राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचारप्रवाह

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला- भाग १- 

राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचारप्रवाह

कृपया नोंद घ्यावीमा. श्री. गिरीशराव बापट यांच्या व्याख्यानमालिकेतील पहिल्या व्याख्यानाचे आणि त्यासंदर्भातील प्रश्न-उत्तरांचे शब्दांकन करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. हे शब्दांकन गिरीशरावांकडून तपासून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात काही प्रश्न, शंका असल्यास ‘ईमेल’च्या माध्यमातून त्या उपस्थित करण्यास हरकत नाही.   

मा.संचालकांच्या तीन व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले वैचारिक, दिनांक ३१-८-२०१९

राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचारप्रवाह –   डॉ. गिरीश बापट

मी एकूण तीन वेळा बोलणार आहे. त्यातलं आजचं पाहिलं भाषण आहे. परंतु राष्ट्रविचार हा शब्द मुद्दाम वापरला आहे. राष्ट्रवाद हा शब्द वापरणार नाही कारण यात नुसता राष्ट्राचा जयघोष करणे हे जास्ती येतं, राष्ट्राचा विचार असतोच असं नाही. मला खरं तर राष्ट्रयोग हा शब्द वापरायचा आहे; पण तो शेवटच्या व्याख्यानात वापरणार आहे. त्यामुळे मधला ‘राष्ट्रविचार’ असा शब्द शीर्षकामध्ये वापरलेला आहे.

अगदी तात्विक चर्चा करायची झाली तर जगामधील विविध राष्ट्रांचा विचार करता येईल. पण राष्ट्रविचार म्हणजे हिंदुत्व विचार असेच मला अभिप्रेत असणार आहे. हिंदुत्वाला भारतातल्याच काही विचारवंतांच्या मते  अध्यात्मिक पाया आहे आणि काहींच्या मते हिंदुत्वाचा विचार हा इहवादी पद्धतीने मांडला पाहिजे असंही आहे. पण मी येथे हिंदुत्वाला अध्यात्माचा पाया आहे असं गृहीत धरून बोलणार आहे. राष्ट्रविचाराला छेद देणारे म्हणजे अध्यात्मिक पाया असलेल्या हिंदुत्वाला छेद देणारे आधुनिक विचार प्रवाह कोणते अशा संबंधी मी  बोलणार आहे. हिंदुत्वाला अध्यात्माचा पाया आहे त्यामुळे हवे ते घ्यायचे बाकीचे सोडायचे असे करता येते. जे आधुनिक विचारप्रवाह अध्यात्म मानीत नाहीत – या जगातल्या, या जन्मातल्याच गोष्टी करतात त्यांचा आपल्या राष्ट्रजीवनावर कसा परिणाम होऊ शकतो, होत आहे याविषयी मी बोलणार आहे.

आधुनिक विचार म्हणजे इ.स. १९६० नंतरच्या काळातले विचार घेतले आहेत. १८९० ते १९०० या काळात आता Physics मधलं सगळं संशोधन करून संपलं – End of Physics अशा प्रकारचं वातावरण अनेक शास्त्रज्ञांच्या मध्ये होतं; पण १९०० ते १९२५ या कालावधीमध्येच Physics मध्ये एवढे बदल झाले आणि इतकं त्यात नवीन संशोधन झालं की आज आता Physics संपलं असं म्हणायला कोणी धजावणार नाही. कारण नवीन नवीन सतत काही लक्षात येत असतं. तसं १९६२ मध्ये Daniel Bell या समाजशास्त्रज्ञाने End of Ideologies असं पुस्तक लिहिले. दोन महायुद्धे झाली आणि सगळ्या जगात आदर्श समाजजीवन कसं असावं हा विचार मांडणाऱ्या ज्या विचारसरणी होत्या मुख्य भांडवलशाही व समाजवाद यांचं काम आता संपलेलं आहे. असं आदर्श जीवन काही या विचारसरणींच्या आधारे कदाचित निर्माण होणार नाही. जे काही बदल आणि सुधारणा ज्या काही होतील त्या मुख्यत: तंत्रज्ञानाच्या आधारे होतील आणि विचारप्रवाह कुठले आलेच तर ते सगळ्या जगाचा किंवा जीवनाच्या सगळ्या पैलूंचा विचार करणारे असे नसतील तर ते समाजजीवनाच्या एखाद्या भागाचा विचार करणारे, एखादा प्रश्न सोडवणारे असे विचारप्रवाह असतील. १९८९  मध्ये End of History अशी एक कल्पना मांडली गेली. वरवर पाहणाऱ्यांना हे मोठं गंमतीशीर विधान वाटतं; पण End of History म्हणजे विचारसरणींमधला जो संघर्ष होता तो संपला. कारण तेव्हा रशियातील साम्यवादी राजवट कोसळली आणि आत्ता सगळीकडे भांडवलशाही येणार. आणि आता जे काही बदल होतील ते तंत्रज्ञानानेच बदल होतील असं म्हटलं गेलं होतं. ते बदल होतच आहेत झपाट्याने. मी ज्या चार आधुनिक विचारप्रवाहांबद्दल बोलणार आहे त्यातल्या  एका विचारप्रवाहातले अनेक विचारवंत म्हणत आहेत की आम्ही सगळं मांडलंय; पण इंटरनेटच्या युगामुळे आता हे सगळं कालबाह्य झालेलं आहे. आता End of Ideaologies म्हणत असताना समाजवाद व भांडवलशाही हे  मुख्य विचारप्रवाह डोळ्यासमोर होते, ते विकसित व्हायलाही १००-१५० वर्षे मिळाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळ्या प्रकारची प्रात्याक्षिके करून झालेली होती आणि त्यातून त्या निष्कर्षापर्यंत Daniel Bell आलेला होता. १९६०  नंतरच्या आधुनिक विचार प्रवाहांच्या चाचण्या व्हायला देखील पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे हे विचारप्रवाह याच्यापुढे आणखी क्षीण होतील की बलवान होतील त्याचा आपल्या राष्ट्रविचारावर काय परिणाम होईल ते सांगणे अवघड आहे. पण राष्ट्रविचार करताना काय विचार केला पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे असे हे चार विचारप्रवाह मला वाटले.

खरेतर एखाद्या विचारसरणीचा अभ्यास करायचा म्हणजे प्रबोधिनीमध्ये आपली पद्धत आहे की त्याच्यासाठी एक अभ्यासशिबिर घ्यायचे. प्रबोधिनीतल्या कार्यकर्त्यांच्या पहिल्या फळीची तयारी कशी झाली तर हिंदुत्व अभ्यास शिबिर झालं – म्हणजे आपण कोण हे आधी कळले पाहिजे. पण आपण कोण हे कळून आपण काय करायला पाहिजे हे कळत नाही. आणि त्यासाठी विविध विचारसरणींचा अभ्यास झाला पाहिजे. आणि मग त्यासाठी समाजवाद अभ्यास शिबिर, साम्यवाद अभ्यास शिबिर, आर्थिक प्रश्नांचं अभ्यास शिबिर, संरक्षण प्रश्नांचं अभ्यास शिबिर अशी विविध अभ्यास शिबिरे झाली. आणि मग या  विचारसरणींचा  अभ्यास केल्यानंतर यापलीकडेही काही तत्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा  म्हणून  गीतारहस्य अभ्यास शिबिरही झाले. ही अभ्यासशिबिरांची पद्धत असल्याने मग भारतात आणखी कोणते विचारप्रवाह आहेत. त्यामध्ये मग  गांधीविचार अभ्यास शिबिर, सावरकर अभ्यास शिबिर, आंबेडकर अभ्यास शिबिरही झाले.परंतू गेल्या १५-२० वर्षांत लहानमोठ्या कार्यकर्त्यांचं एकत्र अभ्यास शिबिर झालेलं नाही आहे. महाविद्यालयीन युवक युवतींची काही अभ्यास शिबिरे होतात. तशी किमान चार अभ्यास शिबिरे व्हायला पाहिजेत एवढा आशय आहे. तो आज मी एका व्याख्यानामध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे विषयांचे सुलभीकरण वाटेल आणि ज्यांचा अभ्यास नाही त्यांना हे चारही विषय एकदम आणि अवघड बोलत आहेत, असं वाटण्याची शक्यता आहे.

आज मी येथे चार आधुनिक विचारप्रवाहांबद्दल  बोलणार आहे.

1. Liberation Theology – मुक्तीचे धर्मशास्त्र

2. Eco feminism – पर्यावरणीय स्त्रीवाद

3. Deep Ecology – सखोल पर्यावरणशास्त्र  

4. Post modernism– उत्तर आधुनिकतावाद

या चारही वर अभ्यासशिबिर घेता येईल एव्हढे हे विषय मोठे आहेत पण मी एक तासात मांडणार आहे.

१. Liberation Theology (मुक्तीचे धर्मशास्त्र)अजितराव कानिटकर १९८४-८५ मध्ये त्रिवेंद्रम येथे होते, तेथे त्यांचे वाचन चालू असे. त्यांनी मला काही छोट्या पुस्तिका वाचायला दिल्या. भारतातील दलित आणि ख्रिश्चन  यांच्याशी संबंधित त्या पुस्तिका होत्या, दलित व ख्रिश्चनांचे ऐक्य केल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे त्यात होते. भाई फडके अमेरिकेतील काळे व भारतातील दलित यांचा तौलनिक अभ्यास करत होते. त्यात हा शब्द परत आला. मुक्तीचे धर्मशास्त्र (L.T.) आफ्रिकेतील काही धर्मगुरू मांडत होते.  दक्षिण अमेरिकेतील मूलनिवासी लोकांचा हा मूळ शब्द. या मूळच्या विकसित संस्कृती परंतु स्पेन, पोर्तुगालच्या राजवटीने त्या धुळीला मिळाल्या. या राजवटीही नंतर नष्ट झाल्या पण  दक्षिण अमेरिकेत परकीय आक्रमणामुळे हुकूमशाही आली. त्यामुळे तेथील ग्रामीण शेतकऱ्यांची पिळवणूक करणे, त्यांना हुसकावणे, शेती पळवणे या सगळ्यामुळे स्थानिक लोक मोठ्या शहरात झोपडपट्टीत हलाखीत राहू लागले. येथे  रोमन कॅथोलिक चर्चचे वर्चस्व होते. त्यांना उपदेश करणाऱ्या धर्मगुरूंना वाटले असे इकडे प्रश्न आहेत ते सोडविले पाहिजेत, पण धर्मगुरू असल्याने बायबलच्या बाहेर बोलणे शक्य नव्हते. तेव्हा तिथल्या लोकांचे गट एकत्र करायचे प्रश्न विचारायचे धार्मिक विचार सांगून प्रश्न सोडवायला उपयोग होईल यावर विचार, चर्चा त्यांनी  करायला लावल्या. त्यामुळे सामाजिक दुरितापासून मुक्तीच्या चर्चा असे याचे नाव झाले. रोमन कॅथोलिक चर्चचे जाळे चांगले मोठे असते, तिथे बिशप नेमलेले असतात, चर्चेस असतात, तेथे कोणता भाग कोणत्या चर्चच्या अखत्यारीत येतो याची सगळी रचना झालेली असते. काही बिशपचां याला विरोध होता; पण काहीजण मात्र  आपला टिकाव लागण्यासाठी प्रश्न सोडवायला पाहिजेत असे मानणारे होते. धर्मशास्त्राच्या आधारे प्रश्न सोडविणे सुरू झाले; ब्राझीलमध्ये ही चळवळ फोफावत गेली. पायाभूत समाजगट २०-४० च्या संख्येने एकत्र यायचे बायबलमधील एखादे प्रकरण घेऊन त्याचा उपयोग करून, आत्ताच्या परिस्थितीपासून मुक्ती मिळवायची तर काय करायचे असा विचार व्हायचा. जुलमाखाली भरडली गेलेली लोक Oppressed  व त्यांची मुक्ती liberation.द. अमेरिकेत हा शब्द फक्त चर्चमध्येच नाही तर शिक्षणशास्त्रातही वापरला गेला .पावलो फ्रायडे याने शिक्षण शास्त्रात Pedagogy of oppressed Pedagogy of liberation अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. त्याने प्रौढ शिक्षणाच्या चळवळीत या तंत्राचा वापर केला, एकत्र येऊन चर्चा करणारे गट. सर्वसामान्य लोकांचे गट, चर्चचे फादर, व्याख्याने ऐकायला जमणारे लोक, त्याचे लेखन करणारे लेखक अशी एक साखळी निर्माण झाली. १९६० नंतर मार्क्सवादाचे आकर्षण होते. त्यातून मार्क्सवाद व बायबलमधील तत्वज्ञान अशी सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. १९६० ते १९९० पर्यंत दलितांनी बंड करण्याऐवजी धर्माच्या आधारे चर्चा करावी अशीही चळवळ पसरत गेली. परंतू १९९० नंतर क्युबाची साम्यवादी राजवाट गेली व या चळवळीलाही ओहोटी लागली. मग आपण (L.T.) मुक्तीच्या धर्मशास्त्राचा  विचार का करायचा?

द.आफ्रिका, पॅलेस्टाईन, दक्षिण कोरिया प्रमाणे ही चळवळ भारतातही आली. भारतातील परिस्थिती वेगळी होती.  गौतम बुद्ध हा या मालिकेतील पहिला व ( L.T.) मुक्तीच्या धर्मशास्त्राची मांडणी करणारे भक्तिमार्गी संत नंतरचे अशी मांडणी केली गेली. आज मात्र येशू ख्रिस्त हा पहिला दलित, त्याचीही परिस्थिती आपल्यासारखीच, त्याचाही जन्म गोठ्यात झाला असे मांडले जाते. आकडेवारीचाही अभ्यास चालू आहे. भारतात अडीच कोटी ख्रिश्चन आहेत. त्यातील ७० टक्के धर्मांतरित आहेत म्हणजे एक कोटी पंचाहत्तर लाख.  साडेसतरा कोटी दलित आहेत. त्यातील १० टक्के जरी दलित, ख्रिश्चन यांनी या पद्धतीने आपली सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी याचा आधार घेतला तर?

भारतातील परिस्थितीत ख्रिस्ताचा आधार घेवो न घेवो पण भारतातील दलितपण गेले पाहिजे यासाठी सहा विविध धर्माचे दलित प्रतिनिधी घेऊन भारतातील दलितांची संघटना बांधण्याचे प्रयत्न चालू आहेत. चळवळ वाढवणे व धर्मांतर नसले तरीही बायबलचा संदेश पोहोचवायचा तर भारतात गांधीजी व दलितांसाठी आंबेडकर यांचा विचार केला पाहिजे हे लक्षात घेऊन वेगवेगळे साहित्य तयार होते आहे. १९९९ पासून हे काम कसे वाढेल याचा विचार चालू आहे.२०१५ चे एक पत्रक वाचले त्यात कामाचा विचार आहे; पण राष्ट्राचा विचार नाही. पण आपल्याच राष्ट्रातले काहीजण या विचाराच्या आधारे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करीत आहेत व शेवटी बायबलचा आधार घेणार आहेत. रोमन कॅथोलिक चर्च आंतरराष्ट्रीय विचार करीत आहे. भारतात वेगवेगळ्या चर्चच्या सेमिनारीजचे प्राध्यापक यावर लिहितायत. पहिले सहस्त्रक युरोपात, दुसरे दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत व  तिसऱ्या सहस्रकात आशियात ही चळवळ निर्माण करायची आहे असा प्रचार चालू आहे. अजूनतरी चळवळ रुपात जास्त आहे. आर्थिक,राजकीय,समाजिक मांडणी झालेली नाही; पण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे आहे यावर आपले लक्ष असायला हवे.

२. Eco feminism – वंदना शिवा स्त्रीवादी विचार मांडणाऱ्या, पर्यावरणीय स्त्रीवाद या विषयावरती बोलणाऱ्या त्या पहिल्या. जगभरात भारतातील ज्या एका व्यक्तीचे नाव आदराने घेतले जाते त्या म्हणजे वंदना शिवा…त्यांचा विचार समजून घेतला जातो. पर्यावरणीय स्त्रीवाद हा विचार पुढे नेणाऱ्या त्या आहेत. १९६२ साली सुरू झाला म्हणून त्याला आधुनिक विचार म्हंटले आहे. ‘चिपको आंदोलन’ हा एक महत्त्वाचा टप्पा होता असे त्या म्हणतात. त्यावर त्यांनी पुस्तके लिहिली. आजपर्यंतची सगळी प्रगती ही पुरुषकेंद्री विचारातून झाली आहे. पुरुषकेंद्री विचार म्हणजे आपल्या बलाचा वापर करून  संसाधनांवर नियंत्रण मिळवायचे व आपल्या संसाधनांमध्ये भर घालत रहायची. निसर्गाप्रमाणे स्त्रियाही संसाधन, स्त्रीमुक्तीचा लढा, विकास प्रक्रियेतील  पुरुषांचे वर्चस्व संपल्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे निसर्ग व स्त्रिया यांच्या शोषणाचा एकत्र विचार करायला हवा अशी दिशा त्यांनी दिली. याला पर्यावरणीय स्त्रीवाद असे म्हंटले आहे. १९६५ मध्ये सुरुवात झाली म्हणून याला आधुनिक विचार म्हंटले. रशियाल कार्सेल नावाच्या स्त्रीने प्रदूषणाबद्दल पहिल्यांदा विचार मांडले.१९७२ मध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांच्या Stockholm येथील परिषदेत सर्व सरकारांनी हा विचार गांभीर्याने करावा अशी जाणीव निर्माण झाली.१९८७ मध्ये एक समिती नेमली होती त्यात Brutland नावाच्या नॉर्वेच्या शासकीय प्रतिनिधी होत्या ज्या त्या समितीच्या प्रमुख होत्या, त्यांनी जो अहवाल सादर केला त्यात sustainable development हा शब्द वापरला होता. पर्यावरणीय स्त्रीवादात वंदना शिवा यांनी घातलेली भर म्हणजे डेव्हलपमेंट सस्टेनेबल असू शकेल का? तर असणार नाही. त्या म्हणतात शाश्वत विकास नाही तर शाश्वत निर्वाहापुरते मिळवणे योग्य ठरेल. निसर्ग संपत्ती मर्यादित आहे. मानवी लोकसंख्येला मर्यादा घालायला हवी. भौतिक संपत्तीत भर घालत राहण्याचा विचार अडचणीचा होईल.

विचारसरणी म्हटले की त्यात आर्थिक विचार मांडला पाहिजे. शाश्वत उदरनिर्वाहासाठी, उत्पादन कशासाठी करायचे तर विक्रीयोग्य नाही तर वापरण्यायोग्य व वापरण्यापुरती वस्तुनिर्मिती करायची. हे करताना आज जे बाजार या संस्थेला अवास्तव महत्त्व आले आहे, तसं नाही तर बाजार हे दुय्यम झाले पाहिजेत. बाजार ही जागा फक्त वस्तू विनिमयाची असली  पाहिजे. माणूस व निसर्ग असा संबंध नव्याने  निर्माण झाला पाहिजे तरच सर्व जीव सुखात राहतील. निसर्गातील विविधता व समृद्धी माणसाकरता नाही तर तिच्यापुरते तिचे अस्तित्व आहे असे म्हणले पाहिजे. गांधीजी म्हणतात, निसर्गात गरजेपुरते आहे, हावेपुरते नाही. मुक्तीचे धर्मशास्त्रवाले, वंदना शिवाही गांधीजींचे नाव घेतात. पुरुष -पुरुष, स्त्रिया- पुरुष संबंधही नव्याने विकसित झाले पाहिजेत. कामातील श्रमविभागणीचाही विचार झाला पाहिजे. बँक बॅलन्सपेक्षा शेजारीपाजारी माझा उदरनिर्वाह करतील असा परस्परविश्वास वाटला पाहिजे. हा आर्थिक विचार झाला.

राजकीय विचार म्हणजे participatory democracy, grass root democracy  तृणमूल काँग्रेस शब्द त्यातून आला. गरिबातील गरीब लोकांना तंत्रज्ञान कुठले वापरायचे, कोणते स्वीकारायचे, सामाजिक-आर्थिक  संबंध कसे असावेत याचे निर्णय घ्यायची व्यवस्था असली पाहिजे आणि विधानमंडळ किंवा ग्रामपंचायती याच्यापेक्षा लोकांनी एकत्र येऊन ग्रामसभेसारख्या पद्धतीने आपले प्रश्न सोडवावेत अशी राजकीय मांडणी त्यांनी केली आहे. सामाजिक विषयामध्ये वारसा हक्क स्त्री-पुरुषांना सारखा असला पाहिजे हे सर्व समाजाने मान्य केले पाहिजे. दारिद्र्य, विषमता हे प्रश्न परस्पर संवादाने, सहकार्याने कसे सोडवता येतील याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये मग विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे नव्या दृष्टीने बघायला पाहिजे. Subsistence science and technology असा विषय त्यांनी मांडला आहे. उदरनिर्वाह अधिक चांगल्या प्रकारे कसा होईल त्यासाठीचे अधिक चांगले तंत्रज्ञान  आपण शोधले पाहिजे आणि त्यासाठी विज्ञान वापरले पाहिजे. वंदना शिवांचा आग्रहाचा मुद्दा म्हणजे पारंपरिक ज्ञानाचे पुनरुज्जीवन करावे. मौखिक परंपरा लेखबद्ध व्हाव्यात. त्याचा वापर लोकांनी करायला पाहिजे म्हणजे नियंत्रण सर्वसामान्य लोकांकडे येईल. खाजगीकरण आणि व्यापारीकरण कशाकशाचे होते तर सध्याच्या भांडवलशाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे, पाणी, हवा, कचरा, माती याचे व्यापारीकरण होत आहे आणि पैशात मोल करणे चालू आहे तसे नको. प्राचीन काळी जसे गावोगावी गायराने गावाच्या मालकीची होती तशी या वस्तू गावाच्या मालकीच्या हव्यात सरकारच्या मालकीच्या नको. याचे खाजगीकरण नको. सर्व गोष्टी पुरुष केंद्रित नको. पुरुष केन्द्रीत अर्थ व्यवस्था नको असेल आणि स्त्रिया -पुरुष हे द्वंद्व संपवायचे असेल तर पुरुषांचाही कामात सहभाग हवा. नाहीतर पाश्चात्य देशात पुरुषांनी प्रदूषण करायचे आणि स्त्रियांनी त्याविषयी आंदोलन करायचे, थोडक्यात पुरुषांनी गोंधळ घालायचा आणि बायकांनी आवरायचा असे नको. दोघांचे एकत्रित काम हवे. सगळ्यात महत्त्वाचे मला वाटते ते त्यांच्याच भाषेत सांगायचे म्हणजे In practical terms this means they have to share unpaid subsistence work i.e. in the household, with children, with the old and sick, in ecological work to heal the earth in new forms of subsistence production.’ घरातील पुरुषांनीही करायला हवे. हे झाले तर demilitarization of men and society असं होईल असे त्या म्हणतात. युरोपियन पद्धतीने राहणीमान म्हणजे विकास नव्हे. ते प्रॅक्टिकल नाही आणि त्यामुळे सुख शांती मिळतेच असे नाही. हे व्यवहारात कसे आणायचे याचा विचार करायला हवा. अर्थात हा स्थानिक पातळीवरील विचार झाला. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शन नाही.

3.Deep Ecology – सखोल पर्यावरणशास्त्र – सध्याचा पर्यावरणाचा विचार हा मानव केन्द्रित विचार आहे. Grey environmentalism and Green environmentalism हे दोन शब्द वापरले जातात. प्रदूषण, धूर कमी कसे करायचे, प्रदूषणामुळे झालेले नुकसान भरून कसे काढायचे  याचा विचार आहे म्हणजे नकारात्मक विचार आहे की पृथ्वीचे झालेले नुकसान भरून कसे काढायचे! औद्योगिक संस्कृतीतून जो धूर निर्माण झाला आहे तो कमी करून प्रदूषण कमी करायचे म्हणजे Grey environmentalism.

Green Environmentalism म्हणजे जे आहे ते टिकवता कसे येईल आणखी हिरवगार कसे करता येईल याचा विचार करायचा. Deep Ecology वाले याला shallow किंवा उथळ पर्यावरण शास्त्र असे शब्द वापरतात. ते मानवकेंद्रित विचार करतात की आज जे आपण वापरतो ते आपल्याच आयुष्यात किंवा आपल्या मुलाबाळांच्या मध्ये संपून गेले तर काय?  म्हणून निसर्गाचे संरक्षण व पुनर्भरण केले पाहिजे. हा म्हणजे मानवकेंद्रित विचार झाला. हे सर्व टिकले पाहिजे म्हणजे वाघाचे संरक्षण का केले पाहिजे  तर ते  संपले तर पर्यावरणाची साखळी बिघडणार . मोठ्या प्राण्याचे रक्षण महत्त्वाचे म्हणजे, वाघाचे रक्षण का? कारण तो अन्न साखळीत सगळ्यात वरच्या टप्प्यावर आहे. वाघ पुरेसे म्हणजे पर्यावरण चांगले आहे याचे लक्षण झाले. हे झाले उथळ पर्यावरण शास्त्र.

तर सखोल पर्यावरणशास्त्र म्हणजे काय हे सारे पर्यावरणाचे काम कशासाठी करायचे तर भारतात जसे आपण विचार करतो हिंदू ,मुस्लीम सिक्ख,इसाई सब है भाई भाई तर तसा पृथ्वीचा विचार करायचा. निसर्गातील सर्व जीव कीटक ,पशु,पक्षी, झाडे, झुडपे हे सगळे भाई भाईच आहेत तर तसा विचार करायचा. आपण एकत्रच जगणार आहोत व एकत्रच मरणार आहोत तर फक्त माणसाचा नाही विचार करायचा, तर सगळ्या पृथ्वीचा विचार करायचा. मानवकेंद्रित विचार न करता सखोल विचार करायचा म्हणजे सखोल पर्यावरणशास्त्र. निसर्गातील सर्व  एकत्रित आहेत त्यामुळे एकूण त्यांचा विचार करायचा असेल तर सखोल विचार हवा. याला काही शास्त्रज्ञानी गैया हायपोथिसीस  हे नाव दिले आहे.हे नॉर्वेजिअन नाव आहे. (गैया – पृथ्वीचे ग्रीक नाव) सगळ्या पृथ्वीचा विचार करायचा. पण तत्वज्ञानामध्ये सखोल पर्यावरणशास्त्र हे नाव जास्त रूढ आहे. १९७२ मध्ये पहिल्यांदी वापरला गेला हा शब्द नॉर्वेजिअन भाषेमध्ये तिथल्या एका शास्त्रज्ञाने वापरला. पण तत्त्वज्ञानात  १९८० सालापासून सर्वत्र वापरला जाऊ लागला. पर्यावरणीय  स्त्रीवादामध्ये  शाश्वत विकासाच्या ऐवजी शाश्वत उदरनिर्वाह ही कल्पना मांडली गेली. सखोल पर्यावरणाशास्त्रामध्ये शाश्वत विकास सर्वकेंद्रित मांडला आहे. पृथ्वीचा विकास, निसर्गाचा विकास, पर्यावरणाचा विकास हा सर्व मानवाचा विकास व्हावा म्हणून झाला आहे. त्यामुळे हा शब्द बाजूला सोडून त्याऐवजी काही जणांनी शाश्वत उत्क्रांती हा शब्द वापरला पाहिजे असे म्हंटले आहे. उत्क्रांतीची प्रक्रिया अखंड चालू राहिली पाहिजे. आता निसर्ग इतका सशक्त आहे की डायनासोर जरी नष्ट झाले तरी पुन्हा उत्क्रांती होतच राहिली; पण आपल्यामुळे उत्क्रांती खंडित व्हायला नको. अशी काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे सर्व सजीवांना जलचरांना, स्थलचरांना, पशुपक्षी, कीटकांना समान जगण्याचा हक्क आहे. असे याच्यामध्ये मांडलेले आहे. आता हे तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाने मांडलेले असल्यामुळे थोडसे त्याची त्यांनी व्यवस्था लावायचा प्रयत्न केला आहे. हे जाहिरनाम्या प्रमाणे मांडले आहे.

सखोल पर्यावरण शास्त्रात मांडलेले मुद्दे

१. मानवेतर सृष्टीचा मानवाला कसा उपयोग होतो याच्या निरपेक्ष तिचे महत्त्व मान्य केले पाहिजे.

२. आपण जैव विविधता निर्माण केलेली नसल्यामुळे जैवविविधता कमी किंवा नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. मानवी उपभोगासाठी जैवविविधतेचा उपयोग करायचा नाही. मानवाने आपल्या गरजेपुरते फक्त घ्यावे.

३.मानवी संस्कृतीच्या विकासासाठी मानवी लोकसंख्येवर नियंत्रण पाहिजे आणि तसे राहिले नाही तर इतर जीवसृष्टीचा ऱ्हास होईल, तर अन्य सृष्टीचा ऱ्हास नको

४. सध्या मानवाने इतर जीवसृष्टीमध्ये विनाकारण अतिशयोक्त हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडते आहे, ती लवकरात लवकर दुरुस्त केली पाहिजे. त्यासाठी धोरणेच बदलली पाहिजेत. आर्थिक तंत्रज्ञानातील आणि विचारातील सुद्धा आणि ही धोरणे बदलायची झाली तर यांनी देखील वंदना शिवा यांच्याप्रमाणे म्हंटले आहे. मुख्य जीवनाच्या गुणवत्तेचा अर्थ आपल्याला शोधायला पाहिजे. ‘स्टॅंडर्ड ऑफ लिविंग’चा आग्रह, हट्ट सोडून द्यावा लागेल.

५. आणि हे सगळे व्हायचे असेल तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.

ज्यांनी ही कल्पना मांडली ते विद्यापीठामधील प्राध्यापक असल्याने हा शब्द चर्चेमध्ये खूप आला आहे. पण प्रत्यक्ष काम केले पाहिजे असे म्हंटल्यावर डीप इकॉलोजी पेक्षा इको-फेमिनिझमवर काम करणारे खूप लोक आहेत. फक्त भाषा वापरली जाते दिशादर्शक आहे. त्यासाठीचे काम करणे हे मान्य नाही. काहीजणांनी वेगळ्याच कारणासाठी हे तंत्र वापरायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ,व्हेल माशांच्या हत्येवरती बंदी घालण्यासाठी ग्रीनपिज संघटना काम करते तर त्यातील एक  अतिरेकी गट आम्ही  सखोल पर्यावरणासाठी काम करतो त्यामुळे व्हेल माशांना जे मारायला येतील त्या बोटी आम्ही नष्ट करू. मग त्यावेळी खलाशी बुडाले  तरी चालतील म्हणजे व्हेलच्या आयुष्याला माणसाच्या आयुष्यापेक्षा जास्त किंमत आहे असे टोकाला जाणे आहे. डीप इकॉलोजीच्या माध्यमातून काम करणारे ग्रीनपिज मधले काही गट हे यातून फुटले आहेत आणि ज्यांनी हे मांडले आहे ते म्हणतात याचा प्रचार कोणी करावा तर कवी, लेखक, कलाकार यांच्या माध्यमातून याचा प्रसार करावा असे म्हंटले आहे. त्यामुळे शब्दाचा वापर खूप वाढला आहे. पण त्याच्यावर विचार करणे आणि काम करणे झालेले नाही. हा विचार करणारे सगळे लोक एकूण पृथ्वीचाचा विचार करत असल्याने राष्ट्र वगैरे कल्पना त्याच्यामध्ये बाद होतात. अजून कुठल्या देशामध्ये ग्रीनपिज किंवा ग्रीन पार्टीचे सरकार आलेले नाही. मध्ये एकदा कुठल्या तरी युरोपीय  देशात आले होते; पण ते वर्षभरात पडले. जिथे ते युतीमध्ये आले आहेत, सत्तेमध्ये गेले आहेत तिथे इस्लामी पक्ष जसा कुठेही गेला तरी आपल्या फायद्याचे बघतो. राष्ट्राचा विचार करत नाही त्याप्रमाणे, हे पर्यावरणाचा विचार करतात; पण राष्ट्राचा विचार करीत नाहीत. असे सत्ताधारी पक्षांमध्ये जिथे ग्रीनपिजचे लोक सहभागी असतात, तिथे वागताना दिसतात. हे जर वाढले तर त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद करायचा याचा आपल्याला विचार करावा लागेल असे दिसते. या सगळ्यात पर्यावरणाचा विचार आहे पण राष्ट्राचा विचार नाही.

शेवटचा जो विचार आहे

४. Post Modernism – उत्तर आधुनिकतावाद हा विचार कधी सुरू झाला यावर हा विचार मांडणारेही चर्चा करतात. आधुनिक काळ कधी संपला आणि उत्तर आधुनिक काळ कधी सुरू झाला याच्यावरती १८७० ते १९७० अशी वेगवेगळी वर्षे दिली जातात. म्हणजे १८७० ला सुरू झाले असे म्हणतात, पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे १९६०,१९७०,१९७९ नंतर अशी वेगवेगळी वर्षे कारण, हा प्रतिक्रियेतून निर्माण झालेला विचार आहे. आधुनिकता म्हणजे काय? तर तर्कबुद्धीला महत्त्व देऊन, विज्ञान तंत्रज्ञानाला महत्त्व देऊन त्याच्या आधारे  निसर्गावर विजय मिळवणे व आपला जास्तीत जास्त आर्थिक विकास करून घेणे हे आधुनिक काळाचे लक्षण  सांगितले आहे आणि ते सतराव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत या पद्धतीने हा आधुनिक काळ आला देशामध्ये असे त्याने म्हंटलेले आहे. मग त्याने आधुनिक काळामध्ये जर का ज्ञानाचा आधार आणि तर्कबुद्धी हा आधुनिकतेचा आधार होता तर मग उत्तर आधुनिकतावाद म्हणतो तर्कबुद्धी आणि ज्ञान हेही मिथक आहे आख्यायिका आहेत. असे काही लोकांना वाटते की तर्कबुद्धीच्या साहाय्याने जे सार्वत्रिक आहे असे सत्य शोधून काढता येईल असे आधुनिक काळात म्हंटले जात होते तर सत्य संस्कृती सापेक्ष आहे असे उत्तर आधुनिकता काळात लोक मानतात. म्हणजे तर्कबुद्धीने लोकांची समजूत घालत घालत कोणतेही संघर्ष सोडवता येतील असे आधुनिक काळात म्हंटले आहे. तर असे काही नसते असे उत्तर आधुनिककाळ म्हणतो. विज्ञान म्हणजेच खरे ज्ञान असे आधुनिक काळात लोक मानायला लागले होते. तसे काही नसते असे उत्तर आधुनिककाळ म्हणतो. भाषा  पारदर्शक असते प्रत्येक शब्दाचा निश्चित अर्थ असतो तो शब्द वापरला की त्याने तोच अर्थ कळतो असे आधुनिक काळ म्हणतो. तर अर्थ अनेक असू शकतात आणि ते कालानुसारही बदलतात असे उत्तर आधुनिक काळ म्हणतो. आज जरी जगात वेगवेगळ्या संस्कृती असल्या व तर्कबुद्धीचा  वापर करून एकच सत्य या संस्कृती कधीतरी स्वीकारतील असे असेल; पण असे सार्वत्रिक सार्वकालिक सत्यच नाही त्यामुळे ते स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. सत्य हे असते ते मानवी जाणीवेच्या निरपेक्ष असते आपल्याला समजले किंवा नाही आणि सत्य आहे की नाही हे  निश्चित करायचे काही साधन नाही असे उत्तर आधुनिकता काळ मांडतो. तर्कबुद्धीचा वापर करत गेल्यामुळेच सुधारणा होत गेल्या आहेत, लोकशाही अनेक देशांमध्ये आलेली आहे. स्वातंत्र्याचा अर्थ समजत गेला आहे आणि विज्ञान प्रगत होत गेले आहे. असे आधुनिक काळ मानतो तर यातले काहीही शक्य नाही असे उत्तर आधुनिक काळ मानतो. समाज संस्कृती काही असले तरी व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व आहे असे आधुनिक लोकांनी  मानले तर व्यक्ती हेसुद्धा एक मिथक आहे म्हणजे तर अनेक सहसंबंधातून, सामाजिक संबंधातून नात्यातून व्यक्तीला वेगळे आहे असे वाटत असते; पण तसे काही नसते असे उत्तर आधुनिक काळ म्हणतो. आता ह्याच्यातून काय तयार होणार? काय मार्गदर्शन होणार! काय विचारांची दिशा मिळणार असे अनेकांना वाटत होते; पण हे सगळे नाही, हे सगळे  नाही असा विचार करत  गेल्याने काय बदल घडले हे सांगतो आणि आजचे माझे भाषण संपवतो.  त्यांनी असे म्हंटले की आधुनिक विचाराला मर्यादा असल्याने आता उत्तर आधुनिक काळ सरू झाला आहे याची लक्षणं काय? तर राष्ट्र  ही कल्पना तात्पुरती आहे त्यामुळेच ७०० वर्ष इंग्लंडच्या राजवटीखाली राहिलेले उत्तर आयर्लंड स्वतंत्र झाले. स्कॉटलंड मध्ये स्कॉटलंड स्वतंत्र व्हावे की नाही यावर सार्वमत घ्यावेसे वाटले. तसे बेल्जियममध्ये पेल्विश लोक स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत, स्पेनमध्ये, फ्रांसमध्ये करतायत  आणि छोटी छोट राष्ट्रक आपली स्वतंत्र अस्मिता दाखवायला लागली आहेत कारण युरोपमध्ये जी Nation state म्हणजे जी राष्ट्र ही कल्पना होती ती पण तात्पुरती होती. काही काळ लोकांना ते उपयुक्त, सोयीचे वाटले; पण आता ते वेगळ्या पद्धतीने विचार करतायत. तर हे स्वीकारणे म्हणजे आत्ता भारत आणि काश्मीरचे काय चाललय त्याला लोक काय म्हणतील हे आपल्या लक्षात येईल आणि तेवढेच नाही पन्नास वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये तीच परिस्थिती होती आणि एकदा याला खतपाणी मिळाले की अनेक लोक याचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग सुरू करतील आणि काहीना प्रामाणिकपणेही तसे करणे योग्य वाटू शकेल, कारण सार्वकालिक, निरपेक्ष असे काही नसते. त्या त्या वेळी लोक ठरवत जातात आणि प्रत्येकाला ते ठरवायचे स्वातंत्र्य आहे असा याचा एक भाग आहे . दुसरा थेट भारताशी जोडणारा  आहे. स्वतंत्र लेख मला त्याच्यावर वाचायला मिळाला,की हा उत्तर आधुनिक काळ  सुरू झाला आहे. त्यामुळेच विज्ञान कॉंग्रेसमध्ये गणपतीची निर्मिती ही प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण आहे असे निर्लज्जपणे सांगितले जाऊ शकते, इंग्लंडमध्ये सर्व आधुनिक विज्ञान वेदांमध्ये कसे सांगितलेले आहे याची गुळगुळीत पुस्तके तिथल्या हिंदू लोकांनी छापली आहेत आणि तिथल्या सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदू धर्माचे शिक्षण आज तिथे दिले जाते. हा उत्तर आधुनिकतेचा परिणाम आहे. त्याचा सारांश म्हणून त्याने म्हंटले आहे छद्मविज्ञान म्हणजे हे जे काही होते ते आमच्याकडे कसे होते सांगणे म्हणजे  वेदांमध्ये कसे होते ते सांगणे आणि विज्ञान हे अंतिम नाही असे म्हणणे. म्हणजे जसे वेदांमध्ये हे असू शकेल म्हणण्याच्या ऐवजी हे आहेच असे म्हणणे हे भारतात सुरू झाले आहे म्हणजे भारताचा वारसा मोठा आहेच. पण, असेच विज्ञानाच्या विरोधात आपापल्या स्थानिक रूढी समजूती कशा योग्य आहेत हे सांगायला सुरुवात करतील आणि जुन्या रूढी  अंधश्रद्धांचे पुनरुज्जीवन होऊ शकते आणि हा उत्तर आधुनिक काळाचा एक मोठा धोका आहे. त्यामुळे मला याचा समावेश करावासा वाटला. अनेक लोकांनी लिहिले आहे ज्याचा तपशिलात अभ्यास केला की  लक्षात येईल की वस्तुनिष्ठ विचारांचे युग होते ते संपले व्यक्तिनिष्ठ विचार करण्याचे युग आलेले आहे अशी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. ती भारतातल्या एका थोर योग्याने केलली आहे .विसुभाऊ ज्यावर व्याख्यानमाला घेणार होते ‘Human cycle‘ नावाचे अरविंदांनी लिहिलेले पुस्तक  आहे त्याच्यामध्ये हा मानवी विकासाचा शेवटचा टप्पा, याच्या पुढचा टप्पा काय  असेल तर age of subjective reason असेल म्हणजे व्यक्तीनिष्ठ विचार असे त्यात मांडले आहे. उत्तर आधुनिकतावादात हेच सांगितले आहे. तर याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. Liberation theology म्हणजे मुक्तीचे धर्मशास्त्र हे थेट ख्रिश्चन धर्माशी जोडलेले आहे, जे राष्ट्रापलीकडचे जे रोमन कॅथोलिक चर्च आहे ज्याचे वर्चस्व मान्य करते, त्याच्यात जे काही संघटनांचे प्रयत्न होतील ते राष्ट्रविचाराला धक्का देऊ शकतील असे मला वाटते. पर्यावरणीय स्त्रीवाद जो आहे तो स्थानिक पातळीवरील स्त्रियांनी आपापले प्रश्न कसे सोडवावेत याचा विचार करतो; पण राष्ट्राच्या पातळीवरून किंवा जागतिक स्तरावर हे कसे होणार आहे याची काही मांडणी झाली नाहीये. त्यामुळे स्थानिक पातळीवरच विचार केंद्रित होऊ शकेल त्याच पातळीवर ते लोक विचार करत राहतील आणि त्यामुळे हा विचार राष्ट्रीय स्तरावर कसा करायचा हे मार्गदर्शन नसल्यामुळे तो एक धोका आहे असे मला वाटते.डीप इकोलॉजी हे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जास्त आहे राष्ट्र वगैरे हे सर्व दुय्यमच आहे आणि निसर्ग केंद्रित पृथ्वी हे  एकक आहे असा विचार करा असे त्यात म्हंटलेले आहे. त्यामुळे राष्ट्रविचाराला तिथे काय स्थान आहे ते आपल्याला ठरवायला लागेल आणि उत्तर आधुनिकतावाद विचारातील हे जे धोके आहेत की मी स्वतंत्र आहे आणि हा विचार राष्ट्रबांधणीला, राष्ट्र विचाराला छेद देणारा आहे आणि या सगळ्यामध्ये छद्मविज्ञानाला जर जोर आला तर याचे आपण काय करणार आहे. यादृष्टीने हे राष्ट्र विचाराला छेद देणारे असाच शब्द मी वापरला आहे. अगदी प्रत्येकवेळी धोका असेलच असे नाही; पण छेद देणारे काय काय असेल त्याबाबत आपण सावध राहायला पाहिजे म्हणून हे चार विचारप्रवाह येथे मांडले. एव्हढेच आहेत असे नाही छोटे छोटे बरेच आहेत, Daniel Bell याने म्हंटल्याप्रमाणे जागतिक स्तरावर जगाचे आदर्श चित्र मांडणारे विचारप्रवाह सुरू झालेले नाहीत आणि याच्यामध्ये मान्य केले आहे की एकूण पुढे काय कसे असेल याचा utopia आम्हाला मांडता आलेला नाही, त्यामुळे असा utopia असावा की नाही यावर वाद असू शकेल. समोर भवितव्य काय असावे आणि आपण ठरवलेले भवितव्य आपण घडवू शकतो असा विचार आपण करत असल्याने आपल्या भवितव्य लेखात सुद्धा या चार विचारसरणीचा अभ्यास करून याची दखल आपण घ्यायला पाहिजे असे म्हणून सात – आठ वर्ष झाली. आज याच्यावर पहिल्यांदा तासभर तरी मांडणी झाली. परिचय करून देता आला असे म्हणून थांबतो.

वैचारिक क्र.२ – राष्ट्रकारणाची विविध अंगेश्री. गिरीशराव बापट, २८सप्टेंबर१९

राष्ट्रविचार किंवा राष्ट्रकारण याबद्दल प्रबोधिनीत व्याख्यानमाला योजण्याचं कारण काय? एक कारण तर विषय मोठा आहे आणि एका व्याख्यानात संपणे शक्य नाही म्हणून ३ व्याख्याने केली आहेत. दुसरं म्हणजे प्रबोधिनीच्या दृष्टीने ‘राष्ट्र’ हा विचार / ही कल्पनाच अतिशय महत्त्वाची आहे. ‘प्रबोधिनीला काय करायचंय’ याबद्दल आपल्या संस्थापकांनी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहे.  तर एका वैचारिकामध्ये त्यांनी असे म्हटले की प्रबोधिनी ही ‘गतीशील संघटना’ झाली पाहिजे. स्वत: सतत परिस्थितीला प्रतिसाद देत बदलणारी आणि परिस्थिती बदलणारी, अशी झाली पाहिजे. आणि या गतीशील संघटनेचं काम काय? तर अर्थकारण, समाजकारण, राजकारण, राष्ट्रकारण, मानव्यकारण या सगळ्यांना गती देणारी संघटना प्रबोधिनी झाली पाहिजे, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सगळे शब्द आलेले आहेत राजकारण, समाजकारण, अर्थकारण, मानव्यकारण वगैरे म्हणून  आजच्या व्याख्यानाचा विषय आहे – ‘राष्ट्रकारणाची विविध अंगे’. मागच्या व्याख्यानामध्ये ‘राष्ट्र’ ही संकल्पना, त्याला छेद देणारे आधुनिक विचारप्रवाह असं मी म्हटलेलं होतं. काही जणांनी प्रश्न विचारला की छेद देणारे हे कसे? त्यातले  Liberation Theology आणि Eco-feminism हे जे विचारप्रवाह आहेत त्याच्यामध्ये मुख्यत: समाजकारणाचा विचार केलेला आहे. राष्ट्रकारणाच्या एका पैलूचाच जास्त विचार केलेला आहे आणि राष्ट्र कसं असावं यावर त्यांनी काही फार मांडणी केलेली नाही म्हणून ते राष्ट्रविचाराला छेद देते असे मी म्हटलेलं आहे. Deep Ecology आणि Post Modernism हे दोन विषय जे होते ते पूर्ण मानवजातीचा, मानव्याचा विचार करणारे मानव्यकारणासंबंधी काहीतरी बोलणारे होते, त्यामुळे त्यांच्यातही राष्ट्र या संकल्पनेला फार काही महत्त्व त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे ते ही राष्ट्रविचाराला छेद देणारे असं मी म्हटलेलं आहे. या व्याख्यानाआधी इतरही काही प्रश्न आले होते.  त्यांची थोडक्यात दखल घेतो आणि आजच्या विषयाचा सुरुवात करतो.

Eco-feminism आणि Deep Ecology यामध्ये जनसंख्या वाढीवर काही म्हटलेलं आहे का? Eco-feminism मध्ये या विषयावर काही म्हटलेलं नाही आहे. पण Deep Ecologyमध्ये वेगळ्या लोकांनी वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. एकूण पर्यावरणाचा विचार करता पृथ्वीवरची माणसांची लोकसंख्या कमी झाली पाहिजेअसं त्याच्यात म्हटलेलं आहे आणि काही जणांनी ती ९० टक्क्यापर्यंत म्हणजे आत्ता आहे त्याच्या ९०% कमी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. पण अजून तो विचार आहे, कार्यक्रम काही झालेला नाही.  त्यामुळे नेमकी आकडेवारी नाही; पण टक्केवारीमध्ये त्यांनी ती कमी झाली पाहिजे असे म्हटले आहे. 

Techno-humanism (तांत्रिक मानवतावाद) व Data-ismया दोन विचारांविषयी वाचलेलं आहे. ते राष्ट्र विचाराला अनुकूल आहेत का? तर मी ज्या विचारप्रवाहांचा विचार केलेला होता, त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक तीन बाबींबाबत काही ना काही विचार केलेला आहे. Techno-humanism (तांत्रिक मानवतावाद) व Data-ism यांमध्ये या तीनहीबद्दल विचार केलेला नाही. अर्थकारण किंवा समाजकारण यापैकी एकाच गोष्टीवर विचार केलेला आहे. तो अजून कल्पना म्हणून आहे. म्हणजे आत्ता जी परिस्थिती होते आहे –Data-ism म्हणजे Data ला महत्त्व येत चालले आहे का? Techno-humanism म्हणजे त्यांमध्ये माणसांच्या विकासाबरोबर तंत्रज्ञानाचा विकास हाही तेवढाच महत्त्वाचा असणार आहे का? असे आत्ता जे बदल दिसत आहेत त्या बदलांची दिशा पाहता ज्यांना आता महत्त्व येतंय आणि महत्त्वाच्या होणार आहेत अशा पद्धतीच्या कल्पना त्या आहेत. अजून पूर्ण विचारधारा म्हणून ideology पुरेसे विकसित झालेले नाहीत म्हणून ज्यामध्ये समाजकारण, अर्थकारण, राजकारण या तीनही गोष्टींचा विचार झालेला नाही. त्यामुळे हा प्रश्न आल्यावर त्यांची माहिती घेतली व त्यांचा समावेश केला नाही हे बरोबर झालं, असा मला वाटतं; पण ism हा प्रत्यय अनेक ठिकाणी लावला जातो, तसा तो इथेही लावला गेलेला आहे असं मला वाटतं.

राष्ट्रविचारही तसं बघायला गेलं तर universal concept आहे; पण universalism/international order हेच आव्हान म्हणून बघितलं जाणं, या contradiction चं कसं analysis करता येईल? तर अनेक ठिकाणी एक राष्ट्र आणि अनेक राष्ट्रांचा समूह हे परस्परांना विरोधी असतील, असंच पाहिलं जातं; पण मी जो राष्ट्रविचार मांडतो आहे, त्याच्यामध्ये सर्व जगाचे हित व्हावं या दृष्टीने प्रत्येक राष्ट्राने आपापली जबाबदारी उचलणं आणि आपापल्या राष्ट्राचं हित करणं असाच विचार केलेला आहे, त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय रचनेला किंवा जागतिक विचारला छेद देणारा नाही तर त्याचा तो पोटभाग किंवा सबसेट आहे असं मला वाटतं.

‘Nation’ is more of an emotional entity. My notion of ‘Nation’ (राष्ट्र) can differ from the other. मग यात काही internal गोष्टी, त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे मतप्रवाह, जे कदाचित विचार प्रवाहात बदलणार नाहीत, त्याबाबत काय करावं?

ही एक भावनिक कल्पना आहे हे बरोबर आहे. म्हणजे राष्ट्र हे प्रत्येकाच्या मनात असतं आणि मग ते त्याला बाहेर दिसतं. आणि प्रत्येकाच्या मनात त्याची कल्पना ही वेगवेगळी असू शकते. पण तुझी कल्पना काय आणि माझी कल्पना काय हे जर एकमेकांनी चर्चा करून, तपासून पाहिलं तर त्यातून बऱ्याच गोष्टी समान आहेत असंही लक्षात येतं. त्याचं एक मोठं मजेशीर उदाहरण विवेकानंदांनी दिलेलं आहे की पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागातून सूर्याचं छायाचित्र काढलं तर ते नक्कीच थोडं थोडं वेगळं असेल किंवा एखादा सूर्याच्या दिशेने चालायला लागला आणि त्याने थोड्या थोड्या अंतराने छायाचित्र काढलं की प्रत्येक ठिकाणी ते थोडं थोडं मोठं होत जाईल. प्रत्येकाची वेगवेगळी छायाचित्रे जर त्यांनी एकत्र पहिली आणि छायाचित्र कुठे कधी काढलं अशी चर्चा केली तर ते एकाच सूर्याचं चित्र आहे एवढं त्यांना नक्की कळू शकेल. तसंच राष्ट्राची मला जाणवलेली कल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते तरी त्यांनी एकमेकांशी चर्चा केली तर आपण कुठल्या तरी एकाच राष्ट्राबद्दल बोलतो आहोत हे त्यांना कळू शकेल, असं मला वाटतं आणि त्यामुळे हा परस्परसंवाद हा राष्ट्रघडणीमध्ये महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाच्या राष्ट्राच्या कल्पना या परस्परांना समजण्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत असं मला वाटतं.

पाचवा प्रश्न आहे की राष्ट्रविचारापेक्षा समाजविचार महत्त्वाचा वाटतो का? अर्थातच समाज हा आधी येतो आणि त्यातून राष्ट्र ही संकल्पना जन्म घेते आणि त्या समाजातील सगळ्यांना आपण एका राष्ट्राचे आहोत असं वाटायला लागतं. त्याच्या नंतरच ते राष्ट्र अस्तित्त्वात येतं. त्यामुळे मागच्या वेळेला मी प्राथम्य आणि प्राधान्य असे शब्द वापरलेले होते. तर समाजविचार हा प्रथम येतो आणि मग राष्ट्रविचार येतो. पण जेव्हा समाज एखाद्या विचाराभोवती संघटीत होतो तेव्हा त्याचं राष्ट्र बनतं. त्यामुळे राष्ट्र ही समाजाची विकसित अवस्था आहे असं मला वाटतं.

बाह्य परिस्थितीत अचानक अनपेक्षित बदल झाल्याने एखाद्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व संपणे किंवा अचानक महत्त्व येणे असे होऊ शकेल का? उदा. संपूर्ण पृथ्वीच्या आस्तित्वालाच धोका निर्माण झाला तर…? तर बरोबर… अचानक बदल झाल्याने एखाद्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व संपू शकेल, नवीन गोष्टींना महत्त्व येऊ शकेल. जेव्हा कम्युनिझमला सुरुवात झाली तेव्हा ‘Workers of the world unite’ अशी घोषणा होती. तेव्हा तो आंतरराष्ट्रीय वाद होता; पण प्रत्यक्ष कम्युनिस्ट क्रांती झाली एका देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये आणि तिथे ते तत्त्वज्ञान त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणायचा प्रयत्न केला तेव्हा ‘Communism within a single state is possible’ असंही रशियन लोकांना म्हणायला लागलं. त्यामुळे हे महत्त्व कमी जास्ती होऊ शकतं, पूर्णपणे नाहीसं होऊ शकतं, अचानक एखाद्या नवीन गोष्टीला महत्त्व येऊ शकतं, असं शक्य आहे.

हे प्रश्न नवीन पिढी, शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगायला व उत्तरं शोधायला काही कल्पना, विचार मांडावेत. शाळेतल्या विद्यार्थ्याना हा विषय सांगावा का हाच माझ्या मनात आधी प्रश्न आहे. कारण मी सांगून पाहिलंय आणि ते पेंगायला लागतात हा माझा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना समजेल एवढेच त्यांना थोडंसं सांगावं. त्यामुळे विषयप्रवेश म्हणून त्यांना कदाचित आपल्या राष्ट्राचा इतिहास असा सांगता येईल आणि त्या दृष्टीने प्रबोधिनीत एकदा आपण प्रयोग केलेला आहे. ५ वी ते ८ वी इतिहासाची पाठ्यपुस्तके या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो तेवढ्या चिकाटीने तो उपक्रम पुढच्या इतिहास शिक्षकांनी चालू ठेवलेला नाही. मला वाटतं अनघाताईंनी त्या जेव्हा इतिहास शिकवायच्या तेव्हा ती पुस्तके करण्यामध्ये बराच सहभाग घेतलेला होता. इतिहास शिकविण्याच्या बरोबर त्यांना समाजदर्शन घडवणं, त्यातून सामाजिक जाणीव निर्माण होणं आणि काहीतरी सामाजिक कृती त्यांनी करणं असं एवढं करता येईल. बाकी त्यांच्या इच्छेवरती सोडावं. ज्यांना हा गहन विषय शाळेत असतानाच शिकून घ्यावासा वाटला, तर असे एखाददुसरे निघतात त्यांना शिकवावं; पण सगळ्यांना लगेच हे सांगावं असं वाटत नाही; पण त्याची वातावरणनिर्मिती म्हणून इतिहासाचं अध्यापन राष्ट्रीय दृष्टिकोनातून आणि समाजदर्शन एवढ्या गोष्टी नक्की करता येतील असं मला वाटतं. जे ७ प्रश्न मला पाठवले होते, त्याची थोडक्यात उत्तरं आता दिलेली आहेत.