वेगळ्या जगाची ओळख !! – प्रसाद चिक्षे

कोविडच्या काळात बरीच उलथापालथ झाली. अनेक लोकांच्या आयुष्यात तो खूप बिकट काळ होता. माझ्यासारख्या लोकात राहणाऱ्या माणसाला घरात निवांत राहणे खूपच अवघड होते. परिस्थितीच अशी होती की घरात बसून राहणे भाग होते. काही दिवसातच लक्षात आले की अंबाजोगाईतील अनेक नागरीवस्त्यातील बांधवांचे हातावर पोट आहे त्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. त्याच बरोबर काही वस्त्या ह्या भटक्या आणि विमुक्त बांधवांच्या आहेत. त्यांचे तर आयुष्य खूपच बिकट आहे.

नव्यानेच ओळख झालेला हा समाज गट होता. वीस वर्षे अंबाजोगाई आणि मराठवाड्यात काम करत असताना या समाज गटा पासून मी कोसो दूर होतो.

ह्या बांधवांचे राहणे. त्यांच्या चाली रीती,भाषा असे अशा अनेक गोष्टी समजून घेण्यास सुरुवात केली. आधी पंधरा दिवसांनी मग आठवड्यानी आणि आता तर दररोज जाणे सुरू झाले. आधी वस्तीवरील जेष्ठ स्त्री – पुरुषांशी मग मुलांशी असे करत करत वस्तीवरील सर्वांशी आमचे नाते जुळू लागले. माझ्यासोबतचे कार्यकर्ते बदलत होते आणि ते अगदी साहजिक होते. मी मात्र ह्या बांधवांचे दर्शन घेण्यासाठी शक्य तो दररोज जात होतो.

आता तीन वस्त्यांवर नियमित प्रत्येकी एक तास मी आणि शुभम जातोत. दुपारी चार वाजले की आम्ही निघतो. घरापासून 9 किमी वर असणाऱ्या बंडी धनगरांच्या वस्तीवर पहिल्यांदा नंतर गोसावी आणि फकिरांच्या वस्तीवर आणि शेवटी शिकलकरी वस्तीवर. असे करता करता सायंकाळचे सात वाजतात.

वस्तीवर मुलांची आनंद शाळा,पुरुष आणि स्त्रियांशी त्यांच्या जीवना बद्दल बोलणे. त्यातून काही उपक्रम सुचला तर तो करणे. आपल्या सर्वांच्या मदतीने त्यांच्या काही प्राथमिक गरजा भागविण्यासाठी मदत करणे. यासर्वातून जवळपास शंभराच्यावर बांधवांनी मदतीचा हात पुढे केला. विनयकाका पटवर्धन, दिपालीताई केळेकर आणि स्वेताताई गडीयार यांनी या कामासाठी नियमित मासिक मदत करणे सुरू केले.