देशकारण करणे आणि करविणे

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग २ – देशकारण करणे आणि करविणे

टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी

राष्ट्राला देव मानणारे होऊ – प्रश्नोत्तरे

मागच्या रविवारी राष्ट्रयोगाची संकल्पना, “राष्ट्राला देव मानणारे होऊ” असं शीर्षक होतं त्याच्यावर  मी तासभर काही विचारांची मांडणी केली. आज त्याच्या पुढचा भाग “राष्ट्रयोगाचा व्यवहार” असा विषय आहे. आजच्या  भाषणाचं “देशकारण करणारे आम्ही होऊ आणि इतरांना करू” अशा शीर्षकाची मी मनात कल्पना केलेली आहे.  ज्यांनी मागच्या वेळचे भाषण ऐकलं नाहीये, त्यांच्यासाठी जर  राष्ट्रयोगाची संकल्पनेचा आढावा घ्यायचा म्हटला तर, ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ उपासनेची पहिली पोथी  होती, त्या पोथीच्या प्रस्तावनेमध्ये अगदी एका वाक्यामध्ये थोडक्यात ही कल्पना मांडलेली असं मला  वाटतं. काय वाक्य आहे? तर-  ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्म विद्या आणि भौतिक विद्या यांचा समतोल राखणे  आणि  अभ्युदय व निः श्रेयस यांची चरमसीमा गाठणे हा व्यक्ति जीवनाचा परमोच्च बिंदू  आहे.  उन्नत व्यक्ति जीवन आणि उन्नत राष्ट्रजीवन यातील द्वैत पुसले जाऊन तिथे समभाव निर्माण व्हावा, हे आम्हाला साध्य करायचं आहे. तर या दोन वाक्यांमध्ये राष्ट्रयोगाच्या संकल्पनेच्या अगदी प्राथमिक कल्पना थोडक्यात आली आहे असं मला वाटतं.

 व्यक्तिगत जीवनात चरम सीमा गाठणे म्हणजे जास्तीत जास्ती प्रगती  साधणे. व्यक्ती जीवन आणि राष्ट्रजीवन यात समभाव निर्माण  करणे म्हणजे व्यक्ती जीवन जितकं उन्नत झालेलं आहे, तिथे राष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे जीवन उन्नत झालेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रामध्ये ज्ञान – विज्ञान, अध्यात्मिक विद्या आणि भौतिक विद्या, अभ्युदय आणि  निःश्रेयस या सगळ्यांची चरम सीमा गाठलेली आहे असं होणं हे राष्ट्रयोगाचं उद्दिष्ट  आहे. असं मागच्या वेळच्या व्याख्यानाचं थोडक्यात सार सांगता येईल. त्याच्या संबंधी काही प्रश्न आलेले आहेत..  दोन जणांनी झूमच्या चॅट बॉक्स मध्ये पाठवलेले होते. दोघांनी व्हाट्सअप वर स्वतंत्र संदेश पाठवलेला होता आणि आणखी दोघांनी प्रश्न विचारला. पण एका विषयावरती आज मी  सुरुवातीला बोलावं असं  म्हटलेल.

 गांधीजींची जी कल्पना मांडलेली होती की राष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये कोणकोणते बदल झाले म्हणजे राष्ट्र विकसित झालं असं  आपल्याला म्हणता येईल. त्यातल्या पहिल्याच मुद्द्यावरती एक प्रश्न आलेला आहे, देशातल्या गरिबातल्या गरीब ,अडाण्यातल्या अडाणी, जो एरवी समाज जीवनामध्ये मूक असतो, जे जे होईल ते फक्त स्वीकारतो अशा व्यक्तीला सुद्धा माझ्या  मताला या देशात किंमत आहे, माझं म्हणणं ऐकून घेतलं जातं अशी स्थिती आली पाहिजे. त्याच्यावरती एक प्रश्न असा होता की असं प्रत्येकाचं ऐकत बसलं आणि प्रत्येकाचं  वेगवेगळं मत त्याला किंमत आहे असं  करत बसलो तर काम कसं करता येईल?  मला प्रश्न ऐकल्या ऐकल्या प्रबोधिनीच्या पहिल्या भवितव्य लेखातलं सूत्र वाक्य – ज्याला आपण साध्य सूत्र म्हटलं होतं ते आठवलं की “देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान जागृत करणे, आत्मसन्मान वाढवणे.”

 गांधीजींनी म्हटलं की प्रत्येकाला  माझ्या मताला किंमत आहे, ऐकून घेतलं जाते असं वाटलं पाहिजे. मला वाटतं आत्मसन्मान जागृत होण्याचे ते पहिलं लक्षण आहे. मला काहीतरी मत आहे,  ते मी व्यक्त करू शकतो आणि बाकीचे माझ्या मताला किंमत देतात, म्हणजे निदान ऐकून तरी घेतात तर प्रत्येकाला बोलायची संधी असली पाहिजे.  प्रत्येकाला ऐकून घेतलं जातंय असं वाटतंय हे अतिशय आवश्यक आहे. ज्ञान प्रबोधिनीमध्ये जी सहविचारात्मक नेतृत्वपद्धती आपण वापरतो त्याच्यामध्ये असंच म्हणतो की गटातल्या प्रत्येकाला प्रत्येक विषयावरती जे काही मांडायचं असेल ते मोकळेपणाने आधी मांडता आलं पाहिजे. जे गटासाठी आपण प्रबोधिनीमध्ये म्हणतो ते गांधीजींनी देशातल्या सर्व लोकांसाठी म्हटलेलं आहे. आत्ता  ते सार्वजनिक निवडणुकीच्या वेळी आपण जी प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे, त्या अधिकाराचा जो वापर करतात त्यांच्यापर्यंत पोहोचली असं म्हणता  येईल. साधारणपणे ५० टक्के ते ८० टक्के पर्यंत मतदान वेगळ्या मतदारसंघात वेगवेळ्या निवडणुकांच्या वेळी होतं . देशातल्या इतक्या लोकांपर्यंत निदान हा मतदानाचा अधिकार मी वापरला पाहिजे आणि वापरू शकतो एवढी स्थिती आलेली आहे.

समाज आणि समाजाची जीवन पद्धती  याच्यातल आधी काय?

 दुसरा प्रश्न जो आलेला होता की समाज आणि समाजाची जीवन पद्धती याच्यातल आधी काय येत? म्हणजे कारण काय आणि परिणाम काय आहे? जीवन पद्धती हे कारण आहे आणि त्याच्यामुळे समाज घडतो समाज हा परिणाम आहे? का समाज हा कारण आहे आणि जीवन पद्धती हा त्याचा परिणाम आहे? मी असं म्हटलं होतं की समाज हा कारण आहे आणि समाज जीवन पद्धती घडवत जातो. आता खरं तर हे अखंड चक्र आहे. पण सुरुवात कशी झाली असेल? जीवन पद्धती आधी असेल का समाज आधी असेल? तर समाज आधी आहे असं म्हणायला लागते . प्रश्न असा होता की जीवन पद्धती समाजात अनेक पिढ्या चालत आलेली आहे त्याचा माझ्यावरती काहीतरी परिणाम होतोच.  त्याप्रमाणे माझी जीवन पद्धती घडत जाते.  समाजाच्या आजच्या सगळ्या लोकांची जीवन पद्धती घडत जाते.  त्यामुळे जीवन पद्धती हे कारण आणि समाज हा परिणाम आहे असं वाटते.

 पहिलं जे निरीक्षण होतं की देशातल्या प्रत्येकाला बोलायची संधी मिळाली पाहिजे, त्याच्या पुढे प्रत्येकाला बदल करण्याची संधी मिळाली पाहिजे. काहीतरी जीवन पद्धती आपल्याकडे  परंपरेने आलेली आहे.  मी त्याच्यात बदल न करता तशीच्या तशीच ती पाळायची? का मला त्याच्यात बदल करायचा अधिकार  आहे?  तर मला बदल करायचा अधिकार आहे असं  वाटलं पाहिजे. त्याच वेळी तोपर्यंत जी आलेली  जीवन पद्धती ती  आपल्याला स्वीकारायला लागते. पण तशीच स्वीकारली पाहिजे असं बंधन आपल्यावरती नाही. ज्ञान प्रबोधिनी त्यातल्या त्यात बदलायला अवघड असे सगळे संस्कार पद्धती आहे त्याच्यात धर्मनिर्णय मंडळाच्या प्रेरणेने आपण पोथ्यांची पुनर्मांडणी करू  म्हटलं. हळूहळू हळू त्या पोथ्यांचा स्वीकार होत आहे.  तर तो बदल समाजाने स्वीकारणे म्हणजे जीवन पद्धतीत बदल होत जाणं.  आणि ते आपण घडवतोय, त्यामुळे आपण आपण समाजातले घटक  कारण आहोत आणि जीवन पद्धती हा त्याचा परिणाम आहे हा  सांगण्याचा मुद्दा होता.  अगदी सुरुवात झाली तेव्हा समाजानेच जीवन पद्धती निर्माण केली  आणि आज सुद्धा समाज बदल करायचं ठरवतो आणि त्याप्रमाणे समाजात बदल होतात. समाजातल्या काही व्यक्ती बदल करायच आधी ठरवतात.

प्रश्नोत्तरे – समाज प्रामाण्य बुद्धी म्हणजे काय

 आता याच्याशी संबंधित असा तिसरा प्रश्न जो आलेला आहे…   पहिले दोन्ही व्हाट्सअप वरती आले होते. एकाच व्यक्तीने विचारले होते.  दुसरा आणखीन एकाने विचारलेला होता की समाज प्रामाण्य बुद्धी म्हणजे काय? एखाद्याने बदल करायचा  ठरवला आणि समाजाने त्याला विरोध केला की  हे चूक आहे! तर मग समाजातले सगळे जण चूक आहे असं म्हणतात तर ते आपण स्वीकारायचं म्हणजे समाज प्रामाण्य बुद्धी आहे का? आधीच्या प्रश्नाशी संबंधितच आहे..  समाज प्रामाण्य बुद्धी म्हणजे अर्थशास्त्रात ज्याला डिमांड आणि सप्लाय  मागच्या वेळी ते शब्द मी वापरले  होते की समाजाची  मागणी काय आहे त्याप्रमाणेच आपण वागायचं. आपण पुरवठा करायचा.  असे वागायचे म्हणजे समाज प्रामाण्य? का  समाजाची गरज काय आहे ती गरज ओळखून  त्याप्रमाणे पुरवठा करायचा म्हणजे समाज प्रामाण्य? समाजातल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या रूढी अंधश्रद्धा सगळेजण मानतात म्हणून मी त्या  मानायच्या. याला समाजप्रामाण्य म्हणायचं की  हा समाजातला दोष आहे –  हा दूर केला पाहिजे म्हणून आपण पुढाकार घेऊन तो बदल करायला सुरुवात करायची?  याला समाज प्रामाण्य म्हणायचं तर मागणी प्रमाणेच पुरवठा करू असा विचार न करता गरज काय आहे ती ओळखू आणि पुरवठा करू असं म्हटलं पाहिजे. 

गरज ओळखण्यासाठी आपल्याला आपली विवेक बुद्धी वापरावी लागते. त्यामुळे समाज प्रामाण्य वृत्ती आपल्यामध्ये निर्माण  करायची असेल तर समाजाचे निरीक्षण करणे,  त्याच्यात काय आवश्यक आहे? काय नाही? याचा स्वतंत्रपणे आपण विचार करणे,  आणि आपण विवेकाने ठरवणे.  असे त्या समाज प्रामाण्य बुद्धीमध्ये गृहीत धरलं पाहिजे असं वाटतं. आणखी एक प्रश्न होता की मध्ययुगीन संतांनीब जे काही सामाजिक बदल  करायचा प्रयत्न  केला त्याच्या बाबत आपण काय म्हणावं? तर त्यांनी आपली समाजप्रामाण्य बुद्धीच वापरली असं म्हटलं पाहिजे. पण विवेकवादाचा जो मुद्दा आहे म्हणजे पंधरा एक वर्षांपूर्वी एक दिनकर गांगल म्हणून मोठी वाचनालयाची चळवळ करणारे गृहस्थ आहेत.  त्यांनी एक लेख लिहिला होता.  आणि त्याचावर माझा अभिप्राय मागितला होता. ते म्हणाले की देशात सामाजिक बदल काही चांगले घडायचे असतील तर, आपल्याला देशातल्या लोकांना समाजशास्त्राचे  औपचारिक शिक्षण द्यायला पाहिजे. मग नंतर प्रौढांना मात्र हे अनौपचारिक रित्याच द्यावं लागेल असंही त्यांनी म्हटलेलं होतं. आणि हे प्रौढांना अनौपचारिक शिक्षण आणि शिक्षण घेणाऱ्यांना औपचारिक शिक्षण अशी द्विस्तरीय  उपाय योजना सुचवताना समाजात नव्या जाणीवांचा प्रकाश यावा असं त्यांनी म्हटलेलं  होतं. कंसात एनलाइटनमेंट असं म्हटलेलं  होतं. नव्या जाणीवांचा प्रकाश यावा म्हणजे  नव्या मूल्यांची जाणीव होऊन ती समाजात रुजावीत. ही नवी मूल्य कोणती याचाही त्यांनी उल्लेख काही केलेला होता. पण पाश्चात्य देशांमध्ये अठराव्या-एकोणिसाव्या शतकात ही जागृती झाली. त्या सगळ्या सामाजिक बदलांना तिथे  एनलाइटनमेंट असं समजलं जातं. विज्ञाननिष्ठा, व्यक्तीस्वातंत्र्य, विवेकाला प्राधान्य ही मूल्य समाजात वरचड ठरायला लागली. साधारणपणे १७६० ते १९६० असा हा काळ अनेक जण एनलाइटनमेंटचं मानतात.  कधी तर १८८० साली संपला असेही अनेक जण मानतात. पण तो कालावधी दीड- दोनशे वर्षाचा तरी नक्की होता असं  म्हणतात.  तर त्या चळवळीमध्ये मुख्यतः  व्यक्तीला भावना असतात पण विवेकाला प्राधान्य दिलं  पाहिजे अशी मांडणी होते.    पण १९६० सालानंतर ट्रान्सक्शनल अनालिसिस,  रॅशनल  इमोटिव्ह थेरपी किंवा त्या सगळ्याचा डोक्यावरती बसणारी पोस्ट मॉडर्निस्टिक थेअरी याच्यामध्ये व्यक्तीला भावना असण्याला वैचारिक मान्यता देणे आणि भावनांना विवेकाने शुद्ध आणि बळकट करणे असं अपेक्षित आहे. भारतामध्ये  आज एनलाइटन शब्द वापरायचा असेल तर व्यक्तीच्या भावना आणि    विवेकशक्ती दोन्हीचं प्रशिक्षण करणं असा त्याचा अद्यावत अर्थ घेतला पाहिजे. त्यामुळे एनलाइटन म्हणजे अज्ञान व  अंधश्रद्धा निर्मूलन असं म्हणायच्या ऐवजी  विवेक व विज्ञान दृष्टीचा विस्तार असं म्हणावं असे मी त्या लेखामध्ये त्यांना सुचवलेलं होतं. 

 पण युरोपातल्या एनलाइटनमेंटच्या आधी भारतात असं काही झालं का? तर महाराष्ट्रात तुकाराम आणि रामदास हे संत हे भावना, विवेक आणि श्रद्धा या तिन्हीचे महत्त्व मानणारे होते.  बसवेश्वर, कबीर, गुरुनानक  हे त्यांच्या आधीच्या काळातले संत. त्यामुळे भारतातल्या समाजविकासासाठी विचार करताना साधन म्हणून फक्त पाश्चात्य  विवेकवाद व  त्याच्यावरती आधारित समाजशास्त्र असा विचार न करता, भारतीय परंपरेतले हे  संतांनी केलेलं  एनलाइटनमेंटचे काम समजून  घेणे आणि समजावून देणे हे भारतात जास्त सहज स्वीकारलं जाईल असं त्यावेळी त्या लेखाला प्रतिसाद देताना मी म्हटलेलं होतं. त्या लेखामध्ये  सायंटिफिक रॅशनलिझम असा शब्द वापरलेला होता. तर गेल्या ७५-८० वर्षांमध्ये ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी जी ही शाखा विकसित होत गेलेली आहे.   त्याचाही विस्तार स्वतंत्रपणे आणखीन करायला पाहिजे आणि समाजशास्त्राची त्याची सांगड घालायला पाहिजे. भावना, तर्कबुद्धी, व श्रद्धा म्हणजेच इमोशन, रिझन आणि इंट्यूशन या तिन्ही मानवी शक्तींचा समुचित उपयोग करणं, त्याचं प्रशिक्षण देणं अधिक फायदेशीर होईल असं मी म्हटलेलं होतं. याच्याशिवाय आणखी एक प्रश्न होता की  प्रत्यक्ष काय करायचं हे सांगावं. तो आजच्या व्याख्यानाचा विषय, त्यामुळे त्याचे काही वेगळं उत्तर मी देत नाही.

प्रश्नोत्तरे – अनेकातले एकत्व का एकतेची विविध  रूप?

दोन जणांनी आणखीन स्वतंत्रपणे कळवलेलं  होतं की बांगलादेशात जे काही चाललेलं आहे ते व्याख्यानमाला चालू असताना आता तिथे चालू आहे त्याची काहीतरी दखल या व्याख्यानमालेमध्ये घेतली पाहिजे. तर माझं व्यक्तिशः तरी असं मत आहे की, आपल्या प्रतिक्रिया असू शकतात आपण आपली मतं देऊ शकतो, पण राष्ट्रवादाच्या दृष्टीने, राष्ट्रयोगाच्या दृष्टीने त्या घटनांकडे बघायचे असेल तर अजून काही काळ थांबावं लागेल. आता सगळं ढवळून निघालेला आहे, ते  शांत होईपर्यंत त्याच्यावरती फार काही भाष्य करणे बरोबर होणार नाही. पण माझ्या मागच्या भाषणात मी बांगलादेशाचा उल्लेख केला होता. त्याच वेळी तिकडे त्या सगळ्या दंगली सुरू झालेल्या होत्या. तेव्हा मी असं म्हटलं होतं की  द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा काही टिकत नाही.  म्हणजे एका भूमीत दोन राष्ट्र असू शकत नाहीत. याच्यावरती भारताची फाळणी झाली. एका राष्ट्रात एका देशात प्रदेशात एकच लोकसमूह  राहील आणि ते सगळे एका देशात राहतात म्हणून त्यांचा एक राष्ट्र, हा  प्रादेशिक राष्ट्रवाद तर तोही पाकिस्तानच्या बाबतीत  २५ वर्षाच्या आत चुकीचा ठरला. आणि आम्ही मुसलमान असलो तरी पूर्व पाकिस्तानात पूर्व बंगालात राहणारे आम्ही सगळे संस्कृतीने वेगळे आहोत, आमची भाषा वेगळी आहे, आम्ही टागोरांना मानणारे आहोत अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आल्या  आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवस्था कशी होती त्याच्यातून बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यामुळे प्रादेशिक राष्ट्रवादाला काही अर्थ नाही एवढंच मी म्हटलेलं होतं.  आता जर का काही म्हणायचं झालं तर मग आमची सगळ्यांची पाकिस्तान पेक्षा वेगळी संस्कृती म्हणून आम्ही वेगळं राष्ट्र. पण आमची सगळ्यांची एक संस्कृती आहे तर आता आम्ही राष्ट्र म्हणून राहायला  पाहिजे. तर आता जी घटना घडताना दिसते तिथे तर    त्याच्यामध्ये त्या सांस्कृतिक राष्ट्रवाद जर का असता, तर बांगलादेशातले हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकले असे पाहिजेत. तसे ते राहत नाही असे  आत्ताच्या सगळ्या बातम्यांवरुन तरी वाटते. त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सुद्धा सर्वकाळ सर्व देशांमध्ये टिकेलच असं नाही.  असं यावरून  म्हणावसं वाटतंय,  पण मी लगेच म्हणेन असं नाही. अजून बांगलादेशातल्या घटना जरा महिनाभर शांत होऊ देत असं वाटतंय.

पण त्या निमित्ताने सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि आध्यात्मिक राष्ट्रयोग याच्या संबंधी एक परिच्छेद वाचावासा वाटतोय  “संस्कृतीमुळे राष्ट्र घडतं असं सांगणारा विचार म्हणजे  सांस्कृतिक राष्ट्रवाद – प्रबोधिनीमध्ये आपण भारताची संस्कृती एकात्म आहे असा विश्वास ठेवतो. हा विश्वास अनुभवाने वाढत जातो. प्रांतोप्रांतीचे संत एकच भाषा बोलतात.  या संताची भाषा प्रांतोप्रांतीचे लोक आजही काही प्रमाणात मानतात. म्हणजे एका प्रांतातल्या संताची भाषा इतर  प्रांतांमधले लोक हे अनुभवल्यावर हा विश्वास वाढतो. ज्ञानेश्वरी आणि गीताईचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर कसे झाले आहे हे पाहिले की हा विश्वास वाढतो. अशी एकच संस्कृती भारतात आहे असं म्हणणं म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद. पण ही संस्कृती कशी आहे? याचा विचार करायला लागलो की काही जण म्हणतात ही संस्कृती मिश्र आहे आणि काही जण म्हणतात ही संस्कृती एकात्म आहे. तर मिश्र आहे असं म्हटलं म्हणजे भारतात काहीतरी वेगळेपण आहे. आणि  वेगळेपणापासून सुरुवात केली की वेगळेपणाचे बारीक बारीक मुद्दे सुचायला लागतात. आणि त्यामुळे एकता शोधत राहण्याची अवघड कसरत करत राहावी लागते. एकत्वापासून सुरुवात केली की कोणतंही वेगळेपण आढळलं तरी ते एकत्वाचं आणखी एक रूप म्हणून त्याच्याकडे पाहता येतं. या  एकत्वाच्या जाणिवेला स्थिर ठेवून समाजाला गतिमान  करणं,  प्रगतिशील करणं हा “अध्यात्मिक राष्ट्रयोग”    त्यामुळे प्रबोधिनीमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद असं म्हणायच्या ऐवजी आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणावा.  आपण हे या अनेकातलं एकत्व शोधणं का एकतेची विविध रूपं स्वीकारणे, साजरी करणं,  विविधतेचा आनंद मानणे या दोन दृष्टिकोनांमध्ये आहे. आणि म्हणून आध्यात्मिक राष्ट्रयोग हा वेगळा शब्द वापरावासा  वाटतो .

राष्ट्रयोगाचा व्यवहार

आता प्रत्यक्ष आजच्या विषयाकडे वळूया की राष्ट्रयोगाचा व्यवहार म्हणजे काय करायचं तर व्यवहार करायचा  झाला, काहीतरी कृती करायची    झाली, की कृती आपण ती कुठल्या प्रेरणेने करतो हे बघायला पाहिजे. व्यक्तीच्या बाबतीत अशा चार प्रेरणा लक्षात आलेल्या आहेत. एखादी कृती आपला निर्वाह उत्तम चालावा याच्यासाठी आपण करतो. अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या प्राथमिक गरजा आपल्याला मिळाव्यात याच्यासाठी आपण करतो. आपल्या निवाऱ्यामध्ये आपली सुरक्षितता याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. मग निर्वाहाच्या शिवाय आणखी काय प्रेरणा असते? तर निर्वाहाची सोय झाली की त्याच्यापुढचे उद्दिष्ट आपल्याला दिसायला लागतात आणि त्याच्यासाठी काम करतात. भारतातली आणीबाणी संपली त्याच्यानंतर जी काही पुस्तक आली त्याच्यात “भाकरी आणि स्वातंत्र्य” या शीर्षकाचे एक पुस्तक ग. प्र. प्रधानांनी लिहिलेलं होतं. भाकरी आधी की स्वातंत्र्य आधी? तर भाकरी मिळत नाही तोपर्यंत कदाचित स्वातंत्र्यासाठीची धडपड अनेक जण करणार नाहीत. पण भाकरी मिळाल्यावर भाकरीची सोय झाल्यानंतर आता तुझी अशी सोय झालेली त्यामुळे तू आता माझा मुकाट्याने ऐक असं कोणी म्हटलं तर ते चालत नाही.  आणि मग भाकरी मिळाल्यावर मग स्वातंत्र्य हे उद्दिष्ट  बनतं आणि  स्वातंत्र्यासाठी काम करणे धडपडणं हे सुरू होतं अशी वेगळी उद्दिष्ट असू    शकतात.  पण  मग एक उद्दिष्ट साध्य झालं की आता दुसरं  उद्दिष्ट कुठलं ते साध्य झालं की त्याच्या  पुढचे उद्दिष्ट कुठलं? मागच्या वेळी गांधीजींचा उल्लेख मी सतत केला तो, स्वातंत्र्य हे उद्दिष्ट आपलं साध्य झालं, तेवढेच उद्दिष्ट होतं? का आणखीन काही होतं? आणि त्याच्यातून त्यांचा तो अध्यात्मिक जीवनयोग असा शब्द आला, त्याच्यामध्ये मी सुरुवातीला जी व्याख्या  म्हटली व्यक्ती आणि समाज जीवन, अभ्युदय आणि  निःश्रेयस, भौतिक विद्या आणि अध्यात्म विद्या या सगळ्याचा एकत्र विकास झाला पाहिजे. त्यामुळे राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, नैतिक स्वातंत्र्य अजून मिळायचं म्हणजे आणखीन काहीतरी पुढचं   आपल्याला बघायचंय .. याचा अर्थ आपण जे उद्दिष्ट ठरवतो त्याला सुद्धा काहीतरी हेतू मनात आधी असतो. त्या हेतूसाठी काम करतो तर हेतूसाठी काम करणारे दीर्घकाळ काम  करू शकतात. एखाद्या उद्दिष्टासाठी काम करणारे  ते उद्दिष्ट साध्य झालं की त्याच्यापुढे काय? असा प्रश्न    पडतो.  अनेक विकसित देशांची उदाहरण मी देतो.  विशेषतः युरोपातल्या स्कॅन्डेनेव्हियन   देशांची    उदाहरण देतो.  ती याच्यासाठी  की सगळी भौतिक सुख साधन प्राप्त झाली.   समाजात बऱ्यापैकी समानता निर्माण    झाली. आता जगायचं कशाला?    आणि अशा विचारातून    सगळी सुखसाधन असून    सुद्धा वैफल्य, तिथे तर सोशल    सिक्युरिटी अशी पद्धत आहे.  तुम्ही बेकार    असला तरी तुम्हाला बेकार भत्ता मिळतो.    रोजगारासाठी धडपडलं पाहिजे असं    नाही. तुमची एक नोकरी गेली तर नवीन नोकरी    मिळवण्यासाठी सरकारी खर्चाने तुम्हाला  नवीन स्किल प्रशिक्षण मिळू शकते.तर असं सगळं असूनही वैफल्य का    आयुष्यामध्ये तर आयुष्यामध्ये काहीतरी    हेतू असायला    लागतो. आणि काही वेळा हा हेतू का तो    हेतू? आपल्या देशातल्या अनेकांना देशासाठी काम करायचं का मानवतेसाठी काम करायचं? असा    प्रश्न पडतो. म्हणजे देशासाठी काम करणे हे    एक मूल्य, चांगला हेतू आहे. मानवतेसाठी काम    करणे राष्ट्राच्या पलीकडे जाऊन काम करणं    हा दुसरा हेतू आहे. मानवता हे मूल्य आहे.    आता राष्ट्र आणि मानवता याच्यापैकी    मूल्य कुठलं निवडायचं? असा मूल्य निश्चय किंवा मूल्य विवेक करायला लागतो आणि तो मूल्य विवेक झाल्यावर कामाची प्रेरणा ही स्पष्ट होते.  त्यामुळे निर्वाह    चालणं उद्दिष्टासाठी काम करणं, काहीतरी हेतूसाठी काम करणं आणि मूल्यांसाठी काम    करणं असा व्यवहार कुठला करत असताना कृती करत असताना विचार करावा लागतो. तर व्यक्ती जीवनाच्या बाबतीत हा विचार आपल्या इथे झालेला आहे. पण राष्ट्र जीवनाच्या बाबतीत हा विचार पुरेसा झालेला नाही. कारण आपल्या राष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांच्या बाबतीत अजून निर्वाहाचे प्रश्न सुटलेले नाहीयेत. आणि ते प्रश्न सोडवणं ही माझी जबाबदारी आहे असं मी  म्हटलं म्हणजे मी देशकारणासाठी काम करायला लागलो आणि या जबाबदारीची जाणीव मी इतरांना करून  देईन आणि त्यांनाही कामाला प्रवृत्त करीन असं म्हणणं म्हणजे देशकारण इतरांना करायला  शिकवणं, करायला लावणं.

आणि मग याच्यामध्ये सगळे जे विषय येतात की मग याच्यासाठी देशातली राजकीय व्यवस्था सुधारली पाहिजे. आपल्या देशात जी लोकशाही आज चालू आहे, ज्या पद्धतीने चालू आहे, ती त्यातल्या त्यात जगातल्या सगळ्या पद्धतींमधली राजकारणाची चांगली पद्धत आहे, असं  म्हणतात . पण ते पक्षीय राजकारण आहे, निवडणुकीचे राजकारण आहे.  सत्तेसाठीच राजकारण आहे.  त्याच्यासाठीच्या कृतींना आपण राजकारण म्हणतो.  याच्याशिवाय काही वेगळी राजकीय कृती असू शकते का?तर विवेकानंदांना सव्वाशे वर्षांपूर्वी असा हा प्रश्न  कोणीतरी विचारला  होता आणि तेव्हा त्यांनी सरळ उत्तर दिलेलं  होतं की “लोकशाही उत्तम आहे पण भारताची अजून त्याच्यासाठी तयारी झालेली नाही असं मला  वाटतं”.    आता तयारी झाल्यावर लोकशाही सुरू करायची का लोकशाही राबवता राबवता तयारी होईल? हा  पुढचा प्रश्न आता तोही आपण सोडवलेला आहे, की लोकशाही राबवायला सुरुवात केली    त्याच्यातून तयारी होईल. पण विवेकानंदांचा  त्या उत्तराचा पुढचा भाग हा मला जास्ती  महत्त्वाचा वाटतो, की लोकशाही मध्ये काय करणार तुम्ही? प्रतिनिधी निवडून देणार आणि ते मग समाजात काय काय बदल झाले  पाहिजेत या दृष्टीने कायदे  करणार. आणि ते कायद्याचे राज्य म्हणून मग होणार.  पण ते कायदे पाळले पाहिजेत असं  लोकांना कधी  वाटतं? सामाजिक सुधारणांचे किती कायदे लोक आपणहून पाळायला लागलेले आहेत? विवेकानंदांच्या काळात संमती वयाचा कायदा त्याचा वाद जोरदार चालू होता आणि  त्यांच्या बहिणींचे लग्न अल्पवयात    झाल्यामुळे त्याचे तोटे काय होतात हे त्यांनी पाहिलेलं होतं.  पण मुलींच्या  लग्नाचं वय  दहा असावं का बारा असावं का १४  असावं असे  वाद चाललेले होते.  आता ते १८  पर्यंत आले.  पण अजूनही अनेक मुलींचे १८ च्या आधी विवाह  होतात. विवेकानंदांनी म्हटले की  सुधारणांचे कायदे  हे आपोआप मागाहून होतील.  पण अशा सुधारणा झाल्या पाहिजेत असं  लोकमत तुम्ही आधी तयार करा.  लोकमताचा रेटा निर्माण झाला की सुधारणांचे कायदे आपोआप होतात.

लोकमताचा रेटा तयार करणे आणि  लोकमत तयार करणे याच्यात फरक आहे असं मला वाटतं.  १२-१४  वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि केजरीवाल जेव्हा एकत्र  होते, तेव्हा जे सगळं आंदोलन  झालं तो लोकमताचा रेटाच तयार झालेला  होता. त्यामुळे हा कायदा आम्ही  लगेच राबवणार नाही, आणनार  नाही असं सरकारला म्हणायला लागलं.  पण एकदा ते म्हटल्यानंतर  ज्या कारणासाठी तो रेटा निर्माण केला ते  कारण दूर झालं का? तर नाही झालेला अजून.  मी  अण्णा म्हणून अनेकांनी त्यावेळी   टोप्या  डोक्यावरती घातल्या होत्या. पण ते आंदोलनाचा जोर संपल्यावर गेलं,  त्यामुळे लोकमत तयार झालं नव्हतं, रेटा तयार केलेला होता. ते राजकीय नेतृत्वाचे  कौशल्य आहे किंवा प्रसार माध्यम वापरण्याचे कौशल्य आहे.  पण लकमताचा रेटा माहितीच्या हक्काबद्दलचा असेल,  लोकप्रतिनिधींची चौकशी कोणी करायची  याच्या संबंधीचा असेल तर याला सुद्धा  लोकमत तयार होणे म्हणजे हे असंच झालं  पाहिजे असा कायमसाठीचा  आग्रह बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये तयार  करणे हे खरं राजकीय काम आहे असं स्वामी  विवेकानंदांनी म्हटलेलं होतं.  गांधीजी  जेव्हा आता काँग्रेस पक्ष विसर्जित  करा असं  म्हणतात तेव्हा त्याचा राजकीय रेटा  निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं.   त्याच्यातनं स्वातंत्र्य मिळालं पण लोकमत तयार करायचं काम अजून राहिलेला आहे आणि ते    दीर्घकाळ करायला लागणार आहे,  ते वेगळ्या    पद्धतीने करायला लागेल.  आध्यात्मिक  राष्ट्रयोगामध्ये असं हे लोकमत तयार    करण्याचं    काम हे खरं राजकीय काम  आहे.  

सामाजिक कामांच्या बद्दल मागच्या भाषणामध्ये मी बोललेलो होतो तसं गांधीजींनी जी १८ प्रकारची काम सांगितलेली होती – सामाजिक, मानसिक बदलाची भौतिक आणि व्यवस्थात्मक बदलांची आणि विविध समाज गटांची ती अजूनही पुरेशी आहेत असं मला वाटतं. वेगळे गट अजून आपल्याला समाजातले सापडत जातील जसं प्रबोधिनीला धनगर वस्त्या सापडल्या, मग कातकरी वस्त्या सापडल्या किंवा हराळीला वेगळे तांडे सापडले. जिथे जाऊन काम करायची आवश्यकता आहे. नागरी वस्त्या सापडल्या पण नागरी वस्त्यांमधला सुद्धा भटक्या जमातीच्या लोकांचे वस्त्या हा आणखीन वेगळाच भाग आहे तो अंबाजोबाईला सापडला. या सगळ्या गटांसाठी काम करणं, त्यांचे निर्वाहाचे प्रश्न सोडवायला त्यांना प्रेरणा देणं आणि ती प्रेरणा जागी होईपर्यंत प्रत्यक्ष मदतीचा पुरवठा करणं हे काम सामाजिक काम म्हणून आपल्याला करायला लागेलच.

समाजाच्या कामाचा आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करणं असं आता सुरुवात झालेली आहे. डेमोग्राफि असं त्याला म्हणतात. म्हणजे समाजात आज कुठल्या वयोगटाचे किती लोक आहेत त्यांच्या काय गरजा आहेत असं वयोगटशः समाजातल्या गटांचा विचार करणं आणि मग आणखीन दहा वर्षांनी, पंधरा वर्षांनी, वीस वर्षांनी समाजातले हे वयोगट कसे असणार आहेत? कुठल्या वयोगटात किती लोक असणार आहेत ?त्यामुळे कुठल्या प्रश्नांचे गांभीर्य वाढेल? याचा विचार करणं आणि त्या दृष्टीने कामांची योजना करणं हे सुद्धा सामाजिक काम हा या राष्ट्रयोगाचा भाग आहे असं मला वाटतं. अर्थकारण – त्याच्यासाठी सुद्धा काम करायला लागेल. हा सुद्धा निर्वाहाचाच प्रश्न आहे. आणि मग कर आकारणी कशी करावी? कशाची करावी? प्रत्यक्ष कर असावेत का अप्रत्यक्ष कर असावेत? हा त्यातल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय. पण गरिबातल्या गरीब माणसाला आज काय जाणवते आणि काय करायला पाहिजे ते पाहून आर्थिक धोरण सुचवणे आणि आपण स्वतः आर्थिक उपक्रम करणे हे सुद्धा या अध्यात्मिक राष्ट्र योगाचा भाग आहे. त्या अर्थकारणाला आता तंत्रज्ञानाची मदत मिळू शकते. भारतामध्ये युपीआय मुळे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व्यवहारांच्या सोयीमध्ये कसा बदल होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आर्थिक स्वावलंबन येणे, आर्थिक सुबत्ता वाढणं कसं होऊ शकतं हे आपण पाहत होतो. त्यामुळे या सगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा हा विचार करणे हा सुद्धा राष्ट्रयोगाचाच भाग आहे.

आर्थिक, राजकीय, सामाजिक याच्या पलीकडे जसा तंत्रज्ञानाचा विचार करावा लागतो तसा आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो तो म्हणजे पर्यावरणाचा. आज आपल्याला सोयीचं वाटते म्हणून काही गोष्टी करतो पण त्या boomerang नंतर उलटणार आहेत का ? नद्यांचे प्रवाह असतील पूर नियंत्रण असेल, दुष्काळ नियंत्रण असेल, दुष्काळ निर्मूलन असेल, पाण्याचे स्त्रोत वाढवणे असेल, वनसंपदा वाढवणे असेल, जैव वैविध्य वाढवणे असेल, असलेल्या वैविध्याचे रक्षण करणे असेल. एकूण सगळ्या औद्योगीकरणाचा पर्यावरणावरती कसा, हवामानावर कसा बदल होतो हे पाहणे असेल. या सगळ्याचा अभ्यास करणं आणि त्यातले सुद्धा संतुलन बघावे लागते. सह्याद्री वाचवा हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय योग्य विचार पण मग सह्याद्री वाचवा म्हणताना त्या सह्याद्रीच्या कुशीत जी सगळी गाव राहतात त्यांच्या आर्थिक विकासाचा विचार कसा करायचा ?तो कोणी करायचा? त्याच्यातला समतोल साधला पाहिजे. त्याच्यासाठी संवादाच्या यंत्रणा निर्माण केल्या पाहिजेत. त्याच्यातून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपलं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे. पर्यावरणाचा जीवनावरती होणारा परिणाम- आज होणारा परिणाम आणि आणखीन २५ वर्षांनी होणारा परिणाम याचा विचार करणं आणि त्याच्यासाठी कृती करणं ही सुद्धा राष्ट्रयोगासाठीचीच कृती आहे असं मला वाटतं. हे सगळं निर्वाहासाठी करायचं काम आहे. हे टाळून चालणार नाही. त्यामुळे आमचा अध्यात्मिक राष्ट्रयोग आहे. आम्ही या सगळ्या दैनंदिन प्रश्नांकडे बघणार नाही, ते क्षूल्लक आहेत असं म्हणून चालणार नाही. हे माझ्या दृष्टीने कदाचित क्षुल्लक असतील पण देशातल्या कोणाला तरी तो जीवन मरणाचा प्रश्न वाटतोय, तर ते आणि मी एकाच समाजाचे घटक आहोत आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटेपर्यंत माझं सगळं आयुष्य व्यवस्थित होणार नाही, हे कळणं आणि त्या जाणीवेतून कृती करणं हा अध्यात्मिक राष्ट्रयोगाचा भाग आहे असं मला वाटतं. असं करत असताना जसा आता या निर्वाहाच्या प्रश्नांचा विस्ताराने मी नामोल्लेख करत त्याच्यासंबंधी काहीतरी बोललो तसा आणखी कशाचा विचार करायला पाहिजे?

माझ्या पाच वर्षांपूर्वीच्या व्याख्यानमालेचा मी उल्लेख केला होता त्यातलं पहिलं व्याख्यान हे राष्ट्र विचाराला छेद देणारे आधुनिक विचार प्रवाह आणि तेही १९६० नंतरचे असाच मी उल्लेख केला होता. ते राष्ट्र विचाराला छेद देणारे अशा दृष्टीने त्याच्याकडे बघता येईल. पण आता जीवनयोग किंवा राष्ट्रयोग म्हणून आपण विचार करायला लागलो तर हा विचार प्रवाह सुरू झाला याचा अर्थ काहीतरी प्रश्न देशांमध्ये होते त्या – त्या देशांमध्ये किंवा आपल्या देशांमध्ये आणि त्या प्रश्नावरती कृती म्हणूनच कोणीतरी काम हे सुरू केलं. राष्ट्र विचाराला छेद कशामुळे बसतो? ते एकांगी विचार करतात, तो एकच प्रश्न सुटला पाहिजे, तोच जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने कार्यकर्ते काम करतात. करावं लागतं त्या त्या वेळी काम. पण मध्ये मध्ये चित्रकार जसं आपलं चित्र कसं वठतंय हे पाहण्यासाठी किंवा शिल्पकार आपली शिल्पकृती बघण्यासाठी मध्ये मागे होऊन त्याच्याकडे पाहतो, तसे या चळवळीतल्या लोकांनी सुद्धा थोडं मागे येऊन एकूण राष्ट्रवर या सगळ्या चळवळींचा काय परिणाम होतो असं बघायला पाहिजे. राष्ट्रयोग मानणारे जे आहेत त्यांनी या सगळ्या विचार सरणी म्हणजे आमच्या शत्रू असं म्हणून चालणार नाही. याच्यातही आपल्याला काही घेता येईल असं आहे का? आपलं दुर्लक्ष होत होतं कारण आपण व्यापक दृष्टिकोनातून बघत होतो. जे बारीक नजरेने पाहतात त्यांना काही गोष्टी लक्षात येतात, त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल.

मग उत्तर आधुनिकता असा एक विचार प्रवाह मी घेतलेला होता. त्याच्यामध्ये व्यक्तीच्या मताला किंमत आहे, वस्तुनिष्ठ सत्य असं काही नसतं, प्रत्येक जण स्वतःकडे आपापल्या दृष्टिकोनातून बघतो आणि त्याला महत्त्व दिलं पाहिजे असा हा विचार आहे. तर गरिबातल्या गरीब माणसाला जी अडचण वाटते ती त्याला बोलता येणं, त्याच्याबद्दल आणि ती इतरांनी ऐकून घेणे असं झालं पाहिजे असं आपण म्हणतोय. तर हाच दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे की व्यक्तीच्या मताला सुद्धा किंमत आहे फक्त वस्तुनिष्ठ सत्य सांख्यिकीतून प्राप्त होणारा निष्कर्ष एवढाच घेऊन चालणार नाही.

मुक्तीचे धर्मशास्त्र अशी दुसरी विचारधारा मांडलेली होती. बाहेर सगळीकडे मुख्यतः ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत, भारतात बौद्ध धर्माच्या बाबतीत मुख्यतः नवबौद्ध तर्फे होणारी चळवळ म्हणते की आमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या देशातले आजपर्यंतचे विचार उपयोगी पडले नाहीत. धर्मातूनच आम्हाला काहीतरी मिळेल. त्याच्यातूनच आम्हाला, आमच्या दुःखातून अडचणींमधून मुक्तता मिळणार आहे, अशा दृष्टीनेच बायबलचा अभ्यास करा, अशा दृष्टीनेच बुद्धाच्या वचनांचा अभ्यास करा, आणि भारतात तर अशा दृष्टीनेच आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करा असेही चाललेले आहे. छोट्या छोट्या चळवळी आहेत पण, त्यालाही प्रतिसाद देणारे लोकही आपल्या देशात आहेत, याचा अर्थ त्या लोकांना आमचं मत इथेच ऐकून घेतलं जाईल असं वाटते. म्हणून ती विचारधारा हळूहळू हळू पसरत असते किंवा पुढे सरकत असते. त्यामुळे त्याचीही दखल घ्यायला पाहिजे. वेगळ्या धर्मशास्त्रांमध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी काही म्हटलेले असेल तर ते धर्मशास्त्रात म्हटले म्हणून त्याज्य नाही. आणि आमच्या धर्मशास्त्रात म्हटलं नाही म्हणून त्याज्य नाही. ते कोणाच्याही धर्मशास्त्रात म्हटलं असेल आणि काही जणांना तरी त्याच्यामुळे आपल्याला व्यक्त व्हायला संधी मिळते आणि त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल असं वाटते तोपर्यंत त्याचाही विचार आपण केला पाहिजे.

पर्यावरणीय स्त्रीवाद अशी एक आधुनिक विचारधारा मी त्यावेळी मांडलेली होती. पर्यावरणाला औद्योगिक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये उपभोग्य वस्तू म्हणून मानलं जातं आणि स्त्रियांनाही उपभोग्य वस्तू म्हणून मानलं जातं. त्यामुळे पर्यावरणाचे व स्त्रियांचे प्रश्न सारखेच असतात आणि त्यामुळे त्याचा एकत्र विचार केला पाहिजे. ते सोडवले पाहिजे, असं भारतातल्याच विचारवंत शास्त्रज्ञ वंदना शिवा यांनी अतिशय जोमाने हा विचार प्रवाह पुढे नेलेला आहे. स्थानिक पातळीवरती तरी त्या ज्या म्हणतात त्याच्यात तथ्य आहे आणि त्या म्हणतात की “आम्ही हाच विचार करणार. राष्ट्राचा विचार करायची गरज नाही कारण तो विचार करताना स्त्रियांचे प्रश्न सुटतात किंवा नाही असे काही कळत नाही”. स्थानिक पातळीवरती तरी पर्यावरणाचे प्रश्न आणि स्त्रियांचे प्रश्न, ते आपल्या उपभोगासाठी आहेत असं पुरुषप्रधान संस्कृती मानत असेल तर मग स्त्रिया आणि पुरुष या सगळ्यांना समान अधिकार मिळणं राष्ट्रयोगासाठी आवश्यक आहे. याही प्रश्नाची दखल घेतली पाहिजे आणि कसं सोडवलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न सोडवता येतील का? कसे सोडवता येतील? असा ही चळवळ विचार करती आहे, प्रयोग करती आहे. त्याच्याकडे राष्ट्राचा विचार न सोडता लक्ष देणे, त्याचाही आवश्यक तो समावेश आपल्या राष्ट्रयोगाच्या कामात करणं असं करणे आवश्यक आहे.

त्याचा सखोल पर्यावरणवाद अशी चौथी विचारधारा मी त्यावेळी विचारासाठी घेतलेली होती. तेव्हा तो छेद देणाराच प्रवाह म्हणून मी म्हटलेलं होतं. सगळी पृथ्वी एक आहे, पृथ्वीवरचे पर्यावरण सगळे एक आहे, पृथ्वीवरचे कुठल्याही देशात काही घडलं तरी त्याचा परिणाम इतर देशांच्या पर्यावरणावरती होऊ शकतो, त्यामुळे सगळ्याचा एकत्र विचार केला पाहिजे. माणसं हे सुद्धा पर्यावरणाचाच भाग आहेत. त्यामुळे पर्यावरण आमच्यासाठी असा माणसांनी विचार करणे बरोबर नाही. सगळी वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी हे आमच्या उपभोगासाठी असा माणसांनी विचार करणे बरोबर नाही. तर सगळे वनस्पती, प्राणी, माणसं आणि जल जंगल जमीन हे सगळे एकमेकांशी गुंतलेला आहे, त्या सगळ्याचा एकत्र विचार केला पाहिजे. त्या सगळ्याच्या एकत्र आरोग्याचा विचार केला पाहिजे असा हा सखोल पर्यावरणवाद. माणसाला त्याच्यात काही वेगळं महत्त्व वेगळं काही किंमत नाही असा तो विचार आहे. माणसालाच किंमत नाही त्यामुळे समाजाला किंमत नाही. राष्ट्रविचाराला तिथे काही स्थानच नाही. पण आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणताना हा सखोल पर्यावरणवाद त्याच्या खूप जवळ जातो. सर्वाभोवती एकच परमेश्वर, सर्व भूतांमध्ये- भूत म्हणजे निर्माण झालेलं फक्त माणसं जनावर प्राणी वनस्पती नाही तर निर्जीव सृष्टी सुद्धा डोंगर, दऱ्या, जमीन, मृदसंधारण, जलसंधारण सगळाच विषय त्याच्यामध्ये आला. या सगळ्यांमध्येच एकच परमेश्वरी तत्व आहे असं जर का आमच अध्यात्म आम्हाला सांगतं, असा अनुभव जर का आमच्यापैकी काही जणांनी घेतला आहे, असे अनुभव घेणारे लोक आमचे आदर्श आहेत तर मग याचाही विचार आपण करायला पाहिजे. आवश्यक तो समावेश आपल्या राष्ट्रयोगाच्या कामात करणं असं करणे आवश्यक आहे.

त्यातलं काय काय घेता येईल आणि आपण आपले निर्वाहाचे प्रश्न सोडवताना या सगळ्या गोष्टींची दखल कशी घ्यायची हे अध्यात्मिक राष्ट्रयोगामध्ये आपल्याला बघायला लागेल. या कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही प्रश्नावरती काम करणारी व्यक्ती आज आम्ही काम करतोय त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते, वेगळ्या उद्दिष्टाने काम करते असं आम्हाला वाटलं, तरी तो आमचा शत्रू नाही, तो आमच्याच कामातला कुठलातरी वेगळ्या पद्धतीने काम करणारा एक भाग आहे असं त्या सगळ्या कामांकडे बघणं आणि आपल्या कामाची आखणी त्याप्रमाणे करणं, आपली शक्ती आपली साधन-सामग्री आपल्या कामाचा आवाका हे सगळं विचारात घेऊन विवेकाने ठरवणं ही कामाची पद्धत, विचाराची पद्धत आध्यात्मिक राष्ट्रयोगामध्ये असली पाहिजे . हे सगळे निर्वाहाचे प्रश्न आहेत आणि ९९ टक्के वेळ अनेक जणांचा याच मध्ये जातो. पण मग तरी आध्यात्मिक राष्ट्रयोग असा वेगळी मांडणी का करायची? तर प्रबोधिनीला देशाला जे २०० कार्यकर्ते द्यायचेत, २०० म्हणजे मोठ्या संख्येने द्यायचे या अर्थाने घ्यायचा. अगदी आकडे मोजायला नाही सुरुवात करायची. कारण आपल्याच एका मित्राने २०० म्हणतात आप्पा, साडेतीन तरी मिळालेत का आजपर्यंत? असा एक लेख लिहिलेला आहे. २०० कार्यकर्ते मिळाले पाहिजेत असं आप्पा म्हणाले. पण मग ते २०० कसे असले पाहिजेत? याच्या अपेक्षा ते उंचावत गेले. २०० कार्यकर्ते झाले पाहिजे, दिले पाहिजेत देशाला आणि ते कसे असले पाहिजे, याच्याबद्दलची शेवटची लिखित नोंद आप्पांची त्यांना १९७६ साली जो एक्सलन्स पुरस्कार मिळाला उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्या उत्तरा दाखल केलेल्या भाषणामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य तर मिळाले. जे गांधीजींनी म्हटलं त्याच्यापुढे आणखी काय व्हायला पाहिजे? तर आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिका किंवा प्रस्ताविकेमध्ये सुरुवातीला जे उल्लेख आलेले आहेत त्यातले शब्द आप्पांनी घेतलेले आहेत. समता, बंधुता, सामाजिक न्याय हे शब्द त्या घटनेच्या उद्देशिकेत. त्याच्याबरोबर विज्ञानातील उत्तमता आणि भारतीय अध्यात्म या पाच मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकाशात जे काम करतात, या पाच मार्गदर्शक तत्त्वातनं ज्यांना देशासाठी कामाची प्रेरणा मिळते असे २०० कार्यकर्ते घडवणं हे प्रबोधिनीचं काम आहे, असं १९७६ साली म्हटलेलं आहे. २०० झाले की नाही याच्या शिरगणतीत आता पडायला नको. जे कोणी आहेत ते या पाचही तत्त्वांच्या प्रकाशात काम करतात की नाही हे बघायला नको. हे ज्याचं त्यांनी बघावं.

 पण मग निर्वाहापलीकडे आणखी राष्ट्रासाठी काम करायचं म्हणजे काय करायचं? तर प्रश्न तर अनंत आहेत, क्षेत्र अनंत आहेत. चार विचार प्रवाह आपण बघितले आणि पाच-सहा क्षेत्र बघितले. राजकीय, सामाजिक ,आर्थिक, पर्यावरणीय वगैरे. तर निर्वाहाचे कुठलेही प्रश्न तुम्ही निवडा, कुठलेही क्षेत्र निवडा, कुठलेही विचारधारा निवडा, पण या उद्दिष्टासाठी मी काम करतोय का? इथे समता प्रस्थापित व्हावी, बंधुतेचे नातं निर्माण व्हावं, सामाजिक न्याय सगळ्यांना मिळावा, हे सगळं काम करत असताना केवळ लोकरूढी प्रमाणे विचार न करता विज्ञान पद्धतीचा उत्तम उपयोग करून त्यातली उत्तमता गाठायची आहे हे लक्षात ठेवून आपण काम करतो आहोत का? भारतीय अध्यात्म असा शब्द वापरलाय, कारण इंग्रजीतलं भाषण आहे. इंग्रजीमध्ये स्पिरिचुअलिटी किंवा स्पिरिचुअलिझम हा बौद्धिक चर्चेचा विषय आहे, तत्वचर्चेचा विषय आहे असं मानलं जातं. भारतामध्ये मात्र ही सगळी चर्चा करून तुम्ही जर का अनुभव घेतला नसेल तर सगळी चर्चा फोल आहे. भारतीय अध्यात्म म्हणजे सर्वांच्या मध्ये एकच शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांच्या द्वारे सर्व व्यवहारांमध्ये काम करत असते, याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेणं. हा अनुभव मी घेतला पाहिजे, ही माझ्या कामाची प्रेरणा आहे असंही असलं पाहिजे. अशी ही पाच तत्व मांडलेली आहेत. या पाच तत्त्वांची प्रस्थापना आपल्या समाजात झाली पाहिजे म्हणजे समाज संस्थापना झाली पाहिजे या प्रेरणेने मी काम करतोय हा उद्देश. आणि निर्वाहासाठी कुठलं तरी काम, प्रश्न, क्षेत्र माझ्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार, अनुभवानुसार, शिक्षणानुसार मी निवडलेले काम करतोय. एकापेक्षा अनेक जास्ती क्षेत्रांमध्ये काम करायला हरकत नाही असं त्याच्याकडे बघता येईल.

आध्यात्मिक राष्ट्रयोगात कार्यवाही करत असताना हेतू काय असला पाहिजे? मी ते आता ते हेतू म्हणून मांडतोय हा चर्चेचा प्रश्न होऊ शकेल. की हे सगळं करत असताना समाजात समता, बंधुता प्रस्थापित व्हावी हे उद्दिष्ट आहे. हेतू काय तर राष्ट्र म्हणजे संघटित समाज. संघटन आपल्या समाजामध्ये खूप कमी आहे. त्यामुळे आपल्या देशातली संघटन वृत्ती आपल्या समाजातली संघटन वृत्ती वाढली पाहिजे. संघटना हा माझ्या सगळ्या कामांचा हेतू आहे. प्रत्येक क्षेत्रात आम्ही संघटना करू, किंवा ज्या कुठल्या व्यावहारिक कामात मी असेन त्या कामात जे कोणी माझ्याबरोबर काम करणारे असतील त्या सगळ्यांमध्ये ही संघटन वृत्ती मी निर्माण करीन. असं फक्त आपण प्रबोधनीतच म्हणतोय असं नाही तर सगळ्या हिंदू समाजाचाच हा प्रश्न आहे, असं अनेक उदाहरण देऊन डॉक्टर पू. ग सहस्त्रबुद्धे यांनी हिंदू समाज संघटना विघटना हे पुस्तक जेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या वेळी लिहिलं त्यावेळी म्हटलेलं आहे. आमच्याकडे संघटना नाही, संघटन वृत्ती नाही. ही संघटन वृत्ती असलीच तर कशी अशी काही उदाहरण त्यांनी दिली इतिहासातली.आज आत्ता काय करायला पाहिजे? आजच आपलं कर्तव्य काय? हे ठरवणारे नेतृत्व नसेल तर त्या संघटनेचा, संघटित वृत्तीचाही फार उपयोग होत नाही. त्यामुळे संघटनेसाठी आणि नेतृत्व विकसनासाठी काम करणं हा राष्ट्रयोगाचा हेतू असला पाहिजे.

आणखी काय असलं पाहिजे? तर संघटना, नेतृत्व याच्याबरोबर सामूहिक प्रतिभा विकसन झालं पाहिजे. अनेकांकडे उपजत प्रतिभा असते. एकेका व्यक्तीची प्रतिभाशक्ती प्रशिक्षणाने वाढवता येते. पण गटाने मिळून एकत्र आपला प्रश्न आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने सोडवूया, नवीन पद्धतीने सोडवूया, त्याच्यासाठी एकत्र विचार करून नवीन कल्पना काढूया आणि एकत्र विचार करून नवीन कल्पना काढली की नवीन कल्पना ही सगळ्यांची होते, त्यामुळे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठिंबा हा जास्ती मिळतो. त्यामुळे सामूहिक प्रतिभा विकसन आणि जगभरात काय चाललेलं आहे त्यातनं नवीन शिकायची तयारी ही व्यक्तीची, गटांची, संस्थांची, संघटनांची, सगळ्या राष्ट्राची असली पाहिजे. संघटना आहे पण राष्ट्रासाठी नवीन शिकायला पाहिजे असं जगभर सगळीकडे जे सांगितलं जातं ते उदाहरण म्हणजे जपानचं. कमोडोर पेरी दोन चार जहाज घेऊन आला आणि त्यांनी तोफा डागल्या आणि सगळं राष्ट्र एकदम सावध झालं! आजपर्यंत आपण जगलोय तसं जगून चालणार नाही. आपली कुपमंडूक वृत्ती होती. आपण देशाच्या बाहेर काय चाललं पाहिलंच नाही. तर अभ्यास देश स्थितीचा समतोल चालो पुरणार नाही. अभ्यास जागतिक स्थितीचा समतोल चालो असं झालं पाहिजे. जपाननी काही दशकांच्या अवधीत आपला देश हा ३५-४० वर्षांमध्ये रशिया सारख्या युरोपीय राष्ट्राचा लष्करात पराभव करू शकेल अशा स्थितीला आणला. सगळ्या जगातल्या दोस्त राष्ट्रांच्या फौजांना एकत्र लढावे लागेल इतकी ताकद त्यांनी मिळवली. आणि दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाल्यानंतर आधुनिक व्यवस्थापनाची तंत्र वापरून पुन्हा आपल्या देशाचा पुनरुद्धार केला पाहिजे, पुनर्जागरण केलं पाहिजे असं सगळं केलं. हे जपानचे उदाहरण जगातून सगळीकडून शिकायची तयारी ठेवणे, त्याच्यासाठी अतिशय डोळे उघडणार आहे. याशिवाय मागच्या वेळी जे म्हटलं ते स्वीकारशील स्वदेशी– स्वदेशीचा जास्तीत जास्ती वापर. आपल्या सगळ्या बुद्धिमत्तेचा वापर आणि मग जगात जे काही ऊत्तम असेल ते स्वीकारणं असा आपण सतत विचार केला पाहिजे.

असा हा विचार करणं म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोगाचे प्रत्यक्ष आचरण करणं असं होईल. या हेतू बद्दल आणखी थोडसं सविस्तर बोलायला लागेल आणि मग मूल्यनिश्चिती किंवा मूल्य विवेक याच्याबद्दल आणखी बोलायला लागेल. हे दोन्ही माझे पुढच्या व्याख्यानाचे विषय असतील. राष्ट्रयोगामध्ये अध्यात्माचा विचार केला पाहिजे हे सांगितलं, राष्ट्रयोगाचा व्यवहार काय ते सांगितलं. आता अध्यात्मिक आणि व्यावहारिक याचा एकत्र विचार कसा करायचा हे पुढच्या व्याख्यानात बघू. आजचा हा विषय इथे संपवतो. आपले प्रश्न पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये चॅट बॉक्स मध्ये ज्यांना पाठवायचे असतील त्यांनी पाठवावेत. धन्यवाद