ग्रामीण भागात काम करायचे तर ते फक्त त्या व्यक्ती सोबत कधीच नसते, त्यांच्या कुटुंबा सोबतचे समाजासोबतचे, गावासोबतचे काम असते. शहरातली सगळीच माणसे जेवढी स्वयंपूर्ण असतात त्यामुळे एकटी असतात तेवढी गावातली नसतात. त्यामुळे ‘विकास’ कामात आलेल्या अनेक अडचणी या समाजिक बंधनामुळेही असतात. रूढार्थाने म्हणायचे तर ‘लोक काय म्हणतील?’ यामुळेही असतात. या सगळ्यांचा विचार करत आपल्या भागात केलेले २ वेगळे प्रयत्न.. बांबूपासून वस्तू उत्पादन : वेल्हे तालुक्यात बांबू मुबलक मिळत असल्यामुळे बांबू पासून विविध गोष्टी बनवायला शिकवण्याचे वर्ग १९९६ पासून आपण घेतले; जेणे करून बांबूमुळे स्वयंरोजगार संधी निर्माण होईल. केंद्र सरकारच्यावतीने त्रिपूरामध्ये बांबू पासून वस्तू निर्मिती करायला शिकवणारा त्याकाळी एकमेव वर्ग चालवला जायचा. वर्ग ६ महिने कालावधीचा असायचा. १९९६-२००० या काळात ३ युवकांना त्या वर्गाला पाठवले. या वर्गाला जाणे म्हणजे महा कठीण कारण तिथली भाषा कळणे अवघड आणि एकदा वर्गाला गेले की ६ महिन्यांनी परत यायचे मध्ये घरी येणे नाही! त्यासाठी जाणाऱ्याची व घरच्यांच्या मनाची तयारी करून घेणे फारच अवघड होते. कारण वर्ग होता ते गाव नकाशावर दाखवले तरी म्हणजे कुठे? ही कळणे अवघड.. आणि ‘तिथे काही झाले तर आम्ही कसे पोचायचे?’ हा प्रश्न मलाच निरुत्तरीत करायचा पण प्रबोधिनीवरच्या विश्वासाने आपण जमवले! वर्गाला शुल्क नसले तरी एकट्याने त्रिपुरात ठरलेल्या ठिकाणी त्याकाळी (गुगल मॅप नसताना) पोचणे धाडसाचेच होते. ३ जणांनी वेगवेगळ्या वेळेला जाऊन वेगवेगळ्या तुकड्यांत हा वर्ग यशस्वीरीत्या पूर्ण केला. वेल्हयात बांबूवर काम करताना येणारी अडचण अजूनच वेगळी होती कारण बांबूसंबंधी काम हे ‘बुरूड’ किंवा ‘कैकाडी’ जाती/जमातीचे काम समजले जाई, त्याला अन्य समाजातील मुलांना पैसे मिळणारी रोजगार संधी असली तरी प्रशिक्षणाला तयार करणे खूपच अवघड होते. तरीही आपण करत राहिलो. वर्ग घेत राहिलो. बांबूपासून वस्तू उत्पादन करणे म्हणजे फक्त पारंपारिक सुपे, टोप बनवणे नसून अनेक सुंदर भेटवस्तू असू शकतात किंवा अगदी घरही बांधणी असू शकते हे आपण शिकवले. सगळ्यांनी रोजगाराचा हा मार्ग स्वीकारला नाही पण वर्गाला आलेल्यांच्या जाणीव जागृतीतून उद्योग करणाऱ्यांचे बळ वाढत गेले. आजही त्यातला एक जण, निवृत्ती वेल्हयात बांबू उद्योगातून अर्थार्जन करत आहे. तालुक्यातंच काय पण निमंत्रण आले तर महाराष्ट्रभरही प्रशिक्षक म्हणून जात आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे, मोठी ऑर्डर मिळवून भागातल्या महिला-युवकांना रोजगार संधी देत आहे!.. सर्व अडचणींवर मात करून आजही स्वतःच्या हिमतीवर बांबू उद्योगात टिकून आहे. अस एखादं उदाहरण टिकलं तरी समाधान वाटते!! होम नर्सिंग वर्ग चालवण्याचा प्रयोग : एकूणच आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. सुपर स्पेशालिटी जशी वाढते आहे तशी थोडेसे शिकून नर्सिंग संबंधी कामाची संधीही वाढते आहे. मोठ्या हॉस्पिटल सोबत छोट्या हॉस्पिटल मधली नर्सिंग संबंधी मनुष्यबळाची मागणी सुद्धा प्रचंड संख्येने वाढते आहे. नर्सिंगच्या शिक्षणामुळे खात्रीने रोजगार मिळेल. अगदी ८ वी झालेल्या गावातल्या मुलीला सुद्धा एरवी कधीच मिळणार नाही अशी या शिक्षणामुळे नोकरीची संधी मिळेल, या हेतूने आपण युवतींसाठी होम नर्सिंग/ असिस्टंट नर्सिंगचे प्रशिक्षण देण्याची योजना केली. पहिला वर्ग सुरू करताना एकत्र माहिती सांगितली तरी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मुलींना गावागावांतून आणायची सोय केली, वर्ग संपल्यावर पुन्हा पोचवण्याची सोय केली. वर्ग पूर्णतः निशुक्ल केला तरीही थंड प्रतिसाद.. मग ज्या गावात वर्गाला येऊ शकतील अशा वयातल्या मुली होत्या त्या एकेकीच्या घरी जाऊन बागेश्रीताई असे शिक्षण मिळाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सन्मानाने कसे काम करता येईल असे सांगितले. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मावशींच्या कामापेक्षा हे वेगळे आहे असेही पटवले. मग एक एक करत पहिल्या वर्गांसाठी १३ जणी जमल्या आणि स्व-रूप वर्धिनी सोबत पहिला वर्ग सुरू झाला. ६ महिन्यांची एक बॅच असायची. मुलींना विषयात रुळायलाच त्यातला महिना लागायचा. कोणाला रक्त बघून चक्कर यायची तर कोणाला अभ्यासातले शब्द पाठ करणे अवघड जायचे, कोणाला हॉस्पिटलची भीती वाटायची तर कोणाला इंजेक्शनची! या सगळ्या दिव्यातून पार होणे अवघड .. त्यात ‘घरी नुसती बसेन पण असे ‘सेवे’ची काम करणार नाही’ अशी सामाजिक मनोवृत्ती! या वर मात करणे फार अवघड गेले. प्रत्येक तुकडीसाठी मुली मिळवणे ही जणू आपलीच जबाबदारी होती. हा वर्ग पूर्ण केलेली एकही जण वर्ग संपल्यावर घरी बसली नाही, ६ महिन्यांचा वर्ग करून परीक्षा दिली की निकाल लागायच्या आधीच नोकरी लागलेली असायची तरीही प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. जसजशा लग्ना आधी मुली कामावत्या व्हायला लागल्या तसतसा हळूहळू बदल घडायला लागला. आपण प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या गावात प्रवेश अभियान करून पहिल्या ६ तुकड्या १०० पेक्षा जास्त संखेच्या यशस्वी रित्या पूर्ण केल्या. मग आपण आंबावण्याच्या स्टरलाईट कंपनीने चालवलेल्या जीवन ज्योती महिला प्रशिक्षण केंद्रात काम केले तेव्हा हा वर्ग त्या संस्थेच्या अभ्यासक्रमाचा भाग केल्यावर हा विषय तेथे सुपूर्द केला. आपण केल्यामुळे नर्सिंग या विषयाचे जनजागरण एवढे झाले की १२ वी शास्त्र शाखेत शिकलेल्या ५-६ जणींनी नर्सिंगचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातल्या बहुतेक जणी पुण्यातल्या उत्तम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहेत. आज पर्यंत त्यांच्या घरात शिक्षण घेऊन नोकरी करायला लागल्यावर मिळालेला सगळ्यात जास्त पगार या मुलींना आहे ! ज्ञान प्रबोधिनीच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणामुळे अनेकांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली, आपल्या प्रयत्नांमुळे नवीन विषयातल्या रोजगार संधी लक्षात आल्या असे नक्की झाले.. एखादी गोष्ट पहिल्यांदाच करताना आपले सगळे पणाला लागते कारण आपण बोलतो/ सांगतो/पटवतो ते यापूर्वी कधी त्या गटाने ऐकलेले नसते ना अनुभवलेले, असे केलेल् कोणीसुद्धा परिचयातले नसते. अशा वेळी ‘पटण्याला’ उपयोगी पडतो तो प्रशिक्षणार्थीचा आपल्यावर असणारा विश्वास! .. एकदा जमले की अनुकरण करणे तुलनेने सोपे असते. अशा प्रकारचे एक-एक उदाहरण तयार करताना समाज शिक्षण करावे लागते. सहभागी प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण करता करता त्यांच्या कुटुंबाचे, नातेवाईकांचे, जवळच्यांचेही शिक्षण करावे लागते. आपण अनेक वर्ष त्याच कार्यकर्त्यासंचाच्या मदतीने भागात काम करत असल्यामुळे जो विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे आपले असे पहिले प्रयत्नही यशस्वी होतात यांचे समाधान आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६