एकदा बचत गटाची घडी बसल्यावर गेले पंचवीस वर्ष आपण दर एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक वर्ष संपल्यावर वार्षिक हिशोब करून गाव पातळीवर गटाच्या हिशोबयचे जाहीर वाचन करतो. या निमित्ताने गटातून कोणी किती कर्ज घेतले, कोणाचे किती देणे बाकी आहे, बचत किती आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचते. एखादी महिला आपण शिकवल्याप्रमाणे जरी वागत नसली तरी ज्ञान प्रबोधिनी आर्थिक विषयातही पारदर्शक व्यवहाराचा आग्रह धरते हे गावातल्या सभासद महिलांपर्यंतच काय दूरून ऐकणाऱ्या पुरुषांपर्यंतही पोहोचते. असे पोचल्याचा सगळ्यात मोठा परिणाम गटाचे सामाजिक बळ वाढण्यात झाला होता. एखादीच्या कुटुंबाने किती मोठे आर्थिक निर्णय घेतले, त्याला बचत गट नेमका कसा आणि किती सहाय्यभूत झाला हे सुद्धा या निमित्ताने गावभर जाहीर होत होते. गटाच्या निमित्ताने ग्रामीण महिलांचा बँकांशी होणारा संवाद हा सुद्धा ‘ती’ची गावपातळीवरची निर्णय क्षमता वाढण्यासाठी उपयोगी पडला आहे असे मेळाव्या निमित्ताने गावाला दिसायचा.
नेतृत्व विकासाचा जाणीवपूर्वक विचार करायला लागल्यावर अशा गावपातळीवर काम करणाऱ्या माहिलांसाठी कार्यक्रमाची आखणी केली. तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात केली. किती छोट्या गोष्टी तर गावातच २०-२५ जणींचा दोन-तीन तास चालणारा मेळावा घ्यायचा अशा उपक्रमाची सुरुवात केली. शेती कामे उरकल्यावर नवरात्रात या मेळाव्याची योजना केली. गेली १० वर्ष असे मेळावे योजनापूर्वक घेतले तेव्हा असे लक्षात आले की रोजंच गावात भेटणाऱ्या गावातल्याच महिलांसाठी मेळावा योजला तर मेळाव्याचे काम पैशाच्या हिशोबा पलीकडे असल्यामुळे एरवी पुढाकार न घेणाऱ्या चार जणी पुढाकार घ्यायला तयार होतात. बचत गटाच्या कामामुळे आर्थिक घडी तर बसली होती पण सामाजिक परिणाम घडवण्यासाठी अशा पद्धतीच्या कामांचा खूपच उपयोग झाला.
गाव पातळीवर घेतले जाणारे असे मेळावे गावातल्याच महिलांसाठी, गावातल्याच महिलांनी घेतलेले असायचे, नवरात्रीच्या ठरावीक दिवसांत एकाच वेळी ३०-४० गावांमध्ये जाण्यापासून सुरुवात झाली एक वर्ष हा आकडा ८२ गावापर्यंत पोचला. या जवळपासच्या गावांमध्ये जबाबदारी घेऊन, नियोजनपूर्वक जाण्यामुळे गटाचा आत्मविश्वास उल्लेखनीय वाढला.
असाच एक कामाचा मैलाचा दगड म्हणजे द्विदशक पूर्ती निमित्त घेतलेला महामेळावा! हा जवळजवळ चार-साडेचार हजार महिलांचा होता या मेळाव्याने कार्यकर्त्या गटाचा आत्मविश्वास दुणावला. त्याचा अधिक तपशील स्वतंत्र लेखात दिला आहे.
ग्रामीण महिला एकत्रितपणे अनुभव किंवा सराव नसल्याने फार दूरचे नियोजन करू शकत नव्हत्या तरी चालू कामांमध्ये बारकावे लक्षात घेऊन, नेटकेपणाने मन लाऊन काम करतात. अशा कामामुळे त्या गावात उठून दिसायला लागतात. शासनाने जरी महिला आरक्षण दिले असले तरी त्यासाठी पात्र होण्यासाठीची प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली नाही. बचत गट अशी संधी देतो. असे नेतृत्व संधी देणारे मेळावे, महिलांना मुख्य प्रवाहात आणायला मदत करतात. ‘कोणाला तरी महिलेला ५०% महिला आरक्षणामुळे संधी मिळणार आहे मग मी का नको?’ असे वाटणारी महिला गावासाठी धडपडून काहीतरी करताना दिसते मग गावातील महत्त्वाच्या पदांवर अशा महिलांची वर्णी लागायला सुरुवात होते. कोणी पाण्याच्या गाव पातळीवरच्या समितीची सभासद होते तर कोणी शाळेच्या शिक्षण समितीची सदस्य होते. कोणी पालक संघासाठी काम करू लागते तर कोणी बालवाडी ताईला मदत करू लागते.
हळदीकुंकवासाठी जमणे वेगळे आणि गाव विकासासाठी आपणच पुढाकार घेऊन काहीतरी करणे वेगळे. एकदा का सामाजात उतरून अशी नेतृत्व संधी घ्यायची ठरवली तर खूप शिकावे लागणार होते. अनुभवाने अनेकींच्या ही गोष्ट लक्षात आली. मग बैठकीचे विषय बदलले. छोटे भाषण गटांसामोर उभे राहून कसे करायचे या पासून अधिकाऱ्यांशी बोलायचे कसे ही अनुभवाने शिकायला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या, कुठली कामे कोण करते यांचे माहिती घेतली.
गंमत म्हणजे ‘पुरुष’ पुढारी ‘शहरात’ जाऊन काय काय करतात यांचा महिलांनी बारकाईने अभ्यास केला. मग थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहाण्या पासून हॉटेलमध्ये जाऊन पंजाबी जेवण कसे मागवायचे यांचाही अनुभव स्वखर्चाने सुरक्षित छोट्या गटात महिलांनी घेतला.
एकीकडे असे अनुभव घेताना आपण आपल्या प्रयत्नाने अनेक गावात महिला ग्रामसभा घेतल्या. गटातील महिला सरपंच नंतर होऊ देत पण आधी गावगाडा कसा चालतो ते समजले पाहिजे. रचनेचा भाग व्हायचे असेल तर रचना आधी नीट समजून घेतली पाहिजे असा साधा हेतू त्यात होता. ज्यांना पुढे जायचे होते त्यांनी अशा गटकार्यात हिरीरीने भाग घेतला. त्यामुळे नेतृत्व करण्याची उर्मी एकेकीच्या मनात जागी व्हायला लागली आहे असे लक्षात आले.
ज्ञान प्रबोधिनी म्हणून आपण सोबत आहोतच पण आता बचत गटाला फक्त मार्गदर्शन करूया असे ठरवले. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या काही जणींनी ‘जिजामाता प्रबोधन केंद्र’ अशा स्वतंत्र न्यासाची सुरुवात केली. गटाची जबाबदारी या न्यासाने घेतली. तरीही गटांची संख्या कमी करून, गट स्वयंपूर्ण होऊन आपापला आर्थिक व्यवहार बघेल असे बघतो आहोत. मग शासनाच्या योजनांना गाव प्रतिनिधी म्हणून त्या आपल्या मार्गदर्शनाने अर्ज करत आहेत. अगदी परवाच्या लोकसभेच्या निवडणूकीला ‘मला पटते त्या उमेदवाराचा प्रचार मी करते आहे!’ असे म्हणणाऱ्या सर्व पक्षात असणाऱ्या आपल्याच कार्यक्रमातून तयार झालेल्या महिला आहेत यांचे समाधान आहे.
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६