स्वयंरोजगार केल्याशिवाय बाईच्या हातात पैसे खेळते रहाणार नाहीत त्यामुळे स्वयंरोजगारासाठी गेली ३० वर्ष सातत्याने काम चालू आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षण वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या गटातील महिलांसाठी घेतले म्हणजे सहभागी महिलांचा गट जरी बदलत गेला तरी आपले काम चालू राहिले. ग्रामीण महिलेसाठी घरातील स्थान उंचावणे, घरातल्या माणसांनी तिची दाखल घेणे असे कुटुंब पातळीवर ‘ती’ कमावती झाल्यामुळे होणारे बदल इतके महत्वाचे असतात की बचत गटाच्या उपक्रमातून आपल्या संपर्कात आलेली महिला काही काळ तरी या उत्पादकतेच्या गटात काम करतेच करते. ‘ती’ला ‘ती’च्या मनासारखे घरात स्थान मिळाले की हट्ट करून पुढे जात रहातेच असेही नाही पण सहभागी होते ही मात्र नक्की!
प्रबोधनाच्या कामासाठी हे फार गरजेचे आहे असे वाटून आपण स्वयंरोजगाराचे काम करत आहोत. अनेक वर्ष सातत्याने काम केल्यामुळे आता थोडक्या दिवसांत काय कसे करायचे याचे शास्त्र बसले. भारतीताईंनी ते नवीन गावात करून बघायचे ठरवले. सायबेज कंपनीने असे करण्याची संधी दिली. आणि डिसेंबर २०२२ पासून सायबेजच्या आर्थिक मदतीने ‘सायबेज संपदा’ प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात मार्च २०२४ पर्यंत काय करू शकलो त्यातल्या काही निवडक गोष्टींचा हा आढावा.
एखादी गोष्ट सिद्ध झाली असे म्हणायचे तर आधी ठरवून तसे करून दाखवले पाहिजे, म्हणून वेल्हे तालुक्यातील पण प्रबोधिनीच्या संपर्कात अजिबात नाहीत अशा ९ गावात हा प्रकल्प करायची संधी घेतली. ही सगळी गावे इतकी छोटी होती की कुठल्याही गावाची लोकसंख्या ५०० पेक्षा जास्त नव्हती, गावात एस टी येत नाही, ९ गावात मिळून १० वीची एकंच शाळा, ११ वी शिकायचे तर किमान रोज १०-१२ किलोमीटर चालत जावे लागेल अशी परिस्थिती. जेवढे गाव दुर्गम तेवढा विकास संथगतीने होतो ही लक्षात यावे म्हणून ही माहिती मुद्दाम नोंदवली.
तर कामाला सुरुवात कराची तर अर्थातच बचत गटापासून! म्हणून प्रत्येक गावात १ गट करायचा ठरवला होता, पण महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला ९ गावात १३ गट तयार झाले. मग त्या १३ गटांचा मिळून एक गट ज्याला आपण विभाग म्हणतो असा तयार केला. त्या विभागाला ‘संपदा’ असे नाव ठेवले. त्या विभागाचे बँकेत खाते काढले; सर्व व्यवहार बचत गट प्रमुखांद्वारे होतील असे पाहिले. बँकेत जाणे, चेकने व्यवहार करणे अशा वरवर किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा पहिल्यांदाच जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांना ‘करण्याचा वेगळाच आनंद’ मिळतो.. तशी संधी योजावी लागते. प्रकल्पानिमित्ताने असे सगळे नियोजनपूर्वक केले.
गावातील बाईमध्ये बदल घडायला हवा असेल तर ‘ती’ने उंबरा ओलांडायला हवा. अगदी गावातल्या गावात जरी घराबाहेर पडली तरीही बदल घडायला सुरुवात होतात. संपदा प्रकल्पात ९ गावात स्वयंरोजगारांच्या २०-२२ प्रकारची २५१ प्रशिक्षणे या कालावधीत घेतली. प्रशिक्षणाची संख्या खूपच जास्त असली तरी छोट्या गावात गावपातळीवर ५-७ जणींसाठीच्या प्रशिक्षणाच्या या अभिनव कल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला. गावातल्या गावात सुद्धा प्रतिसादी होणं सोप्पं नसतं! सर्व वर्गांची मिळून सहभागी संख्या ८०० होती. अनेक जणी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वर्गांना आल्या. त्याच धडपड्या आहेत असे लक्षात आले त्यांनी भरीव काम स्वयंरोजगारात केले, कोणी स्टॉलची जबाबदारी घेतली तर कोणी वैयक्तीक पातळीवर गुंतवणूक करून शेवई मशीन घेतली, गिरणी घेतली..
असे गावागावात जाऊन कमी उपस्थितीच्या महिलांचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षक महिलाही जवळपासच्या गावातीलच होत्या. प्रशिक्षक म्हणूनही अनेकींचा हा पहिला अनुभव होता. या निमित्ताने येणाऱ्यांनी व घेणाऱ्यांनी ‘घराबाहेर पडायची’ संधी घेतली. आता त्यातल्या अनेक जणी त्यांना आवडलेले गाणे आवडीने गुणगुणताना दिसतात ..’आता पुरे झाले घरात बसून, उठ हक्कासाठी कंबर कसून!’
एकदा का महिला घराबाहेर पडली की तिला पुन्हा पुन्हा घराबाहेर पडावे असे वाटायला लागते हे आपल्याला अनुभवाने माहिती होते. त्यामुळे सायबेजला सादर केलेल्या प्रकल्पातच असे नियोजन केले होते! अशा घराबाहेर पडणाऱ्या महिलांची दृष्टी जरा विशाल व्हावी म्हणून आपण प्रकल्प काळात ठरवून १९ अनुभव सहली काढल्या. अगदी पुण्यातल्या रविवार पेठेतील घाऊक दुकाने दाखवण्यापासून मुंबईची घाऊक बाजारपेठ दाखवणे असेल किंवा प्रकल्पात भरतकाम शिकवले म्हणून गुजरातमधल्या कच्छ भागात हाताने भरतकाम करून ४ लाख किमतीची साडी कशी बनते असे बघणे असे सुद्धा योजले होते, अशा सहलीला साधारण २०० जणी सहभागी झाल्या.
सायबेजला दिलेला प्रकल्प स्वयंरोजगाराचा होता त्यामुळे उत्पादन करणे व विकणे हा त्याचा अविभाज्य घटक होता. प्रकल्प काळात ४३ स्टॉल लावले, ज्यावर ८.५ लाख रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली. स्टॉलशिवायसुद्धा साधारण २० लाख रुपयांचे उत्पादन ७५ महिलांनी केले. गावातच काढलेल्या ३९ शेतसहलीतून २.५ लाख रुपयांची उलाढाल २०-२५ महिलांनी केली. बहुतेकींच्या आयुष्यातला अशा प्रकारच्या पाहुणचाराचा हा पहिलाच अनुभव होता. या शिवाय स्वतंत्र व्यवसाय करायचा म्हणून एका गटाने डाएट-किट बनवून ४ लाखांपेक्षा जास्त उलाढाल केली तर दुसऱ्या गटाने ३ लाख रुपयांचा दिवाळी फराळ उत्पादन करून विकला. सायबेज कंपनीने फक्त आर्थिक मदत दिली नाही तर कंपनीत वर्षभर साप्ताहिक स्टॉल लाऊन विक्रीसाठी सुद्धा मदत केली. त्यामुळे थेट ग्राहकांशी संवाद कसा करायचा याचेही प्रशिक्षण झाले.
प्रकल्पानिमित्ताने स्वयंरोजगाराचे काम प्रथमच करणाऱ्या ८१महिलांनी या कालावधीत १३ लाखांपेक्षा जास्त उत्पादन केले. यामुळे अशी धडपड करणाऱ्या महिला आर्थिक प्रवाहात आल्या. मग लक्षात आले की कोणाचे आधार कार्ड अपडेट करायला हवे होते तर कोणाला PAN काढायला हवे होते. कोणाला पोस्टाच्या बचत खात्यांची माहिती हवी होती तर कोणाला बँकेत स्वतःचे खाते काढावे वाटत होते. अशी १६१ कामे अर्थसखीच्या मदतीने केली.
प्रकल्पासाठी केलेल्या १३ बचत गटाच्या रचनेतून जवळ जवळ २२ लाख रुपये माफक दरातले सुरक्षित कर्ज ६४ महिलांनी घेतले. व्यवस्थित व्याजासह होणारी परतफेड बघून सायबेज कंपनीने त्यात ९ लाख रुपयांच्या खेळत्या भांडवलाची भर घातली. ‘कर्ज माफी’ मिळवण्याच्या राजकीय खेळाच्या या जमान्यात, सन्मानाने कर्ज घेऊन व्याजाने फेडायला शिकवणे हे आव्हानच होते पण ‘विकास’ स्वतःच्या हिमतीवर होतो ‘अनुदानावर’ नाही हे मूल्य समजावून द्यायला आपण काही अंशी यशस्वी झालो. मला खात्री आहे अशा आर्थिक ‘इंजेक्शन’मुळे अनेकींच्या घरातली परिस्थिती सुधारली आहे. हे काम जरी महिलांच्या माध्यमातून केले असले तरी नेमक्या प्रयत्नाने अनेक कुटुंबात थोड्याशा काळात बदल झाला आहे.
प्रकल्पामुळे ‘करणारा’ गट काय शिकला तर वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक उपक्रमातून सुद्धा ‘सुरक्षित संधी’ची योजना केली तर अगदी कमी कालावधीत ग्रामीण बाईचे आयुष्य बदलायला सुरुवात होऊ शकते! प्रबोधनाची ही पहिली पायरी!
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६