बचत गटाच्या कामाने जेव्हा ग्रामीण स्त्री शक्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा साधारण ३५-४० वयाच्या महिला बचत गटात यायच्या. त्यांचे सरासरी शिक्षण ४थी पर्यंत झालेले असायचे .. सरासरी म्हंटले आहे म्हणजे ४थी पेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या, शाळाही न पाहिलेल्याही असायच्या. जसजसे काम सुरू झाले तेव्हा शिक्षणाचे महत्व समजायला लागले. आधी महिला विचारायच्या, ‘शिकायचे कशासाठी? शेवटी भाकरीच तर करायची आहे ना?’ पण बचत गटमुळे समाजात वावरायला सुरुवात झाली तेव्हा कमी शिक्षणाने येणारा न्यूनगंड उठून दिसायचा.. अनुभवांनी महिलेला जसजसे शहाणपण येत गेले तसतशी ‘ती’ची शिकायची उर्मी वाढली .. थोडेसे वाचता येत होते त्या काहीतरी नियमित वाचायला लागल्या, आपल्या पोरी शाळेत जात आहेत ना? त्यावर लक्ष ठेवायला लागल्या. त्याकाळात प्रत्येक कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद असायचा. महिन्याच्या बैठकीला वर्षभरात एकही दांडी मारली नाही अशा अनेक असायच्या! पुस्तका पलीकडच्या शिक्षणाची त्यांना भूक होती, प्रबोधिनीच्या बचत गटांमुळे घराबाहेर पडायला मिळणे एवढा एकच विरंगुळा अनेकींच्या आयुष्यात होता…पण २-३ वर्षांतच तिच्या लक्षात यायला लागले की मोठ्या वयात शिकायला मर्यादा आहेत, तेव्हा अनेकींनी ८ वी- ९ वीत असणाऱ्या मुलींची हिशोब ठेवायला मदत घेतली. मग या नव्या दमाच्या खेळाडूंनी मनापासून कामाला मदत केली. अशी स्वेछेने नियमित मदत करण्यामुळे या छोट्या मुलींचाही आत्मविश्वास वाढला, मग तीला पुढे शिकावेसे वाटायला लागले. तेव्हा आपण या वयोगटांसाठी किशोरी विकास सुरू केला. अनेक किशोरींच्या ताई शिक्षणात रस नसल्याने शाळा सोडून घरीच होत्या आणि तेव्हा आत्तासारखे सदासर्वकाळ चालू असणारे रंगीत टि व्ही घरोघरी पोचले नव्हते, मग आपण युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले, नर्सिंग, शिवण, पार्लर असे वर्ग सुरू केले. असे काही काही शिकून ज्यांनी लग्नापूर्वी नोकरी करून पैसे मिळवले, त्यांचे भविष्य बदलून गेले. युवती विकास उपक्रमातून अशी छोटी छोटी यशस्वी उदाहरणे गावागावात दिसायला लागली. मग मात्र गावातले वातावरण सुद्धा बदलले …. या युवतींच्या वर्गांसाठी प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून गावागावांतून युवतींना आणायची-पोचवायची व्यवस्था केली, त्यानिमित्ताने आपला गावोगावचा संचार वाढला. आपले काम पारावरच्या पुरुष मंडळींसाठीही दाखलपात्र झाले. त्यामुळे महिलांना बैठकीला/ कार्यक्रमांना परवानगी काढणे सोपे होऊ लागले. आपण एवढी वर्ष युवतीसाठी काम करत असलो तरी आपल्यानावाने ‘भलतेच शिकून’, पळून गेलेली एकही युवती नाही अशी घटना नाही.. आपला शिक्षण विचार गावकऱ्यांना असाही समजतो! कामाच्या साधारण १५वर्षांच्या टप्प्यावर आपलेही बळ वाढले, कामाची गावे ७-८ वरून २५-३० पर्यंत पोचली. बचत गटांसोबत आरोग्याचे काम सुरू केले, महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, त्यांनी उत्पादन केलेल्या मालाची विक्री करणे असे केले, नाबार्ड सोबत काम करून महिलांना बँकेपर्यंत पोचवले. आपणच बँक व्हायचे नाही आपले काम जनजागृती व लोकशिक्षण करायचे हे सगळ्या गटाला स्पष्ट होते. त्यामुळे लोकांना बँकेबद्दल शहाणे करायच्या कार्यक्रमात आपण सहभाग घेतला व रिजर्व्ह बँकेच्या कॉलेज सोबत आर्थिक साक्षरता विषयात महत्वाचा टप्पा गाठला! शिवापूर केंद्रात सुरू झालेले काम १० वर्षात एका टप्प्याला पोचले, तोच टप्पा अनुभवांमुळे वेल्हयाच्या कामाला ५ वर्षांतच आला, त्यांचे सूत्र लक्षात आल्यामुळे ३ वर्षात आंबवण्याला गट उभा राहिला.. जमले! द्विदशक पूर्ती झाल्यावर मात्र रोजच्या कामातले मनुष्यबळासाठी पुण्यावरचे अवलंबूनत्व जवळ जवळ संपले! तोपर्यन्त कामाला हाताशी आलेल्या युवतींना ‘मागणी’ येऊन त्या पुण्यात संसारी जात होत्या असे लक्षात आले मग सासूबाईच्या भरवशावर ‘भागात आलेल्या सूनांसाठी हिरकणी सुरु केले. त्या उपक्रमाची दशकपूर्ती झाली.. १० वर्षात ८२ गावातल्या ९८२ जणींपर्यंत पोचलो तर अकराव्या एका वर्षात २७ ठिकाणच्या ४६० जणींपर्यंत पोचलो.. मग त्याला नवी उमेद जोडले! या निमित्ताने नवमातेची सासरी गेल्यामुळे बदलावी लागणारी कागदपत्रे या वर काम सुरू झाले ते सुद्धा ‘ती’ने कागदोपत्री अस्तित्वात येण्यासाठी! आत्मविश्वासाची सुरुवातच अस्तित्वात येण्यापासून होते म्हणून.. काम जसजसे वाढत गेले तसतसे ‘ग्रामीण महिला’ हा गट सुद्धा एकसंध नाही, त्यात अनेक गट येतात जसे एकल, किशोरी, युवती, ज्येष्ठ महिला असे.. आणि त्या त्या गटांना त्यांचे त्यांचे दुर्लक्षित प्रश्न आहेत असे लक्षात आल्यावर आपण त्या त्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली. सगळ्यात ज्येष्ठ महिलांचा वयोगट आपण पहिल्यांदा हाताळला तो मोतीबिंदूच्या ऑपरेशन निमित्ताने. आयुष्यभर घरासाठी खस्ता खाणारीच्या डोळ्यांचे जेव्हा फुकट ऑपरेशन होणार असते त्याला नेण्यासाठी घरच्यांना वेळ नसतो.. या वास्तव दर्शनाने काम सुरू केले, मग गर्भाशयासंबंधी उतार वयातल्या तक्रारी तर सांगायच्या कोणाला? असे प्रश्न ऐकून त्याची मासिक तपासणी सुरू केली, आपत्य सांभाळत नाही अशांना श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी होण्यास मदत केली. या सगळ्या संपर्काचा उपयोग करोना काळात आधी ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या लासिकरणात झाला. आपल्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे १००% लसीकरण करून बक्षीस मिळवले कारण एरवीही त्या संपर्कात होत्या!तर गरोदरपणाची आरोग्य तपासणी गेली १८-१९ वर्ष दरमहा अखंडपणे चालू आहे. कोणी सोनोग्राफी करून ‘मुलगी आहे’ म्हणून ‘ती’च्या जन्माचा कोणताही निर्णय बदलू नका हे तर सांगतो आहोतच आपले बाळ सुरक्षित जन्मले पाहिजे, बाळ-बाळंतीण सुखरूप हवीत म्हणून गरोदरपणात औषधे घेतली पाहिजेत पासून आपले काम सुरू होते, म्हणजे मुलीचाही गर्भ जगावा हा आरंभ बिंदू !मुलीचा गर्भ जगावा असे ‘ती’ ने अस्तित्वात येण्याच्या उपक्रमाने सुरू होणारा स्त्री शक्ती प्रबोधनाचा प्रवास पुढे हिरकणी मातेने ०-६ वयोगटातील मुला-मुलींवर समानतेचे संस्कार करावेत मग ७-१२ या वयोगटात त्यांची गावोगावी खेळाची दले चालतील, मग किशोर-किशोरी विकास, मग युवती विकास, लग्नानंतर हिरकणी- नवी उमेद, बचत गट-स्वयंरोजगार तर आहेतच, नंतरच्या टप्प्यात गाव प्रतिनिधींत्व करायला नेतृत्व विकास, आणि ज्येष्ठ महिलांसाठी आरोग्य! या टप्प्यावर पोचतो. ग्रामीण महिलेच्या कुठल्याही वयोगटासाठी त्या त्या वयाला साजेशा उपक्रमाची साखळी आपण तयार केली, ती केवळ ‘ती’चा आत्मसन्मान वाढावा तिला माणूस म्हणून सन्मानाने जागता यावे म्हणून! आता त्रिदशकपूर्तीच्या या टप्प्यावर आपले काम भोर-वेल्हे-हवेली तालुक्याच्या ८२ गावात साधारण ६७००० लोकवस्ती पर्यन्त पोचले आहे! आता या कामाची धुरा स्त्री शक्ती प्रबोधनाच्या उपक्रमातून तयार झालेल्या कार्यकर्त्या, रूढार्थाने म्हणायचे तर आधी ज्या ‘लाभार्थी’ होत्या त्याच जबाबदारी घेऊन सांभाळत आहेत. जेव्हा स्थानिक कार्यकर्त्या त्यांनी अनुभवलेल्या प्रश्नावर काम करतात तेव्हा त्यांची कार्यपद्धती व परिनामकारकता वेगळीच असते .. काल जिच्यासाठी ‘एकल’ आहे म्हणून काम केले, तीच जेव्हा अन्य एकल महिलांसाठी काम करते तेव्हा तीला भाषण करता येते का? बोलताना प्रस्तावना-समारोप नीट करता येतो का? निवेदन करता येते का? हे अगदीच गौण होते.. जीच्यासाठी ती कामाला उभी राहिली ‘ती’ला उपयोगी पडणारे, नेमके, ‘ती’च्या आयुष्याला कलाटणी देणारे काम होते ना? एवढेच महत्वाचे उरते.. असे झाले की एखाद्या गावातल्या लग्नातच रक्त तपासणी जेवण्याआधी- नंतर करता येते.. तर गावच्या वरमाईला सुचते की आहेराच्या देण्या-घेण्याच्या एकसारख्या साड्या देऊन गावातल्या गटातल्या महिलांचा गणवेश करूया.. असे ‘बाहेरून येणाऱ्या माणसाला कधीच सुचणार नाही’ अशी कामात सहजता येते! त्यामुळे काम चालू रहाणार का अशी शंका सुद्धा मनात येत नाही! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६