आध्यात्मिक राष्ट्रयोग

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला- भाग  ३- आध्यात्मिक राष्ट्रयोग

(कृपया नोंद घ्यावी मा. श्री. गिरीशराव बापट यांच्या ‘राष्ट्रविचार, राष्ट्रकारण आणि राष्ट्रयोग’ या  व्याख्यानमालिकेतील तिसऱ्या व्याख्यानाचे व त्यासंदर्भातील प्रश्न उत्तरांचे शब्दांकन करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. हे शब्दांकन मा. गिरीशरावांकडून तपासून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यामध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात काही शंका असल्यास ‘ई-मेल’ च्या माध्यमातून त्या उपस्थित करण्यास हरकत नाही.)

राष्ट्रविचार, राष्ट्रकारण आणि राष्ट्रयोग व्याख्यानमाला – व्याख्यान तिसरे

आध्यात्मिक राष्ट्रयोग

वक्ते – डॉ. गिरीश बापट, संचालक, ज्ञान प्रबोधिनी

राष्ट्रविचारावरच्या व्याख्यानमालेतील हे तिसरे व्याख्यान आहे. काही जणांनी आधीची २ व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली असतील, काही जणांनी YouTube वर ऐकली असतील. काही जणांची ऐकायची राहिलेली असतील. ‘राष्ट्रविचाराला छेद देणाऱ्या आधुनिक विचारधारा/विचारसरणी/विचारप्रवाह’ असं जे पहिलं व्याख्यान होतं त्याच्यामध्ये चार आधुनिक विचारधारांचा थोडक्यात परामर्श घेतलेला होता आणि ज्याच्यात व्यक्तीला प्राधान्य आहे तिथपासून साऱ्या सृष्टीला प्राधान्य आहे अशी विविध प्रकारची प्राधान्य असलेल्या या विचारधारा होत्या. उत्तर आधुनिकतावादामध्ये याचं एक मुख्य लक्षण मी सांगितलेलं होतं की ‘वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यक्तीनिष्ठतेला महत्त्व’. त्यामुळे त्यांची जर का श्रेणी मांडायची म्हटली तर व्यक्तीला प्राधान्य देणारा असा हा उत्तर आधुनिकतावाद, दुसऱ्या क्रमांकावरती पर्यावरणीय स्त्रीवाद मी मांडीन. मुख्यत: स्थानिक स्तरावरती महिलांच्या समस्यांकडे कसं बघावं, महिलांच्या समस्या आणि पर्यावरणाच्या समस्या या कशा एकत्र जोडलेल्या आहेत, याबद्दलचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. तिसरं मुक्तीचं धर्मशास्त्र. देशांतर्गत विचार करायचा झाला की देशाच्या काही घटकांच्या बाबतीत मुख्यत: वंचित घटकांच्या बाबतीत आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धर्माचा मुख्यत: ख्रिश्चन धर्माचा आणि भारतामध्ये बौद्ध विचाराचा देखील कसा उपयोग करता येईल, आंबेडकरांच्या विचारांचा कसा उपयोग करता येईल, हे त्या मुक्तीच्या धर्मशास्त्रामध्ये पाहिलं जातं. या तिन्हीच्या नंतर राष्ट्राचा विचार येतो असं मला वाटतं. मुक्तीच्या धर्मशास्त्राचा दुसरा एक भाग आहे की जो रोमन कॅथोलिक पंथाचे जे मुख्य व्हॅटीकनचं जे केंद्र आहे त्या केंद्राने नियंत्रित केलेला आहे त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय परिमाण आहे, असा भाग येतो त्यामुळे विविध देशांमध्ये या ज्या चळवळी चाललेल्या आहेत मुक्तीच्या धर्मशास्त्राच्या नावाने त्याचं सुसूत्रीकरण व्हॅटीकनच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्नही चालू असतो आणि मग त्यातलं शेवटचं म्हणजे सखोल पर्यावरणवाद. सगळ्या सृष्टीचा आणि सगळ्या निसर्गाचा माणूस हा एक भाग आहे आणि माणसाने स्वत:ला काही वेगळं स्थान आहे, श्रेष्ठत्व आहे असं न मानता या सगळ्या सृष्टीचा आपण एक भाग आहोत असं मानून आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची रचना केली पाहिजे असं ते सांगतात. आता ही श्रेणी पाहिली तर त्याच्यामध्ये राष्ट्रविचार हा साधारण मधोमध आहे आणि व्याख्यानाचं शीर्षक देताना राष्ट्रविचाराला छेद देणाऱ्या विचारसरणी असं जरी म्हटलं असलं तरी आजच्या व्याख्यानाचा ‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ हा विषय जर घ्यायचा झाला तर मी म्हणीन की या सगळ्या विचारसरणींमध्ये काहीतरी राष्ट्रविचाराला घेण्यासारखं आहे की नाही, तर असं काही ना काही प्रत्येकातून घेता येईल त्यामुळे त्यांच्याकडे छेद देणाऱ्या असं पाहण्यापेक्षा की या वेगळ्या विचारसरणी आहेत त्यांच्यातून राष्ट्रविचाराला पुढावा देणारं आपल्याला काही घेता येईल का? त्यातला तथ्यांश घेऊन राष्ट्रविचार अधिक बळकट करता येईल का? असा विचार करणेही शक्य आहे आणि असा विचार करायला लागलो की राष्ट्रविचारामध्ये समावेशकता किंवा स्वीकारशीलता येते आणि तो समग्रतेचा एक पैलू आहे असं मला वाटतं.

दुसरं व्याख्यान जे होतं ‘राष्ट्रकारणाची विविध अंगे’. त्या व्याख्यानामध्ये फक्त भारताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर जे राजकीय पक्ष आपल्या राजकारणासाठी हिंदुत्व हा विचार मांडत असतात, त्याची काही माहिती आपण घेतली. १९९१ सालानंतर ज्या काही आर्थिक सुधारणा भारतामध्ये झाल्या तर ते आर्थिक राष्ट्रवाद मांडणारे किंवा अर्थकारण जर उत्तम पद्धतीने केले तर देशाची प्रगती होत राहते, जसं आपण आज ऐकतो की ५ कोटी लाख रुपयांचा भारताची उलाढाल व्हायला लागली (५ ट्रीलीयन असा शब्द आपण सारखा ऐकतो आहे) की जणूकाही भारताचे सगळे प्रश्न संपले असा आर्थिक राष्ट्रवादाचा विचार करणारे लोक असतात. राजकीय राष्ट्रवादाचा विचार करणारे म्हणजे आता ३७० कलम रद्द झालं, आयोध्येचा प्रश्न सुटला म्हणजे झालं, आता देशाचं भलं होणार असा फक्त एकेका अंगाचा विचार करणारे जे असतात त्यांना असं वाटतं की तेवढ्यावरच आपली शक्ती जर केंद्रित केली तर आपलं राष्ट्र पुढे जाणार आहे. राजकीय, आर्थिक असतात तसे सामाजिक प्रश्नही असतात, सांप्रदायिक प्रश्नही असतात, सांस्कृतिक प्रश्नही असतात आणि त्या त्या क्षेत्रात आपण जारीने, नेटाने काम करत राहिलो तर त्याच्यातून देशाचा विकास होणार आहे, देशाची प्रगती होणार आहे, असं मानणारे वेगवेगळे गट आपल्या देशामध्ये आहेत. हे राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे एकूण राष्ट्रकारणाचे काही पैलू आहेत, त्याची काही अंगे आहेत, असं पाहिलं तर या सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य आहे. सगळ्यांचा विचार करणं म्हणजे सर्वंकषता. समग्रतेचा तोही एक पैलू आहे, असं आपल्याला म्हणता येईल.

पूर्वी राजकीय, आर्थिक, सामाजिक असाच विचार करायचे; पण आत्ता तंत्रज्ञानामुळे देशाच्या परिस्थितीत उलथापालथ होऊ शकते. एकदम नवीन तंत्रज्ञान आले आणि सध्या एक गट प्रबोधिनीमध्ये disruptive technologies की, ज्या तंत्रज्ञानांमुळे आहे ते सगळे बदलू शकते त्यांचा अभ्यास करतो आहे. हा एक अनुभव आपण सध्या घेतच आहोत. सगळी वाहननिर्मिती, वाहनांची विक्री थंडावलेली आहे आणि त्याची विविध कारणे आहेत आणि त्यामध्ये एक म्हणजे आत्ता इलेक्ट्रिक कार येणार आणि पेट्रोलियमवर चालणारी वाहने बंद पडणार अशी भीतीची लहर सगळीकडे पसरली आहे आणि त्याचाही परिणाम होतो आहे. जसा कुठल्याही राजकीय घटनेचा परिणाम स्टॉक मार्केटवर होतो, तसा या तंत्रज्ञानातल्या सुधारणेचा परिणाम उद्योगजगतावर होतो, त्याला disruptive technology म्हणायचं. त्याच्यामुळे अर्थकारणावरती परिणाम होतो, त्यामुळे तंत्रज्ञान हे अर्थकारणामध्ये घ्यायला हरकत नाही आणि विज्ञानामधली संशोधनातली प्रगती हा सांस्कृतिक भाग म्हणून घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. पण राष्ट्रकारण ज्यांना करायचं आहे त्यांना या सर्वच अंगांचा एकत्र विचार करायला यायला पाहिजे आणि सुटा सुटा विचार करणं हे काही वेळा अडचणीचे ठरू शकतं.

आणि मग आजच्या व्याख्यानाचा विषय आहे ‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’. आजपर्यंत आपण ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग असे शब्द ऐकलेले आहेत. राष्ट्रयोग हा त्याच चालीवरचा शब्द आहे. ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाच्या मार्गातून अंतिम सत्याशी किंवा आपल्या मूळ स्रोताशी जोडलं जाणं. कर्मयोग म्हणजे काय तर कामात मग्न राहून कामाच्या मार्गाने अंतिम सत्याशी किंवा आपल्या मूळ स्रोताशी जोडलं जाणं. भक्तीयोग म्हणजे काय तर भक्तीच्या मार्गाने अंतिम सत्याशी किंवा आपल्या मूळ स्रोताशी जोडलं जाणं. तसा ‘राष्ट्रयोग’ हा शब्द तसा मध्यम पदलोकी आहे. नुसतं राष्ट्र असं म्हणून पुरणार नाही, तर तो राष्ट्रसेवायोग किंवा राष्ट्रअर्चनायोग किंवा राष्ट्रचिंतनयोग आहे,  राष्ट्रभक्तीयोग आहे. आपल्या चिंतनाचा, भक्तीचा, अर्चनेचा, सेवेचा या सगळ्याचा विषय राष्ट्र असला तर त्या राष्ट्रसेवेच्या, राष्ट्रचिंतनाच्या मार्गाने मूलतत्त्वाशी जोडलं जाणं शक्य आहे, अशी संकल्पना म्हणजे राष्ट्रयोग. सुरुवातीचे जर का व्याख्यानांचे विषय पहिले तर राष्ट्रविचाराशी इतर विचारांची तुलना त्यात होती, हा मुख्यत: ज्ञानाचा मार्ग आहे. राष्ट्रकारण हा विविध क्षेत्रांतील उलाढालींचा मार्ग हा कर्ममार्ग आहे आणि राष्ट्रयोग हा चिंतन, सेवा, अर्चना या सगळ्यांचा एकत्र जाणारा समग्र मार्ग आहे. त्यामुळे समग्रता, सर्वंकषता, समावेशकता त्याचबरोबर एकात्मता हे सगळे शब्द आपण एकत्र वापरायला लागलो म्हणजे ज्यांना अजून ध्यानधारणेच्या क्षेत्रात शिरायचं नाही त्यांच्यासाठी समावेशकता, सर्वंकषता, समग्रता, एकात्मिकता म्हणजे आध्यात्मिकता असं मी म्हणतो. आणि आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणजे असा राष्ट्राच्या संदर्भात समग्र विचार करत राष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून आपले सर्वप्रकारचे व्यवहार करणं. आध्यात्मिक म्हणजे आजच्या भाषणापुरते समग्र आणि योग म्हणजे अंतिम सत्याशी किंवा मूळ स्रोताशी जोडलं जाणं, असं मी आत्तापर्यंत सांगितलं.

राष्ट्राबद्दल काय म्हणायचंय? आध्यात्मिक आणि योग या दोन शब्दांच्या मध्ये राष्ट्र हा शब्द आलेला आहे. आपल्याकडे संत्रिकेमध्ये ज्या वेगवेगळ्या पोथ्या आपण करतो त्यातली एक वेदपूजनाची पोथी आहे. ती वेदपूजनाची पोथी तयार होत असताना त्याची बहुतेक सगळी प्रारूपे मी पाहिलेली होती. पण त्याच्यात अजून एक श्लोक आहे हे माझ्या ध्यानात राहिलं नव्हतं. इतर वाचनातून संदर्भ बघता बघता एक श्लोक समोर आला आणि तो बघायला आणि त्याचे संदर्भ बघायला मी संत्रिकेत गेलो आणि पहिला शब्द वाचताच मनीषाताई आणि आर्याताईंनी पूर्ण श्लोक मला म्हणून दाखवला.आपल्या वेदपूजनाच्या पोथीत आहे, जिथे कुठे जातील तिथे आपले पुरोहित हा श्लोक म्हणत असतात. म्हटलं ‘ठीक आहे’ म्हणजे पुरोहितांना देखील राष्ट्रकार्याशी जोडायला हा चांगला श्लोक आहे. अथर्ववेदातला श्लोक आहे. श्लोक असा आहे –

ॐ भद्रमिच्छन्त ऋषय: स्वर्विदस्तपो दीक्षामुपनिषेदुरग्रे |

ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसंनमस्तु || (अथर्व. १९.४१.१)

भद्रमिच्छन्त म्हणजे कल्याण इच्छिणाऱ्या, स्वर्विद: ऋषय: म्हणजे आत्मज्ञानी ऋषी, म्हणजे कल्याण इच्छिणाऱ्या आत्मज्ञानी ऋषींनी… ‘तपो दिक्षाम् उपनिषेदुरग्रे’ – अग्रे म्हणजे आधी ताप आणि व्रतांचे अनुष्ठान केलं. ‘ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं’ म्हणजे त्यापासून राष्ट्र, बल आणि सामर्थ्य सिद्ध झालं.तदस्मै देवा उपसंनमस्तु’ म्हणजे त्या राष्ट्रापुढे ज्ञानी लोक नम्र होतात. वेदातलं संस्कृत आहे त्यामुळे लोक आपल्याला पाहिजे तसे अर्थ वळवत असतात. मला त्यातल्या त्यात जो सोयीचा अर्थ वाटला तो अर्थ मी स्वीकारलेला आहे. आता तपश्चर्येने आणि व्रताचं अनुष्ठान करून राष्ट्र सिद्ध झालं म्हणजे अर्थातच त्या देशात राहणाऱ्या लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली, आपण सगळे एका राष्ट्राचे आहोत अशी भावना निर्माण झाली. असा अर्थ त्या वेदपूजनाच्या पोथीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली असं दिलेलं आहे. ही भावना प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते असं या श्लोकातून कळतं. ऋषींनी तप केलं, व्रताचं अनुष्ठान केलं आणि त्यातून ही राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आत्मज्ञानी झालेल्या ऋषींनी…तो ही शब्द जरा लोक सध्या दूर ठेवू या असं म्हणतात. आता त्याच्यासारखाच एक शब्द पण प्रबोधिनीत २०-२५ वर्षांपूर्वी जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांना पाठ करावा लागायचा असा एक उतारा विवेकानंदांचा होता की प्रत्येकाने ‘मंत्रद्रष्टा’ झाले पाहिजे. ऋषी कोण तर ज्याला मंत्र दिसतात तो ऋषी. वेदामधले मंत्र हे ऋषींना दिसलेले आहेत आणि पूर्वीच्या काळात मंत्रद्रष्टे झाले मग आज काही होणार नाहीत का? होऊ शकतील आणि आपल्यापैकी प्रत्येकजण होऊ शकेल. तो परिच्छेद आपण प्रबोधिनीत सगळ्या विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगायचो. हल्ली निगडीत मधूनमधून काही तुकड्यांतून पाठ करतात की, प्रत्येकाने मंत्रद्रष्टा झाले पाहिजे. ‘आत्मज्ञानी ऋषींनी’ च्या ऐवजी ‘मंत्रद्रष्ट्या ऋषींनी’ असे म्हटले तरी चालेल, असं मला वाटतं. मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लोककल्याण्याच्या इच्छेने आपल्या तपाने, आपल्या प्रयत्नाने राष्ट्र घडवलं. मला वाटतं की राष्ट्र एकदा कधीतरी घडलं की कायम तसंच राहातं असं नाही. पिढ्या बदलत जातात, लोक बदलत असतात समाजातले, त्यांच्यापुढे वेगवेगळी आकर्षण येतात त्यामुळे आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत आहोत ही भावना कमीअधिक बळकट होऊ शकते. कधी अगदीच ते विसरल्यासारखं होतं मग पाकिस्तानचं लष्करी किंवा चीनचं आर्थिक आक्रमण झालं किंवा चांद्रयान कोसळतंय असं झालं की ते सगळं एकवटतं. म्हणजे ती भावना आहे; पण ती चंद्राच्या कलांप्रमाणे पौर्णिमा ते अमावस्या वरखाली होऊ शकते. त्यामुळे राष्ट्र घडविण्याचं कामसुद्धा सतत करत राहावं लागतं आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करणं म्हणजेसुद्धा राष्ट्रयोग, असं मला वाटतं. आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी   इच्छा म्हणजे माझी-तुझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या पक्षाचं असं नाही. म्हणजे महिला राखीव जागा असं आलं की माझी बहीण, वहिनी उभी राहणार हे झालं स्वत:चं कल्याण. पण सर्व समाजाचं कल्याण व्हावं अशा इच्छेने तो राष्ट्रयोग आचरला जातो, तो आध्यात्मिक राष्ट्रयोग. त्या आध्यात्मिक राष्ट्रयोगाचे आचरण जर का करायचे असेल तर प्रत्येकाच्या पुढे आपणही मंत्रद्रष्टा होऊ शकू असा आशावाद पाहिजे आणि मला मंत्रद्रष्टा व्हायचंय अशी इच्छा त्याच्यामध्ये पाहिजे. अशी इच्छाही सगळ्यांच्या मध्ये एकदम निर्माण होईल का? आणि ती टिकून राहिलं का? तर व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात. व्यक्तीच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे – ‘निर्वाहापुरते अन्न-आच्छादन, आश्रमाचे स्थान कुपी-गुहा’. म्हणजे निर्वाह चालण्यापुरते अन्न मिळाले, एवढे कपडे मिळाले, तेव्हढे छप्पर मिळालं मग एखादं खोपटेसुद्धा चालेल, गुहासुद्धा चालेल. निसर्गापासून थंडीवाऱ्यापासून, उन्हापासून संरक्षण मिळालं म्हणजे झालं. तर याच्यावरही समाधानी असणारे लोक असतात. तुकाराम महाराज तसे समाधानी नव्हते; म्हणजे एवढं मिळालं तरी चालेल मला बाकीचं काही करायचं आहे, असा तो अभंग आहे. पण याच्यावर समाधानी असतात किंवा एवढं झालं तरी खूप अशी परिस्थिती ज्यांच्यावर असते आणि त्याच्यासाठीच ते धडपड करत असतात. मग राष्ट्रामध्ये ‘निर्वाह चालावा’ याच्यासाठीच धडपड करणारे लोक असणार. त्यातल्या काही लोकांना हा निर्वाह चांगला चालावा यासाठी मी काहीतरी शिकलं पाहिजे, मी काहीतरी कौशल्ये मिळवली पाहिजेत, ज्ञान मिळवलं पाहिजे, संधी शोधल्या पाहिजेत, माझ्यासमोर येईल ते काम मी करीन असं म्हणण्यापेक्षा मला जे पाहिजे ते काम शोधीन आणि करीन, असं म्हटलं पाहिजे. म्हणजे काहीतरी उद्दिष्टं त्यांच्यासमोर असायला हवं. आणि असतं अनेकांच्या पुढे…हल्ली त्याला ambition असं काहीतरी म्हणतात. महत्त्वाकांक्षा काहीतरी लागते. नुसता निर्वाह नाही, मला आणखी काहीतरी करायचं आहे. निर्वाहापुरता विचार करणारे काहीजण असतात. काही समोर उद्दिष्ट ठेवून त्याच्यासाठी धडपडणारे असतात. मग मला चांगली नोकरी मिळावी, मला परदेशातील नोकरी मिळावी, अशी उद्दिष्टे असू शकतील. म्हणजे व्यक्तिगत उद्दिष्टेही असू शकतील. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी असाही विचार करणारी उद्दिष्टेही असू शकतील. पण हे उद्दिष्ट ठेवून मी का काम करायचं किंवा हेच उद्दिष्ट का ठरवायचं? तर त्या उद्दिष्टाच्या पलीकडे हेतूचा विचार लोक करतात. ज्यांना हेतू माहिती असतो त्यांची प्रेरणा दीर्घकाळ टिकते. जे उद्दिष्टांसाठी काम करतात त्यांना उद्दिष्टे गाठल्यावर आता पुढे काय असा प्रश्न पडतो; पण ज्यांचा हेतू निश्चित असतो त्यांना एक उद्दिष्टं गाठल्यावर दुसरं उद्दिष्टं सुचते. त्याच्यासाठी ते काम करायला लागतात. या निवडणुकीत पडलो तर पुढच्या निवडणुकीला निवडून येईन…काही करून सत्ता आपल्याला मिळवायची आहे हा हेतू असला की कुठल्या निवडणुकीत कसं उद्दिष्ट आपल्याला ठेवता येईल असा विचार करून लोक काम करत असतात. आणि हेतू ज्यांना सापडलेला आहे त्यांच्यापुढे काही वेळा प्रश्न असतो की या हेतूसाठी काम करू की त्या हेतूसाठी काम करू. बाहेरचं वातावरण असं आहे की प्रबोधिनीतील काही विद्यार्थी आणि कार्यकर्तेसुद्धा राष्ट्रासाठी काम का करायचं, मानवतेसाठी केलं पाहिजे, असं सहज म्हणू शकतात. म्हणजे राष्ट्रासाठी काम करायचं, का मानवतेसाठी करायचं या हेतूमध्येच द्वंद्व निर्माण होतं. आणि मग त्याच्यातली निवड करावी लागते म्हणजे त्यांना मूल्य द्यावं लागतं. मूल्यनिश्चिती करावी लागते आणि आपण जे मूल्य निश्चित करू त्याला चिकटून राहावे लागते. मूल्यनिष्ठा असावी लागते. आणि त्यामुळे निर्वाहासाठीच ज्यांची सगळी शक्ती खर्च होते आहे, बाकी काही विचार करू शकत नाही, असेही लोक असतात. स्वत:पुरतं आणि छोट्या-मोठ्या गटापुरतं उद्दिष्टं ठेवून काम करणारे लोक असतात. ज्यांच्या मनात काहीतरी निश्चित हेतू आहे, असे लोक असतात. आणि ज्यांची काही मूल्यं निश्चित झाली आहेत आणि त्या मूल्यांवरती निष्ठा ठेवून काम करणारेही लोक असतात. या सर्व टप्प्यांवरच्या व्यक्तींचा आणि समाजगटांचा समावेश आपल्या विचारात करणं म्हणजे सुद्धा राष्ट्रयोग करणं हे सगळे आपल्या राष्ट्रातले लोक आहेत. तर त्या बाबतीतही समावेशक राहिलं पाहिजे आणि या सगळ्यांचा विचार करणं म्हणजे राष्ट्रयोग.

मग आध्यात्मिक राष्ट्र्योग म्हणजे काय?

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह । अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ।। (ईशोपनिषद्, मंत्र ११)

[यः विद्यां च अविद्यां च तत् उभयं सह वेद अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते ॥]

बरेच वेगळ्या लोकांनी केलेले त्याचे अर्थ वाचले; कोणी असा अर्थ केलेला मला सापडला नाही; पण मला अविद्या आणि विद्या याचा अर्थ करताना त्याच्यामध्ये आणखी एक शब्द घालावासा वाटतो. ‘अविद्या’ म्हणजे अपरा विद्या म्हणजे अलीकडची विद्या. विद्या म्हणजे परा विद्या म्हणजे पलीकडची विद्या. जे आपल्याला इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने कळू शकतं अशा सगळ्या विषयांचा अभ्यास म्हणजे अपरा विद्या किंवा अविद्या म्हणजे सगळ्या भौतिक विद्या. सगळी मानव्य शास्त्रे वगैरे कारण ती आपण आपल्या मन-बुद्धीचा विचार करून, त्यांचा वापर करूनच मिळवत असतो. इंद्रियांच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे असं जे काही आहे त्याचं ज्ञानही होऊ शकतं असं जे मानतात त्यांना त्याचं ज्ञान होतं, ती पराविद्या. आणि ‘यस्तद्वेदोभयं सह’ या दोन्हीला जो जाणतो. पुन्हा समग्रता आली. काहीजण फक्त अपराविद्येचा विचार करणारे असतात. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये ते अंधकारात जातात असं म्हटलेलं आहे. आणि काही फक्त पराविद्येचा विचार करणारे असतात ते त्याहून घोर अंधकारात जातात असंही म्हटलेलं आहे. पण या दोन्हीचा विचार जे करू शकतात ते अविद्येने म्हणजे अपरा विद्येने म्हणजे भौतिक विद्येने, विज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होतात आणि विद्येने किंवा पराविद्येनी म्हणजेच अध्यात्म विद्येने अमृतत्त्वाचा अनुभव घेतात म्हणजे त्यांची मृत्यूची भीती जाते. ‘तत् उभयं सह’ हे मूल्य ठेवून राष्ट्रविचार करणं. राष्ट्रकारण करणं म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोग.

मग हा राष्ट्रयोग आपण आचरणात आणायचा म्हणजे नेमकं काय करायचं. कारण आत्तापर्यंत केवळ वेगवेगळे शब्दच मी सांगत होतो. ‘आपण नेमकं काय करायचं’, हे त्याच्यामध्ये आलं असं नाही. आपल्यापैकी बरेचजण जे शब्द सध्या वापरतात अशा शब्दांमध्ये आता थोडंसं बोलतो. आपण ज्या काही कृती, हालचाली, उलाढाली करतो, अभियानं करतो, प्रकल्प करतो, त्या सगळ्यांमध्ये प्रेरणा कुठली असते? अशी प्रेरणांची एक शिडी एका मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे.  ५ टप्पे मांडलेले आहेत. तहान, भूक, झोप याची गरज निर्माण होते म्हणून काहीतरी कृती करतो. त्याही नैसर्गिक प्रेरणा आहेत. तिथपासून सुरुवात करून पाठ्यपुस्तकातला शब्द म्हणजे स्ववास्तविकीकरण आणि आपल्या बोली भाषेतील शब्द म्हणजे Self-Actualization. आता हे सगळं १९४१-४२ साली मांडलेलं आहे. अनेकांना या शिडीचा उपयोग होतो. त्यामुळे मी आज काय करायला पाहिजे याचे निर्णय घ्यायला किंवा इतरांना मार्गदर्शन करायला उपयोग होतो. पण शेवटी अनेक लोकांचे निरीक्षण करून त्याच्यातून मांडलेली ही कल्पना आहे, ती काही अंतिम नाही. त्यामध्ये बदल होऊ शकतात, भर घालता येऊ शकते. मग कोणी पाचाच्या ऐवजी सात टप्पे मांडलेले आहेत. पण आणखी एका पद्धतीने लोकांनी विचार केलेला आहे की राष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर Self-Actualization हे त्या शिडीचे वरचे टोक हे मानणेही बरोबर नाही कारण ज्या मॅस्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञाने हे मानलं त्यानीच त्याच्या पुढची पायरी अशी मांडली की त्याला Selfless-Actualization किंवा Creative Empathy असाही शब्द वापरलेला आहे. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. कारण ते मूळ मांडणीमध्ये नव्हतं त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना शब्द सुचत गेले पण मला जे काही मिळविण्यासारखं होतं ते मिळवून झालं, मला जे काही दाखविण्यासारखं होतं, करून दाखविण्यासारखं होतं, माझ्या शक्ती आणि गुणांची अभिव्यक्ती करायची होती, ती सगळी करून झाली,  आता मी का जगायचं? आता मी काय करायचंय असा प्रश्न ज्यांच्यापुढे पडतो त्या सगळ्यांना आता मी इतरांसाठी जगायचं ही दिशा दिली तरच त्यांच्या आयुष्याला पुढे अर्थ राहतो म्हणून ते Selfless-Actualization. ‘मी न एकटा माझ्यासोबत विहंगमाचे भव्य थवे’ त्यामुळे या सगळ्यांचा विचार आता मला करायचा आहे आणि त्या सगळ्यांसाठी माझ्या शक्ती कशा वापरता येतील, त्याचा प्रयत्न मी करायचा. पण ती मॅस्लोची शिडी सांगताना पहिल्या पाचच पायऱ्या सांगतात. सहावी नंतर त्याला पुरवणी जोडलेली असते. पण ज्यांनी समूहाचा, समाजाचा, राष्ट्राचा विचार केलेला आहे त्यांनी आणखी एक वेगळी शिडी मांडलेली आहे. बरं ती शिडी आहे का तिकाटणं हे अजून ठरवता नाही आलेलं. म्हणजे एका पाठोपाठ एक येतात का तीनही गोष्टी एकत्र चालल्या तर समाज, राष्ट्र स्थिर होतं ते अजून ठरवता नाही आलेलं. पण छान कल्पना आहे. त्याचा सगळ्यात खालचा पाया आहे Self-Actualization. त्याच्या वरचा टप्पा Community-Actualization. म्हणजे लोकसमूहाला समूहाच्या म्हणून ज्या काही शक्ती आहेत त्या सगळ्या पूर्णपणे अभिव्यक्त करता आल्या पाहिजेत अशी स्थिती येणं हे Community-Actualization. आणि त्याच्या पुढची पायरी Cultural Perpetuity. Perpetuity म्हणजे अमरत्व, शाश्वतपण, चिरंजीवीत्व आणि संस्कृतीचं चिरंजीवीत्व. कारण समाजातले लोक तर बदलत जाणार. दर २०-२५ वर्षांनी, ५० वर्षांनी पिढी बदललेली असते बहुतेक आधीचे सर्व लोक गेलेले असतात. पुढे काय राहणार तर ती संस्कृती राहणार. त्या संस्कृतीचं चिरंजीवीत्व टिकलं पाहिजे याच्यासाठी काम करणं ही त्याच्या पुढची पायरी. हे एका पाठोपाठ एक येणारे आहेत का तिन्ही एकत्र चालले पाहिजेत यावर अजून तज्ज्ञांच्या चर्चा चालू आहेत.

हे मानसशास्त्रज्ञ आत्तापर्यंत काय विचार करत आहेत ते सांगितले. शेवटी सगळ्यांचा एकत्रच विचार करावा लागतो. मग Self-Actualization म्हणजे काय? म्हणजेच पूर्णत्वाचे प्रकटीकरण नाही ना? Manifestation of Perfection? ‘मानवातली मूळ पूर्णता उलगडते शिक्षणीSelf-Actualization म्हणजे ज्यातून ही सगळी पूर्णता उलगडते, प्रकट होते. गुंडाळलेलं रीळ जणू सगळं उलगडतंय आणि सगळ्या क्षमता, गुण मानवाचे. एकेका व्यक्तीचे आणि एकेका लोकसमूहाचे, समाजगटाचे, राष्ट्राचे असे गुण सगळे प्रकट होत आहेत म्हणजे ते Actualization आहे का? विवेकानंदांची सगळी राष्ट्राला उद्देशून भाषणं आहेत आणि पत्र आहेत त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे – मूळ पूर्णत्वाचे प्रकटीकरण. पण हे पूर्णत्व काय आहे, हे त्यांची मनाच्या शक्तींसंबंधी जी व्याख्याने आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मनाचे ३ भाग त्यांनी केलेले आहेत – जाणीवयुक्त मन. म्हणजे आपल्याला जे आपल्या आठवणीत येत असतं ते कळत असतं. आपल्याला पाहिजे तेव्हा आठवू शकतं. आत्ता मला काय वाटतंय, काय भावना आहेत, काय शब्द ऐकतो आहे, अशी दीर्घकालीन स्मृती आणि अल्पकालीन स्मृती. भावभावना – काय विचार चालू आहेत, स्वप्नं मी पाहतो आहे, काय भाकीते मी करतो आहे, काय पुढे होईल याचा अंदाज मी वर्तवितो आहे. हे सर्व जे जाणीवेच्या कक्षात आहे ते जाणीवयुक्त मन. तसंच नेणीवतले मन देखील असते. तो असं बोलला आणि मला एकदम राग कसा आला. भाषण चालू होतं. सगळे श्रोते शांत होते आणि एक श्रोता एकदम हसतो, तो का बरं हसला असेल? तर ते नेणीवेतून काही येतं. आधीच्या जुन्या काही स्मृती असतील ज्या पूर्ण विसरून गेलेल्या आहेत; पण मनात साठवलेल्या आहेत आणि कशामुळे तरी त्याचं उद्दिपन झालं, प्रचोदना झाली आणि ते सगळं प्रकट झालं. असं नेणीवेतून देखील अनेक गोष्टी या येत असतात. आपल्या शरीरातील अनेक स्नायूंच्या हालचाली ही नेणीवेतून होत असतात. मग Perfection – पूर्णत्व म्हणजे मला काय म्हणायचं आहे तर विवेकानंदानी त्या व्याख्यानामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या जाणीवयुक्त आणि नेणीवयुक्त मनावरती पूर्णपणे नियंत्रण आणणं, नियंत्रण येणं म्हणजे पूर्णत्वाचे प्रकटीकरण. म्हणजे अनावधानाने काहीही होणार नाही. माझं अवधान आहे, माझं लक्ष आहे काय होतंय. काय होतंय, मी काय बोलतोय, का करतोय. ‘Sleep of the tongue’ – काहीतरी बोललो नंतर पश्चात्ताप झाला असं होणार नाही. ते नेणीवेतून होतं. नेणीवयुक्त मनावरती पूर्ण नियंत्रण म्हणजे नेणीवयुक्त मन राहिलंच नाही. सगळं जाणीवेच्या कक्षेत आलं म्हणजे पूर्णत्व. आणि आपल्या नेणीव आणि जाणीव असलेल्या मनाच्या पलीकडे आणखी एक विशाल जाणीव असते. Unconscious mind, Conscious mind and Superconscious mind असे शब्द वापरलेले आहेत. त्या Superconscious mind वरती त्या विशाल जाणीवेवरती आपलं नियंत्रण येणं म्हणजे त्यांची जी दुसरी व्याख्या आहे Manifestation of Divinity – दिव्यत्वाचे प्रकटीकरण. ते होण्यासाठी जे काही करतात तो खरा धर्म. अशा Perfection आणि Divinity च्या व्याख्या विवेकानंदांनी अशा प्रकारे केलेल्या आहेत. जाणीवयुक्त व नेणीवयुक्त मनावरती पूर्ण नियंत्रण येणं म्हणजे Manifestation of Perfection म्हणजे Self-Actualization आणि विशाल जाणीवयुक्त मनावरती पूर्ण नियंत्रण येणं म्हणजे दिव्यत्वाचे प्रकटीकरण – Manifestation of Divinity, ते म्हणजे पुढचे जे टप्पे आहेत Selfless-Actualization ते असतील किंवा त्याच्याही पलीकडचे काही असतील. हे जसे व्यक्तीचे टप्पे आहेत तसे लोकसमूहासाठी सुद्धा आहेत, समाजासाठी सुद्धा आहेत, राष्ट्रासाठी सुद्धा आहेत की, राष्ट्राचंही एक जाणीवयुक्त मन असतं आणि एक नेणीवयुक्त मन असतं. म्हणजे कुठल्या अफवांवरती आपण सगळेजण पटपट विश्वास ठेवत जातो, कुठले संदेश फार विचार न करता forward करत जातो, ते सगळं  समूहाचे नेणीवयुक्त मन आहे आणि हे आलं तरी पुढे पाठवायचं नाही Administrator चा दट्ट्या त्याच्यावरती. २ दिवस होता मध्ये… ते जाणीवयुक्त मन. आणि फक्त आपल्या संवादावरतीच नाही तर आपल्या कृतींवरती सुद्धा असं नियंत्रण असतं किंवा नसतं आपलं. ते समूहाचे, समाजाचे जाणीवयुक्त व नेणीवयुक्त मन. आणि राष्ट्रयोग करणे म्हणजे त्या लोकसमूहाला सुद्धा आपल्या नेणीवयुक्त मनावरती जास्तीतजास्त नियंत्रण आणायला मदत करणं, मार्गदर्शन करणं, नेतृत्व करणं किंवा ते जे प्रयत्न चालले असतील त्यामध्ये आपण सहभागी होणं म्हणजे राष्ट्रयोग आचरणे. म्हणजे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं. ४ गोष्टी कराव्या लागतात. आणखीही कदाचित लागतील परंतु आत्तापर्यंतच्या विचारांतून जे लोकांच्या लक्षात आलेले आहे त्यात ४ गोष्टी कराव्या लागतात. त्या समाजामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये चांगलं नेतृत्व असावं लागतं. त्या समाजामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये चांगलं संघटन असावं लागतं. त्या समाजामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये व्यक्तींच्या आणि समूहांच्या प्रतिभा वापरण्याला पूर्ण वाव असावा लागतो, प्रोत्साहन असायला लागतं आणि त्या समाजातील व्यक्तींची आणि समाजाची सुद्धा आयुष्यभर सतत नवीन गोष्टींना सामोरे जाण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्याची भूमिका असायला लागते.

३-४ वर्षांपूर्वी आपले एक मित्र आहेत दिलीप कुलकर्णी त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झालं. ‘भूतान आणि क्युबा’ असा पुस्तकाचा विषय होता. भूतानमध्ये जे काही बदल चाललेले आहेत. गेली अनेक वर्षे चालू आहेत आणि क्युबा या देशामध्ये जे काही बदल चाललेले आहेत. ते छोटे देश आहेत. भूतान हा काही लाख लोकसंख्येचा देश आहे. क्युबाही तसा भारताच्या मानाने छोटाच देश आहे. भारताच्या दृष्टीने ती एक प्रयोगशाळाच आहे – एखाद्या समाजामध्ये काही बदल व्हायचा असेल किंवा काही बदल होणार असेल तर तिथे काय काय घडू शकतं आणि कशाची काळजी घ्यायला पाहिजे हे बघण्यासाठीची. अन् त्या पुस्तकात दिलीप कुलकर्णींनी जे काही लिहिलेलं आहे आणि त्याचं मी माझ्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक राष्ट्रयोगाच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या पुस्तकाकडे, त्या सगळ्या बदलाकडे पाहिल्यानंतर काही गोष्टी दिसतात – भूतानचे चौथे राजे जिग्मे सिग्मे वांगचू आणि क्युबाचा क्रांतीकारी नेता फिडेल कॅस्ट्रो यांना लक्षात आलं की त्या परिस्थितीत काहीतरी बदल करायला पाहिजे. त्यांची सदसदविवेकबुद्धी किंवा कार्याकार्यविवेकबुद्धी ही जागी होती. त्यामुळे आपापल्या देशामध्ये विकासाचे एक वेगळे प्रतिमान राबवायला त्यांनी सुरुवात केली. आता भूतानमध्ये उद्योग पोहोचलेच नव्हते. उद्योगपूर्व संस्कृती होती. तिथली प्रजा अतिशय राजनिष्ठ होती आणि तिथे बौद्ध धर्माचा प्रभाव होता. त्यामुळे कायदा म्हणून काय गोष्टी पाळायच्या आणि नीतीनियम म्हणून काय गोष्टी पाळायच्या, तर कायद्यापेक्षा नीतीनियम आणि राजा काय म्हणतोय त्याप्रमाणे करायचं, असं लोक सहजपणे करत होते. क्युबामध्ये मात्र स्वातंत्र्याची तीव्र इच्छा होती. अमेरिकेने त्यांची आर्थिक कोंडी केली होती की भारतात ज्या सुमारास हे बदल झाले, नवीन आर्थिक धोरण आले त्याच सुमारास क्युबामध्ये बदल झाले. त्याच्याबद्दलचा संताप त्यांच्या मनात होता आणि रशियाचा पाठिंबा अचानकपणे काढून घेतला होता. रशियाच कोसळल्यामुळे रशियाचे साहाय्य काढलं होतं. आपलं स्वातंत्र्य राखायचं आणि झगडत राहायचं ही वृत्ती जवळजवळ ३०-४० वर्षे त्या देशाची झालेली होती. त्यातून त्या देशाचं सार्वजनिक चारित्र्य घडलेलं होतं. भूतानमध्ये बुद्ध धर्माचा नैतिक आधार होता, क्युबामध्ये धर्माचा आधारही नव्हता. कमनशिबी देशच होता तो आणि त्यामुळे क्युबाच्या सगळ्या बदलाचे कौतुक करत असतानाच एका बाजूला असं वाटत होतं की अमेरिकेने जो विरोध करायचा ठरवला होता तो विरोध बाजूला ठेवून एकदम मैत्रीचा हात पुढे केला, (कारण अमेरिका आपल्या स्वार्थासाठी तसं करू शकते. कोणाशीही भांडू शकते आणि कोणाशीही  मैत्री करू शकते.) तर विकासाचं तिथलं सर्व प्रतिमान कोलमडून जाऊ शकते. मग या दोन देशांच्या प्रगतीचा विचार करत असताना त्यांनी विकासाचं वेगळं प्रतिमान जरी निवडलं तरी त्या विकासाचे उद्दिष्ट काय, हेतू काय आणि मूल्ये काय आहेत?  आज जगभर लोक ज्या घोषणा देतात त्याचं काय करायचंय आम्हाला…आम्हाला आमच्या देशाची आर्थिक प्रगती साधायची आहे, कल्याणकारी राज्य आमच्या इथे असावं, समृद्धी असावी असं वाटतंय. पण जगात काय असावं तर शांततामय सहजीवन. सगळयांनी एकमेकांशी न भांडता एकत्र राहावं, परस्पर सहकार्याने राहावं आणि धारणाक्षम विकास – निसर्गाची धारणा होईल असा विकास – Sustainable Development म्हणजे ते मुख्यत: पर्यावरणाचा विचार होत असतो. हा असा विचार करणं म्हणजे भौतिक राष्ट्रयोग असं मी म्हणीन आणि मग आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणजे काय विचार करायला पाहिजे? तर निसर्गाची धारणा किंवा धारणाक्षम विकास करताना निसर्ग आणि मानव यांची धारणा एवढाच विकास गृहीत धरलेला असतो. मानवजातीने समाज आणि राष्ट्र घडवलेली आहेत विकास हा समाज-धारणाक्षम असला पाहिजे. जसा निसर्ग-धारणाक्षम असला पाहिजे तसा समाज-धारणाक्षम असला पाहिजे याची चर्चा कधी होत नाही. आणि समाजाची धारणा म्हणजे काय तर आहे ती स्थिती टिकवणं त्यातील आंतरविरोध संपवणं एवढंच नाही तर समाजाचं गतिमान संतुलन झालं पाहिजे, असा दिलीपराव कुलकर्णींचा शब्द आणि मी त्याच्यामध्ये भर घातली की समाजाचं प्रगतीशील संतुलन झालं पाहिजे. आहे त्या स्थितीत समाज असून चालणार नाही तो पुढे पुढे गेला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वजण एकत्र पुढे गेले पाहिजेत म्हणजे त्यात संतुलन पाहिजे. एखादाच जर खूप वेगाने पुढे गेला किंवा सतत तोच पुढे जात राहिला असं चालणार नाही. मानसिक आणि सामाजिक उत्क्रांती जशी चालू आहे तशी व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, हा विचार भारतामध्ये केलेला आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींना आपल्या आध्यात्मिक विकासाची प्रेरणा व्हावी, प्रगतीची प्रेरणा व्हावी आणि त्याच्यासाठीची अनुकुलता लाभावी असं वातावरण समाजामध्ये असलं पाहिजे. मग तिथे भौतिक संपत्तीची निर्मिती लागेल का, तर लागेल. संपत्तीचे न्याय्य वितरण लागेल का, लागेल. व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्य वाढेल अशा पद्धतीने संपत्तीचा विनियोग झाला पाहिजे का, तर झाला पाहिजे. पण या दोन्हीशिवाय आणखी काय झालं पाहिजे. तर त्या दोन्ही देशांच्या गेल्या ३० वर्षांमधल्या प्रगतीचा आढावा घेतला तर त्या देशांमध्ये या ३० वर्षांमध्ये लेखक किती झाले, कवी किती झाले, नाटककार, संशोधक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संगीतकार, चित्रकार, वक्ते, उत्तम शेतकरी, उत्तम कारागीर किती झाले हे सगळं त्या त्या समाजाच्या आरोग्य आणि विकासाचे निदर्शक आहेत. आणि असं सगळं त्या समाजामध्ये चालू असेल तर तिथल्या समाजातल्या व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती होते आहे की नाही ते देखील बघायला लागेल.

Stockholm ला पर्यावरणासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्याचं उद्घाटन इंदिरा गांधींनी केलेलं होतं. आता इंदिरा गांधींची भाषणं त्यांनी लिहिलेली होती का आणखी कोणी लिहून दिली होती ते मला माहिती नाही; पण त्या वेळचे उद्घाटनाचे भाषण अतिशय सुंदर आहे. भारताची बाजू, भारताचे प्रश्न मांडणारं आणि त्यावेळी त्यांनी उदाहरणं देऊन त्या भाषणामध्ये असं सांगितलेलं की भारतामध्ये जेव्हा आर्थिक समृद्धी होती, कलांची समृद्धी होती, त्याच काळात भारतामध्ये सगळ्यात जास्ती आध्यात्मिक स्त्री-पुरुष हेही उदयाला आलेले आहेत.  त्यामुळे भारतात आध्यात्मिक स्त्री-पुरुष निर्माण होत होते, त्यामुळे भारताने आपलं सगळं लक्ष तिकडेच दिलं होतं म्हणून भारताची आजची गरीबी आहे असं नाही, आजची विषमता आहे असं नाही. त्याची कारणं वेगळी आहेत. उलट भारतामध्ये जेवढे सगळ्यात जास्ती आध्यात्मिक स्त्री-पुरुष होत होते, त्या कालखंडात भारताची आर्थिक आणि शास्त्रांमधील, संशोधनातली, कलांमधली समृद्धी सगळ्यात जास्ती होती, असं त्यांनी त्या भाषणामध्ये फार सुरेख वर्णन करून सांगितलं आहे. निसर्गाची जशी सृजनशक्ती असते तशी माणसाची सृजनशक्ती असते आणि ज्या समाजामध्ये या सृजनशक्तीला भरपूर वाव असतो त्या समाजामध्येच त्या सृजनशक्तीमुळे तिथल्या अनेक लोकांचा आध्यात्मिक विकासही होतो. अशा समाजामध्ये सतत नवीन नवीन माहिती आणि नवनवीन कल्पना यांचं स्वागत करण्याचं वातावरण असतं. ते क्युबा आणि भूतानमध्ये आहे असं एका वर्णनावरून जाणवत नाही. असं ज्या ज्या देशांमध्ये आहे त्या देशांमध्ये काही सांस्कृतिक प्रगती त्यांची होताना दिसते. जिथे अशी सृजनशीलता दिसते, तिथे समाजापुढे नवीन ध्येय, नवीन आदर्श उभे राहतात. आणि त्या आदर्शांसाठी धडपड करण्याचे प्रयत्न त्या समाजात सुरू होतात, त्याला मार्गदर्शन करणारे नेते त्यावेळी तेथे असावे लागतात. दोन प्रकारचे नेते असावे लागतात. एक तर स्वतःच पुढचं भविष्यातले काही सुंदर चित्र दाखविणारे नेते असायला लागतात. एखादा एखादंच चित्र दाखवतो, एखादा सातत्याने नवीन नवीन देत राहतो. राजीव गांधींच्या बाबतीत असं म्हणतात की बाकी त्यांचं राजकारण, निर्णय सगळे चुकले असतील; पण १९८५ सालीच त्यांनी ओळखलं होतं की आता भारताने माहितीयुगात जायला पाहिजे, त्याच्यासाठीचे प्रयत्न आपण सुरू केले पाहिजेत. ते त्यांनी त्यावेळी म्हटलं आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारचा पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं. त्याची फळे आज आपले IT मधले लोक उपभोगत आहेत. म्हणजे नवीन ध्येय काहीतरी दाखवणं ते नेत्याचं काम असतं. असे एक प्रकारचे नेते असतात. काही जण एखादंच ध्येय दाखवू शकतो काही सतत पुढची पुढची ध्येय दाखवतात. आणि काही जण स्वत: त्यांना सुचलं नाही तरी असं वातावरण त्या समूहामध्ये निर्माण करतात की त्याच्यातून आपोआप कोणालाही आपल्या नवीन कल्पना मांडायचं धाडस, साहस असतं आणि तो मांडू शकतो आणि त्याचा स्वीकार समाजामध्ये होतो. मग असे प्रयत्न करायचे ठरले तर नेत्याला आणखी एक काम करायला लागतं की त्या समूहातील सगळी साधनसामग्री आणि मनुष्यबळ ह्या आता पुढच्या कुठच्या कुठच्या संधी दिसत आहेत त्या संधी पकडण्यासाठी आणि त्या संधींचं वास्तवात रुपांतर करण्यासाठी गटाला मार्गदर्शन करावं लागतं. ते ही नेत्याचं काम असतं. असं त्या समूहाला नवीन संधी पकडण्यासाठी मार्गदर्शन करणं आणि नवीन संधी दाखवणं, नवीन कल्पना निर्माण होतील, त्यांचा मोकळेपणाने स्वीकार होईल असं वातावरण समाजामध्ये निर्माण होईल असं काम करणं हे नेत्याचं काम आहे. असं एखाद्या कल्पनेसाठी सगळा समाज काम करायला लागला तरच तो समाज संघटित झाला आणि प्रत्येकजण आपापल्या वेगळ्या कल्पनांच्या मागे धावतो आहे असं झालं तर तो समाज हा विस्कळीत स्वरूपातला आहे. जेव्हा समाज अशी सतत नवीन आव्हाने घेत राहतो, नवनवीन साहसे करत राहतो, नवीन प्रयोग करत राहतो, तेव्हा त्या समाजातल्या सुप्त क्षमता या प्रकट व्हायला लागतात. आपणही हे करू शकतो हे लोकांना कळायला लागतं आणि त्याप्रमाणे लोक पुढे जायला लागतात. आम्ही अंतरीक्षाचं तंत्रज्ञान तुम्हाला देणारच नाही, अणुशक्तीचं तंत्रज्ञान तुम्हाला देणारच नाही, असं म्हटलं की आपल्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने ते तंत्रज्ञान निर्माण केलं. एकदा मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली तर उद्योगांमधली, आर्थिक क्षेत्रातली स्पर्धात्मकता हे भारतीय उद्योजक दाखवायला लागले. आणि फक्त भारतातच Multinational companies आहेत, असं नसून भारतीयांच्या देखील Multinational companies आहेत, असं चित्र दिसायला लागलं. नवीन संधी आणि आव्हाने दिसली की त्या समाजातल्या सुप्त क्षमता या प्रकट व्हायला लागतात. आपल्याकडे कोणती कौशल्ये, क्षमता आहेत हे जे माहिती नसतं ते नवीन संधी, आव्हानांमुळे प्रकट व्हायला लागतं. हे समाजाच्या नेणीवेच्या गोष्टी जाणीवेच्या कक्षात आणण्यासारखं आहे. मग याच्या पुढचा टप्पा म्हणजे Manifestation of Divinity.

विवेकानंद अमेरिकेत असताना ज्या प्राध्यापक राईट यांच्यामुळे त्यांना सर्वधर्म परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. प्राध्यापक राईट हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित असल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठातल्या तत्त्वज्ञान विभागातील विद्यार्थ्यांबरोबर विवेकानंदांचे एक प्रश्नोत्तराचे सत्र झालेलं होतं.आणि एक प्रश्न विचारलेला होता – What is the Vedic view of civilization? मोठं सविस्तर उत्तर दिलेलं आहे विवेकानंदांनी…त्या उत्तराचा शेवट त्यांनी असा केलेला आहे – Civilization is the manifestation of that divinity in man. म्हणजे आपल्यामधलं दिव्यत्व व्यक्ती प्रकट करण्याचा प्रयत्न करते. मग त्याला अंतिम सत्याचा, मूलस्त्रोताचा अनुभव येतो, साक्षात्कार होतो आणि समाजातल्या अनेक व्यक्ती जेव्हा आपल्यामधल्या दिव्यत्वाचे प्रकटन करण्याचा प्रयत्न करायला लागतात तर त्याचा परिणाम म्हणूनच संस्कृती निर्माण होते. आपल्या एका पद्यामध्ये असं म्हटलेलं आहे – ‘देवत्वाप्रत खचित पोहोचतील पथितसंघ येथले’. एकेकटा नाही तर पथितसंघ म्हणजे अनेकजण देवत्वाप्रत पोहोचतील म्हणजे विकसित मानव होतील. त्यांच्यामधल्या अनेकानेक क्षमता आधी नेणीवेतल्या प्रकट होतील आणि मग त्यांच्या विशाल जाणीवेतील देखील प्रकट व्हायला लागतील म्हणजे ते देवत्वाच्या म्हणजे देवमानवाच्या दिशेने गेले. तर आध्यात्मिक राष्ट्रयोगाचा विचार करायला लागलो की समाजापुढे असं ध्येय बाकी कुठल्या देशामध्ये त्याचा विचारच केलेला नाही हे लक्षात येतं. शांततामय सहजीवन, धारणाक्षम विकास याच्या पलीकडे कुठला देश अजूनही जात नाही, गेलेला आपल्या पाहण्यात नाही. भारतामध्ये मात्र समष्टीच्या पुढे सृष्टी आणि परमेष्टी हे कायमच सांगितलेलं असतं. व्यष्टी किंवा व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज किंवा राष्ट्र, सृष्टी म्हणजे सगळा निसर्ग, पर्यावरण सगळं आणि परमेष्टी म्हणजे त्याच्या पलीकडचंही तत्त्व आहे. त्यामुळे राष्ट्रयोग राष्ट्राच्याद्वारे अंतिम सत्याचा शोध घेणं, त्याचा अनुभव घेणं म्हणजे राष्ट्र अशा पद्धतीने विकसित झालं पाहिजे की, आपण इतर देशांनाही असं पुढे जाण्याला, अनुभव घेण्याला मदत करू शकतो. आणि हे फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे. ‘स्वं स्वं चरित्र शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः ।।’ – या देशात शिकलेल्या उत्तम चारित्र्याच्या लोकांकडून जगातल्या सगळ्या देशांनी आपापलं चरित्र आपण कसं विकसित करायचं हे शिकावं. आम्ही आमचा विकास का करायचा आहे तर सगळ्याच मानवांचा असा विकास होऊ शकतो हे जगाला दाखविण्यासाठी आणि जगाला त्याची मदत करण्यासाठी. ‘राष्ट्रवाद’ हा शब्द जसा मी टाळला या व्याख्यानमालेमध्ये – त्याच्यात ‘राष्ट्र राष्ट्र’ अशा घोषणाच काही होतात, बाकी काही विचार होत नाही म्हणून राष्ट्रविचार, राष्ट्रकारण, राष्ट्रयोग असे शब्द मी आणले. तसा ‘राष्ट्रधर्म’ हा शब्दही मला वापरायचा होता; पण त्याचं आपल्याच काही लोकांना वावडं आहे असं लक्षात आलं की ‘धर्म’ शब्द आला की आपण बिथरतो. आपण बिथरलो नाही तर बाकीचे लोक बिथरतात. आणि ते बिथरले तर आपण त्यांच्या बरोबर कसं काम करू शकू या भीतीने ‘नकोच तो शब्द वापरायला’ असंही होतं. पण असा आध्यात्मिक राष्ट्रयोग साधणं हाच सगळ्या आपल्या ऋषि-मुनींनी, रामदासांनी, विवेकानंदानी, अरविन्दानी सांगितलेला आपला राष्ट्रधर्म आहे, असं मला वाटतं आणि त्याचं वावडे (allergy) असले तर ठीक आहे; राष्ट्रयोग हा शब्द वापरला. आता आंतरराष्ट्रीय योग दिवस झाला आहे, त्यामुळे राष्ट्रयोगाकडे आम्हाला जायचंय असं म्हटलं तर फार कोणी नाकं मुरडणार नाही; पण काय करायचंय तो आशय आपल्या मनातला पक्का असला पाहिजे असं मला वाटतं. तो आध्यत्मिक राष्ट्रयोग ज्याच्यामध्ये हा समग्रतेचा विचार – सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचंय, प्रथम आपल्या देशातल्या कारण त्याच्याबरोबर जवळ जवळ जगातले १५-२० % लोक येऊन जातात. जे १५-२० % जगातील लोकांच्या बाबतीत आम्ही करू शकतो फक्त भूतान आणि क्युबाच्या बाबतीत नाही, तर ते संपूर्ण जगाच्या बाबतीत शक्य होईल. इथली सगळी विविधता स्वीकारून आणि सुभाषराव या २ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप करणार आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं, तुमच्या समारोपात तुम्ही नेहमी जे बोलता ते सांगा की विविधतेमध्ये एकता पाहणं ही बौद्धिक कसरत आहे, एकतेची विविध रूपे पाहणं हा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. मुळात सगळं एकच आहे, त्याचे विविधप्रकारे कसे आविष्कार होत आहेत हे बघा. ते स्वीकारणं आपल्याला सोपं जातं कारण मुळात एक आहे हे माहिती आहे. तर आध्यात्मिक राष्ट्र्योग म्हणजे भारतातली विविधता आम्ही पचवली कारण ती विविधता म्हणजे आमच्यातल्या सुप्त क्षमतांचं प्रदर्शन आहे. असाही विकास होऊ शकतो, अशाही भाषा असू शकतात, असेही पोषाख असू शकतात. ही विविधता आपण साजरी करू या. तो प्रश्न मानून त्याच्यातून एकता शोधण्यापेक्षा मुळात एकत्व आहे हे लक्षात ठेवू या आणि ही विविधता आपण साजरी करू या. काहीही येऊ दे. कितीही वेगळ्या प्रकारची फुले असतील तरी त्याचा गुच्छ करता येतो हे जर का आम्हाला माहिती आहे, तर गुच्छ तरी का करायचा. ह्या एकाच पृथ्वीवर अनेक प्रकारची फुले उमलत आहेत. त्याचा आनंद घेऊ या. तसेच या एकाच देशात अनेक प्रकारे लोक आपापल्या क्षमता व्यक्त करत आहेत, ते सगळे आमचेच आहेत. कारण आम्ही एक आहोत हे लक्षात ठेवून राष्ट्रकारण करणं, राष्ट्रविचार करणं म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोग आहे असं मला वाटतं. तर प्रबोधिनीमध्ये तरी आपण हे ‘विविधतेत एकता’ ही राजकीय घोषणा ही जरा बाजूला ठेवू या आणि आपल्याला आध्यात्मिक राष्ट्रयोग आचरायचा आहे त्यामुळे ‘एकतेची विविध रूपे’ असं बघू या. कारण त्याशिवाय आपण इतके सगळे एकत्र कसं बसू शकू. माझं नाही तुझ्याशी पटत असं म्हणणारे अनेकजण असू शकतील; पण तरीही आपण एकत्र का काम करू शकतो कारण मुळात आपण एक आहोत हे आम्हाला माहिती आहे. आणि मग ती विविधता आहे ती वेगवेगळ्या वेळी कशी वापरायची एवढंच बघायचंय. तर जसं हे व्यक्ती-व्यक्तींच्या बाबतीत, छोट्या गटांच्या बाबतीत तसं राष्ट्रांमध्ये सुद्धा आणि राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने बघायचंय. त्यामुळे असा हा राष्ट्रयोग आचरणं म्हणजे आपण मानवतेचा विचार करत नाही असं नसून मानवतेचा विचार अधिक चांगला करता येण्यासाठी आणि फक्त विचार नाही तर मानव्यकारण करण्यासाठी म्हणजे सगळ्या मानवांनी अधिक चांगलं होण्यासाठी आम्हाला हा राष्ट्रयोग आचरायचा आहे, असा विचार आपण प्रबोधिनीमध्ये करावा असं मला वाटतं आणि या दृष्टीनी मी ३ व्याख्यानांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक प्रश्न असतील. आज जसा वेळ असेल त्याप्रमाणे आज किंवा नंतर पुन्हा एकदा सगळ्या व्याख्यानांवरती एकत्रित प्रश्न-उत्तरे असंही एखादं सत्र घेऊ शकू.

प्रश्न-उत्तरे

  • ‘राष्ट्रयोग’ हा विचार वेगाने सर्व जगासमोर मांडण्यासाठी व त्याच्या अनुकरणासाठी काय काय करू या?

‘राष्ट्रयोग’ हा शब्द पहिल्यांदा मी रामदेव बाबांकडून ऐकला. रामदेव बाबांच्या एका कार्यक्रमामध्ये हा शब्द त्यांनी वापरलेला पाहिला. ‘राष्ट्र सशक्त आणि आरोग्यपूर्ण करण्यासाठी योगासनं करू या’ या अर्थाने त्यांनी तो राष्ट्रयोग हा शब्द वापरला होता. त्यामुळे इंटरनेटवरती जर का तुम्ही

‘राष्ट्रयोग’ असं छापलंत तर योगासनाबद्द्लचेच बरेचसे संदर्भ तुम्हाला मिळतील. त्यामुळे आज मी जसा मांडला तसा ‘राष्ट्रयोग’ हा विचार वेगाने पसरण्यासाठी तो योगासानांपेक्षा बरंच काही आहे असं आपल्याला मांडायला लागेल. आणि तसं मांडता येण्याइतकी तयारी आपल्यापैकी

१५-२० जणांची व्हायला लागेल तर मग तो वेगाने सगळीकडे मांडता येईल असं वाटतंय. मी छोट्या गटांमध्ये हा विषय जिथे जिथे मांडलेला आहे तिथे बहुतेकांना तो लगेच पचला, स्वीकारता आला, त्याला फार काही विरोध झाला नाही. त्यामुळे मांडता येईल असं वाटतंय मला; पण वेगाने

पसरण्यासाठी मी जे शेवटी म्हटलंय की राष्ट्रयोगाचे आचरण हे सुद्धा बरोबरीने व्हायला लागेल, त्याच्यासाठी नेतृत्व म्हणजे स्वनेतृत्व गैरनेतृत्व नाही, संघटना – ती म्हणजे लोकांची परस्पर आत्मीयता-सामंजस्यावर आधारित आणि दीर्घकालीन ध्येयासाठी झालेली संघटना – झुंडशाही नाही; प्रतिभा आणि निरंतर शिकायची तयारी याचे आचरण करणारे जितके लोक होतील, तितका या मांडणीचा उपयोग होईल. पण त्यामुळे वेगानी याचा अर्थ दर १० वर्षांनी आणखी एका देशामध्ये असा वेग आपल्याला गृहीत धरावा लागेल असं मला वाटतं. फार वेगाने प्रसार झाला तर नुसती एक वैचारिक मांडणी म्हणून जाऊ शकेल तर ते काय youtube वरती भाषणं टाकली, लेख e-journal मध्ये प्रसिद्ध झाले आणि चांगल्याप्रकारे सजवले तर त्याला अनेक hits मिळतील; पण तो विचार पचला जाईल असं नाही वाटत मला. त्यामुळे त्याचं आचरण करणं आणि

योगासानांपेक्षा ते बरंच काहीतरी आहे. योग याचा अर्थ काहीतरी योगासने घेतली जातात. त्यामुळे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग यातला ‘योग’ हे लोकांना झटकन समजत नाही, त्यामुळे राष्ट्रयोगामध्ये या बऱ्याच कल्पना आहेत, हे व्यवस्थित मांडणारे अनेकजण निर्माण व्हावे लागतील आणि त्याचं आचरण व्हायला लागेल, तर त्याचा प्रचार वेगाने होईल असं मला वाटतं.

  • स्वत:मधल्या दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे नक्की काय?

ज्याला असं हे करता आलं आहे किंवा आपल्यामधून होतंय याचा अनुभव आला आहे तो जास्त चांगलं सांगू शकेल. मी अजून अनुभव नाही घेतलेला; पण मग हा कोणी अनुभव घेतला असेल आणि त्यांनी कुठे मांडून ठेवलं असेल, असा शोध घेताना मग मला पसायदान सापडलं. आपलं ‘जिज्ञासापूर्ती’ म्हणून पुस्तक आहे त्यात याच प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. पसायदानामध्ये ११ गोष्टी दिलेल्या आहेत, मागितलेल्या आहेत की हे सगळ्यांना मिळो. ह्या ११ गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता आला किंवा ज्याच्यात ह्या गोष्टी अनुभवता येत आहेत, असं आपल्याला दिसेल तिथे दिव्यत्वाचं प्रकटीकरण होतंय, असं आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत पहिली पायरी म्हणून ते स्वीकारायला हरकत नाही असं मला वाटतं. त्या दृष्टीने एकदा पसायदानाचा विचार करा. मग त्या ११ गोष्टी काय आहेत ते हळूहळू लक्षात येईल. नाहीतर आपण त्या ओव्या म्हणण्यामध्ये इतके बुडून जातो की ते जे काही मागितलं आहे ते आपल्यामध्ये येऊ शकतं हे आपल्या लक्षात येत नाही. तर ‘जिज्ञासापूर्ती’ पुस्तकामध्ये एका प्रश्नाचे उत्तर म्हणून या सगळ्या ११ गोष्टी दिलेल्या आहेत.

  • Creative Empathy आणि Effective Altruism यावर अजून थोडं बोलावं.

Effective Altruism हा शब्द मी या प्रश्नातच पहिल्यांदा वाचतो आहे, त्यामुळे लगेच त्याच्यावर काही बोलता नाही यायचं. Creative Empathy याच्यावरती एक case study मला वाचायला मिळाली होती. सुमारे २० वर्षांपूर्वी ती वाचली होती. अनेक Multinational companies अशा आहेत की ज्यांचा अर्थसंकल्प भारताच्या राज्यांपेक्षा मोठा असतो. त्यामुळे त्याचे जे प्रमुख अधिकारी असतात त्यांना मोठे पगार असतात. खाजगी कंपनी असल्यामुळे किती पगार असावा अशी काही बंधने त्यांना नसतात. प्रत्यक्ष रोख रकमेतील पगारावर जरी मर्यादा आली तरी अनेक प्रकारचे perks त्यांना असतात. म्हणजे त्याच्यावरती अनेक प्रकारच्या सवलती म्हणजे इतका विमान प्रवास फुकट, इतके दिवस सुट्टी कंपनीच्या खर्चाने घेता येईल, ती five star किंवा seven star हॉटेल किंवा resort मध्ये घेता येईल, इतकी वाहने तुम्हाला वापरता येतील, मग अगदी खाजगी विमान किंवा हेलिकॉप्टर देखील तुम्हाला असू शकेल, त्याच्यासाठीचे चालक तुम्हाला मिळतील, अशा अनेक प्रकारच्या सवलती असतात. त्यामुळे ज्याच्यासाठी माणसाने काम करावं अशा सगळ्या गोष्टी या लोकांना मिळाल्यावर आता कशासाठी काम करायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे पडतो आणि त्यांच्या कामाची प्रेरणा कमी होते. असं लक्षात आलं. २० वर्षांपूर्वी अशा Multinational मधल्या १०० अधिकाऱ्याचं सर्वेक्षण त्यांनी केलेलं होतं. तर आत्ता यांची प्रेरणा वाढविण्यासाठी म्हणजे अर्थातच कंपनीचा फायदा वाढविण्यासाठी यांना काय द्यायला पाहिजे. यांना काय द्यायला पाहिजे याचे प्रयोग केल्यानंतर त्यांना सापडले की, आता तुला आणखी पैसे, वाहने, बंगले घे, असं करून काही प्रश्न सुटणार नाही. आता कंपनीच्या वेळेतच तुला इतरांसाठी काम करायचं असेल तर काम करायला परवानगी आहे आणि अशी मुद्दाम त्यांना कामं सुचवली. मग रुग्णालयात जाऊन तिथल्या रुग्णांशी बोला, अनाथालयामध्ये जा, अपंग मुलांसाठी काहीतरी वेळ द्या, त्यांना फिरायला, सहलीला घेऊन जा. ख्रिसमसच्या निमित्ताने गरीब, गरजू लोकांना द्यायला जे गोळा केलेलं असतं (United नावाची मोठी संघटना आहे ते हेच काम करतात) त्याचं वाटप करायला जा. आता आपण केवळ कंपनीचा फायदा वाढवत नसून कोणाला तरी आपण समाधान देतो आहे, हे त्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला लागल्यावर यांची प्रेरणा वाढायला लागली. आणि मग त्यांना सुचायला लागले की आणखी काय प्रकारचे काम करता येईल आणि मग कंपनीच्या वेळेत नाही तर माझ्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा मी असं काम करीन असं ते लोक करायला लागले, तर याला Creative Empathy म्हटलं आहे की, इतरांच्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी स्वतःची सहसंवेदना वाढवणे. हे Self-Actualization च्या पुढची पायरी आहे. कारण ते ज्यांच्यासाठी झालेलं होतं त्यांच्यासाठीच हा प्रश्न होता की आता मी का काम करायचं. त्यांच्यासाठी Creative Empathy हा पुढचा टप्पा हा शोधून काढला. आता किती वापरत आहेत, ते मला माहिती नाही; पण २० वर्षांपूर्वी १०० जणांची case study ही मला वाचायला मिळालेली होती. आणि त्याच्यातून Creative Empathy हा शब्द मला अतिशय आवडला आणि अनेकवेळा त्याचा उल्लेख मी करतो.

  • आध्यात्मिक राष्ट्रयोग घडताना/आचरताना ‘राष्ट्र’ या entity चा केवळ ‘nation-state’ असा विचार करायचा ठरवलं तर ते शक्य आहे का? मग त्या अर्थी ‘बृहद् भारत’ (भारताबाहेर स्थायिक) समाजही समाविष्ट होऊ शकेल का?

आज तुम्ही जरी ‘राष्ट्र’ हा शब्द ‘आमच्या मनामध्ये एखाद्या कल्पनेभोवती, विचाराभोवती संघटित झालेला समाज, समान संस्कृती, समान परंपरा असलेला समाज’ असं जरी तुम्ही म्हणालात तरी आज बहुसंख्य लोक ‘राष्ट्र म्हणजे nation-state राष्ट्र-राज्य’ म्हणजे एक समान शासन असलेला समाज की जो स्वत:ला राष्ट्र म्हणून ओळखतो अशा पद्धतीनी बघतात. परवा रामजन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर अनके लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्याच्यामध्ये Republican पक्षाच्या एका प्रतिनिधीने म्हटलेलं होतं की, ‘भारत हा १९४७ पर्यंत देश होता, नंतर तो राष्ट्र झालेला आहे.’ म्हणजे त्यांना तो राष्ट्र-राज्य (nation-state) झालेला आहे असं म्हणायचं होतं आणि आधी राष्ट्र होता म्हणजे राष्ट्र-राज्याशिवाय राष्ट्र असू शकेल ही कल्पना बहुतेक लोकांना करता येत नाही. त्यामुळे ‘तर ते शक्य आहे का?’ तर ते शक्य आहे असं वाटतं आणि तेवढंच करता येतंय तुम्हाला… कारण आता त्याच्याशिवाय तुम्ही ‘भारत’ असा विचार करण्याचा प्रयत्न केला तर आता ते National Citizenship Register याच्याबद्दल काय काय गदारोळ होतोय ते बघा… म्हणजे ते ही आमच्याच राष्ट्राचे आहेत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान येथून येणारे मुसलमानेतर सगळे…हे आमच्याच राष्ट्राचे आहेत असे तुम्ही म्हणालात तर ते लोकांना वैचारिकदृष्ट्याही समजायला आणि मानसिकदृष्ट्या स्वीकारायला किती अडचण आहे ते लक्षात येतं. त्यामुळे आज ‘राष्ट्र म्हणजे nation-state’ असं जे लोक म्हणत आहेत त्यापासून सुरुवात करू या. मग ‘बृहद् भारत’ (भारताबाहेर स्थायिक) समाजही समाविष्ट होऊ शकेल का? तर आध्यात्मिक राष्ट्रयोग अशी संकल्पना मांडल्यानंतर तुम्ही जिथे कुठे आहात त्या समाजाला देवमानव बनविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं आणि जिथे राहताय त्या ‘nation-state’ चे जर घटक झालेले असाल तर तिथे काम करण्यामध्ये काही चूक नाही आणि तिथेही तो आध्यात्मिक राष्ट्रयोग तुम्हाला आचरता येईल. ‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ ही व्यापक हिंदुत्वाची कल्पना आहे असं मला वाटतं. ती फक्त भारत या राष्ट्रराज्यापुरती ती मर्यादित आहे असं नाही. कुठल्याही देशामध्ये आध्यात्मिक राष्ट्रयोगाचे आचरण करता येईल, असं मला वाटतं. भारतीय जे आज इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत, त्यांनी त्या त्या देशासाठी प्रयत्न करणं हेच चांगलं असं मला वाटतं. आत्ता प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशनची स्थापना झाली आणि त्यांनी मला विचारलं की आम्ही काय काय करावं? तर बाकी काही शक्य झालं नाही तर शेवटचा उपाय म्हणून ‘ज्ञान प्रबोधिनी, भारत’ साठी निधी संकलन करा असं मी त्यांना सांगितलं आहे. त्याच्याआधी करण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत तर तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तेथे भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करा आणि लोकांना तिची ओळख करून द्या, असं केलंत तर सगळ्यात चांगलं काम तुम्ही केलंत असं होईल. आणि असं ते करायला लागले तर आध्यात्मिक राष्ट्रयोगाचेच आचरण ते करतील असं वाटतंय. केवळ प्रबोधिनीचे ठिकठिकाणचे माजी विद्यार्थी नाही तर कोणीही भारतीय जर का इतर ठिकाणी गेला तर त्यांनी तसंच करावं, असं मला वाटतं.

  • Despite the influence of and interaction with contrasting cultures for centuries, the basic elements of Indian culture have survived. Does this signify that Cultural Perpetuity had been achieved in its original form?

छान प्रश्न आहे. Cultural Perpetuity म्हणजे संस्कृतीचे चिरंजीवीत्व. भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतींच्या प्रभाव पडला. आंतरक्रिया इथल्या संस्कृतीमध्ये आणि इतर संस्कृतींमध्ये झाल्या तरी भारतीय संस्कृतीची मूलभूत तत्त्वं जी होती ती टिकून आहेत त्यामुळे

संस्कृतीचे चिरंजीवीत्व मूळ स्वरूपात टिकलं आहे असं म्हणता येईल का? असा प्रश्न आहे. तर संस्कृतीमधला काही भाग हा शाश्वत असतो, टीकाऊ असतो आणि काही बदलता असतो. काही विचार हे त्याच्यात तडजोड करायची नाही असे असतात. काही विचार हे त्या त्या वेळच्या परिस्थितीला उत्तर म्हणून आलेले होते, परिस्थिती बदलल्यावर ते सोडून द्यायला हरकत नाही. असं संस्कृतीमध्ये २ भाग असतात, असं जर का मी गृहीत धरलं. नदीचा प्रवाह धरला अगदी मोठा पूर आलेला असताना देखील तर पृष्ठ भागावरचे पाणी ज्या वेगाने वाहते त्या वेगाने काही तळाचे पाणी वाहत नाही आणि जमिनीत मुरलेलं पाणी हे त्या पेक्षाही कमी वेगाने वाहते. पण सगळंच वाहत असतं… स्थिर कुठलंच नसतं. त्यामुळे हे बघताना original form म्हणजे काहीतरी बदलेलं असणारच, असं आपल्याला गृहीत धरायला लागेल. पण त्यातली कोणते तत्त्वं बदलेली नाहीत आणि कोणती बदललेली आहेत आणि ती बदलेलेली चालली म्हणून ती बदलेली आहेत, असं जर का बघायला गेलं तर Cultural Perpetuity म्हणजे संस्कृतीचे चिरंजीवीत्व हे भारतामध्ये बऱ्यापैकी साधलेलं आहे, असं वाटतं. गांधीजींचं हिंद्स्वराज्य पुस्तक जर का वाचलं, त्याला १०० वर्षे झालेली आहेत. त्यावेळेस सुद्धा त्यांनी भारताच्या संस्कृतीतील काय काय बदलेलं नाही आहे, अनेक प्रकारचं आक्रमण आणि आघात होऊन सुद्धा असा आढावा तिथे घेतलेला आहे. आज ते वाचले तरी आजही त्यातल्या बऱ्याच गोष्टी तशाच आहेत, असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे ते भारतामध्ये साधलेलं आहे; पण हे कोणाच्या प्रयत्नाने साधलेलं आहे आणि हे भारतीयांच्या नेणीवेतून झाले आहे का जाणीवेतून, असं बघायला पाहिजे. मला असं वाटतं की भारतातल्या काही संतांच्या आणि विजयनगर साम्राज्यातले काही राजे, शिवाजी महाराज, शीख गुरू असे काही राज्यकर्ते ही अलीकडच्या काळात तरी यांच्या नेतृत्वामुळे, प्रयत्नांमुळे झालेलं आहे. एकूण समाज हे टिकविण्यामध्ये किती सहभागी होता हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे भारतीयांच्या नेणीवेतच बहुतेक ते होतं आणि त्याच्यातून झालं आहे. ते जाणीवेतून झालं पाहिजे. तर अधिक चांगल्या पद्धतीने टिकेल, असं मला वाटतं.

  • Creative Empathy याचे Individualistic रूपाचे उदाहरण घेऊनच मग समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तो रुजवायचा म्हणून CSR-Corporate Social Responsibility चा उगम झाला असेल का?

ती एक शक्यता आहे; पण आता सरकारी खाती ज्या पद्धतीने कंपन्यांना वेठीला धरत आहेत की, सरकारचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही CSR चा निधी द्या, त्याच्यावरून सरकारला अधिक महसूल मिळावा किंवा अधिक उत्पन्न मिळावे, हे ही एक कारण त्याच्यामागे आहे, असं मला वाटतं. कारण एकूण CSR निधी पहिला तर काही हजार कोटी रुपयांचा झालेला आहे. त्यामुळे सरकारचाही स्वार्थ त्याच्यामध्ये आहे. Creative Empathy रुजवण्याचे प्रमाण म्हणून काही प्रमाणात झालेलं असेल. निदान काही कंपन्यांना तरी आपली सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीव झालेली आहे. पण माझ्या माहितीची एक कंपनी आहे. त्याचे सगळे चालक हे अतिशय व्यक्तिगत परिचयाचे आहेत. त्यांनी त्यांच्या कंपनीचे विभाजन केल्यानंतर आता या कंपनीला काही फायदा झाला नाही, त्यामुळे आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे CSR देणे लागत नाही, असं ते म्हणू शकले. याचा अर्थ त्या कंपन्या हा कायदा म्हणूनच करत आहेत. वृत्तीत बदल घडेल असं काही वाटत नाही. पण कायदा झाल्याने जर हे चालू राहिले तर कदाचित १०० वर्षांनी वृत्तीत बदल होऊ शकेल. पण व्यक्तींच्या बाबतीत जो बदल होतो तो जितका होतो तो कंपनींच्या बाबतीत व्हायला जास्ती वेळ लागेल असं  मला वाटतं.

  • समग्र, भव्यदिव्य विचार करणारे तत्त्वज्ञ. दार्शनिक जिथे अनेक, असा भारत, व्यावहारिक, भौतिक व्यवस्था (उदा. रस्ते, ट्रफिक, शहरनियोजन, भ्रष्टाचार) या बाबतीत इतर अनेक देशांपेक्षा मागे हा विरोधाभास का? यावर काही उत्तर?

हा मलाही पडणारा आणि अनेक जणांना कायम पडणारा प्रश्न आहे. हा विरोधाभास तर आपण सगळ्यांना जाणवतो आणि याच्यावर मला सुचलेलं उत्तर नाही; पण स्वामी रंगनाथानंदांनी दिलेलं जे उत्तर आहे ते मला आवडलं, ते मी सांगतो. तुम्हाला पटतंय का बघा. स्वामी रंगनाथानंद हे रामकृष्ण मठाचे अध्यक्ष आणि भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ६० देशांमध्ये अनेक वेळा दौरे केलेले. त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की, आपल्या देशातल्या लोकांना प्रजा म्हणूनच राहण्याचा अनुभव आहे. प्रजेचं पालनपोषण राजाने आपल्या अपत्याप्रमाणे करायचं असतं. त्यामुळे प्रजा राजाकडे मायबाप सरकार म्हणून पाहात असते. त्यामुळे अनावृष्टी झाली तरी सरकारनी मदत करावी आणि अतिवृष्टी झाली तरी सरकारनी मदत करावी. आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही आमची सगळी तत्त्वं बाजूला ठेवून सरकार करणार आहोत, असं हे वातावरण आहे म्हणजे लोकांनी प्रजा म्हणूनच राहावं असं राज्यकर्त्यांना वाटतंय. शतकानुशतकांची लोकांची सवय प्रजा म्हणून कोणीतरी आपलं बघेल असं करायची आहे. तिथे स्वत: पुढाकार घेऊन आपणच आपले प्रश्न सोडवायचे असतात, हे प्रजाजनाकडून नागरिक बनण्याकडे असा जो प्रवास समाजाचा व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे. तो करण्याचा प्रयत्न हा स्वातंत्र्यानंतर देखील फारसा झालेला नाही. त्यातला अगदी एक क्षीण प्रयत्न म्हणजे गडचिरोली भागामध्ये ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’. असा जो काही गावांमध्ये प्रयत्न चाललेला आहे त्याचा थोडा परिणाम दिसतो; पण एका जिल्ह्यातील काहीशे गावं आणि याचा एकूण देशावर परिणाम व्हायला खूपच वेळ लागेल असं मला वाटतं. म्हणून आपण सगळे अजून प्रजाजन आहोत असं समजण्यामध्ये आनंद मानतो; पण आम्ही नागरिक झालो पाहिजे म्हणजे स्वत: आपली जबाबदारी स्वत: घ्यायला पाहिजे, हे आपल्या देशामध्ये होऊ शकलेलं नाही कारण आधी राजेशाही होती आणि मग परकीयांचंच राज्य होतं, त्यांना ते तसंच आपल्याला प्रजा म्हणून ठेवणं हे सोयीचं होतं. त्यांना थोडं नागरिक बनविण्याचा प्रयत्न National Congress च्या निमित्ताने ह्यूमसाहेबाने केला आणि तो १५ वर्षांत ब्रिटीशांवर उलटला. त्या कॉंग्रेसने इंग्रजांना घालविण्याचं नेतृत्व केलं. त्यामुळे परदेशी सरकार तर हा प्रयत्न करणारच नाही आणि आपल्याकडचे त्या वेळचे जे संस्थानिक होते ते ही काय असं करणारे नव्हते. त्यावेळी ७०० संस्थानांपैकी एक बडोदा, म्हैसूर, औंधचं संस्थान अशी ३ किंवा ४ संस्थानांची नावं घेता येतील की जिथे राजालाही दृष्टी होती की, लोकांना प्रजेकडून नागरिकत्वाकडे घेऊन जायचं आहे. त्यामुळे हा प्रवास भारतात खूप करावा लागेल. निवेदितांनी याचं खूप छान वर्णन केलेलं आहे की, हा प्रवास होण्यासाठी पहिल्यांदा लोकांमध्ये civic sense यावा लागतो. मग public spirit यावं लागतं. civic sense म्हणजे निदान मी कायदे मोडणार नाही आणि नियम सगळे पाळीन. public spirit म्हणजे माझ्या परीने मी इतरांना सगळे नियम पाळायला लावीन. मग organized unselfishness म्हणजे मला लगेच फायदा असेल किंवा नसेल; पण समाजात त्याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन असा प्रयत्न करू, असे ३ टप्पे भारतातल्या लोकांनी अजून जायला पाहिजेत त्याच्यानंतर national identification होऊ शकेल असं निवेदितांनी १०० वर्षांपूर्वी म्हटलं आहे. मग आपण या राष्ट्राचे घटक आहोत याची जाणीव लोकांना होऊ शकेल. तर हा मोठा प्रवास करायला लागेल, ज्यांना ज्यांना लोकांमध्ये काम करायचं आहे त्यांनी या पद्धतीने विचार करायला लागेल.

  • ‘नेणीवयुक्त मन’ नियंत्रित करण्यासाठी काही Common Minimum विचार (समाजमनाच्या दृष्टीने प्रत्येकाने करायचा विचार) असायला हवा का?

या प्रश्नाच्या निमित्ताने मुक्त चिंतन (loud thinking) करतो. व्यक्तीचं नेणीवयुक्त मन नियंत्रित करायचं तर माझ्यातले हे दोष दूर व्हावेत असं चिंतन करायचं का मला या विधायक गोष्टी करता याव्यात, सकारात्मक  गोष्टी करता याव्यात असं चिंतन करायचं? तर बऱ्याच वेळा माझ्यातला हा दोष दूर व्हावा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्या दोषाचंच चिंतन होतं असा अनुभव आहे. दोष आहेत, असू देत, ते जातील कधीतरी; पण सकारात्मक गोष्टी कुठल्या आल्या पाहिजेत आणि माझ्या नेणीवयुक्त मनात सुद्धा त्या गेल्या पाहिजेत याचं चिंतन जास्त केलं पाहिजे असं मला वाटतं. हे व्यक्तीच्या बाबतीत. आणि मग समाजाच्या बाबतीत सुद्धा असाच प्रयोग करून पाहिला हरकत नाही आणि प्रबोधिनीमध्ये आपण तो सामूहिक उपासनेच्या निमित्ताने तोच करत असतो की, समूहाने मिळून काही सकारात्मक विचार करायचा आता बऱ्याचवेळा त्याचा उपचार होतो. म्हणजे ‘परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हे यंत्रवत आपण म्हणतो; पण ‘परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ म्हणजे आमच्या समाजातला पराक्रम वाढावा, आमच्या समाजातील संघटन वाढावे. आमच्या समाजातली आपल्या सगळ्यांमध्ये तिच ईश्वरी शक्ती आहे याची जाणीव वाढावी आणि आम्हाला ही जाणीव जगातील सर्वांमध्ये निर्माण करायची आहे, अशी इच्छा वाढावी. अशा ४ गोष्टी हा मंत्र ज्यांनी रचला, त्या आप्पांनी म्हटलेलं आहे की ‘परब्रह्म शक्ती स्फुरो’ म्हणताना याचं चिंतन करा. तर या सगळ्या सकारात्मक गोष्टी आहेत आणि असा जर का आपण एकत्र सकारात्मक गोष्टींचा विचार करायला लागलो तर कदाचित नेणीवयुक्त मनावर नियंत्रण येईल, असं मला वाटतंय. पण व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा हा दीर्घकालीन प्रयत्न असतो, समूहाच्या बाबतीत सुद्धा असे चिंतन केलं तर तात्पुरता परिणाम आपल्याला सुरुवातीला दिसेल. दीर्घ काळासाठी नेणीवयुक्त मन नियंत्रणात यावं म्हणून आणखी काहीतरी common minimum program काढावा लागेल असं मला वाटतं.

  • तीन प्रकारची मने तुम्ही सांगितली. जाणीवयुक्त आणि नेणीवयुक्त मन हे पटकन अनुभवता येतं. विशाल जाणीव म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? किंवा कुठे अनुभवता येतं?

कुठे अनुभवता येतं तर हे स्वत:च्या बाबतीत अनुभवता येणं अवघडच आहे, असं मला वाटतं. म्हणजे तेवढा आपला कोणाचा प्रयत्न झाला असेल असं वाटत नाही मला. महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी नावाचं एक ठिकाण आहे. त्यातले बाबासाहेब देशमुख असे एक

जमीनदार त्यांनी आपली काही हजार एकर जमीन एक संस्था स्थापून त्या संस्थेला दिली आणि तिथल्या ग्रामीण मुलांसाठीचं निवासी विद्यालय ते चालवतात. ते आपल्या निगडीला गुरुकुलाला भेट द्यायला आले होते. तिथे एक पद्धत आहे. व्यक्तिपरिचय करून देताना व्यक्तीला प्रश्न

विचारायचे. गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांशी बोलताना मुलांनी त्यांना प्रश्न विचारला – ‘तुम्हाला अतिशय दु:ख देणारा प्रसंग कोणता?’ कोणाच्या ध्यानीमनी येणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणाले १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केलं आणि भारताचा युद्धात पराभव झाला

आणि आपण काही करू शकलो नाही, याचं मला अतिशय दु:ख झालं. तर असं एखाद्याला वाटणं याच्यामध्ये विशाल जाणीव ती आहे, असं मला वाटतं. आणि असं बघायला पाहिजे की जिथे स्वत:चा विचार नाही, स्वत:च्या सु:खदु:खांचा विचार नाही आणि सगळ्यांच्या सु:खदु:खांचा

विचार आहे, असं जिथे ज्यांच्या वागण्यामध्ये बघायला मिळेल तिथे त्या वेळेपुरती त्यांची ती विशाल जाणीव आहे, असं मी म्हणीन. ती कायम असते की नाही ते आपल्याला माहिती नाही, आपण २४ तास त्यांचं निरीक्षण केलेलं नाही. पण अशा व्यक्तींचं निरीक्षण करावं आणि

त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल.

दुसरं उदाहरण नानाजी देशमुख, भारतरत्न ज्यांना मिळालेलं आहे. शिवापूरला एक जीवनयोग शिबिर म्हणून झालेलं होतं, त्या शिबिरामध्ये नानाजी देशमुख शिबिरार्थी म्हणून येऊन बसले होते. मी एकच दिवस त्या शिबिरामध्ये गेलेलो होतो. पण नानाजींबरोबर थोडा वेळ बोलायची संधी मिळाली. मी काही विचारलं नाही. विचारायचा प्रश्न नव्हता, मी आपलं त्यांच्या बरोबर होतो. त्यांनीच आपणहून बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘अनेकांना वाटतंय की, मी इतके वर्षं काम केलं आणि इतकी मोठी संस्था चालवत होतो. मी इथे शिबिरार्थी म्हणून का आलो?’ पण मला असं वाटतं मी आजपर्यंत जीवन जगलो; पण जीवनयोग काय असतो मला माहिती नाही. मग जे कोणी शिकवतात त्यांच्या पायाशी बसून शिकलं पाहिजे. इथे चाललं आहे, असं कळलं म्हणून मी आलो, असं ते सहज बोलून गेले. एवढं मोठं कर्तृत्व असलेला माणूसही मला हे कळलं नाही, मला हे समजून घ्यायला पाहिजे, मी आलो इथे, असं सहज म्हणू शकतो. मला वाटतं तिथे ती विशाल जाणीव त्यांच्यामधली त्यावेळी व्यक्त झाली, असं मला वाटतं. तर असे प्रसंग आपल्याला शोधत राहावे लागतील आणि मग इतरांच्या मधली ही विशाल जाणीव काय आहे ही कळली तर आपल्यामधली कळायला लागेल. परंतु ही विशाल जाणीव सुद्धा विवेकानंद म्हणतात तसं Super-conscious आहे असं मला वाटत नाही. ती conscious मधलीच अधिक व्यापक अशी जाणीव आहे. विशाल जाणीव म्हणजे जिथे तुम्ही स्वत:ला पूर्णपणे विसरता. म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग वाचायला मिळतात. आधीच्या संतांच्या चरित्रात आहेत; पण ते दंतकथा असू शकते आणि रामकृष्ण परमहंस म्हणजे संत माणूस म्हणून ते सुद्धा बाजूला ठेवतो.

असाच एक प्रसंग लोकमान्य टिळकांच्या बाबतीतला आहे. तोही मला विशाल जाणिवेकडे लक्ष वेधणारा आहे, असं वाटतं. ते मंडालेच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांची कोठडी होती, तिच्या एका बाजूची भिंतीला हे पूर्णपणे लाकडी गज होते आणि त्याच्यातून अर्थातच चिमण्या आत येऊ शकतील एवढी जागा होती. त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करणारा कैद्यांपैकीच स्वयंपाकी नेमलेला होता आणि तो शिधाही त्यांच्याकडेच काढून ठेवलेला असायचा. त्यांचं वाचन, चिंतन चालू असताना चिमण्या आल्या की सहजपणे ते तांदुळाचे दाणे त्यांच्यासमोर टाकायचे. त्यामुळे चिमण्या धीट झाल्या की या माणसाला काही घाबरायचे कारण नाही, हा काही करणार नाही आपल्याला. आणि मग त्यांच्याबरोबर जो कैदी स्वयंपाकी होता त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहून ठेवलं आहे की त्यांची वाचण्यामध्ये, चिंतनामध्ये इतकी तंद्री लागायची की चिमण्या सहजपणे त्यांच्या अंगाखांद्यावरती आणि डोक्यावर येऊन बसायच्या. ही पक्ष्यांमध्ये जी माणसाबद्दलची भीती असते ती भीती जाणं हे निर्भय, निर्वैर होणं, त्याच्यामध्ये ती विशाल जाणीव आहे असं मला वाटतं. निर्भय आणि निर्वैर म्हणजे आपली कोणाला भीती न वाटणं आणि आपल्याला कोणाची भीती न वाटणं. आपलं कोणाशी भांडणं नसणं आणि आपल्याशी कोणाचं भांडण नसणं ही स्थिती जेव्हा होईल तेव्हा ती विशाल जाणीव Super-conscious ज्याला विवेकानंद म्हणतात ती कदाचित माणसाच्या आवाक्यात येत असावी असं मला वाटतंय. पण त्याच्यासाठीचे प्रयत्न आणि धडपडच आपल्याला चालू ठेवावी लागेल. मला प्रत्यक्ष अनुभव नाही त्याचा.

१०. ‘एकतेचा दृष्टिकोन ठेवून विविधतेकडे पाहा’ याला राष्ट्रयोगासाठीच्या यमनियमांपैकी एक असं म्हणता येईल का? असे कोणते ‘यमनियम’ आणखी सांगता येतील? कोणी सांगितले आहेत का?