मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा!

ग्रामीण महिलांचा अभ्यास दौरा हा जरा वेगळाच! अभ्यास हा साधारणतः पाठ्यपुस्तकांशी संबंधीत विषय वाटतो पण दौरा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला घर सोडून गटाने बाहेर पडायचे. बाहेर पडताना ‘पर्यटन’ दृष्टीकोन ठेवायचा नाही तर काहीतरी शिकायचा अनुभवायचा असा दृष्टीकोन ठेवायचा.

पहिला दौरा ‘दिल्ली राजधानी अभ्यास दौरा’ १९९८ साली झाला. त्या काळात नुकतेच महिलांना आरक्षण मिळाले होते. अनेक जणी सरपंच/ उपसरपंच/ ग्राम पंचायत सदस्य झाल्या होत्या, काही जणी गावातील शिक्षण समितीच्या किंवा पाणलोट कामाच्या पदाधिकारी झाल्या होत्या, काही बचत गटाच्या अध्यक्ष, खजिनदार होत्या. ही पदे खूप मोठी होती अशातला भाग नव्हता पण महिला अशा पदावर जबाबदारी घेऊन प्रथमच विराजमान होत होत्या. त्यामुळे ‘आपल्याला अशी जबाबरीची कामे जमतील का?’ अशी धास्ती वाटत होती. एखादीलाच नाही तर ‘ग्रामीण महिला’ म्हणून संगळ्यांनाच आत्मविश्वासाचा प्रश्न होता.

पहिला दिल्ली दौरा अशा २५ जणींसाठी योजला होता की जिच्याकडे स्वतःच्या पदाचा शिक्का आहे! पण साधारण ६५ जणींनी नावे दिली. ४ महीने दौऱ्याची तयारी चालू होती. दर १५ दिवसांनी प्रशिक्षणे होत होती. गटाला पूर्वतयारीची व्याख्याने, माहिती सांगणे चालू होते. अगदी नकाशा दाखवून रेल्वे कशी जाणार ही सुद्धा दाखवले गेले. अनेकींनी आयुष्यात नकाशा सुद्धा प्रथमच पाहिला होता. एक छोटा प्रसंग सांगते महिलांना प्रवासाची अजिबात सवय नव्हती, साधा कात्रजचा घाट चढताना सुद्धा उलटी येत होती. नकाशात दिल्ली किती ‘वर’ आहे असे सांगितले तर घाट किती मोठ्ठा असेल असे वाटून काही नावे कमी झाली होती. इतक्या प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात होती. गटाच्या कानावर हिंदी भाषा पडण्याची व्यवस्था केली होती कारण तो पर्यन्त टिव्ही घराघरात पोचले नव्हते. हे प्रशिक्षण बघून दौरा झेपणार नाही असे वाटणाऱ्या १० जणी गळल्या. ५५ जणींचा ८ दिवसांचा दौरा झाला. संसद भवन पाहिले, खासदार शरद पवार, विठ्ठलराव गाडगीळ, निर्मला देशपांडे यांची दिल्लीतल्या घरी भेट घेतली, आकाशवाणीच्या दिल्ली-वार्तापत्र सादर करणाऱ्यांची भेट घेतली, महाराष्ट्र सदन पाहिले, महिला आरक्षणावर काम करणाऱ्या  IIPA (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिसट्रेशन) येथे जाऊन आलो. मग प्रेक्षणीय स्थळ म्हणून राजघाट पाहिले कारण बातम्यात परदेशी पाहुणे तिथे जातात असे दिसले, मग लाल किल्ला, मथुरेचे कृष्ण मंदिर, ताजमहाल सगळे पाहिले. परत आल्यावर लक्षात आले दौरा अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाला. दौऱ्यात सहभागी अनेकजणी ९ वारी साडी नेसणाऱ्या होत्या.. त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला कारण प्रत्येकीला वाटत होते की ‘इतरांनी जे पाहण्याची कल्पनाही केली नव्हती ते मी प्रत्यक्ष पाहून आले!’

राजधानी सहलीच्या परिणामामुळे महिलांमध्ये झालेला बदल इतका उठून दिसणारा होता की “आम्हालाही ‘त्यांच्या’ सारखे व्हायचंय, चला पुन्हा दिल्लीला जाऊ..” या आग्रहाने पुन्हा दिल्ली दौरा झाला या दौऱ्यात पहिल्या सारख्या अनेक गोष्टी दौऱ्यात होत्याच पण सोबत राष्ट्रपती भवन बघण्यापासून परतीचा प्रवास विमानाचा करण्यापर्यन्त भर होती. हा दौरा साधारण १० वर्षाने झाला तो पर्यन्त ग्रामीण महिलेची ‘मला नेतृत्व करायचे आहे’ असे म्हणण्याची भीड चेपली होती. त्यामुळे कमी पूर्वतयारीने दौरा झाला. पूर्णतः स्वखर्चाने झालेल्या या दौऱ्यात चकाचक दिल्लीचे दर्शन होते तसेच दिल्लीतील वस्तीचेही दर्शन होते..  पहिल्या दौऱ्यात येणाऱ्या महिलांना हिन्दी बोलणे तर सोडाच पण समजणेही अवघड होते म्हणून बहुतेक भेटी मराठीत होतील असे पाहिले होते. दुसऱ्या दौऱ्यात असे लक्षात आले की सिनेमा बघून बघून निदान गटाला हिन्दी बोलता येत नसले तरी समजत होते! त्यामुळे अवघड वाटले नाही. दौऱ्याचा परिणाम चांगला झाला. दिल्ली दौरा जास्त दिवसांचा काढावा लागतो म्हणून सगळ्यांना इच्छा असूनही जमत नाही मग ‘मुंबई दौरा’ काढला! अनेक गट मुंबई बघून आले अगदी समुद्र दर्शन, गेट वे ऑफ इंडिया, मोनो रेल प्रवासापासून ते थेट भुलेश्वरच्या घाऊक बाजारपेठेपर्यंतचे दर्शन ! मुंबई ही आर्थिक राजधानी आहे म्हणजे काय यांचे ही दर्शन घेतले! असे दौरे फक्त महिलांचेच नव्हते तर युवती सुद्धा मुंबईला जाऊन आल्या. विधान भवन, विधान परिषदही बघून आल्या. मग त्या सोबत तारांगण, मत्स्यालय असेही बघणे झाले.

कार्यकर्त्यांचे दौरे वेगळेच! एकदा दक्षिण भारत बघायला तिरूअनंतपूरम मधून देवदर्शन करून विवेकानंद केंद्राचे काम व शिलास्मारक बघायला कन्याकुमारीला मुक्काम केला. संस्था कार्यकर्त्यांच्या भेटी तर होत्याच आणि मग बंगलोर वरून परत! कार्यकर्त्यांचा पुढचा दौरा अरुणाचलला काढला! हा दौरा पश्चिम बंगालची राजधानी कलकत्यापासून सुरू झाला. गंगेतीरी असणाऱ्या रामकृष्ण मठाच्या बेलूर मठात राहून नावेने गंगापार करून कालीमातेचे दर्शन घेतले, छट पूजा पाहिली. तेथून थेट अरुणाचलच्या चीन-तिबेट टोकाला तवांगला गेलो. बर्फाछादित प्रदेश पाहिला, सीमेवर सैन्य कसे काम करते ते पाहून आसाममध्ये गुवाहाटी कामाख्या मंदिर पाहून परतीचा प्रवास सुरू केला. प्रदेश बदलला की भौगोलिक परिस्थिती बदलते तसेच लोकांची विचार करायची पद्धतही कशी बदलते यांचा तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीतून अनुभव घेतला.

करोंना काळात आणि नंतर राजस्थानला २ दौरे गेले. जयपूर जवळचे तिलोनीया येथिल रॉय यांचे ग्रामीण महिलांसोबत चालू असणारे सौर ऊर्जा व अन्य काम पाहिले त्यातून प्रेरणा घेतली नंतर उदयपूर.. चितोड, हळदीघाटी सगळे पाहिले! पर्यटना पासून संस्कृती दर्शन बघताना पद्मिनी आणि हजारो महिलांच्या ‘जौहार’चा सल घेऊन स्त्री शक्ती प्रबोधनचा गट परतला. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचे काम म्हणजे नक्की काय केले हे या दौऱ्याला गेल्यामुळे शिवप्रदेशात राहाणाऱ्या महिलांना नेमके कळले असे नंतरच्या निवेदनात समजत होते. त्यामुळे राजस्थानात महिलांचा रस्त्यावर वावर कमी होता..आम्ही मोठ्यांदा हसलो तरी लोक बघत होते अशी बारीक निरीक्षणे महिला शोधबोध बैठकीत सांगत होत्या. आपला समाज महिलांना खूपच स्वतंत्र देतो. तिथल्या गावातल्या घराच्या भीती सुद्धा खूप उंच इतक्या की आतले काहीच दिसत नाही.. जणू त्यात महिला कोंडल्या होत्या. आम्ही एकट्या ‘महिला’ आलो यांचे त्यांना खूपच आश्चर्य वाटले. असे दौऱ्याला जाऊन आल्यावर समजणे महत्वाचे फिरले की अशी समज वाढते, ‘यात्रा कंपनीतून’ गेल्यावर असे काही समजेलच याची खात्री नाही म्हणून याला दौरा म्हणायचे! मग बाजारात गुलाबांचे पाणी, तेल, अत्तर बघून मागे असणारे गुलाब फुलावर प्रक्रिया करणारे केंद्र पहावेसे वाटणे म्हणजे दौरा यशस्वी होणे!    

त्यामुळे दौऱ्याची योजना म्हणजे फक्त प्रवास, निवासाची व्यवस्था करणे एवढेच मर्यादीत नसते ते तर काय यात्रा कंपनी सुद्धा करतात. दौरा म्हणजे सोबत येणाऱ्या महिलांनी काय पाहायला हवे ते आधी ठरवणे, त्याचे नियोजन करणे असते. प्रवासात समविचारी संस्था-कार्यकर्त्यांच्या भेटी होतील असे बघणे म्हणजे कन्याकुमारीला गेले तर ग्रामीण प्रकल्पात तिथल्या कार्यकर्त्यांनी कमी खर्चात घर बांधायचे तंत्र कसे विकसित केले आहे ते बघायचे तर गुवाहाटीला कार्यकर्त्यांशी बोलताना शिक्षणाचे महत्व कसे पटवून द्यावे लागते हे समजून घ्यायचे, बेलूर मठात गेल्यावर एका आध्यात्मिक संघटनेचा परिचय करून घ्यायचा तर तिलोनीयाला रॉय यांच्या भेटीत आंतरराष्ट्रीय काम समर्पण वृत्तेने लोकाभिमुख कसे उभे करता येते ते बघायचे.

असे सगळे बघितले की रोज रात्री गटाने एकत्र बसून त्यावर चर्चा करायची, प्रत्येकीच्या वहीत या सगळ्या नोंदी होत आहेत ना? याची खात्री करायची. परत आल्यावर दौऱ्याचे प्रत्येकीने वृत्त लिहायचे त्यात नवीन काय अनुभवले, काय भावले पासून काय शिकले असे सगळे लिहायचे. त्याचे गटागटात जाऊन अनुभव कथन करायचे मग दौरा ‘संपतो’ बहुतेकदा दौरा संपतो तो पुढच्या वेळी कुठे जायचे असे ठरवूनच!     

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६