मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. !

 आजचा भाग लेखमाळेतील शेवटचा भाग

ग्रामीण महिलांसाठी काम करताना सतत हे जाणवायचे की ‘कोणीतरी बाहेरून’ येऊन काम केले की कल्पना म्हणणून समजायला सोपे असते पण रुजण्याच्या दृष्टीने ते काम उपरेच रहाते! जेव्हा असे काम व्हावे असे स्थानिक महिलेला वाटते तेव्हाच ते टिकणारे होते असे आपण मागच्या भागातही पाहिले .. असेच हे मंगलचे मनोगत!

      मंगल तोरण्याच्या पाठीमागच्या भागात म्हणजे पासली भागात लहानाची मोठी झाली, तिच्याच गावात शाळा होती तिथेच १० वी पर्यन्त शिकली, ११ वी पुढच्या शिक्षणासाठी निवासामुळे आपल्या संपर्कात आली आणि तीने सगळे काम ‘ती’च्या नजरेतून अनुभवले,. वाचूया तिच्याच शब्दांत!

ग्रामीण भागातील गरजू मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वेल्हे येथे जास्वंद गिरीकन्या सहनिवास सुरु केले आणि त्यामुळे माझ्यासारख्या अनेक मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लागणारे मुलभूत शिक्षण घेता आले. खरंतर शिकत राहण्याची प्रक्रिया निवासात राहायला आल्याने सुरु झाली आणि वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन विषयांपर्यंत पोहचण्याची संधी निवासातील अनेक युवती घेऊ शकल्या. बऱ्याच मुलींना स्वतःच्या खर्चासाठी लागणारी रक्कम आता पालकांकडे न मागता स्वतः ती कमावण्याची भावना निवासात एकत्र राहिल्याने निर्माण झाली. आणि त्यातूनच कॉलेज करता करता कमवा आणि शिका या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याची हिम्मत मिळाली. 

      निवासात राहत असल्यामुळे निवासातील ताई या अनेक गावांमध्ये/शाळांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे वेळ असेल तेव्हा ताईसोबत किशोरी, युवती विकास तासिका कशी घेतात हे पाहायला जायचो आणि त्यातूनच मग आम्हीही प्रशिक्षण घेऊन तायांच्या मदतीने किशोरी, युवती, कातकरी या प्रकल्पांमध्ये काम करू लागतो. त्यामुळे मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्व पटवून देता देता आम्ही आमचा आत्मविश्वास वाढवू शकलो. व त्यासोबतच अनेक प्रकारची विविध कौशल्य शिकलो. निवासात असल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगांचा अनुभव दिला जायचा त्यातील एक अनुभव मला नक्की सांगावासा वाटतो. तो म्हणजे माझ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला सुवर्णाताईंनी सांगितले कि साताऱ्याला जायचे आणि तेथे असलेल्या BSW (Bachelor of Social Work ) कोर्सची माहिती एकटीने जाऊन घेऊन यायची. त्यासोबत अट अशी होती की मोबाईल सोबत न्यायचा नाही. असं सांगितल्यावर मी थोडी गोंधळून गेले. कारण साताऱ्याला कसं आणि कुठून जायचे? किती दूर आहे हेही माहित नव्हते आणि त्यात मी एकटीने प्रवास करणे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. पण धाडस करून मी साताऱ्याला जावून माहिती घेऊन आले आणि त्यामुळे मी एकटी प्रवास करू शकते असा विश्वास निर्माण झाला. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या संधींमधून एकटीने प्रवास करणे, आपले गाव सोडून इतर गावांमधील मुलांना शिकवणे त्यांचे मेळावे घेणे, बँक/ शासकीय कामे स्वतःची स्वतः करणे, मुलींच्या सहली घेऊन जाणे, गणेशोत्सवात ढोल वाजवणे अशा अनेक संधींचा लाभ घेण्यासाठीचे व्यासपीठ मिळाल्याने आम्ही चौकटी बाहेरचा विचार करायला शिकलो. आपल्यासोबत इतरांचाही विचार करायचा असतो हे समजले.

      खरंतर निवास सुरु होण्यासाठी बचत गटातील ताईंनी मांडलेल्या प्रस्तावामुळे निवास सुरु झाले. आणि निवासामुळे आमचे पालक हे बचत गटाच्या कामात जोडले गेले. तसेच प्रत्येक गावामध्ये गटाचे काम सुरु होऊन गावात स्थानिक पातळीवर काम करणारी कार्यकर्ती तयार झाल्याने गावाचे चित्र बदलत आहे हे दिसत आहे. म्हणजे माझ्या गावात जेव्हा बचत गट सुरु केला तेव्हा सुरुवातीला महिलांचा सहभाग कमी होता परंतु हळूहळू महिलांचा सहभाग वाढत गेला आणि आता महिला कर्ज घेऊ लागल्या आहेत, मुलींना उच्च शिक्षण घेण्यास पाठींबा देत आहेत, वेगवेगळे उद्योग/ व्यवसाय करू लागल्या आहेत.   त्यामुळे तिचे तीच्या कुटुंबातील स्थान वाढत आहे. मी ज्या भागात राहते ज्याला पासली खोरे असे म्हटले जाते जेथे अजून बऱ्याच गावांमध्ये पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत अश्या भागात आपली प्रबोधिका पोहचल्याने गावात शिक्षण, आरोग्य, आणि आर्थिक साक्षरता नांदू लागली आहे. अनेक महिला या त्यांच्या सुना लेकींना आता घरी बाळंतपण न करता दवाखान्यातच करूया या विचारापर्यंत पोहचल्या आहेत हे सर्व वेगवेगळ्या बैठकींच्या माध्यमातून गरोदर माता तपासणीची माहिती मिळाल्याने शक्य झाले आहे. आरोग्य सखी प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाची जाणीवजागृती करण्याचे काम केले त्यात शाळेतील मुलांसाठी Good Touch Bad Touch या विषयाचे सत्र घेतल्यानंतर अनेक मुलांनी मनमोकळेपणाने त्यांचे अनुभव सांगितले त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत असे विषय पोहचवले पाहिजेत ही बाब या प्रकल्पातून लक्षात आली. यातूनच गावांमध्ये दलाचे काम सुरु झाल्याने पारंपारिक खेळांची जपणूक करून गटाने एकत्र मुले आता मैदानावर खेळू लागली आहेत. पालकांचा मुलांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना असलेल्या वाईट सवयी, शिस्त दलाच्या माध्यमातून सुधारण्यासाठी काम करत राहण्याची उर्जा मिळत आहे. बऱ्याचदा पालक सांगतात कि ताई मुल आमच जितकं ऐकत नाहीत तेवढ दल घेणाऱ्या ताईचे ऐकतात, गावात कधी न साजरे केले जाणारे सण आत्ता दलामुळे साजरे होतात हे ऐकल्यावर आपण योग्य दिशेने जात आहोत असे वाटते. संस्थेच्या माध्यमातून मला माझ्या भागातील मुलांसाठी, लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने अजून काम करण्याची उर्जा टिकून राहण्यास मदत होत आहे.   

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६