करायला बहुतेक कुटुंबांमध्ये कोणाला सुचलेलेच नसते. सुचले तरी तो विचार नेटाने पुढे चालवायला जमतेच असे नाही. कुटुंबाची सामूहिक उपासना असा विचार व्हायला निमित्त व साधन होऊ शकेल.

असा काही सामूहिक हेतू व उद्दिष्ट आपल्या घरच्या किंवा कामाच्या ठिकाणच्या समूहाला सुचावे, तो हेतू व उद्दिष्ट गाठायचे संकल्प आपल्या कुटुंबाचे किवा कार्यसंघाचे व्हावेत व ते संकल्प पूर्ण करायचेच या विचाराने आपले कुटुंब किवा कार्यसंघ भरून आणि भारून जावेत, यासाठी सामूहिक उपासना करायची आहे.

केवळ संकटनिवारण व्हावे, केवळ काहीतरी लौकिक लाभ व्हावा, केवळ आपल्या ऐक्यभावनेचे इतरांसमोर प्रदर्शन व्हावे, यासाठी सामूहिक उपासना सुचवलेली नाही. कोरोनाची साथ जावी, संचारबंदी लवकरात लवकर उठावी, आपले कुटुंबीय किंवा नातेवाईक यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सामूहिक उपासना सुचवलेली नाही. संचारबंदीच्या स्थानबद्धतेत सर्वांचे मनोधैर्य टिकून राहावे यासाठीही सामूहिक उपासना सुचवलेली नाही. मनोधैर्य टिकेलच आणि वाढेलही. कारण प्रबोधिनीमध्ये सामूहिक उपासना आपल्यातील तेज प्रकट होण्यासाठी, त्या तेजाची आराधना करण्यासाठी आहे. तेज जेवढ्या अंशांनी प्रकट होईल त्या प्रमाणात आपल्यातील विवेकशक्ती, प्रतिभाशक्ती, स्नेहशक्ती आणि त्याबरोबर मनोधैर्यही वाढल्याचा अनुभव येतो. कुटुंबातही येईल आणि संघटनेतही येतो. त्यासाठी शुभेच्छा.

सौर चैत्र २७ शके १९४२

१६/०४/२०२०

स. न. वि. वि

व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, सर्व मानवजात आणि अखिल विश्व अशी अखंड साखळी आहे. आज बुद्धीने विचार करून आपण सर्व मानवजातीचा आणि विश्वाचा एकेका व्यक्तीशी असलेला संबंध समजून घेऊ शकतो. कोरोना साथीच्या निमित्ताने प्रत्येक राष्ट्राने इतर देशांच्या नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे आपले राष्ट्र व इतर राष्ट्र यातला फरक स्पष्ट झाला. व्यक्तीचा राष्ट्राशी असलेला व्यावहारिक संबंध प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. कुटुंब आणि समाजाशी व्यावहारिक आणि भावनिक संबंध असतो. हे संबंध बळकट करण्यासाठी सामूहिक उपासनेचा उपयोग होतो.

सौर चैत्र २५ (१४ एप्रिल) च्या माझ्या टिपणामध्ये कुटुंबाच्या जगण्याला हेतू व उद्दिष्ट असले पाहिजे असे मी लिहिले होते. एक-दोन जणांनी त्यांच्या कुटुंबाचे हेतू व उद्दिष्ट कळवले. पण अनेकांनी हे कसे ठरवायचे असे विचारले. त्यासाठी मला प्रबोधिनीने तयार केलेली वास्तुशांतीची पोथी आठवली.

 हिंदू संस्कृतीत घर/गृह या संकल्पनेला काही सामाजिक संदर्भ देखील आहे. घर हे केवळ कुटुंबाचे नाही तर समाजाचेही ते एक आधारकेंद्र व्हावे लागते. या दृष्टीने वास्तुशांतीच्या पोथीतला संकल्प आहे –

‌ ‘नीतीने मिळवलेली संपत्ती या घरात उदंड असावी.

येथे अतिथींचा सत्कार व्हावा,

विद्वानांविषयी आदर असावा,

राष्ट्रभक्तांचा गौरव व्हावा,

ईश्वरभक्तांविषयी प्रेम असावे.

सत्त्वसंपन्न अभिरुचीची आमच्या कुटुंबात जोपासना व्हावी.

सत्कर्माचे आचरण व्हावे, प्रीती आणि करुणा,

पुरुषार्थ आणि ईश्वरभाव यांच्या संगमात

आमच्या घराचे पुण्यतीर्थ व्हावे.‌’

असे संकल्प वास्तुशांतीच्या दिवशीच करायचे असे नाही. कुटुंबाच्या सामूहिक उपासनेत नेहमीच त्यांचा उच्चार व स्मरण  करत राहायला पाहिजे. अशा शुभ संकल्पातूनच आपल्या कुटुंबाचे हेतू व उद्दिष्ट प्रत्येक कुटुंबाला स्पष्ट सुचत जाते व स्वतःच्या शब्दात मांडता येते.         

मला कुटुंबाच्या सामूहिक उपासनेसंबंधी जे म्हणायचे होते, ते या तीन टिपणांमध्ये म्हणून झाले. उद्यापासून कै. आप्पांचे  उपासना – व्यक्तिगत आणि सामूहिक – यासंबंधीचे काही विचार रोज एक या पद्धतीने काही दिवस पाठवण्याचा विचार आहे.

“या परब्रह्मशक्तीचे आपल्या समाजात स्फुरण व्हावे अशी प्रार्थना करूया. भूतकाळात आपल्या देशाचा प्रकाश श्रीलंकेपासून ते थेट हिमालयाच्या शिखरापलीकडे पोचला होता. तो सर्व प्रदेश त्याच्या पूर्वपश्चिम विस्तारासह डोळ्यांसमोर आणायचा. या साऱ्या प्रदेशात विविध भाषा बोलणारा पण एकाच संस्कृतीच्या सूत्रात गुंफलेला विशाल हिंदुसमाज राहतो. कोणत्याही राष्ट्रामध्ये ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो‌’ असे म्हणताना त्या समाजातील ऐक्यभावना वाढवणारी संघटना आणि त्या समाजाचे नवनवीन क्षेत्रातले कर्तृत्व दाखवणारा पराक्रमही वाढायला हवा. शरीर अनित्य असून आत्मा नित्य आहे, हा अनुभव घेतल्यामुळे एकच सत्य अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात व एका पद्धतीने सांगितलेले सत्य अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी कृतीतून व्यक्त होते, ही वस्तुस्थिती मोकळेपणाने स्वीकारता येईल. ही स्वीकारशीलता जगातील सर्वांना आपल्या वागणुकीद्वारा शिकवणे म्हणजे अध्यात्म-तत्त्वज्ञानाद्वारे विश्वविजय करणे.”

सूक्त 1. संकल्पसिद्धीसाठी उपासना

            आपल्याला मिळालेल्या सर्व शिक्षणाचा उपयोग देशहितकारणासाठी झाला पाहिजे ;  आणि आपले टिचभर जीवन देश समृद्ध होण्याकडे लागले पाहिजे असे विद्यार्थ्यांना वाटले तर खरा उपयोग !  त्यांचा भावनाकोश समृद्ध होणे याला खरे महत्त्व आहे.

            अमुक एक गोष्ट मी करीनच करीन असे संकल्प करीत जाणे, केलेले संकल्प पार पाडण्याची मनाला सवय लागणे, पुन्हा नवे संकल्प करणे, लहान संकल्पातून मनात मोठ्या संकल्पांची बांधणूक करणे, त्या मोठ्या संकल्पांच्या सिद्धीसाठी जिवाचा आटापिटा करणे, अंती असे सर्वजीवनव्यापी संकल्प करणे आणि त्यांच्या सिद्धिसाठी जीवनाला सुयोग्य दिशा देणे, हे सर्व कुशाग्रबुद्धीच्या विद्यार्थ्यांना शिकविता येते आणि शिकविले पाहिजे.

(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ८)