भाजी-विक्री, एक मदतकार्य !

आभाळात मान्सून पूर्व ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा आला. दोन दिवस उन्हाने तापलेल्या वातावरणात एकदम सुखकर फरक पडला तेवढ्यात कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई पाउस येणार असे दिसतंय! नुकताच काढलेला कांदा शेतात चांगला वाळला आहे पावसाने भिजला तर आज २०-२५ रुपयाने जाणाऱ्या कांद्याला किलोला २ रुपये सुद्धा मिळणार नाहीत! काही तरी करा आणि कांदा लवकर म्हणजे उद्याच विकता येईल असे बघा!’ मी नेमकी अडचण समजावी म्हणून विचारले की ‘किती आहे?’ त्या म्हणाल्या, ‘फार नाही ५० किलोची १०० पोती तरी भरतील!’ …. एकीला मदत करायची तर ५००० किलो… ५००० किलो नुसता विचारही मला झेपेना. पण काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं. कावेरीताईंनी मला एकटीला नाही तर अनेक ताईंना फोन केले होते. सगळ्यांनी एकत्र बोलून मदत करायचे ठरवले!

गटातल्या वंदनाताईंनी पुढाकार घेतला. एरवी त्रास वाटणारी प्रसार माध्यमे या वेळी कामी आली आणि कांदे विक्रीचा निरोप झपाट्याने फिरला. पुण्यात ३५ रुपये किलो कांदे मिळत असताना गावात १०रु ने विकला जात होता. म्हणून १८ रु किलो असा विक्रीचा भाव ठरवला पण किमान ५ किलो तरी घ्यायचा असं ठरवलं आणि म्हणता म्हणता १००० किलोच्या ऑर्डर बुक झाल्या आणि दुसऱ्या दिवशी वाटप करायचे ठरवून कावेरीताईंची मुले छोटा टेम्पो घेउन पुण्यात आलीही. वंदनाताईंनी कसं कुठून जायचे हे सांगितले आणि ग्राहकांना कुठे थांबा हेही सांगितले. तसे घडले आणि कांदा बघून लोकांनी ‘अजून द्या’ ‘अजून द्या’ अशी मागणी केली, ती अर्थातच पूर्णही झाली आणि एका दिवसात व्हॉटस अॅप कृपेने एका दिवसात १५००किलो कांदा विकला गेला. 

लॉकडाउनमुळे सगळे घरात होते रोजचे भाजीवाले येत नव्हते त्यामुळे कांदा विक्रीला उदंड प्रतिसाद मिळाला. घेणारा आणि विकणारा दिघेही खुश झाले. घेणाऱ्याची गरज भागताना कमी दरात कांदा मिळाला आणि शेतकऱ्याला मदत झाली असे समाधान मिळाले तर विकणाऱ्याला चार पैसे जास्त मिळाले, कटकट न करता समाधानाने कांदे घेणारे ग्राहक मिळाले, रोख पैसे लगेच हातात आले. पाउस लागायच्या आत कांद्याचे पैसे झाले. सगळा खर्च निघाल्याचे समाधानहे त्या सोबत मिळाले!

संध्याकाळी कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई, कांदा करताना झालेला सर्व खर्च भरून आला. कालच्या फेरीत मुलांनी काही कांदा हॉटेलला विकला, काही भाजीवाल्यांनी ऑर्डर दिल्या. उद्या पुन्हा फेरी केली की संपेल सारं. बर वाटलं लोकांनी कांदा घेतला तेव्हा कोणी जेवण दिले तर कोणी उन्हाचे गार पाणी दिले, तर कोणी सरबत भरून बाटली दिली… सन्मानाने विक्री झाली! फार बर वाटलं. कांद्यामुळे नवीन कर्ज होणार नाही… आधीच लॉकडाउन त्याला चांगला आधार मिळाला!’ एरवी वर्तमान पत्रात बातमी वाचतो ‘अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान’ म्हणजे काय हे कांदा घेणाऱ्या प्रत्येकाला थोडं तरी कळलं! ….प्रश्न सगळ्यांना होता आताकुठे एकीचा प्रश्न मार्गी लागला!

तो पर्यत प्रबोधिनीने कांदा विकला ही ‘बातमी’ पुण्यात आणि बचत गट घेत आहोत त्या गावात पसरली. मग काय भारतीताईला फोन आले, ‘ताई आमची भाजी विकायची आहे. करोनामुळे बाजार बंद आहेत म्हणून शेतात गुर सोडायची का? असा प्रश्न आहे. देउ का पाठवून?’ आशाताईना फळवाले म्हणाले आमचे अंजीर, चिक्कू पण घ्याकी…. घेत असलात तरच तोडा करतो नाहीतर पक्षी येतीलच की….

मग कार्यकर्त्यांना स्वस्थ बसवेना, आशाताई म्हणाल्या मीच जाते कांद्याच्या टेम्पोत भाजी-फळे घेउन …. तोवर भारतीताईंनी एका अपार्टमेंटमध्ये स्टॉल ठरवला आणि दुसरे दिवशी २ गाड्या भाजी, कांदे घेउन निघाल्या. एक स्टॉल लागला त्यावर फक्त भाजीच विकली. सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांनी वजन करायला सुद्धा मदत केली. तीन तासात १५० किलोपेक्षा जास्त विक्री केली. तर कांद्याचा टेम्पो आज भाजी घेउन मागणी पुरवत पुणेभर फिरला त्याने ४०० किलो पेक्षा जास्त विक्री केली सकाळी ७ वाजता निघालेली गाडी शेवटची भाजी रात्री ९,३० वाजता देउन गावी परतली. दिवस भरात एकूण ५५६ किलो भाजी व १२०० किलो कांदे विकून झाले!

वर्तमानपत्रे चालू नसली तरी आपल्या या उपक्रमाचा दोन दिवसात वाऱ्याच्या गतीने पुण्यात आणि गावात प्रसार झाला. देणारे आणि घेणारे दोघेही आग्रह करत होते. आता रचना बसवण्याची गरज वाटायला लागली. आधी मागणी नोंदवायची त्या प्रमाणे शेतकऱ्याला भाजी मागणी प्रमाणे काढायला सांगायची, गावागावातून गोळा करायची. आणि पुणेभर वितरण करायचे …. कामेही त्याच क्रमाने करायची, तसे काही सोपे नव्हते, कारण लॉकडाउन चालू होते. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. गावातला टेम्पो भाजी घेउन बाहेर पडायला परवानगी लागतं होती, त्यामुळे आपल्या वाहनाला ‘अत्यावश्यक सेवा’ परवाना काढायचा, वितरकांनी करोना काळजी घेत सारे करायचे आणि काही शे किलो भाजी व फळे असे नाशवंत सामान मागणी केलेल्या व्यक्तींपर्यंत पोचवायचे ठरवले. 

मग प्रबोधीनीय कार्यकर्ते कामालाच लागले! मागणी नोंदवण्यासाठी अॅप बनवले गेले. व्हॉटस अॅपने प्रचार सुरु झाला. सिंहगड रोड, सातारा रोड, कोथरूड, गावभाग असे व्हॉटस अॅपचे गट केले म्हणता म्हणता एकेका गटात २५७ सभासद होउन गट पूर्ण झाले, मग दुसरा गट असे एकूण ७ गट तयार केले. साधारण १३००+ सभासद गटात सहभागी झाले. भरपूर मागणी नोंदवली गेली. 

आता मात्र पुरवठ्याची रचना अपुरी पडणार का काय असे वाटायला लागले. युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली. मागणी नुसार विभागवार पुणे शहरात भाजी वितारण करण्यासाठी रस्ते माहिती असणारे युवक, युवक विभागाने शोधून कामाला लावले तर ग्रामीण महिलांनी भाजी-फळे मिळवून वजन करून क्रेटमध्ये बसतील असे पाहिले. वांगी, दुधी, टॅमाटो, भेंडी असा कीट तयार करणे चिक्कू, अंजीर अर्धा एक किलोत पॅकिंग करणे असे ५००-५५० किलोचे पॅकिंग एकेका दिवशी सुरु झाले. हे चालू काम जे लांबून बघत होते ते सुद्धा उत्साहाने मदतीला धाउन आले. मनुष्यशक्ती कामाला लावायची पण करोना लॉकडाउनचे सर्व नियम पाळून, त्यामुळे गाडीत डिलिव्हरी द्यायला जातानाही दोन पेक्षा जास्त जणांनी एकत्र बसायचे नाही, मास्क हवेत हे सारे केले. 

काम सुरु झाल्यावर प्रश्नही सुरु झाले. पहिल्या दिवशी सारे प्लॅस्टिक पिशवीत भरले तर दुसऱ्या दिवशी भाजी भरायला पिशव्याच नव्हत्या, दुकाने बंद त्यामुळे मिळणारही नव्हत्या, असे लक्षात आले मग रद्दी गोळा केली, त्याच्या पिशव्या तयार केल्या अगदी स्टेपलरच्या पिना संपल्या लॉकडाउनमुले त्याही मिळणार नाहीत मग पिशव्या पुरवायची जबाबदारी युवती विभागाने सांभाळली. कागदी पिशव्यात फळे भरली, भाजीसाठी कापडी पिशव्या वापरल्या पण त्याही खूप नव्हत्या एकीकडे गावात निरोप देउन त्याचे उत्पादन सुरु केले, तर ग्राहकांना सांगितले की भाजी घ्यायला येताना पिशवी घेउन या पिशवीत भाजी ओतून घ्या. कापडी पिशवी हवी असेल तर वर १० रुपये द्यावे लागतील पण पिशवी परत केलीत तर हवी आहे. ग्राहकांनी साथ दिली बहुतेक पिशव्या परत आल्या. 

ग्राहकांनी फक्त मागणी देउन मदत केली असं नाही तर युवक गट भाजी वाटप करताना ‘भाजी’च्या वेळेला म्हणजे सकाळी-संध्याकाळी पोचला असे झाले नाही, कधी ऐन दुपारी सुद्धा पोचला तरी फोनवर बोलणे झाल्या प्रमाणे ठरलेल्या ठिकाणी बहुतेक जण आले. पोलिसांनी रस्ते बंद केले असताना मोकळे रस्ते शोधत एखाद्या पत्याच्या जवळपास जाणे सुद्धा लॉकडाउनमध्ये सोपे नव्हते. त्यामुळे कधी वेळ पुढेमागे झाली तर कधी एखादी मागणी केलेली भाजी एवढ्या डिलिव्हरी करताना पुढेमागे झाली तरी कोणी तक्रार केली नाही. हे ग्राहकांचे सहकार्य खूप महत्वाचे होते. भाजी-फळे वितरण करताना ज्याला डिलिव्हरी द्यायची त्याचा फोन लागला नाही म्हणून जर एखाद्या घरी जावे लागले तर मिळणारा पाहुणचार ‘भाजीवाला आला’, असा नव्हता तर प्रबोधिनीचा प्रतिनिधी आला असा होता असे अनेक युवकांनी आवर्जून सांगितले.

‘भाजी’ या विषयाशी अनेक युवक प्रथमच सामोरे गेले होते त्यामुळे कुठली भाजी हळूवारपणे हाताळायची पासून भाजी-फळाच्या किंमती काय असतात अशा अनेक गोष्टींची माहिती करून घ्यावी लागली होती. चुकत होते तरी नव्या उत्साहाने शिकत करत होते हे विशेष!

१३ दिवसाच्या कालावधीत प्रत्यक्ष वाटप ६ दिवस झाले. ह्या मदतकार्यात साधारण ८०० जणांना ६७३४ किलो कांदे, भाजी व फळे खरेदी करून वितरण केले केले. पावणे दोन – दोन लाख रुपयांची उलाढाल झाली ६ गावातल्या २५ जणांचा माल या रचनेतून वितरण झाला. एकूण ३० पेक्षा जास्त जणांचे स्वेच्छेने केलेले काम १७० पेक्षा जास्त मनुष्य दिवसाचे झाले. एवढ्या कमी वेळात एवढी मनुष्यशक्ती उभी करून असे काहीतरी करता येईल असे वाटले नव्हते, सगळ्यांनी मिळून जमवले. त्यामुळे उपक्रमकर्त्यांचा विश्वास दुणावला! आता नियोजन करून अजून काहीतरी मोठे करू असे वाटायला लागले. खूप ताण आला त्यामुळे ‘झाले तेवढे बास’ असे कोणालाच वाटले नाही, तर या उपक्रमातून सर्व कार्यकर्त्यांना नवीन उर्जा मिळाली.

अजूनही प्रतिसाद आहे, पण ज्या शेतकरी गटासाठी सुरु केले त्यांची शेते खरीपासाठी  रिकामी करायची वेळ झाली. पुण्यात संध्याकाळी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आणि आता अशी भाजी वितरण व्यवस्थाही गरजेची राहिली नाही. कारण रोजचे भाजीवाले नियमित यायला लागले आणि अनेक गटांनी हा उपक्रम हाती घेतला; मग कुठे नगरसेवक पुढे आले तर कुठे देवस्थाने पुढे आली. 

भाजी आली आणि पोच झाली. आता संपलीही! उत्पादकाकडून थेट ग्राहकापर्यंत वितरण करण्याचा प्रबोधिनीच्या नव्या पिढीचा एक प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण झाला. नाशवंत म्हणजे काय पासून शेतकऱ्याला भाव मिळवून देताना नुसतीच करुणा उपयोगी पडत नाही रचना बसवणे कसे गरजेचे आहे हे आम्ही सारे जण शिकलो. तेव्हाच नेमकी निर्मला सीतारामन यांनी FPO (Farmer Producer Organizetion) संबंधी काही घोषणा केली. काल पर्यत ती नुसती बातमी बातमी झाली असती. आता पुढील कामासाठी त्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली!!  

*****