राष्ट्रकारणाची विविध अंगे

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला - भाग २ - राष्ट्रकारणाची विविध अंगे

वैचारिक क्र.२  – राष्ट्रकारणाची विविध अंगे – मा.संचालक                            

(कृपया नोंद घ्यावी – मा. श्री. गिरीशराव बापट यांच्या व्याख्यानमालिकेतील दुसऱ्या व्याख्यानाचे व त्यासंदर्भातील प्रश्न उत्तरांचे शब्दांकन करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. हे शब्दांकन मा. गिरीशरावांकडून तपासून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यामध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात काही शंका असल्यास ‘ई-मेल’ च्या माध्यमातून त्या उपस्थित करण्यास हरकत नाही.)

राष्ट्राची व्याख्या करण्याचा लोक प्रयत्न करतात आणि ती व्याख्या करणं खूप अवघड जातं. थोड्या शब्दांमध्ये सांगणं तर फारच अवघड जातं. प्रबोधिनीच्या संस्थापकांनी ‘राष्ट्र म्हणजे काय?’ आणि ‘हिंदू राष्ट्र म्हणजे काय?’ असं ५ श्लोकांमध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्यातलं राष्ट्र म्हणजे काय याबद्दल एक श्लोक त्यांनी केलेला आहे. जना: परंपरापूर्व: (म्हणजे स्वत:ची काही परंपरा असलेला समाज) तस्य वंश क्रमान्विता (पिढ्यानपिढ्या ते जिथे राहत आलेले आहेत) स्वामेष्या भू: ! पण तोही अपुरा वाटतो. मग निवेदिता यांनी रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा जन, देश, धर्म या तिन्ही गोष्टी म्हणजे राष्ट्र होतं असं म्हटलं आहे. आता धर्म या शब्दाने निर्माण होणारे घोटाळे…इथे सुद्धा धर्म या शब्दाचा वेगवेगळा अर्थ प्रत्येकाच्या मनात असेल कदाचित. त्यामुळे मी धर्माच्या ऐवजी संस्कृती, समाजरचना आणि परमार्थविचार किंवा अध्यात्मविचार असे तीन शब्द वापरतो. निदान भारताच्या संदर्भात तरी या पाच शब्दांचा विचार करायला लागेल –  देश, भूमी, जन-लोक, संस्कृती, समाजरचना आणि परमार्थविचार किंवा अध्यात्मविचार. आपल्या उपासना मंदिरात असलेली चित्रमूर्ती हिला सुद्धा आक्षेप घेणारे प्रबोधिनीतलेच काही सदस्य मला माहिती आहेत, तर आता जर घटनेने स्वीकारलेला नकाशा हा आहे तर तो नकाशा का लावला? आणि मग त्यांना मी सांगतो की अष्टविनायकाच्या मूर्ती पाहिल्या आहेत का – त्या सगळ्या स्वयंभू मूर्ती आहेत म्हणजे जसा जो सापडला त्याच्यात गणपतीचा आकार मला दिसतोय म्हणून त्यात गणपतीचे मूर्ती. तशी ही चित्रमूर्ती ही स्वयंभू आहे – जशी निर्माण झाली तशी ती आहे, त्याच्यात माणसाने ओढलेल्या रेघा कुठे दाखविलेल्या नाहीत. जशी ती निर्माण झाली तशी ती आहे, तशीच आहे हे भारतामध्ये अनेक शतकं अनेक लोक मानत आहेत. राजकारणी लोक काय म्हणतात किंवा इतिहासकार काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळा संदर्भ मला सापडला.

भरतमुनी, त्यांनी नाट्यशास्त्र लिहिलेले आहे आणि विविध प्रकारच्या सादर करायच्या कला यांच्याबद्दल ते कसं असावं, काय असावं याचं अगदी सविस्तर वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. तर नाटकासंबंधी लिहिताना नाटकामध्ये जी पात्रं असतात, त्यांनी उभं कसं राहावं, बोलावं कसं, बसावं कसं, हालचाली कशा कराव्यात, तर ते पात्र देशाच्या कुठल्या भागातला आहे हे लक्षात घेऊन नाटककाराने ते ठरवायला पाहिजे आणि मग त्यांनी चार भाग केलेले आहेत. पहिला भाग त्यांनी असा केलेला आहे – दाक्षिणात्य भाग. त्यात नर्मदेच्या खालच्या सगळ्या राज्यांचा उल्लेख केलेला आहे. आंध्र आहे, द्रविड आहे, महाराष्ट्र आहे आणि दक्षिण भारतातले वेगळे पर्वत ‘महेंद्र मलयसह्योते,’ असा एक श्लोकच आहे. असे श्लोक आणि नद्यांच्या आसपासचा भाग असा सगळा दक्षिण भारत तेथे आलेला आहे. या भागातलं पात्र असेल तर त्यांच्यासाठी दाक्षिणात्य प्रवृती वापरली पाहिजे. त्या भागातल्या लोकांचं चालणं, बोलणं हे वेगळ्या पद्धतीचं असतं.

मग मध्यभाग आणि पश्चिमेकडचा भाग याला अवन्तिकी म्हटलेलं आहे म्हणजे अवंती नगरीच्या भोवतालचा भाग. पण त्याच्यामध्ये सौराष्ट्रापासून सगळे देश म्हणजे आजचा राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश हा सगळा येतो. छत्तीसगड म्हणजे कोशल तो दक्षिणात्य भागात घेतलेला आहे. कोशल असा त्याचा उल्लेख केलेला आहे. अवन्तिकी प्रवृती अशी दुसरी एक प्रवृती म्हटलेली आहे.

मग ओढ्रमागधी म्हणजे मगध देशाचे त्यांनी दोन भाग केलेले आहेत. हा वरचा मगध प्रांत. त्याच्या भोवती नेपाळचा देखील उल्लेख आहे. पर्वतांच्या अलीकडचा आणि पलीकडचा भाग. म्हणजे हिमालय पर्वताच्या अलीकडचा पलीकडचा भाग. त्याचाही उल्लेख केलेला आहे.

प्रागज्योतिष म्हणजे कामरूपाचा (आसामचा) उल्लेख केलेला आहे. आणि मग अंग, वंग, कलिंग महाभारतात उल्लेख असलेले तेही सगळे प्रदेश त्यांचा उल्लेख केलेला आहे. यांना प्राच्य किंवा ओढ्रमागधी प्रवृती म्हटलेली आहे. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं हे वेगळ्या प्रकारचं असतं.

आणि चौथा भाग पांचाल म्हणजे उत्तर आणि वायव्य भारत. पांचाल भागामधले जे सगळे उल्लेख केलेले आहेत त्यामध्ये काश्मीर आहे, बाल्हिक म्हणजे बल्क – अफगाणिस्तान, इराणच्या बाजूचा भाग. गंगेच्या उत्तरेचा भाग सगळा – हस्तिनापुर, शौरसेन, मद्रदेश असे सगळे उल्लेख त्याच्यामध्ये केलेले आहेत. आणि या ठिकाणचं त्यांनी वर्णनही केलेलं आहे. नाट्यशास्त्रातले सगळे संस्कृत शब्द मला कळले नाहीत; पण काही ठिकाणाचे लोक सात्विक असतात, काही ठिकाणचे अल्पगीतार्थ असे असतात. काहींची आविद्ध गती असते. असं वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. अशा भारताच्या चार भागातल्या चार प्रकारच्या प्रवृती सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चित्रमूर्तीमध्ये जो भारत दाखविलेला आहे तो सगळा भारत येतो. भरताचं नाट्यशास्त्र म्हणजे इ.स.पूर्व दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक ह्या काळातलं कधीतरी आहे, याच्यातलं वर्णन केलेलं आहे. तर राष्ट्रकारणाची विविध अंगे याच्यामध्ये आपण कुठल्या भूमीतल्या लोकांचा विचार करावा लागतो आणि या भूमीचा विचार किमान दोन हजार वर्ष तरी या देशात केलेला आहे आणि नाट्यशास्त्र लिहिणाऱ्यांनी केलेला आहे, कोणी राजकारण करणाऱ्यांनी नव्हे. भारतात नाटक सादर करायचा असेल तर या कुठल्याही भागातलं पात्र असू शकेल, त्यांचं वागणं-बोलणं कसं असावं ते त्यांनी नाट्यशास्त्र म्हणून सांगताना सांगितले आहे.

मग जन इथले लोक कुठले आहेत? त्याच्या बद्दलही वादविवाद अनेक आहेत. काहीजणांना वाद सुरू करायलाही आवडते. परवाच डेक्कन कॉलेजच्या कुलगुरूंचे एक निवेदन आले होते आणि ते भा.ज.पा. सरकार आल्यामुळे ते केले आहे अशी त्यच्यावर टीकाही झाली; पण ते २०१९ मधले विधान सोडून देऊया, २०१० मध्ये तर भा.ज .पा. सरकार नव्हते, २००५ मध्ये नव्हते १९९९ मध्ये नव्हते. ते यायचे नव्हते पण त्याची भीती कोणाला नव्हती, आहे ती आघाडी आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदाय शास्त्रज्ञांचा होता त्यांनी भारतात ६० ठिकाणी, आग्नेय आशियातील, चीनमधल्या, ऑस्ट्रेलियातील मध्य आशियातील, युरोपातील, आफ्रिकेतील अशा वेगवेगळ्या भागांमधील लोकांच्या  जीन्सची छाननी केली. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू जे म्हणतात तेच आधी वीस वर्ष शास्त्रज्ञ म्हणत आहेत. आईकडून पेशींमधून mitochondria म्हणून जे जीन्स येतात ते फारसे बदलत नाहीत म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत बदलत नाहीत. नैसर्गिक कारणांमुळे काही बदल झाले तर होतात; पण ते सावकाश सावकाश होतात. काय झालंय हे शोधता येतो मग त्या भागातल्या लोकांमध्ये त्यांच्या आईकडून येणाऱ्या पेशीतल्या डीएनए मध्ये काय बदल झालाय याचाही अभ्यास सुरू झालाय. वडिलांकडून जो वाय क्रोमोझोम भाग येतो त्यातही बदल कमी होतात म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाताना पण अनेक कारणांमुळे तेथेही नैसर्गिक बदल होऊ शकतात याचाही वेध त्यांनी घेतला आहे. आफ्रिकेत सगळ्यात जास्त विविधता आढळते. एकच धागा आफ्रिकेच्या बाहेर गेलाय असे लक्षात आले तो सुवेझ कालव्याकडून अरबस्थानात गेला का इथे इथिओपियाच्या इथून अरबस्थानात केला. या दोन मार्गांवर वाद चालू होता; पण तो विषुववृत्ताच्या जवळ कुठेतरी ती पहिली आदीम स्त्री होती जिचा डीएनए आज सर्व माणसांच्या मध्ये आहेत म्हणतात. ती इथिओपियाच्या इथून अरबस्थानात येमेन आहे तेथे गेली. ती समुद्राच्या काठाकाठाने भारतात आली, पश्चिम किनाऱ्याने दक्षिण टोकापर्यंत गेली आणि तिथून पुन्हा पूर्व किनाऱ्यापासून उत्तर टोकापर्यंत गेली. तसेच फक्त किनाऱ्या किनाऱ्या कडून न जाता जे दक्षिण टोकाकडून उत्तर टोकाकडे गेले व जे उत्तरेकडे गेले आहेत ते पश्चिमेकडे वायव्येच्या भागातून मध्य आशियात आणि युरोपा पर्यंत पसरले आणि पूर्व किनाऱ्याने जे गेलेले होते ते म्यानमारच्या बाजूने आग्नेय आशियात गेले. एक शाखा अमेरिका, ऑस्ट्रेलिया पर्यंत गेली दुसरी कंबोडिया, व्हिएतनाम या भागातून चीनमध्ये गेली आणि तिसरी कोरिया जपान पर्यंत गेली आणि चीनमधून पुन्हा उत्तरेकडे मध्य आशियामध्ये गेली युरोपमध्ये गेली. अमेरिकेतून बाहेर पडण्याचा काळ साधारण दीड लाख वर्षे, भारतात पोचले आणि भारतातून बाहेर पडायला सुरुवात झाली याचा काळ 65000 वर्षेपूर्वी, भारतातून बाहेर पडले आणि इतर सर्वत्र पसरले ते साधारण तेरा हजार वर्षापूर्वी त्यातून चीनमध्ये गेलेले कोरियामध्ये गेलेले सायबेरियातून गेले आणि तिकडे अलास्काच्या कडे गेले ते सात हजार वर्षे असे गणित त्यांनी मांडलेले आहे म्हणजे बाहेरून आक्रमक येत गेले भारतात आणि आक्रमण झालेले आहे आणि त्यामुळे मिश्रण झालेले आहे  असे या जेनेटिक डेटावरून तरी दिसत नाही. दीड लाख वर्षापूर्वी प्रवास सुरू झाला आणि 65 हजार वर्षांपूर्वीच कधीतरी कुठेतरी भारतामध्ये मनुष्यवस्ती सुरू झाली पण भारतात आलेले लोकच भारतातून सगळीकडे गेलेले आहेत युरोप, अमेरिका, चीन आणि सगळे बदल झालेले असतील ते त्या त्या ठिकाणी जे काही जीन्समध्ये जे बदल होत गेले, त्याच्यामुळे झालेले आहेत आणि आज भारतातले जे काही वैविध्य दिसते ते भारतात तेव्हा जे लोक होते त्यांच्यामध्ये तिथल्या  परिस्थितीमुळे जे काही बदल होत गेले त्यातच हे वैविध्य सगळे आलेले आहे. भारतातून जे तिकडे गेले आणि तिकडून आक्रमण करून इकडे आले ते अशांची संख्या नगण्य आहे त्यामुळे ते उत्तरेत आले आणि त्यांनी दक्षिणेकडे द्रविड यांना पाठविले याला तर काही अर्थ नाही आणि खरच बाहेरून आलेले ते आर्य आणि त्यांनी येथे आक्रमण केले ह्याला काही अर्थ नाही असे निदान जीन्स वरचा जो अभ्यास झालेला आहे त्यावरून दिसते. त्यांच्याप्रमाणे जीन्स मध्ये झालेले बदल हे टिकाऊ आहेत. भाषांमध्ये रंगामध्ये झालेले बदल हे बरोबर चे असतात सहजपणे होऊ शकतात. भाषेमध्ये दर पंचवीस वर्षांनी सुद्धा बदल होऊ शकतात आणि कुठल्या भाषेचे कोण बोलायला लागले.

एक प्रश्न आहे अंदमान मध्ये आहेत ते कोण आहेत तर ते भारतातीलच आहेत 65 हजार वर्षांपूर्वी पूर्वेकडून जो प्रवास सुरु झाला त्यात अंदमानमध्ये गेलेले आहेत त्यामुळे अंदमानमध्ये जे वनवासी आहेत आणि भारतातील सर्व भागातील वनवासी आहेत त्यांच्या अभ्यास भारतातीलच अन्थ्रोपोलॉजिकल सर्व्हे ने सॅम्पल घेऊन केलेला आहे. ते या सगळ्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटाबरोबर काम करतात. तेथे भारतातील सर्व वनवासी व ग्रामवासी व शहरवासी हे 65 हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून जे कोणी येथे पोचले त्यांचेच वंशाचे आहेत आणि त्यामुळे एकरस आहेत एकाच खाणीचे एकाच मातीचे असा हा जीवशास्त्रीय अभ्यास सांगतो आणि तो अगदी गेल्या वीस पंचवीस वर्षातील आहे .ते म्हणतात की आधीच्या सगळ्या थिअरी होत्या त्या फक्त आर्किऑलॉजीच्या किंवा भाषाशास्त्राच्या अभ्यासावरून अशा केलेल्या होत्या. अधिक त्या त्या संशोधकांचे जे काही पूर्वग्रह होते त्यातून झालेल्या आहेत. आता हा जो काही आंतरराष्ट्रीय समुदायअभ्यास करतोय त्यामुळे ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ पुराव्याने सिद्ध करून निष्कर्ष काढणे अशा पद्धतीने चालू आहे आणि 1995 ते 2010 हे संशोधन या टोकापर्यंत गेलेले आहे अधिक अभ्यास चालू आहे डेक्कन कॉलेजचे लोक त्यात अभ्यासात सहभागी आहेत आणि उत्खननात काही सांगाडे सापडले आणि त्या आधारे त्यांनी केलेले संशोधन हे मिळतेजुळते आहे त्याचा भाजप सरकारची काहीही संबंध नाही. असे जन आणि देश याच्याबद्दल झाले .

धर्म ऐवजी मी म्हटले तसे संस्कृति, समाजरचना आणि परमार्थ विचार किंवा अध्यात्म विचार अशी राष्ट्रकारणाची अजून तीन अंगे आहेत राजकारणामध्ये सध्या दोन प्रवाह आहेत निधर्मी राष्ट्र आहे असे म्हणणाऱ्या पक्षांचा एक समूह आहे आणि हे हिंदू राष्ट्र आहे म्हणणाऱ्या पक्षांचा एक छोटा गट आहे त्यांचा जो राष्ट्रविचार आहे तो राजकीय राष्ट्रविचार आहे. 1975 हा कट ऑफ पॉईंट म्हणता येईल त्या आधीचे जे राजकीय पक्ष होते ते काही विचार मांडत होते तो विचार 75 साली आणीबाणी आली आणि संपला. ८४ साला पर्यंत हे हिंदूराष्ट्र आहे म्हणणारे कोणी नव्हतं शिवसेना तेवढे फक्त मराठी लोकांसाठीच भांडत होती आणि ८० साली भाजपा स्थापन झाले त्यांनी ‘गांधीवादी समाजवाद’ असे आपले एक तत्त्वज्ञान स्वीकारलेले होते. ८४ साली राजकारणातले आपले स्थान कमी होत आहे असे लक्षात आले आणि त्याच वेळी लंडनमधल्या आपल्या दूतावासामध्ये ज्यांच्या नावाचा म्हात्रे पूल आपल्या इथे आहे ते म्हात्रे अधिकारी त्यांचे काश्मिरी अतिरेक्यांनी अपहरण केले आणि नंतर ठारही मारले. बाळासाहेब ठाकरे यांनी तो मुद्दा उचलला आणि मराठी माणूस गेला. मराठी अधिकारी गेला त्यामुळे त्याच्यासाठी आपण भांडू शकतो कारण आजपर्यंत आपण सहन केले आहे आणि त्याला काश्मिरी अतिरेक्यांनी मारले म्हणजे मुसलमानांनीच मारले  आणि आता त्याच्याविरुद्ध उभे राहायचे असेल तर आम्ही हिंदुत्व मानणारे आहोत फक्त मराठी माणसांसाठी भांडणारे नाही असे मांडायला पाहिजे.अशी ८४ साली शिवसेनेने भूमिका घेतली, रामजन्मभूमी आंदोलनही सुरू झाले आणि भाजपालाही वाटले गांधीवादी समाजवाद हे काही फारसे यशस्वी होत नाही. लोकसभेत दोनच जागा मिळाल्या, त्यामुळे आणखीन काहीतरी वेगळे केले पाहिजे. त्यामुळे ८९ साली भाजपा आणि शिवसेनेची युती झाली व हिंदुत्वाचे राजकारण वेगाने सुरू झाले. मग निवडणुका आल्या निवडणुकांमध्ये भाषणे सुरू झाली. मुंबईमधल्या एका विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार आणि बाळासाहेब ठाकरे दोघांनीही आवाहन केले हिंदुत्वाच्या नावाने ते निवडून आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोर्टात दावा केला हिंदुत्वावर खटला झाला आणि हिंदू धर्म असे काही नाहीये ‘हिंदू वे ऑफ लाईफ’ आहे असा कोर्टाने निर्णय दिला. पण त्यांच्या आवाहनातील काही शाब्दिक गोष्टींवर ते सापडले आणि त्या दोघांनाही सहा सहा वर्षे मतदान करण्याची बंदी घालण्यात आली. पण हे आवाहन लोकांपर्यंत पोचतंय आणि त्यातून सत्ता मिळू शकतीये सत्तेच्या जवळ जाता येतंय हे ह्या दोन्ही पक्षांनी पाहिल्यामुळे आपला आग्रह चालू ठेवला. महाराष्ट्रात पाच वर्षे सत्ता मिळाली त्या व्यक्तीला, त्याबरोबर केंद्रातही सत्ता मिळाली आणि हा मुद्दा लावून धरला पाहिजे असे त्या त्यावेळी जो कोणता मुद्दा असेल समान नागरी कायदा असेल,रामजन्मभूमी असेल ,३७० कलम असेल,गोहत्त्या बंदी असेल ज्याच्यामुळे लोकांच्या भावना चेतवता येतील असा विषय वापरायचा आणि आपले राजकारण पुढे न्यायचे.असा तो राजकीय हिंदुत्व विचार आहे. आता राजकारणामध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेला आवाहन करायला पाहिजे की  नाही? केल्याचा उपयोग होतो तर कशाप्रकारे करावे? तर राष्ट्रविचारामध्ये जर का राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सगळ्याचा विचार करायचा असेल तर राजकारणामध्ये हिंदुत्वाचे कोणतेतरी एकच अंग पुढे करायचे आणि लोकांच्या भावभावना चेतवायच्या हे एकांगी झाले असे मला वाटते.

हे सगळे कशामुळे झाले असे हे राजकारणामध्ये वापर कशामुळे करायला लागला  तर ज्योतिर्मय शर्मा म्हणून एक लेखक आहेत त्यांनी ‘Exploring Hindutva exploring the idea of Hindu Nationalism’ असे एक पुस्तक लिहिले आहे. ज्याची पहिली आवृत्ती २००३ साली आली. त्याच्यावरती अनेक अभिप्राय लोकांचे आले. त्यावर दुसरी आवृत्ती २०१५ मध्ये काढलेली आहे. त्यावर एक प्रदीर्घ प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे की बऱ्याच गोष्टी वाचकांना समजतील असे मी गृहीत धरले होते; पण मला जे म्हणायचे होते ते वाचकांना समजले नाहीये म्हणून ही प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्याच्यामध्ये दयानंद, विवेकानंद, अरविंद आणि सावरकर या चौघांनी राष्ट्रविचार आणि हिंदुत्व विचार कसा मांडला हे सांगितले आहे. शेवटचा परिच्छेद त्यातील गमतीशीर आहे, A question is often asked why only Hindu identity and Hindutva why not Islam and Christianity? after all there is much to comment on the limitations of other faiths as well. One can only say that my concern in these pages are darkness on my side. म्हणजे मी हिंदू आहे म्हणून हिंदू व हिंदुत्वसंबंधी बोलतोय. मी मुसलमान किंवा ख्रिश्चन नाही म्हणून त्यासंबंधी बोलत नाही आणि मग ह्या मर्यादा सांगताना त्यांनी सहा मुद्दे सांगितले आहेत म्हणजे ह्या चौघांच्यातील सार काय? समान काय? तर त्यांनी ज्या दृष्टीकोनातून पाहिले आहे, त्यांच्या दृष्टीने राष्ट्र म्हणजे हिंदुराष्ट्र कसे आहे तर १) rigid codified monochromatic entity म्हणजे एकाच रंगाचे अतिशय कठोर न बदलणारे codifide म्हणजे सगळ्या गोष्टी आधीच सांगितल्या आहेत, त्यात बदल करणे शक्य नाही. अशा पद्धतीचे हिंदुराष्ट्र या चौघांनी मांडले आहे असे त्यांनी म्हंटले आहे.२)मग दुसरा मुद्दा masculine, aggressive and violent faith  म्हणजे पुरुषांचे सगळे गुण असलेला, आक्रमक, हिंसक असलेला मग असे असूनही आपल्या राष्ट्रावर पराभव आणि आक्रमण का आलंय? तर या सगळ्यांनी केलेले वर्णन म्हणजे ३)Confrontation and misfortune आमच्याहून बलवान असे लोक दुर्दैवाने आमचे बल कमी झालेले असताना येथे आले आणि त्यामुळे हे सगळे झाले. मग ४) चौथा मुद्दा काय तर Victim Hood ConspiracyTheory-never ending threats .आपले हे राष्ट्र जगायचे असेल तर आपण कायम  कोणीतरी आघात करते आपण ते झेलणारे आहोत असे कट कोणीतरी सतत करते आहे आणि कोणीतरी आपल्या देशाला ,राष्ट्राला बाहेरून काहीतरी धोके आहेत अशा पद्धतीची मांडणी या चौघांनी केली आहे. ‘एंड ऑफ थिओलॉजी’ आता नवीन सांगण्यासारखे काही नाही सगळं जे काही आहे ते  सांगून झालेले आहे आता जे काही अंतिम सत्य आहे आहे ते वेदांमध्ये आहे. काही बदल होणे शक्य नाही असे या चौघांनी म्हटले आहे आणि रिजेक्ट भक्ती मुव्हमेंट! जी काही भक्तीयुगाची चळवळ  मध्ययुगात झाली आहे तिला हे चौघे मानत नाहीत आणि पुराणे ही मानत नाहीत आणि इंट्रोडक्शन ऑफ inventive अब्युज कंट्रोल टूल्स आणि सतत लोकांना शिव्या देणे तुच्छ लेखणे अतिशय जहाल भाषा वापरणे असे हे आपले साधन म्हणून वापरतात आपला विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी! आता हे त्यांनी असे का म्हटले हा मला प्रश्न पडलाय कारण या चौघांचे मी काही न काही वाचले आहे; पण माझ्या असे लक्षात आले की हे सगळे लेखन आहे ते राष्ट्राचा फक्त राजकीय दृष्टीने विचार करायला लागल्यामुळे आणि आत्ता जे राजकीय पक्ष आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे म्हणतात त्यातले नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा स्वयंभू प्रवक्ते ज्याप्रमाणे बोलत असतात त्यानुसार त्यांना जे दिसले ते त्यांनी मांडले असे दिसते पण संकलन म्हणून ते पुस्तक चांगले आहे, पण अवश्य वाचण्यासारखे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे, हिंदुत्वाची ही जी सहा वैशिष्ट्ये मला यांच्यामध्ये सापडतायत ती ज्यांच्यामध्ये नाहीयेत; पण तेही आपल्या राष्ट्राचाच विचार करतात तर गांधी, टागोर, लोहिया आणि आंबेडकर अशी चार नावे त्यांनी घेतली आहेत. हे चौघे जो विचार करतायत तो वेगळ्या पद्धतीचा आहे. तो आजचे राजकीय हिंदुत्व मांडणार त्याच्यामध्ये नाहीये आणि त्याची दखल घ्यायला पाहिजे .त्यांच्या दृष्टीने राष्ट्रविचार हा प्रवाही आहे. ह्या चौघां प्रमाणे दयानंद, विवेकानंद, अरविंद, सावरकर यांच्याप्रमाणे हे दुसरे चौघे गांधी-आंबेडकर टागोर आणि लोहिया या चौघांनाही आपल्या परंपरेचा, वारशाचा अभिमान आहे एका मोठ्या देशाचे आहोत याचा त्यांना अभिमान आहे; पण त्याच्याबरोबर आपल्या देशाच्या बाहेर काय चालले आहे ते आपण समजून पाहिजे स्वीकारले पाहिजे, पचवले पाहिजे आणि असे आपल्याला जे देतात त्यांच्यावर आपण प्रेम आहे केले पाहिजे असे म्हणणारे ते आहेत याबाबतीत ते आजचे राजकीय हिंदुत्व मांडणारे आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

मी म्हटले की देश आणि लोक यांच्याबद्दल नाट्यशास्त्र काय म्हणते आणि आधुनिक जीवशास्त्रातील संशोधन काय म्हणते ते पाहिले आपण तर संस्कृति, समाजरचना आणि परमार्थ, अध्यात्म रचना यातील समाजरचना ज्याच्यामुळे घडते ते राजकारण समाजकारण अर्थकारण याविषयी बाकीच्यांनी काय म्हटलं ते आपण बघूया. तसं अर्थकारणाच्या बाबतीत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या राष्ट्रामध्ये काय असले पाहिजे असा स्वतंत्र विचार कमी झाला आहे किंवा ज्यांनी कोणी केलाय त्यांना तो फक्त भाषणांनी आणि लेखाद्वारे मांडता आलाय. प्रत्यक्ष नेहरूंनी जे काही अर्थ रचना करण्याचे सुचविले होते त्यामध्ये ती अर्थरचना झाली; पण भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी जे पुढारलेले असे देश होते त्यांनी त्याचा विकास करताना नियोजनाचे तत्व वापरले. स्वतंत्र देशांमध्ये नियोजनाचा विचार करून आपला आर्थिक विकास आपण करूया असं म्हणणाऱ्यांमध्ये भारत पहिला होता. पूर्वी कधी म्हटलेले नसले तरी एवढा मोठा देश स्वतंत्र झालाय आणि औद्योगिक क्रांतीच्या मध्ये सहभागी झालेला नव्हता त्याचा विकास कसा करायचा हे म्हणताना आपल्या देशात नियोजनाचे तत्व सुचले व पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. असे नियोजन करून देशाचा आर्थिक विकास केला पाहिजे हा भारतीय विचारच म्हटला पाहिजे. रशियाकडे पाहिले असेल नेहरूंनी; रशियातील योजना पाहून इथे हे करायचे सुचले त्यांना, पण तंतोतंत अनुकरण केले नाही. रशियात असे दिसले तसे केले नाही. आपल्या येथे स्वतंत्रपणे नियोजन मंडळे स्थापन करून अनेक चर्चा करून त्यातून त्या पंचवार्षिक योजना सुरू होत गेलेल्या आहेत. त्याच्यातून काय झाले तर बहुतेक सगळे अवजड उद्योग सरकारी मालकीचे झाले. ८०० वस्तूंचे उत्पादन फक्त छोट्या लघु उद्योजकांनी करावे असे धोरण ठरले. बाकी मधले जे काही होते ते मोठ्या उद्योजकांनी लायसन्स घेऊन त्याचे उत्पादन करायचे असे ठरले. त्यामुळे देश म्हणून काहीना काहीतरी आर्थिक प्रगती होत गेली तरी इथल्या लोकांच्या उद्योजकतेला वाव मिळाला नाही. हा आणि बाहेरील देशांशी  औद्योगिक बाबतीत आपण फार सहकार्याचे धोरण ठरवलेले नव्हते. काहीकाही एकत्र प्रकल्प झाले; पण त्यामुळे आपल्या लोकांना काहीना काही स्वतःचे तंत्रज्ञान निर्माण करता आले आणि करावे लागले तर करता येते एवढे कळले. मग ९१ साली धोरण एकदम बदलले तेव्हा असे लक्षात आले की आपण बाहेर जाऊन स्पर्धा करू शकतो वेगाने आर्थिक प्रगती करू शकतो आणि हे कशावरून ठरू शकते तर आर्थिक वाढीचा दर सुरुवातीला भारताचा ३ टक्क्याच्या आसपास होता. राजकृष्ण नावाच्या अर्थतज्ज्ञाने त्याला हिंदू रेटऑफ ग्रोथ असे म्हटले आणि असं म्हणताना हिंदू रेट ऑफ ग्रोथ तर हिंदू कोण तर ज्यांना ऐहिका पेक्षा पारलौकिकात रस आहे असे हिंदू म्हणजे हिंदू धर्माचा उल्लेख केला होता.

पण १९९१ नंतर भारताचे चित्र बदलले त्यावेळी मग आधीच्या सगळ्या दराचा अभ्यास करताना आढावा घेताना दीपक लाल नावाचा जो शास्त्रज्ञ होता २००५ साली त्याने हिंदू इक्विलिब्रियम असा शब्द वापरला म्हणजे त्याच गतीने ते होणे शक्य होते. त्याने स्पष्ट सांगितले मी हिंदू धर्माबद्दल बोलत नाही, हिंदुस्थानातील समाजरचनेतबद्दल मी बोलतोय. हिंदुस्थानातील समाजरचना तशी आहे. तुझ्यामुळे हा इक्विलिब्रियम असा झाला एकतर कारण त्यांनी सांगितले. लायसन्स परमिट कोटा राज्य जे होते त्यामुळे जास्त गतीने आर्थिक वाढ शक्‍यच नव्हती; पण दुसरे कारण त्याने असे सांगितले की धर्माचा भाग नाही पण हिंदुस्थानातील समाजरचना अशी आहे की पाश्चात्य देशांना आर्थिक वाढ हेच सगळे काही यशाचे मोजमाप करण्याचे साधन असे वाटते. भारतामध्ये मात्र समाजरचनेमध्येच धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत त्यामुळे आर्थिक वाढ २५ टक्केच होणार आहे हे भारतीय लोकांनी गृहीत धरले आहे त्यामुळे तो इक्विलिब्रियम झाला ही आर्थिक वाढ तर होतीये पण दुसऱ्या बाजूला अरे हे 25 टक्केच आहे बर का? सगळे महत्त्व यालाच महत्त्व द्यायचे नाही बरका हे समाज रचनेच्या मनात शिरले आहे आणि त्यामुळे तो हिंदू इक्विलिब्रियम झाला. रेट ऑफ ग्रोथ च्या ऐवजी पण इथल्या समाजरचनेमुळे आणि लायसन्स कोटा परमिट राज मुळे तो झाला असे त्यांनी म्हटले आहे मग या देशाचे अर्थकारण कसे असले पाहिजे? दयानंदानी काही म्हटले नाही, विवेकानंदांचा अभ्यास अर्थशास्त्राचा होता. शिकागोचे भाषण धर्मपरिषदतले द्यायच्या आधी त्याचा आधार चांदी  असावी की सोने यावर त्यांनी तेथील उद्योगपतींसमोर भाषण केले होते, पण एकूण देशाचा आर्थिक आधार कसा असावा असे त्यांनी म्हणले दिसत नाही. अरविंदांनी हे फारसं काही मांडलेले नाही म्हणजे पोन्डिचेरी आश्रमाच्या बाबतीत त्यांनी म्हटले आहे की आर्थिक शक्ती याला कमी महत्त्व देऊन चालणार नाही तर तुमची प्राणशक्ती जर घनीभूत झाली तर ती पैशाच्या रूपात संपत्तीच्या रूपात दिसते तुम्हाला दिसते. त्यामुळे पोंडीचेरीच्या आश्रमात पैसे मिळवले पाहिजेत त्याच्यासाठीची आर्थिक कामे तिथे चालतात. अर्थात त्यांनी आश्रमा पुरते म्हटले आहे देशासाठी नाही. सावरकरांनी काही अर्थकारणाबाबत म्हंटलेले नाही. मोठे उद्योग असावेत यांत्रिकीकरण असावे एव्हढे म्हटले. आंबेडकर अर्थतज्ज्ञ होते त्यांची पीएचडी अर्थशास्त्रातील आहे; पण पीएचडीचा प्रबंध आणि नंतर कोकणातील खोतीचा प्रश्न हे काही सोडल्यास त्यांनी अर्थकारणाबद्दल काही म्हटले नाही कारण त्यांनी वेगळ्याच प्रश्नाला हात घातला होता. टागोरांनी याबद्दल काही म्हटले नाही. लेख लिहिले आहेत काही; पण फार तपशीलात काही म्हटलेले नाही. लोहिया राजकीय नेते होते त्यामुळे त्यांना नेहरूंच्या आर्थिक धोरणावर टीका करायची होती त्यामुळे आर्थिक विषयावर काही बोलले होते; पण अर्थकारणावर तपशीलात आणि सविस्तर विचार कोणी केला आहे? तर गांधीजींनी केलाय. गांधीजींनी केलेला विचार काय? गांधीजींनी केलेला विचार म्हणजे पाश्चात्यसंस्कृती, औद्योगीकरण, यांत्रिकीकरण आणि आर्थिक मक्तेदारी सगळ्या विकृती आहेत आणि त्याला पर्याय दिला पाहिजे. विकेंद्रित अर्थव्यवस्था असली पाहिजे त्यामुळे सर्वोदय, स्वदेशी, विश्वस्त कल्पना अशा कल्पना त्यांनी मांडल्या. स्वदेशी स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, स्वदेशीची माझी कल्पना म्हणजे मी स्वतः बनवायचे माझ्या शेजाऱ्यांनी बनवलेल्या वस्तू वापरायच्या. घर बनवायचे घरापासून पाच मैल अंतरावर जी साधने मिळतात त्यातूनच बांधायला पाहिजे. बाहेरून कुठून साधने आणायची नाहीत आणि मग तुम्ही स्वतः आणि तुमच्या आसपासचे शेजारी गावातले लोक जे काही बनवतात त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, असे जर का भारतातल्या प्रत्येक गावात झाले तर मग सगळ्या भारतातच आर्थिक परिवर्तन होईल आणि त्याच्यातून भारताची प्रगती होईल. असा विचार त्यांनी मांडला. त्यातून ट्रस्टीशिपची कल्पना काही लोकांनी स्वीकारली, उद्योगपतींनी स्वीकारली. स्वदेशीचा आग्रह यांनी धरला होता तो चरख्याच्या बाबतीत! भारतात त्याचा पुरेसा प्रसार झाला आणि इंग्रजांना परिणाम जाणवेल अशा पद्धतीने भारतात खादीचे उत्पादन सुरू झाले. १९३४ साली गांधीजींनी खादी बरोबर सगळ्या ग्रामोद्योगांचीही कल्पना मांडली की स्थानिक अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तेव्हा सगळ्या पंचवार्षिक योजना सुरू होण्याआधी १९३४ झाली पहिल्यांदी इंग्रजांनी ग्रामीण विकासासाठी आर्थिक तरतूद त्यांच्या अर्थसंकल्पात केली. कारण आपण नाही केले गांधीजी हे करतील आणि चार-पाच वर्षांनी एकदम राजकीय चळवळ त्यातून उभी राहील अशी भीती इंग्रजांना वाटली. एवढे त्या आर्थिक विचाराचे सामर्थ्य होते; पण आज विचार करताना असे वाटते की जेव्हा भारतातील ८०-९०% लोक गावात राहत होते आणि कृषिप्रधान अर्थव्यवस्था होती त्याच्यासाठीचे उत्तर गांधीजींनी दिले होते. आता शहरीकरण वेगाने चालू आहे. गांधीजींना ते जाणवले होते. त्यांनी असे म्हटलेले ही आहे की शहरीकरण रोखायचे असेल तर गावातच लोकांना उद्योग आणि काम मिळायला पाहिजे. पण तेव्हा ते झाले नाही आणि सगळे तंत्रज्ञानच बदलत गेले. त्यामुळे औद्योगिक युग, माहिती युग भारतात आले आणि त्याच्यामुळे अर्थ रचनेचे स्वरूपच सगळे बदललेले आहे आणि बऱ्याच अर्थकारणाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. कारण जगातील  पैसा येथे ऑनलाइन येऊ शकतो. इथला पैसा बाहेर जाऊ शकतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एका दिवसात काहीशे कोटीची होऊ शकते आणि एका दिवसात ते बाहेर काढले जाऊ शकते तर हिंदू इक्विलिब्रियम सांगताना त्यांनी सांगितले आहे की पेपर टायगर म्हणजे दक्षिण आशियातले हे सगळे देश होते. जिथे वेगाने झपाट्याने क्रांती झाली. तिथे ९८-९९साली जे काही आर्थिक उघड घोटाळे झाले, त्यामधून त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली, मंदी आली, आर्थिक वाढ थांबली. इथे भारतात मात्र त्यामानाने काही झाले नाही कारण येथे हिंदू इक्विलिब्रियम होता. भारतात लोक सावधपणे गुंतवणूक करीत होते. बचत करायची सवय बऱ्यापैकी त्यांना होती आणि कर्ज काढून सगळे विकत घ्या आणि नंतर हप्ते भरत बसा अशी संस्कृती भारतात तेव्हा आलेली नव्हती, हे हिंदू इक्विलिब्रियमचे उदाहरण त्यांनी सांगितले.

असा हा अर्थकारणाचा विचार गांधीजींनी केलेला होता. पण आज राजकारण करताना या सगळ्या आधुनिक यंत्रयुग माहिती युगातले अर्थकारण कसे असेल त्याला भारतीय उत्तर पर्याय कसा असेल यावरती अजून शोधायला लागेल. म्हणजे माशेलकरांनी नॅशनल नॉलेज सिस्टीमचा आधार घेऊन त्याचे इंटलेक्च्युअल proparty राइट्स आपण ठेवूया वगैरे असा एक उपाय केला; पण असे अनेक उपाय करायला लागतील आणि भारतासाठीचे अर्थकारण राष्ट्र कारणासाठी उपयुक्त कसे असेल याच्याबद्दल खूप विचार करण्याची गरज आहे. समाजकारण कसे असावे तर गांधीजींनी असे म्हटले आहे की जे अनेक प्रश्न स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी आपण बाजूला ठेवले होते की आधी राजकीय स्वातंत्र्य मिळू दे मग बाकीचे करता येईल तर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रश्न सोडवू या आपण असे कोणी म्हटलेच नाही, त्यामुळे अस्पृश्यता आहे की नाही तर आहे अजूनही अस्पृश्यांना विरोध होतो की नाही तर होतो! आता आपले हराळीचे लोक म्हैसाळ ला गेले होते त्याच्या जवळच्या अंकली गावात गेले तर तिथले अस्पृश्य लोक पूलाखाली कुठेतरी राहत आहेत आणि त्यांच्यापर्यंत मदत मुद्दाम पोहोचवावी लागते कारण मदत करणारे त्यांच्यापर्यंत जात नाहीत असा साक्षात अनुभव आला. त्यामुळे अजून पूर्ण गेलेली नाही, जातीयता गेलेली नाही, भाषावार प्रांतरचना करून आपल्याला स्वायत्तता अशा विचारातून भाषिक अस्मिता अधिक प्रकार झाले आहेत आणि आर्थिक विषमता तर आहेच. म्हणजे मध्यम वर्ग वाढला आहे. कारण लोकसंख्या वाढली त्यात मध्यमवर्ग वाढला. भारत एक मोठे मार्केट आहे असे जगाला वाटायला लागलंय सगळे ठीक आहे; पण कोट्यवधी लोक मध्यमवर्गात गेले तरी एकूण लोकसंख्या वाढल्यामुळे दरिद्री लोकांची संख्या तेवढीच आहे आणि विषमता ही वाढली आहे याच्यावरचे उत्तर अजून सापडलेले नाही.

समाजकारणावर गांधीजींचे उत्तर काय? त्यांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे असे सांगितले. राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे असले तरी, सामाजिक ,सांस्कृतिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि त्यामुळे त्यासाठी रचनात्मक कार्यक्रम हा करायला पाहिजे असे त्यांनी म्हटले. तो कार्यक्रम काय असला पाहिजे त्यांच्या डोक्यातच हळूहळू तयार होत गेले. पहिल्यांदा चार गोष्टी मांडल्या, १९४१ सालापर्यंत त्यात भर पडत पडत १८ गोष्टी त्यामध्ये आल्या आणि ते काम करण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने त्याची शक्ती खर्च करावी. २८ जानेवारी १९४८ साली कागद त्यांनी तयार केला. ३० जानेवारीला त्यांची हत्या झाल्यामुळे तो विषय काँग्रेसने अलगद बाजूला ठेवला आणि बाकी कोणीच तो हातात घेतला नाही. या रचनात्मक कामात घरात करण्याजोग्या गोष्टी आणि गावात करण्याजोग्या गोष्टी गांधीजींनी अनेक सांगितल्या होत्या, अजूनही करण्यासारख्या होत्या आणि राष्ट्रकारण करायचे जे हे समाजकारण आपल्याला करावे लागेल. अर्थकारण तर शोध घ्यायला लागेल की काय करायचे; पण समाजकारणासाठी डोळ्यासमोर एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवणे हे जिथेजिथे सुरू होते त्या गावांमध्ये बदल झालेले दिसतात. अण्णा हजारे यांनी केलेल्या अनेक गोष्टी रचनात्मक कार्यक्रमातल्या आहेत. पोपटराव यांनी केलेल्या गोष्टी रचनात्मक कार्यक्रमातल्या आहेत आणि ज्या गावांमध्ये हे होतंय इथे बदल होतात. अर्थकारणांमध्ये प्रयोग झाले की नाही ? तर इतर देशांमध्ये पाहून आणि आपल्या प्रतिभेने आपल्या इथल्या प्रश्नांना उत्तर देत ‘सहकारी चळवळ’ जी गुजरात महाराष्ट्रात उभी राहिली त्यातून आर्थिक प्रश्न लोकांचे सुटले. देशाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होईल एवढे काही ते वाढले नाही. छोट्या छोट्या गोष्टी घडल्या. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी नवीन गोष्टी करण्याचा प्रयोग केला. त्याच्यासाठी वेगळ्या आर्थिक रचना उभ्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून युरोपमध्ये त्यांना पारितोषिक मिळाले एकूण; पण देशाच्या अर्थरचनेत हा प्रयोग रुजला नाही तो प्रयोग म्हणूनच राहिला. त्यामुळे अर्थकारणात आपल्याला खूपच प्रयोग करायला लागतील. आपल्या देशाच्या प्रतिभेमध्ये पूर्वी काय होते असे नुकतेच आय आय एम अहमदाबाद मधल्या सतीश देवधर यांचे पुस्तक आले आहे की, आधुनिक आर्थिक संकल्पना आधुनिक काळात आधुनिक युगाला उपयुक्त म्हणून पाश्चात्य देशांमध्ये निर्माण झालेल्या आहेत; पण त्या पद्धतीचा विचार भारतात कुठे कुठे आधी झालेला होता यावर त्यांनी फार छान पुस्तक लिहिले आहे. पण ती पुन्हा सैद्धांतिक मांडणी प्रत्यक्ष त्याची व्यवहाराची प्रात्यक्षिके झाली तर ते कळेल.

राजकारणा बाबतीत काय पर्याय आहे? राजकीय पक्ष जेव्हा पक्षीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन देशहिताचा विचार करतील तेव्हा राजकारणात बदल होऊ शकेल. त्यावर उत्तर फक्त गांधीजींनी सुचविले आहे की, वरून खाली असे विकेंद्रीकरण शक्य नाही कारण वरचे लोक आपली सत्ता खालच्या लोकांना द्यायला तयार होणार नाहीत. ती सत्ता सर्व खालीच असली पाहिजे, गावांमध्ये असली पाहिजे. गावांना झेपणार नाही ते त्यांनी वरच्या लोकांकडे सोपवावे. अशा तर्‍हेने क्रमशः राजकीय सत्तेचे केंद्रीकरण करत गेले तर राजकीय सत्तेचे आणि त्यामध्ये आम्हीच प्रतिनिधी निवडून देऊ आणि ते आमचा राज्यकारभार चालवतील ही कल्पना अजून ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ ही कल्पना  गावागावात रुजवायला पाहिजे. ती एका जिल्ह्यातल्या काहीशे गावांमध्ये रुजवायला; पण किती वेळ लागतो हे आपण पाहिले आहे. गडचिरोली, चंद्रपूर भागात ते काम चालू आहे. वन हक्कांच्या बाबतीत त्यांना ते जमलं की त्या  गावाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्हीच हे सर्व बघू अशी सामाजिक जाणीव, उत्तरदायित्वाची जाणीव किती वाढायला पाहिजे, गावातल्या लोकांमध्ये ते काम कसे करायचे ते बघायला लागेल. अशीही सामाजिक जाणीव वाढवणे, स्वतःच्या स्वार्थापलीकडे सार्वजनिक स्वार्थाची जबाबदारी आपली आहे, असे म्हणून आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये, सहभागी व्हायला शिकवणे,  नवीन प्रश्न नवीन उत्तरे आपणच विचार करून शोधणे आणि ती राबविणे हे सगळे करण्यासाठी विचार पद्धतीत बदल करायला पाहिजे आणि हा विचार पद्धतीतील बदल म्हणजे सांस्कृतिक बदल झाला पाहिजे.

म्हणजे ज्योतिर्मय शर्मांनी जी यादी सांगितली, दयानंद, विवेकानंद, अरविंद आणि सावरकर यात विवेकानंदांनी आणि सावरकरांनी सांस्कृतिक बदल काय झाले पाहिजेत हे सांगितले. सावरकरांनी सामाजिक बदलासाठी प्रयत्न केले; पण ते जेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात दहा वर्षे स्थानबद्ध होते तेव्हा मर्यादित प्रमाणात केले. तेव्हा कुठेतरी आपली कृतिशीलता व्यक्त झाली पाहिजे याच्यातून तो झाला आहे. नंतर तो विषय संपला एकूण सप्त बंदी मोडल्या पाहिजेत म्हणजे काय करतो…हा सांस्कृतिक बदल आहे आणि विवेकानंदांनी जी प्रॅक्टिकल वेदांत मध्ये कल्पना सांगितली आहे की वेदांत हा दैनंदिन व्यवहारामध्ये आणायला पाहिजे. वेदांत दैनंदिन व्यवहारात आणणे म्हणजे तो सांस्कृतिक बदल आहे आणि विवेकानंदांच्या सगळ्या व्याख्यानांचा म्हणजे प्रॅक्टिकल वेदान्तावर विवेकानंदांची चार व्याख्याने आहेत त्या व्याख्यानांचा आणि इतर व्याख्यानांचा अभ्यास करून रामकृष्ण मठाने  एक यादी तयार केली आहे की यात विवेकानंदांना काय काय अपेक्षित आहे अशा आठ दहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामध्ये आर्थिक समृद्धीची इच्छा वाढली पाहिजे हे सांगितले आहे. सगळ्या जगातून नवीन गोष्टी स्विकारण्याची तयारी असली पाहिजे हे सांगितले आहे. आपल्या स्वतःच्या सगळ्या समाजाचा विचार करायला जमला पाहिजे सांगितले आहे. तर हा सांस्कृतिक बदल हा राष्ट्र घडणीसाठी आवश्यक आहे. इतर देशांमध्ये असा राष्ट्राकारणाचा विचार होतो का? राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृती असा विचार इतर देशांमध्ये होतो का? तर बहुतेक सर्व देशांमध्ये राजकारण व अर्थकारण यांचा विचार होतो. बाकी सर्व विचार हा लोकांमध्ये काही चळवळी होत असतात त्यातून हळूहळू त्या देशात वातावरण तयार होते आणि बदल होत जातो. पण असा लोकांमध्ये विचार होत जातो आणि त्यातून चळवळी होत जातात याच्यातच तो समाज राष्ट्र म्हणून घडलेला आहे हे व्यक्त होते. अविकसित देश आहेत, त्याच्यात अलीकडेच एक पुस्तक प्रसिद्ध झालय की क्युबा आणि भूतानमध्ये कसे बदल झालेत? तर तेथील राजकीय सत्तेने ठरवले हे बदल केले पाहिजेत म्हणून हे बदल झालेत. वागण्यामध्ये बदल झालेले दिसतायत; पण विचारांमध्ये झालेत की नाही ते सत्तेचा दट्ट्या दूर झाल्याशिवाय कळणार नाहीत. सत्तेचा दट्ट्या आहे तोपर्यंत लोक वागतायत; पण भूतानचा राजा बदलला अथवा क्युबाचा हुकुमशहा बदलला तर मग तिथे काय होईल ते आज सांगता येत नाही, सत्तेच्या दट्ट्याने झालेले बदल हे वैचारिक बदल असतात असे नाही त्यासाठी संस्कृतीकरण करावे लागते.

भारतातला राष्ट्रविचार म्हणजे चार विचारप्रवाह आहेत असे लोक म्हणतात. वैदिक काळापासून हे राष्ट्र आहे असे म्हणणारा एक विचारप्रवाह, हे अध्यात्मिक राष्ट्र आहे असे म्हणणारा दुसरा विचारप्रवाह, हे बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे असे मानणारा तिसरा विचारप्रवाह, आणि भारत हा आर्थिक महासत्ता बनू शकतो असे म्हणणारा चौथा विचारप्रवाह त्यामुळे ते राष्ट्र म्हणून आहेच आणि आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि योग्य निर्णय घेत गेलो आणि त्याची कार्यवाही झाली की भारत आर्थिक महासत्ता होत जाईल आणि तसे होणे म्हणजेच राष्ट्र म्हणून विकसित होणे हा चौथा विचारप्रवाह आहे आणि राष्ट्र म्हणून या चौघांच्या बाबतीत कुठली गोष्ट किंवा कुठले वर्णन हे योग्य ठरेल हे कशावर ठरवायचे तर हा सगळा एकच प्रदेश आहे येथे एकाच प्रकारचा समाज राहतो आणि त्यांची एकाच प्रकारची संस्कृति आहे असे जरी म्हंटले तरी या प्रदेशापुरता आम्ही विचार करीत नाही तर आमच्यासमोर उत्क्रांतीशील आदर्श आहे. म्हणजे आदर्श सुद्धा कसा उत्क्रांत होत जातो आणि तो आदर्श काय आहे तर सगळ्या मानव जातीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे हा आदर्श आहे आणि तो आम्ही जसे जसे राष्ट्र घडत जाईल तसे तसे स्पष्ट आणि नेमका होत जाईल आणि त्या आदर्शाकडे पाहून आम्ही सगळे एकत्र आलेले आहोत आणि राष्ट्र म्हणून झालेले आहोत, असा हा विचार जर का लोकांनी स्वीकारला तर या चारपैकी आम्ही कोण आहोत हे नेमके स्पष्ट होईल. नाहीतर तोपर्यंत हे चारही प्रकारचे प्रवाह देशामध्ये चालू राहतील आणि हे भारताचे वैशिष्ट्य आहे की अनेक विचारप्रवाह असूनही त्यातून हळूहळू एक रसायन तयार होत जाते आणि त्यातून भारताची ओळख पटते. तर असा हा राष्ट्रकारणाचा जन, देश, राजकारण, समाजकारण, अर्थकारण याचा आढावा मी थोडक्यात घेतला संस्कृतीचा थोडक्यात उल्लेख केला. पुढच्या भाषणामध्ये संस्कृती आणि परमार्थ विचार याच्या संबंधाने बोलीन.

प्रश्न – १. गांधीजींना पार्टीलेस डेमोक्रसी हवी होती आजच्या घडीला ते कितपत शक्य आहे?

उत्तर- असे व्हायचे असेल तर घटनेचा पुनर्विचार करायला लागेल. घटना नव्याने लिहायला लागेल. तसे झाले तर हे शक्य होईल. पण घटनेची कार्यवाही होऊ शकते, नाही ह्याचा आढावा घ्यायलाही आपण तयार नाही, मध्यंतरी वाजपेयी सरकारने असे करायचा प्रयत्न केला तर त्याला सर्व बाजूनी विरोध झाला. त्यामुळे घटनेचा पुनर्विचार करणे त्यात बदल करणे असं काही आज होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे आजघडीला हे अशक्यप्राय आहे असे मला वाटते.

  1. Party less Democracy सारखा हा दुसरा प्रश्न आहे. Elements thoughts mentioned seem ideal as a national goal often criticized as utopian. Their implementation is fulfilling future India’s dream but what can be ways to tackle mentality that such ideals are not pragmatic which is crippling the very first initiation?

Utopia हा शब्द मुळातला चांगला आहे; पण आता आपण जरा तो कुचेष्टेच्या अंगाने वापरतो म्हणजे फारच स्वप्न आहे, दिवास्वप्न आहे अशा अर्थी; पण utopia म्हणजे भविष्य काळातील आदर्श स्थिती तर तीही vision आहे. ही प्रत्यक्षात येण्यासाठी आधी सगळ्या लोकांचे एकमत होऊ दे आणि मग सगळ्यांना ती vision मान्य झाल्यावर मग त्याच्यासाठी कार्यवाही सुरू होईल असे म्हंटले तर तसे कधीच होत नाही. काही लोकांना तरी ती पुरेशी आव्हानात्मक वाटली पाहिजे. त्यामुळे ते कामाला लागतात आणि असे जे कामाला लागतात, ते नेतृत्व करतात आणि त्यांनी नेतृत्व केल्यानंतर हळूहळू सगळ्या लोकांना ते समजत जाते आणि त्यामुळे बदल होतात. गांधीजींच्या सगळ्यात मोठ्या चळवळीमध्ये देशाच्या तेव्हाच्या तीस कोटी लोकांपैकी दीड दोन लाख लोक कैदेत गेले होते. म्हणजे काहीजणांनी निदर्शने केली, सत्याग्रह केले ते पोलिसांना सापडले नसतील. सगळी मिळून ती संख्या पाच लाखाच्यावर नव्हती; पण तेवढ्यामुळेही देशाचे वातावरण बदलू शकते. त्यामुळे सगळ्यांनी initiative घेतलाय असे कधीच नसते म्हणून तर नेतृत्वाची गरज असते. Such ideals are not pragmatic असे म्हणणारे ते pragmatic आहे असे दिसायला लागेपर्यंत थांबतात आणि मग त्यात सहभागी होतात. आत्ता जसे सगळ्या पक्षांकडून भा.ज.पा.कडे लोंढा चालला आहे ते pragmatic, आणि आहे त्याच पक्षाकडून  पुन्हा पुन्हा निवडणुका लढवत राहणे म्हणजे utopian. तर राजकारणात असते तसेच देशाच्या बाबतीत विचार करतानाही तसेच असते. आदर्श भविष्यवाद हा स्वप्नवतच वाटतो पण काहीजणांना तो सत्यात येईल त्याच्यासाठी मी भविष्य खर्च केले पाहिजे असे वाटते ते पुढे येतात नेतृत्व करतात. त्यांच्यामुळे हळूहळू बाकीचे हलायला लागतात. which is crippling the very first initial that such ideas are not pragmatic त्यामुळे ह्या mentality मुळे काहीजणांच्या बाबतीत ते crippling mentality होते; पण सर्वजणांच्या बाबतीत नाही. म्हणून तर आजही देशात नवीन स्टार्टअप सुरू होतात, त्यांचे स्वप्न असते, वाटते माझी कल्पना भारी आणि त्यातून मी पैसे मिळवू शकेन. कुठूनतरी venture capital मिळवीन आणि करीन. स्टार्ट अप घेणे म्हणजे utopia साठी झोकून देणे. तसे स्वतःच्या कल्पना नाही तर देशाच्या बाबतीतील कल्पनांबाबत असे विचार करणारे असतात आणि ते हळूहळू बाकीच्या लोकांचे मतपरिवर्तन करीत जातात.

३. जागतिकीकरण व आत्ता येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र ही संकल्पना किती तार्किक ठरते?

तार्किक आहे की नाही मला माहित नाही; पण व्यवहार्य आहे. कालच मोदींचे भाषण तुम्ही पाहिले असेल. युनोच्या आमसभेत काय होते तर चर्चा होतात. कार्यवाहीचे निर्णय त्या त्या देशाला घ्यायला लागतात. त्यामुळे जोपर्यंत निर्णयाचे केंद्र राष्ट्र आहे, तोपर्यंत अशा जगामध्ये आपल्यालाही राष्ट्र म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवावे लागेल. युरोपिअन युनियनचा एक प्रयोग झाला. युरोपिअन युनियनला किती सामर्थ्य आहे आणि त्या त्या देशाच्या पार्लमेंटला किती सामर्थ्य आहे हे आपण पाहतोच. त्यामुळे जागतिकीकरण आर्थिक बाबतीत झालय, तसेच ते आर्थिक-सामाजिक बाबतीतही होईल, संस्कृतीच्या बाबतीतही होईल हेही एक आदर्श आहे. होणार असेल तर आपल्या एका राष्ट्राचे झगा उतरवून ठेवून आपण पृथ्वीवासी म्हणून राहू,पण ते तसे होईपर्यंत आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपल्या राष्ट्राचा झगा घालायला लागेल आणि तो घातला की त्याप्रमाणे वागायला लागेल. त्यामुळे जागतिकीकरण असेल,चौथी औद्योगिक क्रांती असेल तरीसुद्धा जोपर्यंत आर्थिक बाबतीतले निर्णय संरक्षणाच्या बाबतीतले निर्णय आणि एखादी गोष्ट आपल्या देशात येऊ द्यायची की नाही याचे निर्णय, जागतिकीकरण होतंय तरी आयातीला बंदी घाला, आयात शुल्क वाढवा निर्यात शुल्क कमी करा अशा पद्धतीने देश आपले विषय मांडीत असतात. त्यामुळे आर्थिक राष्ट्रवाद हा स्वतंत्रपणे चालू असतो आणि त्यात अनेक घटक आहेत अर्थकारणातले. ते सगळे जागतिकीकरण एकदम होईल असे नाही. काही बाबतीत त्या त्या देशाला आपला विचार करायला लागेल, असे अर्थतज्ञ मांडतायत आणि त्यामुळे आर्थिक जागतिकीकरण झाले तरी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व्हायला खूप वेळ लागणार आहे. राष्ट्रामध्ये हे सगळे पैलू येत असल्याने राष्ट्र ही कल्पना तार्किक आहे की नाही मला माहित नाही; पण आवश्यक आहे व्यवहार्य आहे असे मला वाटते.

४.भारताच्या विकासासाठी भारतीय भूमितूनच आलेल्या विचारांचा आधार का घ्यायचा? टर्की आणि जपान यांनी पाश्चात्य modernism विचार घेतला आणि राबवंला आणि आपली प्रगती केली असे आपण का करू नये?

उत्तर- तुर्कस्थानच्या बाबतीत रशियन क्रांती झाली आणि बदलले असे वाटले; पण सत्तर वर्षाने क्रांती फेल गेली तसे तुर्कस्थानच्या बाबतीतही केमालपाशाने क्रांती केली सेक्युलारीझम तेथे आणला तरी आज तेथे मुलतत्ववादी सरकार तेथे आलेले आहे. क्रांतीच्या स्वरुपात केलेले वरवरचे बदल हे टिकवू असतातच असे नाही. लोकांमध्ये आतून बदल व्हावे लागतात. जपानमध्ये जो बदल झाला तो एकतर त्यांनी स्वतःहून करायचे ठरवले आणि त्यातले आपल्या देशाच्या संस्कृतीतल्या कुठल्या गोष्ठी बदलायच्या आणि कुठल्या नाही बदलायच्या हे त्यांचे ते निर्णय घेत गेले. त्यामुळे बाहेरच्यांचे काय स्वीकारायचे आणि काय नाही याचा विचार त्यांचा झाला होता. त्यामुळे ते यशस्वी झाले तर आपल्यालाही असेच करावे लागेल आपल्या देशातल्या कोणत्या गोष्टी टिकवून ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि त्याएवजी बाहेर ज्या गोष्टी आहेत त्या स्विकारायच्या हे करायला लागेल. त्यामुळे बाहेरच्या भूमीतल्या कल्पना घ्यायच्याच नाहीत असे नाही. अनेक कल्पना आपल्याला स्वीकारायला लागतील, परंतु आपल्या देशातल्या कल्पना सगळ्या सोडून देता येत नाहीत. त्या सोडायच्या झाल्या तर हळूहळू लोकांची तयारी व्हायला लागते, त्या सगळ्या सोडायची आवश्यकता नसते काही धरून ठेवल्या तर ती आपली ओळख म्हणून राहते. त्यामुळे तुर्की आणि जपान मधील चर्चेचे उदाहरण हे थोडेसे निसरडे आहे असे मला वाटते. जपानमध्ये तो स्वयंनिर्णय होता की काय स्वीकारायचे आणि आपले काय ठेवायचे, तसा आपलाही स्वयंनिर्णय असेल बाहेरच्या काय कल्पना घ्यायच्या आणि आपल्या काय टिकवून ठेवायच्या.

५.राष्ट्रकारण वगैरे विचार करणारे कायम धुरिणांपर्यंत पोचू शकतात का?असा अनुभव आहे का?त्यासाठी कशा प्रकारे काम होऊ शकते? समाजातील बरेच घटक हा विचार करण्यासही असमर्थ आहेत तर त्यासाठी आपण काय करू शकतो?

उत्तर – समाजातील बरेच घटक हा विचार करण्यास असमर्थ आहेत हे तर खरेच आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या समर्थ केले पाहिजे. रोजच्या जेवण्याची त्यांची चिंता मिटली की ते बाकीचा विचार करू शकतात. आधी त्यांचे शिक्षण केले पाहिजे ते फक्त लौकिक शिक्षण करून चालणार नाही. त्याच्याबरोबर त्यांचे वैचारिक शिक्षणही करायला लागेल. संकल्पना वेगवेगळ्या त्यांना शिकवायला लागतील, अमूर्त संकल्पनाही शिकवाव्या लागतील आणि तसे झाले तरच राष्ट्रकारण वगैरे विषय त्यांना समजतील. तर आता हे धुरिणांपर्यंत पोचतातच का विषय! तर धुरीण कोण हे आपण ठरवायला लागेल. त्या त्या वेळचे राजकीय नेते हेच धुरीण आणि त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे, तर अर्थक्रांतीमध्ये अनुभव घेतात पोचायला किती वेळ लागतो. त्यामुळे आमच्या देशात आम्हीच सरकार तसे आमच्या देशात आम्हीच धुरीण आहोत. त्यामुळे आम्ही करायचा ठरवलाय हा बदल म्हणून करायचे, एकाची शक्ती अपुरी पडली तर शंभरजणांनी एकत्र यायचे याला संघटना असे म्हणतात. त्यामुळे राष्ट्रकारण करताना राष्ट्रात काय बदल करायचे याचा विचार करायचा,आम्हीच घडवून आणणार आहोत आम्हीच धुरीण आहोत. ‘धुराच करून सोडायचे सकलजन’ असे रामदासांनी म्हंटले आहे. बदल घडवून आणायचं असेल तर कोणालातरी एकाला तो करेल असे म्हणून चालत नाही तर आम्ही या देशाचे कर्तेधर्ते आहोत असे म्हणायला लागते. आणि एकाचा आवाज कमी पडला तर अनेकांनी यावे लागते त्यामुळे संघटना आणि विचारामध्ये लवचीकता, आधुनिकता, प्रागतीकता असणे हे दोन्ही केले तर बदल घडू शकेल. त्याच्यामागोमाग राजकीय नेत्यांना यावे लागेल. याचे एक उदाहरण माझ्या पाहण्यात आलेले आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल  म्हणजे शेतकरी संघटना सुरु झाली ती शेतमालाला आर्थिक भाव मिळाला पाहिजेल म्हणून आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय म्हंटल्यावर सगळ्या आर्थिक पक्षांनी ठरवून टाकले शेतमालाला आर्थिक भाव मिळाला पाहिजे आणि त्या चळवळीतील हवाच निघून गेली. भाव मिळतोय का माहित नाही; पण त्या चळवळीतला जोर गेला. कारण त्या चळवळीने धुरिणांना आम्ही करायला लावू असे ठरवले तर धुरिणांना आम्ही करायला लावू असे न म्हणता आम्हीच धुरीण होऊ असे म्हणायला पाहिजे. असे म्हणूनच राष्ट्रामध्ये बदल होतील. छोट्या राष्ट्रांमध्ये हे बदल लवकर झाले. आपले फारच मोठे राष्ट्र आहे. त्यामुळे आपल्याला इथे वेळ लागेल तेवढा आपण येथे दम धरायची तयारी ठेवावी लागेल असे वाटते.

६.राष्ट्राकारणात बदल होण्यासाठी घटनेमध्ये काय बदल व्हावे लागतील? घटना ही राष्ट्रकारणासाठी  महत्त्वाची आहे का?

उत्तर- कालपरवाच लोकसत्तामध्ये लेख आला आहे. ब्रिटनमधल्या अकरा न्यायमूर्तीनी पंतप्रधानांचा निर्णय घटनाबाह्य  आहे असा दिला आणि येथे घटना नाही तरी हे घटनाबाह्य आहे असे ठरविले. म्हणजे अलिखित घटना आहे याचा अर्थ घटना कागदावर असणे ही नंतर झालेली सुधारणा आहे. पहिल्यांदा जिथे घटना झाली ती अलिखीतच आहे. परंपरेतून ठरत गेले की कशाला प्राधान्य द्यायचे त्याचे काय महत्त्व करायचे. त्यामुळे लिखित किंवा अलिखित घटना असणे देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी आवश्यकच आहे. अलिखित असण्यापेक्षा लिखित असणे उपयुक्त आहे असे मला वाटते. त्यात बदलही करता येतात. आपल्या घटनेत आपण शंभरपेक्षा जास्त बदल केले आहेत. घटना असल्यामुळे आपण हे बदलायचे, हे नाही बदलायचे हे ठरवू शकलो. आता राष्ट्रकारणात बदल होण्यासाठी काय बदल व्हावेत तर आत्तापर्यंत जे बदल झाले. त्यामुळे आपले राष्ट्रकारण बदलतच आहे. त्यामुळे आत्ता जे घटनेत दिले आहे, दोन तृतीयांश राज्यांनी त्याला संमती दिली पाहिजे. घटनेने लोकसभेत राज्यसभेत त्याला संमती मिळाली पाहिजे ही घटना बदलाची एक पद्धतच आहे. काय बदल करायला पाहिजेत हे सुचविण्याचे काम मात्र आम्ही या राष्ट्राचे धुरीण आहोत म्हणणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे. लोकासभेचे खासदार, आमदार आणि त्या त्या पक्षाचे प्रमुख ज्यांच्याकडे सर्वाधिकार दिलेले आहेत त्यांनी ते बदल करावेत असे म्हणू नये असे मला वाटते. काय बदल व्हावेत हे मी सांगण्याइतका माझा अधिकार नाही. घटना मी एकदा वाचलेली आहे मधून मधून पाहतो. बदल झालेत हे पाहण्यासाठी त्याचा अभ्यास करणारेच लोक लागतील आणि त्यांनी ते सुचवायला लागतील आणि ते राजकारण्यांना सुचवायचे का समाजातल्या लोकांना सुचवायचे हा त्यांच्या त्यांच्या शैलीचा फरक आहे. म्हणजे माहितीच्या अधिकाराचा कायदा कसा आला? राजकारण्यांना काही तो नको होता. पण तो आला कारण समाजात तसे वातावरण तयार झाले. आज केजरीवाल कसेही असले तरी त्यावेळी त्यांनी चांगले काम केले होते. त्याची चळवळ त्यांनी, अण्णा हजारेंनी अनेक कार्यकर्त्यांनी चालवली लोकमताचा रेटा तयार झाला आणि तो कायदा तयार झाला. कायदा होऊ शकतो तसा घटनेतील बदलही लोकमताच्या रेट्याने, प्रशिक्षित लोकमताच्या रेट्याने होणे अधिक चांगले असे मी म्हणेन आणि काय बदल व्हावेत हे घटनेचा अभ्यास असणाऱ्यांनी, घटनेत बदल करून आम्ही राष्ट्रकारण करू असे म्हणणाऱ्यांनी करावेत असे वाटते.