बचत गटाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महिलांना स्वतःच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या मग ‘मागच्यायचं ऱ्हाऊदया पुढच्याचं सुधरा’ या उक्ती प्रमाणे त्यांच्या मुलींच्यासाठी काहीतरी करा असा आग्रह त्यांनी धरला. त्यातून मुलींसाठीच्या कामाला सुरुवात झाली.
किशोरी विकास हा रचनात्मक उपक्रम स्थानिक शाळांच्या सहकार्याने सुरू केला. ८-९ वीच्या किशोरींसाठी शाळेत जाऊन तास घेणे असे त्यांचे स्वरूप होते. तासिकांमध्ये किशोरींचे वृत्तीघडण व्हावे, आयुष्याची पुढची दिशा ठरायला मदत व्हावी, साहस निर्माण व्हावे आणि या सगळ्यातून आत्मविश्वास वाढवा यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. अश्विनीताईं या उपक्रमाचे प्रमुख म्हणून नियोजन केले.
पुण्यातील साने गुरुजी कथामालेसह संवाद कौशल्य यावे म्हणून कथाकथन कसे करायचे ते सलग ८ वर्ष शिकवले. किशोरींना गोष्ट सांगण्यासाठी प्रवृत्त केले त्यांच्या स्पर्धा घेतल्या. यामुळे गटासमोर उभे राहण्याचे धाडस तर येतेच आणि शब्द संपत्ती वाढवून आपलं म्हणणं दुसऱ्यासमोर मांडण्याचे कौशल्यही शिकता येते. गटासमोर स्वतःला सादर करणे ही पहिली पायरी!
त्यानंतर मुलीवर ‘मला काहीच जमणार नाही’ असा झालेला संस्कार पूसुन काढण्यासाठी मानसिक घडण करायला सुरुवात करणे गरजेचे होते. मग थोड्याशा साहसी गोष्टी करण्याचे ठरवले. किशोरी विकास मधल्या मुलींची सातत्याने १०-१२ वर्ष ‘निवासी तंबूतील शिबिरं’ घेतली. कुटुंबापलीकडे मैत्रिणी मैत्रिणींनी रात्री एकत्र राहायचं, तंबूंना पहारा देत रात्र जागवायची, शिबिराच्या शेवटी गड किल्ले सर करायचे अशा वेगळ्याच भाविश्वात आपण किशोरींना घेऊन जायला लागलो. या प्रयत्नातून तोरणा, राजगड, पुरंदर, रायरेश्वर, सिंहगड, सज्जनगड असे किल्ले एकेकावर्षी एकेक गड सर केले! डोंगरांवर फाटा आणायला जाणाऱ्या मुलींना गड ‘सापडला’, इतिहास समजला.. मग आपसूक ‘पाळी’ या विषयाचा संकोच गेला, त्यांचा आत्मविश्वास दुणावला!
शारीरिक आणि मानसिक आव्हानासाठी किशोरींनी सायकली चालवल्या पाहिजेत असा आग्रह धरला. स्वयंपूर्णतेसाठी उचललेलं हे पहिले पाऊल होतं. ३-४ वर्षात मिळून पुण्यातील मुलींच्या वापरल्या जात नाहीत अशा जवळ जवळ ८०-९० सायकली गोळा केल्या आणि नव्या कोऱ्या सायकली कॉगनिजंट कंपनीमधून मिळवल्या त्याचा वाटपाचे कार्यक्रम केले. त्यावेळी सामाजिक वातावरण असे होते की सायकल हातात असली तरीही मुली सायकली चालवण्याचं धाडसच करू शकत नव्हत्या. मग मात्र आपण मुलींनी सायकल चालवण्याला सामाजिक मान्यता मिळावी म्हणून एक वर्ष महिलांची वाहन रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये सर्वजण महिला चालक होत्या. ज्यांना स्कूटर येत होती आशा १० जणी पुण्यातून स्कूटरनी आल्या, ज्यांना गाडी येत होती त्या गाडीने आल्या आणि ५० किशोरींचा गट सायकल चालवत २२ किमी रॅलीमध्ये सहभागी झाला. रॅलीमुळे ‘शारीरिक ताकदीची चॅलेंजेस सुद्धा मानसिक ताकदीच्या बळावर मी सहज पूर्ण करू शकते’ असा विश्वास आला.
पुढे ४ वर्षानी मुलींची आणि महिलांची क्रीडा प्रात्यक्षिके घेतली त्यावेळी या गटातील काही मुलींनी सायकल कसरती सुद्धा केल्या म्हणजे एकच विषय सातत्याने लावून धरल्याने मुलींच्या मनोवृत्तीत बदल होऊन गटाचा आत्मविश्वास वाढतो हे आपण सिद्ध करून देऊ शकलो. त्यावर्षी भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या उपक्रमाची दखल घेतली आणि खासदार निधीतून सगळ्या किशोरींना सायकल वाटप केले. आता सायकल मिळवणे या पथदर्शी प्रकल्पाचे काम संपुष्टात आले. त्यानंतर आपण हा विषय पुढे लावून धरला नाही. आजही मुली रस्त्यावर सायकल चालवताना दिसतात पण अपवादाने …. आपल्या कामाने परिस्थिती नक्कीच बदलली आहे पण सायकल चालवण्यासाठी मनोबल जसं महत्त्वाचा आहे तसं ‘माझ्या सायकलमध्ये मी हवा भरेन’ ‘माझ्या सायकलला झाले तर मीच पंचर काढीन’ याचे प्रशिक्षण देण्यात आपण कमी पडलो. पण समाजाचे मत परिवर्तन करायला ७-८ वर्षांचा काळ पुरत नाही.. पुढच्या किशोरींसाठीही अजून काही काळ असाच उपक्रम करायला हवा होता.
किशोरींसाठी तंबूतली शिबिरं घेतली तशी शारीरिक धाडस वाढावे म्हणून मढे घाटावर रॅपलिंगची शिबीरे सुद्धा घेतली. दोराच्या साह्याने प्रस्तरावरतरण करणे यासाठीची मनाने तयारी होणे हे खूपच अवघड होते. अश्विनीताई सोबत कुंदाताईंसारख्या ताईंनी स्वतः उंचच उंच कडा उतरून मुलींना दाखवले की आम्हाला जमते मग तुम्हाला का नाही? ..मग त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या मुली भराभर रॅपलिंग करत उतरल्या. मनाचे घडण ही शारीरिक घडणीपासून सुरु होते!
पुढचा टप्पा होता तो विद्याव्रताचा स्वतःच्या आयुष्याचा पुढचा निर्णय करण्यासाठी संकल्प कथन करणे गरजेचे होते. किशोरी विकास उपक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणून सातत्याने गेली १४-१५ विद्याव्रत करत आहोत. भागातील १०००-१२०० किशोरवयीन मुला-मुलींचे विद्याव्रत आपण केले. या सगळ्यांना विधायक विचार करण्याची ताकद, व्यसनांपासून दूर राहणे, स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वतः घेणे आणि संकल्प शक्ती वाढवणे आणि पंचकोशातून विकास या वरच्या व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले. छोटे छोटे उपक्रम गटागटाने करून घेतले. यातले अनेक उपक्रम किशोरी विकास उपक्रमामुळे आयुष्यात मुलींनी एकदाच केले असतील पण हे उपक्रम असे होते की ते त्यांच्या आयुष्यातल्या सुखद आठवणीचा भाग बनले. १० वर्षांनी जरी त्या किशोरी कुठेही भेटल्या अगदी रस्त्यात, बसमध्ये, जीपमध्ये, माहेरी आल्यामुळे आपल्या गरोदर तपासणी शिबिरात…. तरी ‘ताई मला ओळखलं का? त्या शिबिरात तुम्ही आला होतात’ असं म्हणत ‘आता मी..’ आपलेपणाने बोलायला लागतात. त्यांच्या आयुष्यामध्ये त्या प्रसंगाचं महत्त्व किती होतं हे आपल्याला सांगतात.
किशोरी विकास उपक्रमातून किशोरींची स्वप्न मोठी झाली पाहिजेत म्हणून तासांना चांगलं शिक्षण होण्यासाठी चांगले मार्क मिळावेत म्हणून अभ्यास कौशल्यांचे वर्ग घेतले, दहावीत गेलेल्या मुला-मुलींना पेपर कसे सोडवायचे कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही आणि अभ्यास कसा करून मार्क चांगले मिळवायचे यावरही मार्गदर्शन केलं. शिक्षणाच्या संधीवर व्याख्याने दिली. विविध क्षेत्रांची ओळख होऊन आयुष्याची दिशा ठरवायला मदत करणारे मार्गदर्शनही केलं. निवडक गटाला क्षेत्रभेटीसाठी पुण्यात आणलं कधी दीनानाथ सारख्या हॉस्पिटलची मुलींना भेट देऊन नर्सिंग पासून डॉक्टरांपर्यंत आणि टेक्निशियन पासून अन्य स्टाफ पर्यंत नोकरीचे काय मार्ग आहेत याचा परिचय करून दिला तर कधी कर्वे शिक्षण संस्थेच्या भेटीतून इंजीनियरिंग पासून फॅशन डिझाइनिंग पर्यंत आणि नर्सिंग पासून संगणकापर्यंत इथं मुलींच्या निवासात राहून सुरक्षित शिक्षण कसं घेता येईल याचे परिचय करून दिला. गावात दहावी होणाऱ्या मुलीला कॉलेजमध्ये जायचं एवढंच ऐकून माहिती असतं पण कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागतं याबद्दल मात्र ती अनभिज्ञ असते. किशोरी विकास उपक्रमातून आधीमित्र गट मुलींना सहज उपलब्ध झाला की सोबत काम करणाऱ्या ताया वयाने त्यांच्यापेक्षा फार मोठ्या नव्हत्या त्यामुळे झालेल्या सहज संवादातून अनेक गोष्टी घडत गेल्या.
किशोरी विकास उपक्रमाने अजून एक महत्त्वाचं काम केले ते म्हणजे स्वतःच्या गावात त्यांनी धडपडून काहीतरी केलं पाहिजे म्हणून किशोरीनच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कामाचे आवाहन केलं. गावातील मुला-मुलींना जमवून बाहेरून येणाऱ्या मार्गदर्शक तायां सोबत गाव पातळीवर मेळावा घ्यायचा. असा उपक्रम आपण गेले दहा वर्ष करत आहोत एका वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे ८५ गावांमधून २५०० मुला-मुलींपर्यंत किशोरींच्या मदतीने आपण पोहोचलो. स्वतःच्या गावात चांगला झालेला मेळावा बघून माझ्या मामाच्या गावात घेऊयात, माझ्या मावस बहिणीच्या गावात घेऊयात असे म्हणत मुलींनी पुढाकार कसा घ्यायचा आणि ठरवलेले काम कोणाच्यातरी मदतीने साध्य कसे करायचे याचे शिक्षण घेतले. अशा आपल्या धडपडणाऱ्या मुली कॉलेजमध्ये गेल्या आणि त्या कॉलेजमधल्या बाईंची भेट झाली तर त्या आपल्याला आवर्जून भेटून सांगतात, ‘तुमची ती मुलगी वर्गात उठून दिसते बर का!’ आणि त्यामुळे तिचं पालकत्व आपण घेतलं आहे हे तिच्या बदललेल्या वागणुकीतूनच कळतं. अशा अनेक मुलींच्या आयुष्यावर ठसा उमटवणार काम किशोरी विकासाच्या निमित्ताने केलं कारण या सगळ्या कामाला या सगळ्यांच्या आईचा पाठिंबा होता. बचत गटातून त्या शिकल्या होत्या की मुलीने पुढे जायचं असेल तर आईनं तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ही संधी बचत गटाच्या कामांनी दिली म्हणून केवळ किशोरी विकास हा उपक्रम अतिशय उत्तम चालला आहे आणि आजही चालू आहे. ही काम सांभाळणारी अश्विनीताईची आई सुद्धा बचत गट प्रमुख होती.
ज्या किशोरींसाठी आपण कार्यक्रम घेत होतो त्या किशोरी जसजश्या मोठ्या होत गेल्या १०-१२वी पास झाल्या, त्यातल्या काही पुढच्या किशोरींसाठी अश्विनीताईंच्या मदतीला कामाला आल्या. किशोरी विकास उपक्रमातून तयार झालेली युवती जेव्हा तोच उपक्रम पुढे चालावा म्हणून काही काळ काम करते, तिच्यापेक्षा थोड्याशा लहान मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा तिचाही आत्मविश्वास दीर्घकाळ टिकणारा रहातो असे आपण बघू शकतो. ही काम बघायला नक्की या!
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६