वेदपूजन उपासना (उदकशांती)

वेदपूजन उपासना (उदकशांती)

प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनीच्या धर्मविधींमधे वेदपूजन उपासनेची भर घालताना मनःपूर्वक आनंद होत आहे. प्रस्तुत विधीची कल्पना उदकशांती या प्रचलित विधीवरून घेतलेली असली तरी ही पारंपरिक उदकशांती नव्हे. मूळ उदकशांतीचा विधी बोधायन गृह्यसूत्रात आलेला आहे. उदकशांतीमधील वेदब्रह्माचे आवाहन व पूजन हा धागा पकडून त्याभोवती एका नव्या चांगल्या विधीची रचना करता येईल असे वाटले. त्यामुळे पारंपरिक उपनयन संस्कारावर आधारित ज्याप्रमाणे विद्याव्रत उपासनेची रचना केली गेली, त्याप्रमाणे पारंपरिक उदकशांतीवर आधारित ही ‌’वेदपूजन उपासना‌’ प्रसिद्ध करत आहोत.
वेद हा शब्द विद्‌‍ म्हणजे जाणणे या धातूपासून निर्माण झाला आहे. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचे साधन किंवा ज्ञानाचा विषय असा अर्थ होतो. वेद हे भारतीयांचे सर्वात प्राचीन ग्रंथ होत. भारतामधे लेखनकला अवगत होण्याच्या पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी मौखिक परंपरेने हे वेद जतन केले. वेदपूजन उपासनेच्या निमित्ताने ज्ञानोपासनेची परंपरा सुरू करणाऱ्या आणि चालू ठेवणाऱ्या आपल्या पूर्वजांचे आपण स्मरण करत आहोत.
अज्ञान म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजेच अशांती होय. ही अशांती दूर करायची तर ज्ञानाचीच कास धरली पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवून अज्ञानाचा काळोख नष्ट करण्यानेच खरी शांती लाभेल. म्हणून या वेदपूजन उपासनेची आजच्या काळात आवश्यकता आहे.
ज्या उदकशांतीच्या पोथीवरून प्रस्तुत विधीची कल्पना सुचली त्यासारख्या कित्येक शांती पूर्वी सांगितल्या गेल्या आहेत. मनःशांती मिळवून देणे हाच या शांतीकार्यांचा खरा हेतू दिसतो. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वेदवाङ्मयाची, त्यातील उत्तमोत्तम विचारांची आणि विविधांगी विषयांची ओळख समाजाला नव्यानेच करून द्यायला हवी. वेदपूजन उपासना हे त्यासाठी चांगले उपयुक्त स्थान आहे असे वाटते.वेदांबद्दल अधिक माहिती मिळवण्याची इच्छा असेल त्यांनी ज्ञान प्रबोधिनी संस्कृत संशोधिकेच्या ‌’संस्कृत साहित्याचा इतिहास‌’ या दीर्घ प्रकल्पातील ‌’वेद व वेदांगे‌’ हा प्रथम भाग अवश्य पाहावा. हा विधी एखादी व्यक्ती देवाघरी गेल्यावरच करायचा असतो असे मुळीच नाही. नवीन वास्तूत प्रवेश करताना, नवीन कार्याला सुरुवात करताना आणि एखाद्या चांगल्या प्रसंगीदेखील तो करता येईल.सर्व संप्रदायांचे आणि जातींचे स्त्रीपुरुष, तसेच केवळ भारतीय नागरिकच नाही तर अन्य कोणत्याही देशांचे नागरिक या उपासनेत सहभागी होऊ शकतील. काही प्रशिक्षण घेऊन पौरोहित्यही करू शकतील.प्रस्तुत उपासनेने उपासकांना वेदवाङ्मयाची ओळख होऊ शकली, वेदमंत्रांतील आशावादी दृष्टिकोन, विहित विचार त्यांच्यामधे रुजू शकले आणि केवळ गंधाक्षतपुष्पांनी वेदपूजन न करता वेदांच्या अभ्यासाची आणि सर्वच क्षेत्रांमधील ज्ञानोपासनेची प्रेरणा त्यांना मिळाली तर या उपासनेचे सार्थक होईल.ज्ञान प्रबोधिनीतर्फे संस्काराचे काम सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून केले जाते. यजमानांनी ज्ञान प्रबोधिनीला दिलेल्या देणगीच्या व पोथी, पुस्तके व इतर विक्रीच्या आधारावर हे काम चालते.

पूजासाहित्य

पळी, ताम्हन, पंचपात्र, कलश २, नारळ १, आंब्याची किंवा विड्याची १० पाने, हळद, कुंकू, अक्षता, ५ सुपाऱ्या, १ नारळ, ३ नाणी, १ वाटी तांदूळ, गंध, फुले, उदबत्ती, नीरांजन, काडेपेटी, नैवेद्य ४ भागात, चौरंग, त्यावर घालण्यासाठी वस्त्र, पाणी, २ तांब्या, ३-४ फुलपात्रे (अभिषेकासाठी). बसण्यासाठी आसने, पाट, इ.

वेदपूजन उपासना

अध्वर्यू आज आपण सर्वजण वेदपूजन उपासनेसाठी एकत्र जमलो आहोत. वेद म्हणजे ज्ञान. अज्ञानातूनच अशांतीचा जन्म होत असल्याने ज्ञानाची उपासना करणे, शांतीच्या लाभासाठी आवश्यक आहे. ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्याने अज्ञानाचा काळोख नष्ट होईल व खरी शांती लाभेल. आपण आज वेदपूजन उपासनेच्या निमित्ताने ज्ञानाचीच उपासना करीत आहोत आणि ज्ञानोपासनेची परंपरा सुरू करणाऱ्या व चालू ठेवणाऱ्या आपल्या पूर्वजांचेही स्मरण करीत आहोत.त्रिवार ओंकार व आचमन करून आजच्या या उपासनेचा प्रारंभ करूया.

माझ्या पाठोपाठ आपणही म्हणा-

अध्वर्यू उपासक

            हरिः ,   ,  

              केशवाय नम😐 नारायणाय नम😐

              माधवाय नम😐 गोविन्दाय नम😐

(पहिल्या तीन नमनांच्या वेळी आचमन करावे व चौथ्या वेळी उदक सोडावे.)

अध्वर्यू आचमनानंतर आता स्वतःची आणि आसमंताची शुद्धी करूया.

अध्वर्यू उपासक

            अपवित्र: पवित्रो वा, सर्वावस्थां गतोऽपि वा |

            : स्मरेत्  पुण्डरीकाक्षं, बाह्याभ्यंतर: शुचि:

अध्वर्यूमनुष्य पवित्र,अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेत असो. त्याने भगवन्ताचे स्मरण केले तर तो अंतर्बाह्य पवित्र होतो.

आता आपण या कार्याचा संकल्प करूया.

अध्वर्यू उपासक इह पृथिव्यां, जम्बुद्वीपे, भरतवर्षे, — नगरे /ग्रामे, बौद्धावतारे, अद्य  —— नाम संवत्सरे, —- मासे, —- पक्षे, —- तिथौ, —- वासरे, —- नक्षत्रे – अज्ञाननिरसनार्थं, ज्ञानार्जनार्थं दुरितनाशार्थं, शांतिलाभार्थं च वेदपूजनं करिष्यामहे |

तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपतिपूजनं करिष्यामहे |

      अभ्युदयार्थं पुण्याहवाचनं करिष्यामहे|

अध्वर्यू – या पृथ्वीवरील, भरतवर्षातील,  —- नगरात/गावात, बौद्धावतारात, —- संवत्सरात  —- महिन्यात, —- पक्षात, —- तिथीला, —- वारी —- नक्षत्रावर अज्ञान दूर होऊन ज्ञान प्राप्ती व्हावी व दुरितनाश होऊन  शांतिलाभ व्हावा याकरिता गणपतीपूजन, पुण्याहवाचन यांसह वेदपूजन करीत आहोत.

अध्वर्यू सर्वप्रथम आपण गणेश पूजन करू.

अध्वर्यू उपासक

            गणानां त्वा गणपतिं हवामहे

            कविं कवीनां उपमश्रवस्तमम्‌‍ |

            ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते|

: श्रृण्वन्‌‍ ऊतिभि: सीद सादनम्‌‍ (ऋग्वेद २.२३.१)

अध्वर्यू देवादि गणांचे अधिपती, ज्ञात्यांचेही ज्ञाते, अतुलनीय कीर्तियुक्त, ब्राह्मतेजयुक्त, अधिपांचे मुकुटमणी, मंत्रसंरक्षक अशा हे भगवन्‌‍, तुम्हाला आम्ही आवाहन करतो. ते स्वीकारून आपल्या सर्व  संरक्षक शक्तींसह आमच्या येथे या.

अध्वर्यू उपासक

            श्रीमन्महागणपतये नमः |

            सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामः |

अध्वर्यू हे महागणपते, आपणाला नमस्कार असो. पूजेच्या सर्व उपचारांसाठी म्हणून गंध, अक्षता आणि फुले अर्पण करतो.

(गंध, अक्षता, फुले वाहून गणपतीला नमस्कार करावा.)

अध्वर्यू आता आपण पुण्याहवाचन करू. वडिलधाऱ्या मंडळींकडून या उपासनेसाठी आजचा दिवस शुभ आहे, या उपासनेत स्वस्तिक्षेम असावे व ही उपासना संपन्न व्हावी असा आशीर्वाद मागूया.

अध्वर्यू यजमान मह्यं सकुटुंबिने महाजनान्‌‍ नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण-वेदपूजनाख्यस्य कर्मण पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु |

वडिलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून आशीर्वाद अपेक्षित असलेल्या आणि कुटुंबियांसह वेदपूजन करू इच्छित असलेल्या मला या कार्यासाठी आजचा दिवस शुभ होवो असा आशीर्वाद द्यावा.

अध्वर्यू ज्येष्ठ मंडळी ॐ पुण्याहम्‌‍ | आजचा दिवस शुभ होवो.

अध्वर्यू यजमानमह्यं सकुटुंबिने महाजनान्‌‍ नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमेक्षमाणाय अद्य करिष्यमाण-वेदपूजनाख्याय कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु॥

या कार्यात स्वस्तिक्षेम असावे असा आशीर्वाद द्यावा.

अध्वर्यू ज्येष्ठ मंडळी ॐ स्वस्ति | या कार्यात स्वस्तिक्षेम असेल.

अध्वर्यू यजमान मह्यं सकुटुंबिने महाजनान्‌‍ नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण – वेदपूजनाख्यस्य कर्मण: ऋद्धिं भवन्तो ब्रुवन्तु |

हे कार्य समृद्ध होवो असा आशीर्वाद द्यावा.

ज्येष्ठ मंडळी – ॐ कर्म ऋध्यताम्‌‍ | हा विधी संपन्न होवो.

अध्वर्यू आता आपण वरुणपूजन करू.

अध्वर्यू उपासक

            गंगे यमुने चैव गोदावरि सरस्वति॥

            नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन्‌‍ सन्निधिं कुरु

            वरुण देवाय नम😐 पूजार्थे गंधाक्षतपुष्पम्‌‍ समर्पयामि|

अध्वर्यू हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी हे सप्तनद्यांनो तुमचे पवित्र जल ह्या कलशात येऊन वास करो. वरुण देवाला नमस्कार असो. पूजेच्या सर्व उपचारांसाठी गंध, अक्षता आणि फुले अर्पण करतो. (गंध, अक्षता, फुले वाहून कलशाची पूजा करावी

अध्वर्यू आता आपण वेदब्रह्माचे आवाहन आणि पूजन करू. वेद हे भारतीय धर्म व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ आहेत. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञानाचे साधन असा होतो. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासात वेदांचे स्थान श्रेष्ठ आहे. तत्कालीन जनांचा आध्यात्मिक जीवनक्रम आणि भौतिक उन्नती यांची कल्पना वेदवाङ्मयावरून येते. पूर्वी एकसंध असणाऱ्या वेदराशीचे व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार विभाग केले. वेदामध्ये अनेक देवतांना उद्देशून म्हटलेले मंत्र आहेत. लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही विषयांवर विचार वेदांमध्ये मांडलेले आहेत. वेदद्रष्ट्या ऋषींची, हे जीवन भौतिक व आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न असावे ही इच्छा वेदमंत्रांमधून दिसून येते. एका समृद्ध, सुसंस्कृत, प्रगत अशा समाजाचे दर्शन आपल्याला वेदांमध्ये होते.

वेद, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे मिळून वैदिक वाङ्मय झालेले आहे.  यज्ञयागादि विविध कर्मकांडे व त्यांच्यामध्ये वेदमंत्रांचा कसा विनियोग करावा ते सांगणारे ग्रंथ म्हणजे ब्राह्मण. यज्ञयागादि क्रियांमध्ये दडलेला आध्यात्मिक अर्थ उकलण्याचे काम आरण्यकांनी केलेले आहे. गुरुंजवळ बसून परमार्थ विद्या समजून घेणे म्हणजे उपनिषद. वैदिक वाङ्मयात तत्त्वज्ञान विषयक विचारांनी समृद्ध अशी ही उपनिषदे सगळ्यात शेवटी येतात म्हणून त्यांना वेदान्त म्हटले जाते. वेद, ब्राह्मणग्रंथ व आरण्यके यांत ऐहिक सुखोपभोगाबद्दल प्रार्थना आल्या आहेत. त्यांच्या पलिकडे जावून अध्यात्माविषयीचे ज्ञान उपनिषदे देतात. म्हणून त्यांचे महत्त्व मोठे आहे. श्रीमद्भगवद्गीतेत सर्व उपनिषदांचे सार आले आहे.

वेदांतील मंत्रांचा अर्थ नीट समजण्यासाठी तसेच त्यांचे विशेष विवरण करण्यासाठी रचलेले ग्रंथ म्हणजे वेदांग. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही सहा वेदांगे होत.

अशा आपल्या या प्राचीन वाङ्मयाविषयी श्रद्धा आणि आदरभाव व्यक्त करू आणि त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

आता आपण वेदब्रह्माचे आवाहन व त्यानंतर पूजन करू. वेदांचे खरे पूजन श्रवण, वाचन/स्मरण, पठण, मनन व धारण या पाच उपचारांनी आपल्याला करायचे आहे. या पाच उपचारांचे बाह्य प्रतीक म्हणून गंध, फुले, धूप, दीप व नैवेद्य हे उपचार आपण येथे करणार आहोत.

अध्वर्यू आणि उपासक

            वेदब्रह्माणं आवाहयामि|

अध्वर्यू मी वेदब्रह्मचे आवाहन करतो.

अध्वर्यू आणि उपासक

            वेदब्रह्मणे नमः| सुप्रतिष्ठितमस्तु|

अध्वर्यू वेदब्रह्माला नमस्कार असो. आपण येथे प्रतिष्ठित व्हावे आणि आमच्या पूजेचा स्वीकार करावा.

अध्वर्यू आता आपण चारी वेदांतील शांतिमंत्रांचे पठण करूया. हे पठण करत असताना मन अधिकाधिक शांत, स्वच्छ, निर्मळ करण्याचा प्रयत्न करूया. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी ही अधिकाधिक सुंदर, प्रेममय करण्याची इच्छा करूया. विश्वाच्या कल्याणाची जी प्रार्थना ऋषींनी वेदमंत्रांद्वारे केली होती तीच आपणही करूया.

अध्वर्यू ऋग्वेद हा जगात उपलब्ध असणारा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. ऋचा, सूक्त व मंडल, अशी ऋग्वेदाची रचना केली आहे. अनेक ऋचा मिळून एक सूक्त होते व अनेक सूक्ते मिळून एक मंडल होते. अशा दहा मंडलांमध्ये मिळून सुमारे दहा हजार ऋचा ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदात मुख्यत: यज्ञातील देवतांची स्तुती, वर्णन किंवा प्रार्थना केलेली आहे. याशिवाय काही सूक्तात बीजरूपाने कथा आल्या आहेत. ऋग्वेदातील सूक्तांच्या वर्ण्य विषयांना अनुसरून त्यांचे वर्गीकरण असे करतात.  १. देवता सूक्ते  २. ध्रुवपद सूक्ते ३. कथा सूक्ते ४. संवाद सूक्ते ५. दानस्तुती सूक्ते ६. तत्वज्ञान सूक्ते ७. संस्कार सूक्ते ८. मांत्रिक सूक्ते ९. लौकिक सूक्ते १०. आप्री सूक्ते. सूक्ताचा जो वर्ण्य विषय असेल ती त्याची देवता होय. प्रत्येक सूक्ताचा द्रष्टा ऋषी किंवा ऋषिका ठरलेली आहे. गायत्री, जगती, त्रिष्टुप्‌‍ अशा छंदांमध्ये या ऋचांची रचना झाली आहे. काही मंत्रांचा विनियोग यज्ञयागादि कर्मात तसेच संस्कार कार्यातही करतात. उत्तरकालात व्यक्त झालेले  सुंदर तात्त्विक विचारांचे अधिष्ठानही ऋग्वेदच आहे. ऋग्वेदांतील उल्लेखांवरून आपल्याला प्रगल्भ व सुसंस्कृत अशा समाजाची कल्पना करता येते. अशा या ऋग्वेदाची पंचोपचारांनी पूजा करूया.

अध्वर्यू उपासक ॐ ऋग्वेदाय नम:|  चंदनं समर्पयामः|

अध्वर्यू – ऋग्वेदाला नमस्कार असो. चंदन अर्र्पण करतो.

अध्वर्यू उपासक – ॐ ऋग्वेदाय नम:| पुष्पाणि समर्पयामः|

अध्वर्यू – ऋग्वेदाला नमस्कार असो. फुले अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक – ॐ ऋग्वेदाय नम:|  धूपं आघ्रापयामः|

अध्वर्यू – ऋग्वेदाला नमस्कार असो. धूप अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक – ॐ ऋग्वेदाय नम:| दीपं दर्शयामः|

अध्वर्यू – ऋग्वेदाला नमस्कार असो. दीप दाखवतो.

अध्वर्यू उपासक – ॐ ऋग्वेदाय नम:| नैवेद्यं सर्मपयामः |

अध्वर्यू – ऋग्वेदाला नमस्कार असो. नैवेद्य अर्पण करतो.

आता आपण ऋग्वेदातील पहिला मंत्र म्हणून त्यानंतर त्यामधील निवडक मंत्रांचे पठण करू.

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्‌‍ | होतारं रत्नधातमम्‌‍ (ऋ. १.१.१)

यज्ञाच्या अग्रभागी स्थापन केलेल्या, ऋत्विज या नात्याने देवांना आवाहन करणाऱ्या, प्रज्वलित आणि ऐश्वर्यसंपन्न अग्नीची मी स्तुती करतो.

नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिद😐

      देवा नो यथा सदमिद्वृधे, असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे   (ऋ. १.८९.१)

कल्याणकारी, अजेय, अप्रतिहत, विरोधी शक्तींचा नाश करणारे संकल्प सर्व बाजूंनी आम्हाकडे येवोत. म्हणजे आम्हाला स्फुरोत. त्यामुळे देव आमच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्हाला वैभव प्राप्त होईल.

देवानां भद्रा सुमतिर्ऋजूयतां देवानां रातिरभि नो नि वर्तताम्‌‍|

      देवानां सख्यमुप सेदिमा वयं देवा आयु: प्र तिरन्तु जीवसे॥ (ऋ. १.८९.२)

सुचरित आणि कल्याणकारी अशा देवांचे बुद्धिबल आणि दैवी गुणसंपदा सदैव आम्हापाशी असो. देव आमचे पाठिराखे, आम्हाला आयुर्बल देणारे होवोत.

तमीशानं जगतस्तस्थुषस्पतिं, धियंजिन्वमवसे हूमहे वयम्‌‍|

      पूषो नो यथा वेदसामसद्वृधे रक्षिता पायुरदब्ध: स्वस्तये      (ऋ. १.८९.५)

चराचर सृष्टीचा जो स्वामी आहे, जो बुद्धीला प्रचोदना देणारा आहे, त्या देवदेवाला आहुती देतो. आमच्या आकांक्षा जाणणारा, आमचा सद्भाव आणि संपदा यांचे रक्षण करणारा जो शक्तिशाली, पूषादेव, त्यालाही आम्ही कल्याणार्थ आवाहन करतो.

स्वस्ति इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति : पूषा विश्ववेदा😐

      स्वस्ति नस्तार्क्ष्येा अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु   (ऋ. १.८९.६)

विशालकीर्ती इंद्र, सर्वज्ञ असा पूषादेव, दुरितहारक आणि चैतन्यमूर्ती वासुदेव, महावाणीचा अधिपती बृहस्पती हे सर्व देव आम्हाला कल्याणकारक होवोत.

भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: |

      स्थिरैरड्.गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायु:  (ऋ. १.८९.८)

हे देवांनो, आम्ही कानांनी कल्याणकारक तेच ऐकू, दृष्टीने मांगल्यपूर्ण पाहू. सुदृढ शरीराने आणि सतेज इंद्रियशक्तींसह आपण दिलेले हे जीवन उत्तम रीतीने व्यतीत करू.

स्वस्ति नो मिमीतामश्विना भग:

            स्वस्ति देव्यदितिरनर्वण: |

            स्वस्ति पूषा असुरो दधातु :

            स्वस्ति द्यावापृथिवी सुचेतुना           (ऋ. ५.५१.११)

हे अश्वि देवांनो, आम्हाला हितकारक अशा गोष्टी घडवा. अदिती म्हणजे आद्यशक्ती, भाग्यदाता भग आणि कल्याणकारी देव आमचे शुभ करोत. सर्वपोषक पूषन्‌‍ आणि आकाश-पृथ्वी हे युगुल आमचे कल्याण करो.

स्वस्तये वायुमुप ब्रवामहै, सोमं स्वस्ति भुवनस्य यस्पति😐

      बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये, स्वस्तय आदित्यासो भवन्तु :  (ऋ. ५.५१.१२)

प्राणशक्ती असलेला वायुदेव, भुवनस्वामी असलेला सोमदेव, सर्व लोकांचा प्रमुख असलेला बृहस्पती आणि सर्व आदित्य (आदिशक्तीची विविध रूपे) आम्हाला कल्याणप्रद होवोत.

विश्वे देवा नो अद्या स्वस्तये, वैश्वानरो वसुरग्नि: स्वस्तये|

      देवा अवन्त्वृभव: स्वस्तये, स्वस्ति नो रुद्र: पात्वंहस:   (ऋ. ५.५१.१३)

सर्व देव, ऐश्वर्यशाली, सर्वव्यापी अग्निदेव, अमृत तत्त्व देणारे ऋभुदेव आणि रुद्रदेवसुद्धा आम्हाला शुभप्रद होऊन सर्व क्लेश दूर करोत.

स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पथ्ये रेवति |

      स्वस्ति इन्द्रश्चाग्निश्च, स्वस्ति नो अदिते कृधि  (ऋ.  ५.५१.१४)

हे मित्रावरुणांनो, सत्पथावर प्रवास करीत असता तुमचे आशीर्वाद असोत. इंद्र, अग्नि आणि अदिती हेही आम्हास मांगल्यदायी होवोत.

स्वस्ति पन्थामनु चरेम, सूर्याचन्द्रमसाविव |

      पुनर्ददताघ्नता जानता, सं गमेमहि       (ऋ. ५.५१.१५)

चंद्रसूर्याप्रमाणे आम्हीही सन्मार्गावर नित्य मार्गक्रमणा करू असे घडो. उदारचरित, सुजन आणि विद्वान सत्पुरुषांचा आम्हाला सहवास घडेल असे होवो.

संसमिद्युवसे वृषत्रग्ने, विश्वान्यर्य |

            इळस्पदे समिध्यसे, नो वसून्या भर॥  (ऋ.१०.१९१.१)

हे उत्तरवेदीप्रदीप्त, जगद्व्यापक, आणि कामपूरक परमेश्वर अग्निदेवा त्ूा आम्हास धन प्रदान कर.

सङ्गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्‌‍ |

      देवा भागं यथा पूर्वे सञ्जनाना उपासते  (ऋ.10.191.2)

हे लोकांनो, तुम्ही एक विचाराचे, एक भाषणाचे आणि एक ज्ञानाचे व्हा. पुरातन सहविचारी लोकांप्रमाणे तुम्ही आपली कार्ये एकमताने करा.

समानो मन्त्र: समिति: समानी, समानं मन: सह चित्तमेषाम्‌‍|

      समानं मन्त्रमभि मन्त्रये : समानेन वो हविषा जुहोमि   (ऋ.१०.१९१.३)

हे लोकांनो, आपणा सर्वांची प्रार्थना, विचारस्थान, तसेच ज्ञान आणि मने एकसारखी असावीत. एकाच सामग्रीने आपण देवपूजन करावे.

      समानी आकूति: समाना हृदयानि :  |

      समानमस्तु वो मनो यथा : सुसहासति ॥   (ऋ.१०.१९१.४)

हे लोकांनो, संघशक्तिपुष्टयर्थ तुमचे अभिप्राय, अंत:करण, तसेच मन एक सारखे असावे.

अध्वर्यू संपूर्ण वैदिक साहित्यात यजुर्वेदाला एक विशिष्ट स्थान आहे. यजुर्वेदातील रचना गद्य व पद्य अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत. वैदिक कर्मकांडाचा मुख्य आधार यजुर्वेद असून यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार यजुर्वेदातच झालेला आहे. विविध यज्ञांमध्ये जे मंत्र म्हणावे लागतात व जे नियम पाळावे लागतात त्याची माहिती यजुर्वेदात मिळते. यजुर्वेदाचे शुक्ल व कृष्ण असे दोन भाग आहेत. ऋग्वेदातील तत्त्वज्ञानात्मक विचार यजुर्वेदात अधिक प्रगत झालेले दिसतात. ऋग्वेद काळातील देवतांचे स्वरूपही यजुर्वेदात बदललेले दिसते.  साहित्यिक दृष्टीने विचार केल्यास यजुर्वेद हा रूक्ष वाटू शकतो. पण वैदिक धर्माचा हा आधारभूत ग्रंथ असल्याने त्याचे महत्त्व अविवाद्य आहे. तर अशा या यजुर्वेदाचे पंचोपचारांनी पूजन करू.

अध्वर्यू उपासक ॐ यजुर्वेदाय नम:| चंदनं समर्पयामः|

अध्वर्यू            यजुर्वेदाला नमस्कार असो. चंदन अर्र्पण करतो.

अध्वर्यू उपासक ॐ यजुर्वेदाय नम:| पुष्पाणि समर्पयामः|

अध्वर्यू            यजुर्वेदाला नमस्कार असो. फुले अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक ॐ यजुर्वेदाय नम:|  धूपं आघ्रापयामः |

अध्वर्यू            यजुर्वेदाला नमस्कार असो. धूप अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक ॐ यजुर्वेदाय नम:| दीपं दर्शयामः |

अध्वर्यू            यजुर्वेदाला नमस्कार असो. दीप दाखवतो.

अध्वर्यू उपासक ॐ यजुर्वेदाय नम:| नैवेद्यं सर्मपयामः |

अध्वर्यू             यजुर्वेदाला नमस्कार असो. नैवेद्य अर्पण करतो.

आता आपण यजुर्वेदातील मंत्रांचे पठण करू.

ॐ त्र्यंबकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌‍ |                                                 उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ‍ |

(शुक्ल यजु. अ. ३. मं. ६०)

त्रिनेत्र अशा रुद्र देवाची आम्ही उपासना करतो. तो देव जीवनात सुगंध, सामर्थ्य आणि संरक्षक सत्ता यांचा बोध करून देणारा आहे. ज्याप्रमाणे परिपक्व असे फळ देठापासून अलगद वेगळे होते त्याप्रमाणे आम्ही मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हावे अमृतत्वापासून नको.

यथेमां वाचं कल्याणी मावदानि जनेभ्य: |

            ब्रह्मराजन्याभ्यां, शूद्राय चार्याय , स्वाय चारणाय |

            प्रियो देवानां दक्षिणायै दातुरिह, भूयासमयं मे काम:                                  समृध्यतामुपमादो नमतु ॥ (शुक्ल यजु अ. २६ मं. २)

या कल्याणी वाणीचा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्याचप्रमाणे सुसंस्कृत व असंस्कृत अशा सर्व मनुष्यमात्रांसाठी मी प्रचार करावा. या संसारात मी विद्वानांमध्ये आणि दानशूर लोकांमध्ये प्रिय व्हावे. माझी ही कामना पूर्ण होवो.

यज्जाग्रतो दूरमुदैति देवं, तदु सुप्तस्य तथैवैति |

            दूरङ्गमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु

जागृतपणी आणि सुप्त असतानाही ज्ञानग्रहणासाठी जे दूर दूर जाते, जे सर्व ज्ञेय वस्तूंना प्रकाशित करते त्या माझ्या ज्योतिर्मय चित्तात कल्याणाचा संकल्प उमटोत.

येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीरा:

      यदपूर्वं यक्षमन्त: प्रजानां, तन्मे मन: शिवसङ्कल्पमस्तु

ज्याच्या बलाने निग्रही, बुद्धिमान आणि धैर्यसंपन्न लोक यज्ञात, ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात अथवा संगरात श्रेष्ठ कार्य करतात,जे अपूर्व असून भूतमात्रांच्या हृदयात लपलेले असते ते माझे मन श्रेष्ठ संकल्प धारण करणारे होवो.

यत्प्रज्ञानमुत चेतो धृतिश्च, यज्ज्योतिरन्तरमृतं प्रजासु |

      यस्मान्न ऋते किञ्चन कर्म क्रियते तन्मे मन: शिवसङ्कल्पमस्तु ॥३॥

जे श्रेष्ठ ज्ञानाचे साधन असून सर्व जाणणारे व सर्व रूपे धारण करणारे आहे,  जे सर्व भूतमात्रांमध्ये अविनाशी अन्तर्ज्योतीच्या रूपाने वास करते आणि ज्याच्यावाचून  कोणतेही काम करता येत नाही ते माझे मन शुभ संकल्प करणारे होवो.

येनेदं भूतं भुवनं भविष्यत् ‍ परिगृहीतममृतेन सर्वम्‌‍ |

      येन यज्ञस्तायते सप्तहोता, तन्मे मन: शिवसङ्कल्पमस्तु ॥४॥

ज्या अविनाशी मनाच्या बलाने भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन गोष्टींचे ज्ञान होते, सप्तर्षि ज्या कर्मयज्ञाचे अध्वर्यू आहेत, त्या कर्मयज्ञाचा विस्तार ज्याच्यामुळे होतो, त्या माझ्या मनात कल्याणसंकल्प उमटो.

यस्मिन्नृच: साम यजूंषि यस्मिन्‌‍ प्रतिष्ठिता रथनाभाविवारा😐

      यस्मिन्‌‍ चित्तं सर्वमोतं प्रजानां तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु ॥५॥

रथचक्राच्या नाभीत ज्याप्रमाणे त्याचे सर्व आरे एकत्रित झालेले असतात त्याप्रमाणे ज्या मनात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे प्रतिष्ठित झालेले आहेत, भूतमात्रविषयीचे ज्ञान ज्यात ओतप्रोत भरलेले आहे असे माझे मन श्रेय संकल्प धारण करो.

सुषारथिरश्वानिव, यन्मनुष्यान्नेनीयतेभीशुभिर्वाजिन इव |

      हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्ठं, तन्मे मन: शिवसङ्कल्पमस्तु

(शुक्ल यजु. अ. ३४ मं. १ ते ६)

ज्याप्रमाणे कुशल सारथी घोड्यांना इच्छेनुसार कुठेही घेऊन जातो त्याप्रमाणे जे माणसांना फिरविते, घोड्यांना लगाम लावून खेचून धरावे तसे जे माणसांना नियंत्रित करते, असे ते सर्वांच्या हृदयात प्रतिष्ठित असलेले, नित्य नूतन आणि अत्यंत गतिमान्‌‍ असे माझे मन शुभ संकल्प धारण करो.

द्यौ: शान्तिः, अन्तरिक्षं शान्ति: पृथिवी शान्ति:

      आप: शान्तिः ओषधय: शान्ति: |

      वनस्पतय: शान्तिः, विश्वेदेवा: शान्तिः ब्रह्म शान्ति:,

      सर्वं शान्ति:, शान्तिरेव शान्ति:, सा मा शान्तिरेधि  

(शुक्ल यजु.अ. ३६ मं. १७)

आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, जल, औषधी वनस्पती, सर्व देव आणि सर्व वेद शान्तिदायक असोत. ॐ शान्ति असो, ॐ शान्ति असो, ॐ शान्ति असो, मला शान्तीचा लाभ होवो.

तच्चक्षुर्देवहितं पुरस्ताच्छुक्रमुच्चरत् |

      पश्येम शरद: शतम्‌‍, जीवेम शरद: शतम्‌‍, शृणुयाम शरद: शतम्‌‍,

      प्र ब्रवाम शरद: शतमदीना: स्याम शरद: शतं भूयश्च शरद: शतात्॥

(शुक्ल यजु. अ. ३६ मं. २४)

ज्या सत्यसूर्याची देवतांनी प्रतिष्ठापना केली, जो सर्वांच्या आधी उदयाला आला, जो तेजस्वी आहे, त्याला आम्ही शंभर वर्षे पाहू. आम्ही शंभर वर्षे उदात्त विचार ऐकू. शंभर वर्षे उत्तम विचार बोलू. शंभर वर्षे तर सामर्थ्यपूर्ण राहूच पण त्याहून अधिक कालही राहू.

अध्वर्यू सामवेदात पुष्कळसे ऋग्वेदातीलच मंत्र घेतले असून त्यांचे सस्वर गायन करण्याची पद्धती ऋषींनी विकसित केली आहे. साम म्हणजे सुंदर, सुखकारक असे गायन. यज्ञसंस्थेतील कर्मकांडात सामगान हा महत्त्वाचा भाग असे. भारतीय संगीतशास्त्राचे मूळ सामगायनातच सापडते. सामवेदाचे पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे दोन विभाग केलेले आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ‌’वेदानां सामवेदोऽस्मि |‌’ वेदांमध्ये मी सामवेद आहे असे म्हटले आहे. ‌’वेदा हि यज्ञार्थमभिप्रवृत्ता:|‌’ वेद हे यज्ञासाठीच उत्पन्न झाले आहेत अशी वैदिकांची धारणा असून ऋक्‌‍, यजु:, साम या तीन्ही वेदांचा यज्ञाशी प्रत्याक्षी संबंध आहे. आता आपण सामवेदाचे पंचोपचारांनी पूजन करूया.

अध्वर्यू उपासक       ॐ सामवेदाय नम:| चंदनं समर्पयामः |

अध्वर्यू                   सामवेदाला नमस्कार असो. चंदन अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक       ॐ सामवेदाय नम:| पुष्पाणि  समर्पयामः|

अध्वर्यू                   सामवेदाला नमस्कार असो.  फुले अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक       ॐ सामवेदाय नम:| धूपं आघ्रापयामः |

अध्वर्यू                   सामवेदाला नमस्कार असो. धूप अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक       ॐ सामवेदाय नम:| दीपं दर्शयामि |

अध्वर्यू                   सामवेदाला नमस्कार असो. दीप दाखवतो.

अध्वर्यू उपासक       ॐ सामवेदाय नम:| नैवेद्यं सर्मपयामः |

अध्वर्यू                   सामवेदाला नमस्कार असो. नैवेद्य अर्पण करतो.

आता आपण सामवेदातील मंत्रांचे पठण करू.

अग्निर्मूर्धा दिव: ककुत्पति: पृथिव्या अयम्‌‍ | अपां रेतांसि जिन्वति

(साम. पूर्वार्चिक १.३.७)

द्युलोकापासून पृथ्वीपर्यंत व्यापलेल्या सर्व जीवांचा अग्नीदेव हा पालनकर्ता आहे. तोच जलाला गती आणि रूप देण्यास समर्थ आहे.

शं नो देवीरभिष्टये शं नो भवन्तु पीतये | शं योरभि स्रवन्तु 😐

(साम. पूर्वाचिक. १.३.१३)

आम्हाला सुखशांती प्रदान करणारा, तो जलप्रवाह प्रकट व्हावा. ते जल पिण्यायोग्य, कल्याणकारी आणि सुखकर असावे.

यशो मा द्यावापृथिवी, यशो मेन्द्रबृहस्पती |

            यशो भगस्य विन्दतु, यशो मा प्रतिमुच्यताम्‌‍ |

            यशस्व्यास्या: संसदो ऽहं, प्रवदिता स्याम्‌‍ |       (साम. पूर्वार्चिक ६.३.१०)

द्यावा – पृथ्वी, इंद्र-बृहस्पती, सूर्य-चंद्र यांचे यश मला प्राप्त व्हावे. भग देवाचे यश माझा त्याग न करो. मी या सभेमधील यशस्वी असा वक्ता व्हावे.

: पवस्व शं गवे, शं जनाय शमर्वते | शं राजन्नोषधीभ्य: (साम. उत्तरार्चिक १.१.३)

हे कल्याणकारी सोमदेवा, आपण स्वत: शुद्ध होऊन पशूधन, प्रजा आणि सैन्याचे कल्याण करावे आणि औषधींना पवित्र बनवावे.

उद्‌‍ गा आजदङ्गिरोभ्य आविष्कृण्वन्‌‍ गुहा सती: |

      अर्वाञ्चं नुनुदे वलम्‌‍ | (साम. उत्तरार्चिक १७.३.३)

तेजस्वी लोकांसाठी इंद्रदेव अंतर्निहित अशा वेदवाणीला प्रकट करतो व ज्ञानाचा उदय होतो. अज्ञानरूपी वृत्राला घालवून टाकतो.

अध्वर्यू प्रारंभी यज्ञकर्मात ऋक्‌‍, यजु:, साम या वेदत्रयीलाच स्थान होते. अथर्ववेदाची निर्मिती नंतरच्या काळात झाली असावी असे वाटते. अथर्ववेदात यज्ञोपयुक्त असा फारच थोडा भाग आहे. अथर्ववेदातील वर्ण्य विषयांची व्याप्ती फार मोठी आहे. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदात स्पर्श केलेला आढळतो. अथर्ववेद हा वेदकालीन यज्ञधर्म आणि उपनिषदातील ब्रह्मविद्या यांच्यामधील सेतू आहे. अशा या समृद्ध, परिपक्व विचारांनी नटलेल्या अथर्ववेदाचे पंचोपचारांनी पूजन करूया.

अध्वर्यू उपासक ॐ अथर्ववेदाय नम:| चंदनं समर्पयामः|

अध्वर्यू            अथर्ववेदाला नमस्कार असो. चंदन अर्र्पण करतो.

अध्वर्यू उपासक       ॐ अथर्ववेदाय नम:| पुष्पाणि समर्पयामः|

अध्वर्यू                   अथर्ववेदाला नमस्कार असो. फुले अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक       ॐ अथर्ववेदाय नम:| धूपं आघ्रापयामः |

अध्वर्यू            अथर्ववेदाला नमस्कार असो. धूप अर्पण करतो.

अध्वर्यू उपासक       ॐ अथर्ववेदाय नम:| दीपं दर्शयामः|

अध्वर्यू            अथर्ववेदाला नमस्कार असो. दीप दाखवतो.

अध्वर्यू उपासक       ॐ अथर्ववेदाय नम:| नैवेद्यं सर्मपयामः |

अध्वर्यू            अथर्ववेदाला नमस्कार असो. नैवेद्य अर्पण करतो.

आता आपण अथर्ववेदातील मंत्रांचे पठण करू.

यथेन्द्रो द्यावापृथिव्योर्यशस्वान्‌‍, यथाप ओषधीषु यशस्वती 😐

      एवा विश्वेषु देवेषु, वयं सर्वेषु यशस: स्याम | (अथर्व. ६.५८.२)

ज्याप्रमाणे इंद्र द्यावा – पृथ्वींमध्ये यशस्वी आहे. ज्याप्रमाणे जलधारा औषधींमध्ये श्रेष्ठ आहेत. त्याप्रमाणे तेजस्वी लोकांमध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ व्हावे.

इमानि यानि पञ्चेन्द्रियाणि मन:षष्ठानि मे हृदि ब्रह्मणा संशितानि |

यैरेव ससृजे घोरं, तैरे शान्तिरस्तु 😐    (अथर्व. १९.९.५)

मन ज्यांचा साथीदार आहे अशी पाच इंद्रिये माझ्या हृदयात अशांति उत्पन्न करतात. विवेकाद्वारे परिष्कृत होऊन त्यांच्याद्वारेच आम्हाला शांति प्राप्त व्हावी.

अभयं : करत्यन्तरिक्षमभयं द्यावापृथिवी उभे इमे |

      अभयं पश्चादभयं पुरस्तात‍, उत्तरादधरादभयं नो अस्तु॥ (अथर्व १९.१५.५)

पृथ्वी आणि आकाश यांचे सुस्थिर युगुल आणि त्यामधील अंतरिक्ष हे आम्हाला पुढून, मागून, वरून, खालून अशा सर्व बाजूंनी अभयप्रद असो.

अभयं मित्रादभयममित्रादभयं ज्ञातादभयं पुरो : |

      अभयं नक्तभयं दिवा : सर्वा आशा मम मित्रं भवन्तु॥  (अथर्व. १९.१५.६)

आमच्या मित्राकडून आणि शत्रूकडून, ज्ञात आणि अज्ञात वस्तूपासून, रात्री आणि दिवसा आम्हाला अभय असो, सर्व दिशांनी मला स्नेहप्राप्ती होवो.

भद्रमिच्छन्त ऋषय:,स्वर्विदस्तपो दीक्षामुपनिषेदुरग्रे |

      ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसंनमन्तु॥    (अथर्व. १९.४१.१)

सर्वांचे हितचिंतक, आत्मज्ञानी ऋषी सृष्टीच्या प्रारंभी तप, दीक्षा आदी नियमांचे पालन करत होते. त्यामधून राष्ट्रीय भावना, बल आणि सामर्थ्य उत्पन्न झाले. म्हणून जाणत्या लोकांनी त्या राष्ट्रापुढे नम्र होऊन त्याची सेवा करावी.

अध्वर्यू पवित्र वेदमंत्रांच्या लहरी या ठिकाणी भरून राहिल्या आहेत. आपल्या मनातही पवित्र विचार आहेत. आता आपण या कलशातील जलाने यजमानांवर अभिषेक करू. जल हे स्वभावतःच शांत असते. त्यालाच जीवन असे नाव आहे. अशा या शांत, पवित्र व जीवनदायक जलाने अभिषेक होत असताना आपण काया, वाचा, मने, अधिकाधिक शांत, पवित्र होत आहोत असा अनुभव घ्यावा.

(पूजन केलेल्या कलशातील पाणी छोट्या पात्रांमध्ये घेऊन आंब्याच्या पानांनी ज्येष्ठ व्यक्तींनी यजमानांवर अभिषेक करावा. अभिषेक करताना अध्वर्यू पाठोपाठ खालील मंत्र म्हणावेत.)

अध्वर्यू उपासक

देवस्य त्वा सवितु: प्रसवे                                                      अश्विनोः बाहुभ्यां, पूष्णो हस्ताभ्याम्‌‍                                             अग्नेः तेजसा सूर्यस्य वर्चसा

            इन्द्रस्य इन्द्रियेण अभिषिञ्चामि |

            बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॥               (ऐतरेय ब्राह्मण ८.३)

              भूर्भुव: स्व: | अमृताभिषेकोऽस्तु |

            शान्ति: पुष्टि: तुष्टि: अस्तु |

 

अध्वर्यू सर्वप्रेरक सविता देवाच्या प्रेरणेने, अश्विनीकुमारांच्या बाहूंनी, पूषा देवाच्या हस्तांनी, अग्नीच्या तेजाने, सूर्याच्या कान्तीने, इन्द्राच्या इन्द्रियशक्तीने तुम्हास, बल, संपत्ती, यश आणि भरपूर अन्न प्राप्त व्हावे, म्हणून हा अभिषेक करत आहोत. जलबिंदूचा हा अभिषेक तुमच्यासाठी अमृतवर्षाव ठरो आणि तुम्हांस शांती, समृद्धी व संतोष यांचा लाभ होवो.

कोणत्याही पूजेमध्ये चराचरांत भरून राहिलेली ईश्वरीशक्ती समोरच्या मूर्तीमध्येही आहे असा भाव ठेवणे महत्त्वाचे असते. पूजेच्या सुरुवातीला त्या देवतेला आपण पूजेचा स्वीकार करण्यास यावे असे सांगतो त्याला ‌’आवाहन‌’ म्हणतात. तर शेवटी त्याला प्रेमाने निरोप देतो, त्याला ‌’विसर्जन‌’ म्हणतात. आता आपण पुढील मंत्राने येथे आलेल्या सर्व देवतांचे विसर्जन करू.

अध्वर्यू उपासक

            आवाहनं जानामि जानामि विसर्जनम्‌‍ |

            पूजां चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर

अध्वर्यू हे परमेश्वरा, तुला कोणत्या प्रकारे बोलवावे, कोणत्या प्रकारे तुझे आदरातिथ्य करावे आणि तुला कसा निरोप द्यावा हे मला समजत नाही. तरी माझ्या पूजेत काही अधिक-उणे राहिले असेल तर तू पूर्ण मानून घे.

अध्वर्यू उपासक  –

            यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम्‌‍ |

            इष्टकामप्रसिद्ध्यर्थं, पुनरागमनाय |

अध्वर्यू प्रस्तुत पूजेचा स्वीकार करून सर्व देवगणांनी स्वस्थानी गमन करावे. पण आमच्या मनोकामनांची पूर्ती करण्यासाठी पुनश्च यावे.

अध्वर्यू गायत्री मंत्राने आपण या विधीची सांगता करू. सर्व मंत्रात श्रेष्ठ असा हा मंत्र आहे. हा चारही वेदांमध्ये येतो. उपासनेची आपली परंपरा ऋग्वेदापासून चालत आली आहे. कोणाची उपासना आपण करतो? भूलोक, भुवर्लोक अशा सप्तलोकांचे म्हणजेच निराळ्या शब्दात पृथ्वी, ग्रहमाला आणि आपल्या ग्रहमालेचा सूर्य या लोकांचे, असे कोट्यवधी सूर्य, त्यांना सामावणारी आपली आकाशगंगा, अशा अनंत आकाशगंगा, त्यांच्या केंद्रस्थानी असणारा, अनंत कोटी ब्रह्मांडांना प्रकाश देणारा तो सविता या सर्वांचे आपण स्मरण करतो. सर्वांना स्फुरण देणारा तो सविता आपल्याला, आपल्या देशाला स्फुरण देवो अशी आपण प्रार्थना करूया.

अध्वर्यू आणि उपासक ॐ,   ॐ,   ॐ

(२ मिनिटे ध्यान)

अध्वर्यू आणि उपासक

ॐ,   ॐ,   ॐ

ॐ    भू:|   हे पृथ्वी.

ॐ    भुव:|  हे अन्तरिक्ष

ॐ    स्व: | हे सूर्य

ॐ    मह:|  हे कोटिसूर्य

ॐ    जन: | हे आकाशगंगा

ॐ    तप: | अनन्त आकाशगंगा

ॐ    सत्यम्‌‍ |  हे परब्रह्म

 

ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‌‍ भर्गो देवस्य धीमहि |

धियो यो न: प्रचोदयात् ॥

या परब्रह्माच्या, देवाच्या, श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो.

अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो.

 

ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु |